जलद लेखन स्पर्धा- फेब्रुवारी -२०२६
विषय:- खरा गुन्हेगार
शीर्षक:- तपास
भाग:-३
सगळ्यांची भांबेरी उडाली. प्रेक्षकांमध्ये एकच गदारोळ माजला. जो तो घाबरून जागेवरच खिळून बसला.
आयोजकही या घटनेने हादरून गेले; पण परिस्थिती पाहून त्यांनी सर्वांना शांत राहण्याची विनंती करत पोलिसांना कळवले. पोलीस येईपर्यंत प्रेक्षकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यामुळे प्रेक्षक कुजबुजत एका कोपऱ्यात उभे राहिले.
राजेंद्र यांचे प्रेत पाहून केतनसह सर्वांनाच जबरदस्त धक्का बसला होता. तरी त्याने स्वतःला सावरले. कारण त्यांच्या लक्षात आले की हारनेसवरून तर जितू येणार होता. मग जितूच्या ऐवजी राजेंद्र कसे आले आणि जितू कुठे गेला? त्याच्या मनात प्रश्न आला. त्याने राघवला हाताशी घेऊन जितूचा शोध घ्यायचा ठरवले.
ज्या ठिकाणाहून तो येणार होता. तेथे जाऊन पाहिले; पण तो तिथे नव्हता. खूप शोधाशोध करूनही तो सापडला नाही. तेव्हा त्यांना आता जितूची खूपच काळजी वाटू लागली.
तेवढ्यात पोलीस घटनास्थळी आले. विचारपूस केल्यानंतर प्रेक्षकांची सुटका झाली. पण खूप सारे प्रश्न अनुत्तरितच राहिले होते.
राजेंद्रचा यांच्या पोटात चाकू खूपसल्याच्या खुणांवरून हा खून असल्याचे पोलिसांना स्पष्ट झाले. शरीर आखडले होते यावरून खून रात्रीच झाला असावा, असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला. आता प्रश्न होता तो जितूचा? तो कुठे गायब झाला? त्याच्यासोबतही काही घातपात झाला होता का? हा प्रश्न होता.
राजेंद्रच्या पूर्ण युनिटची कसून चौकशी करण्यात आली. त्याच्या युनिटमध्ये लगबग चौदा-पंधराजण होते. त्यातले दोघेजण गायब होते. त्यांच्याबद्दल चौकशी केल्यावर ते शो संपल्यावर पसार झाले होते.
पोलिसांनी जितू कोणत्या संदुकमधून गायब झाला आणि तो कोठून पुन्हा स्टेजवर येणार होता हे केतन आणि त्याच्या सहकाऱ्यांना विचारले.
केतनने सर्व माहिती देत ती जागा दाखवली जेथून जितू येणार होता. तेथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की तिथे चार-पाच संदुक आहेत.
प्रत्येक संदुक त्यांनी उघडून पाहिली. त्यातल्या एका संदुकमध्ये रक्ताचे डाग आढळून आले. म्हणजे ते नक्कीच राजेंद्रचे रक्त असेल असा अंदाज काढण्यात आला. फॉरेन्सिक लॅबमध्ये त्याचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले आणि राजेंद्रचे प्रेत पोस्टपार्टमसाठी रवाना करण्यात आले.
राजेंद्रचा मोबाईल मात्र सापडला नाही. त्यांचे लास्ट लोकेशन शहरातल्या एका तळ्याजवळचे असल्याचे समोर आले.
चौकशी दरम्यान पोलिसांनी जेव्हा राजेंद्र यांची कोणाशी वैर होते का? कोणी वाईटावर होते असे विचारण्यात आल्यावर
त्या जोडप्याबद्दल केतनकडून त्यांना कळले. शो दरम्यान त्याने त्यांचे फोटो काढले होते ते त्याने त्यांना दिले.
त्या जोडप्याबद्दल केतनकडून त्यांना कळले. शो दरम्यान त्याने त्यांचे फोटो काढले होते ते त्याने त्यांना दिले.
संशयाची दुसरी सुई त्यांच्याकडे वळली. पहिली सुई त्या पसार झालेल्या दोघांवर होती. खबऱ्यांकडून त्या जोडप्यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले. ते थोडे रागातच तिथे आले आणि म्हणाले,"सभ्य माणसांना का त्रास देत आहात? इथे का बोलावले आम्हाला?"
"तुम्ही जादूगार राजेंद्र यांना ओळखता का?" इन्स्पेक्टर प्रधान जे या केसाचा तपास करत होते, त्यांनी थेट प्रश्न केला.
"हो. त्यांचा काय आता?" तो पुरुष म्हणजेच मिस्टर मोहितेने विचारले.
"त्यांचा खून झालाय, हे तर एव्हाना तुम्हाला कळेलच असेल आणि.." इन्स्पेक्टर प्रधान अजून पुढे काही बोलणार तोच मिसेस मोहिते धक्का बसल्यागत तोंडावर हात ठेवत म्हणाल्या,"काय? पण हे कसे झाले?"
"त्यांच्या खून झाला तर त्याचा आमच्याशी काय संबंध?" मिस्टर मोहिते पत्नीकडे पाहत म्हणाले.
"दोन दिवसांपूर्वी तुम्ही त्यांना भेटला होतात आणि त्यांना धमकीही दिली होती, हे खरं आहे ना." प्रधान त्यांना पाहत शांतपणे म्हणाले.
"हो, पण याचा अर्थ आम्ही खून केला असं नाही ना होतं. आमची महत्त्वाची अशी गोष्ट त्यांच्या जवळ होती. ती आम्हाला पाहिजे होती, ते मागण्यासाठी फक्त धमकावले होते, बाकी आम्ही काहीच केले नाही." मिस्टर मोहिते थोड्या सौम्य भाषेत बोलले.
"ती कोणती गोष्ट, आम्हाला कळू शकेल का?" प्रधान आवाज जरब आणत विचारले.
मिस्टर मोहितेने पत्नीवर एक नजर टाकली.
"आमचा मुलगा, जितू ..!" मिसेस मोहिते जसं ती हे म्हणाली तसे प्रधान चकित झाले आणि म्हणाले,"ओह, म्हणून तुम्ही राजू यांचा खून करून जितूला गायब केलेत. आता पटकन.."
त्याचे बोलणे मध्येच तोडत मिसेस मोहिते धक्का लागून डोळ्यांत पाणी आणत म्हणाली,"काय, जितू गायब आहे! पण कसं काय? सर, आमच्या मुलाला लवकर शोधा."
"नाटक छान करता तुम्ही? कशावरून जितू तुमचा मुलगा आहे, पुरावा काय?" प्रधान धारदार आवाजात विचारले.
"आमच्याकडे पुरावे आहेत, सर. आमचा मुलगा जितू लहानपणी हरवला होता. खूप शोध घेऊनही तो सापडला नाही. नंतर आम्हाला कळलं की तो एका अनाथाश्रमात आहे. म्हणून आम्ही त्याला घ्यायला गेलो तिथे तर राजेंद्र आधीच त्याला दत्तक घेऊन गेला होता. त्याच्या पत्त्यावर आम्ही गेलो होतो; पण तो तिथे नव्हता. तो जितूला घेऊन कोठे गेला ते कळले नाही. मग अचानक या शहरात तो आला. म्हणून मग आम्ही त्याला आमचा जितू परत मागत होतो, विनंती करत होतो ; पण तो होता की आम्हाला सतत नकार देत होता. म्हणून मग त्या दिवशी आम्ही धमकी दिली." मिस्टर मोहिते खरं काय ते सांगून टाकले.
"अच्छा, म्हणूनच तुम्ही जितूला मिळवण्यासाठी आधी राजेंद्रला फोन करून बोलावून घेतलेत आणि नंतर त्यांचे प्रेत संदुकमध्ये ठेवून स्टेजवर टाकले आणि जितूला गायब केलेत. चुपचाप तो कोठे आहे ते सांगा. नाही तर खरं कसं वदवून घ्यायचं हे आम्हाला चांगलच माहिती." प्रधान टेबलाला टेकवून उभे राहत रोखून पाहत म्हणाले.
क्रमशः
मिस्टर आणि मिसेस मोहिते खरंच खूनी असतील का?
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा