जलद लेखन स्पर्धा- फेब्रुवारी-२०२६
विषय:- खरा गुन्हेगार
शीर्षक:- तपास
भाग:-२
रात्री जेवण झाल्यावर राजू आणि जितू दोघेही गप्पा मारत झोपायची तयारी करत होते. तेवढ्यात राजूंचा मोबाईल खणखणला. त्यावरील नाव पाहून त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि थोडा रागही आला.
ते तडक उठून बेडरूममधून बाहेर येऊन फोन उचलून रागात गरजले,"एकदा सांगितलेले कळत नाही का तुला? हम्म, आलो थांब."
फोन कट केला आणि रागातच ताडताड पावले टाकत जितूला काहीही न सांगता दार उघडून ते बाहेर निघून गेले.
ते बाहेर पडलेले पाहून जितू पळतच बाहेर आला आणि "पप्पा, पप्पा" म्हणत दार उघडून बाहेर पाहिले ; तोपर्यंत राजू निघून गेले होते. त्याने त्यांना फोन केला; पण त्यांनी फोन उचलला नाही. पुन्हा पुन्हा फोन ट्राय केला पण त्यांनी काही फोन उचलला नाही. त्याला खूप भीती आणि काळजी वाटू लागली. त्याने बराच वेळ वाट पाहिली. त्यातच त्याचा डोळा लागला. मध्य रात्र उलटून गेली तेव्हा त्याला जाग आली; ते आजूबाजूला पाहिले पण तेही काही आले नाहीत आणि त्यांचा फोनही आला नाही. तेव्हा त्याला रडायला येऊ लागले. त्याने मग केतनला फोन करून सगळे सांगितले.
"सर येतील, काळजी करू नकोस. मी येतोय लगेच." केतन त्याला दिलासा देत म्हणाला.
साधारण अर्धा तासाने केतन त्यांच्या युनिटमधल्या राघव व रिटाला सोबत घेऊन तिथे आला.
दार उघडल्या उघडल्या जितू केतन आणि रिटाच्या गळ्यात पडून रडू लागला.
त्या दोघांना केतनने येताना वाटेत राजूबद्दल कल्पना दिली होती. त्यांनीही राजूंचा फोन ट्राय केला होता; पण एकाचाही फोन त्यांनी उचलला नाही. ते असे कधीच करत नव्हते. काम झाल्यावर तरी ते काॅल बॅक करत होते. त्यामुळे त्यांनाही त्यांची काळजी वाटू लागली.
त्यात आता जितूला रडताना पाहून तर त्यांना कसंतरीच वाटू लागले.
तिघांनी त्याला समजावून कसेबसे झोपी लावले. ते सगळे विचार करत राहिले.
"मला तर खूप काळजी वाटू लागली सरांची, देव करो ते ठीक असतील." केतन जितूकडे एक नजर टाकत हळू आवाजात रिटा आणि राघवला म्हणाला.
"हो ना, बघूया सकाळपर्यंत वाट पाहू. नाहीच आले तर मग पोलिसांकडे तक्रार करू." राघव म्हणाला.
त्यावर रिटा आणि केतन यांनी मान डोलावत दुजोरा दिला.
तासभरांनी लगेच जितूला जाग आली. तो "पप्पा, पप्पा," म्हणत दचकून इकडे तिकडे पाहू लागला.
रिटा लगबगीने त्याच्याजवळ आली आणि त्याला सावरू लागली.
सकाळपर्यंत कशीबशी त्यांनी कळ काढली. सकाळ होताच, केतनने हळूच राघवला इशारा केला तसा तो पोलीसमध्ये राजेंद्र गायब होण्याची तक्रार नोंद करायला गेला.
काही वेळाने तो परत आला. बाकी काही सहकारीही तेथे आले. सगळ्यांचे चेहरे गंभीर झाले होते. संध्याकाळी शो होता, त्याचंही सर्वांना टेन्शन आले होते.
आयोजकांचा फोन आल्यावर काय उत्तर द्यायचे हा मोठा पेच केतनला पडला. त्याचा विचार त्याच्या मनात सतत घोळत होता.
साधारण साडे आठच्या दरम्यान जितूच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली. त्यावर पप्पा असे नाव पाहून जितूची कळी खुलली. सर्वांना दाखवत त्याने उत्साहाने राजेंद्रचा मेसेज वाचायला सुरुवात केली.
"मी सुखरूप आहे. लवकरच परत येईन. जितूबाळा, तू काळजी घे." असा मेसेज वाचून दाखवल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.
तरीही जितूने त्यांना फोन लावून पाहिला ; पण आताही फोन उचलला गेला नाही. तो हिरमुसला. केतन त्याला समजावत होता.
तेवढ्यात केतनला आयोजकांचा संध्याकाळच्या शो बद्दल फोन आला. त्याने शो होईल असे आश्वासन दिले. तेव्हा रिटाने त्याला प्रश्नार्थक नजरेने पाहिले.
तेवढ्यात केतनला आयोजकांचा संध्याकाळच्या शो बद्दल फोन आला. त्याने शो होईल असे आश्वासन दिले. तेव्हा रिटाने त्याला प्रश्नार्थक नजरेने पाहिले.
तेव्हा तो जितूजवळ जात म्हणाला,"जितू, सर आता सुखरूप आहेत. ते कधी येतील ते माहिती नाही. आयोजक फोन करत आहेत तर आपण संध्याकाळचा शो करूया. तुला आता सांभाळून घ्यावे लागेल."
"हो, अंकल; पण पप्पा नाहीत तर मी कसे करू शकतो? मला जमेल का?" जितूने विचारले.
"नक्कीच करशील. सरांच्या जागी राघव परफाॅर्म करेल." केतनने सुचवले.
राघव चाट पडत म्हणाला,"अरे केतन, मी सरांचा असिस्टंट म्हणून काम करतो, डायरेक्ट त्यांची जागा कशी घेऊ?"
"अरे चेहऱ्यावर मास्क लावायचा. सरही मास्कच लावायचे. त्यामुळे कोणाला काही कळणार नाही. तू फक्त काॅन्फिडेन्टली उभा राहा. फक्त सरांचे बोलणे आठव एकदा. बाकी सगळे आहेतच सांभाळून घेतील."
राजेंद्र नेहमीच सांगायचा की काही झालं तरी शो थांबवायचा नाही. त्यामुळे ती गोष्ट आठवून सगळ्यांनी तो शो करण्याचा निर्णय घेतला.
संध्याकाळी शोची सुरुवात रिटाच्या डान्सने झाली. नंतर राजेंद्रप्रमाणे जितूनेही स्वतःला संदुकामध्ये बंद करून घेतले. काही क्षण शांतता पसरली. प्रेक्षक रोखून पाहत होते. अचानक वरून काहीतरी स्टेजवर कोसळले.
धप्प ऽऽ....!
ते होते.. हारनेसवर लटकत आलेले राजेंद्रचे प्रेत.
क्रमशः
राजेंद्रचे प्रेत तिथे कसे आले? काय झाले होते त्यांच्यासोबत?
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा