जलद लेखन स्पर्धा - फेब्रुवारी -२०२६
विषय:- खरा गुन्हेगार
शीर्षक:- तपास
भाग:- ४
"नाही सर, आम्ही आमच्या मुलाला का गायब करू? उलट आता आम्हालाच त्याची जास्त काळजी वाटू लागली आहे. त्याला लवकर शोधा, सर प्लीज." मिसेस मोहिते रडवलेल्या सुरात विनंती करत हात जोडत म्हणाली.
"हो, सर आणि पुरावे आम्ही लगेच सादर करू. तुम्ही त्या अनाथाश्रमात आणि पोलीस स्टेशनमध्ये विचारपूस करून पाहा, तुम्हाला पुरावे मिळतील." मिस्टर मोहिते पत्नीला सावरत म्हणाले.
त्याने सांगितल्याप्रमाणे प्रधानांनी चौकशी केली तर ते खरे निघाले. नंतर ते निघून गेले.
प्रधान विचार करत होते. त्यांना आठवले की राजेंद्र यांच्या युनिटमधले दोघे जण गायब होते. पण त्यांच्या चौकशीतूनही काही सापडले नाही.
नंतर त्यांना अजून एक गोष्ट आठवली की केतनने सांगितले होते की ज्या संदुकमध्ये राजेंद्र यांचे प्रेत सापडले होते ते संदुक त्यांच्या युनिटचे नव्हते. ते हुबेहूब तसे बनवून घेतले होते. मग ते कोणी व का बनवून घेतले असेल? हे शोधून काढण्यासाठी त्यांनी त्या संदुकचे फोटो काढून त्यांचे असिस्टंट घारे आणि शिवरे यांना चौकशी करायला सांगितले होते.
तेवढ्यात घारे यांचा त्यांना काॅल आला.
"सर, त्या संदुकबद्दल कळले आहे, तुम्हाला मी लोकेशन पाठवतो तुम्ही तिथे या." घारेने त्यांना सांगितले.
थोड्याच वेळात प्रधान त्या ठिकाणी आले.
ज्याने ती संदुक बनवली होती तो म्हणाला,"सर, हे संदुक मीच तयार करून दिले होते. एक बाई आणि पुरुष आले होते, या संदुकचे फोटो घेऊन."
"अच्छा, मग ते दिसायला कसे होते? म्हणजे त्यांचे वर्णन करू शकता तुम्ही? ज्यामुळे त्यांना ओळखता येईल." प्रधान त्याच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत म्हणाले.
"माफ करा, सर. मी त्यांचे वर्णन करू शकणार नाही, कारण त्या बाईने पूर्ण चेहरा स्कार्फने झाकून घेतला होता आणि पुरुषाने जोकरसारखा मेकअप केला होता. त्यामुळे ओळख सांगणे कठीण आहे." तो माणूस सुस्कारा टाकत म्हणाला.
"ठीक आहे" म्हणत ते आपल्या टीमसह परत पोलीस स्टेशनला आले.
ते टेबलावरील पेपरवेट गोल गोल फिरवत विचार करत घारेंना म्हणाले,"घारे, हा जो कोणी खूनी आहे तो राजेंद्र यांच्या युनिटमधलाच कोणीतरी आहे. त्यांच्या युनिटमध्ये किती महिला आहेत?"
"पाचजण आहेत, सर." घारे पाठीमागे हात बांधून म्हणाले.
"ओके, लेट्स गो, देअर. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो मास्क काढून पाहू." कॅप डोक्यावर चढवत प्रधान म्हणाले.
ते पुन्हा युनिटला भेटायला गेले. त्याआधीच त्यांनी केतनना फोन करून सर्वांना बोलावून घ्यायला लावले होते. त्यामुळे सगळे तिथे उपस्थित झाले होते. सगळ्यांचे चेहरे गंभीर तर झाले होते ; घाबरणारे भावही होते.
"तुमच्यापैकी कोणी संदुक बनवायला गेले होते का? कारण आम्हाला कळले आहे की एक बाई आणि पुरुष वेश बदलून तिथे गेले होते. बऱ्या बोलाने विचारतोय, खरं खरं सांगा, तुमच्यापैकी कोणी गेलं होतं का?" प्रधान सगळ्यांवर करारी नजर टाकत कडक आवाजात विचारलं.
"नाही सर, आमच्यापैकी कोणी नसेल. कारण सगळ्यांना राजूसरांविषयी कोणतीही तक्रार नव्हती. कोणी दुसरं असेल जे आमच्या युनिटचा फायदा घेतला असेल." राघवने सगळ्यांकडे पाहत म्हणाला.
त्यावर सर्वांनी माना डोलावल्या.
तेवढ्यात प्रधानांना शिवरे यांचा फोन आला जे ऐकून ते चकित झाले आणि म्हणाले,"बरं, त्याचे उपचार चालू करायला सांगा, मी लगेच येतो." असे बोलून त्यांनी मोबाईल पॅन्टच्या खिशात ठेवला आणि पुन्हा सगळ्यांकडे वळत म्हणाले," तळ्याजवळच्या जंगलात जितू सापडला. सध्या तो बेशुद्ध आहे. डाॅक्टरांना ट्रिटमेंट करायला सांगितले आहे."
"बरं झालं तो सापडला. सर, आम्ही त्याला भेटू शकतो का? प्लीज सर." रिटा विनंती करत म्हणाली.
"ठीक आहे." ते म्हणाले तसे केतन आणि रिटा लगबगीने निघाले.
प्रधान वाटेतच डाॅक्टरांना ते येईपर्यंत कोणालाही जितूला भेटू देऊ नका असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
मोहिते दांपत्यालाही जितूबद्दल कळले तसे तेही हाॅस्पिटलमध्ये पोहचले आणि त्याला भेटण्यासाठी डाॅक्टरांना विनंती करू लागले. प्रधान यांनी सांगितल्यामुळे त्यांनी कोणालाही भेटू दिले नाही.
थोड्याच वेळात प्रधान तिथे पोहोचले. जितूला इथे कोणी आणले हे विचारले तेव्हा एका भल्या माणसाने तिथे आणल्याचे कळले. त्याची विचारपूस केल्यावर त्याने सांगितले की तो जंगलात लाकडे आणण्यासाठी गेला असता जितू तिथे बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला त्याने इथे आणले आणि पोलिसांना कळवायला सांगितले.
प्रधान यांनी त्याचे आभार मानून त्याला ती जागा दाखवायला सांगितली.
नंतर जितूची चौकशी करून तो शुद्धीवर येताच लगेच कळवायला सांगितले आणि बाकी तिथे आलेल्या सगळ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आणि तिथे दोन काॅनस्टेबलांना काही सुचना देऊन तिथल्या हालचालीवर लक्ष ठेवायला तैनात केले.
ते स्वतः आपल्या काही माणसांना घेऊन त्या माणसासोबत जंगलाकडे निघाले. त्याने ती जागा दाखवली आणि तो निघून गेला. गरज पडल्यास त्याला पुन्हा बोलवण्यात येईल असे त्याला सांगण्यात आले.
त्या जागेचे ते निरीक्षण करू लागले. जसे ते पुढे जाऊ लागले तसे त्यांना एक पडके घर दिसले. साधवपणे ते सगळे त्या घराकडे कूच केले. सावधपणे पावले टाकत ते त्या घराचे निरीक्षण करू लागले. ते घर खूपच जुनाट, अंधारलेले होते. ते आत जाताच त्यांना एके ठिकाणी एक रिकामी खुर्ची आणि काही तुटलेले दोरखंड दिसले. त्यावरून जितूला तिथे बांधून ठेवल्याचे समजले.
दुसऱ्या रूममध्ये काही तुटके फुटके फर्निचर होते. खूप शोधाशोध केल्यावर एका टेबलाखाली चाकू मिळाला, ज्यावर वाळलेले रक्त होते आणि एक बूटही मिळाले. जे पाहून घारे म्हणाले,"सर, हे बूट राजेंद्र यांचे आहे. कारण त्या दिवशी त्यांच्या एकाच डाव्या पायात बूट होते. हे त्यांचेच असावे. हे उजव्या पायाचे बूट आहे."
"हम्म, निरीक्षण चांगले आहे तुमचे, घारे. मला वाटतं की याच चाकूने त्यांचा खून याच ठिकाणी झाला असावा. हा चाकू फाॅरेन्सिक लॅबमध्ये पाठवून द्या. खूनी आता जास्त दूर नाही, तो लवकरच आपल्या ताब्यात येईल. जितू काय सांगतो बघू या." त्यांनी आधी घारेंचे कौतुक केले आणि नंतर विचार करत म्हणाले.
"हो, थॅंक्यू, सर. राजेंद्र यांना जो मेसेज आला होता ते लोकेशन आणि त्यांना जो लास्ट काॅल आला होता त्याचेही लोकेशनही कळले." घारे म्हणाले.
ते मान डोलावत काही बोलणार तोच जितू शुद्धीवर आल्याचा फोन आला. तसे ते पुन्हा हाॅस्पिटलच्या दिशेने निघाले.
क्रमशः
कोणी केला असेल राजेंद्रचा खून? जितूला कोणी व का किडनॅप केले होते?
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा