Login

तपास (भाग -१)

जादूच्या प्रयोग चालू असताना अचानक स्टेजवर मुख्य जादूगारचे प्रेत वरून स्टेजवर कोसळते आणि त्यांचा मुलगाही गायब होते. ह्या गुन्हाचा तपास इन्स्पेक्टर प्रधान करून खऱ्या गुन्हेगाराला कसा शोध घेतात जाणून घ्या या कथेत..
जलद लेखन स्पर्धा- फेब्रुवारी-२०२६

विषय:- खरा गुन्हेगार

शीर्षक:- तपास

भाग:-१

प्रसिद्ध जादूगार राजेंद्र यांच्या जादूचा खेळ चालू होता. ज्यांना लोक प्रेमाने जादूगार राजू म्हणायचे. प्रेक्षागृहात बसलेले प्रेक्षक अगदी थक्क होऊन त्यांची जादू पाहत होते. त्यात त्यांचा बारा वर्षांचा मुलगा जितेंद्रही सामील होता. जो जितू नावाने प्रसिद्ध होता. तोही वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून जादूचे प्रयोग करायचा.

"मायबाप पब्लिक, आता खरी जादू तुम्हाला पाहायला मिळेल. मी तुमच्या समोर या संदुकमध्ये बसेन आणि काही मिनिटांतच तुमच्या सर्वांच्यावरून उडत असल्यासारखे येईन." राजू त्यांच्या भारदस्त आवाजात एका भल्यामोठ्या, सुंदर नक्षीकाम असलेल्या लाकडी संदुककडे बोट करत म्हणाले.

सगळे प्रेक्षक अगदी श्वास रोखून तो प्रयोग पाहू लागले.

राजेंद्र यांनी त्या संदुकमध्ये आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्वतःला कैद करून घेतले.

थोड्याच वेळात त्यांनी बोलल्याप्रमाणे प्रेक्षकांवर हारनेसच्या मदतीने हवेत उडत असल्यासारखे प्रवेश केला.

प्रेक्षकांना विचार करण्याचाही अवधी मिळाली नाही. इतक्या जलद गतीने त्यांनी ती जादू करून दाखवली. प्रेक्षकांनी तोंडातच बोट घातली, डोळेही विस्फारले. त्यांनी आनंदाने टाळ्यांचा कडकडाट केला.

पण त्या प्रेक्षकांत एक असं जोडपं होते, जे  त्यांच्याकडे रोखून पाहत होते. राजेंद्रना त्यांच्या त्या नजरेचा काडीचा फरक पडला नाही. त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानत प्रयोगाची सांगता केली आणि आपल्या मेकअप रूममध्ये निघून आले. त्यांच्यासोबत जितू आणि त्यांचा मॅनेजर केतन होता. जितू खूप खूश होता.

"पप्पा, खेळ खूप छान झाला ना ! लोक किती खूश होते. मलाही तुमच्यासारखं मोठा जादुगार व्हायचे आहे." जितू आनंदाने त्यांना बिलगत म्हणाला.

"हा बेटा, म्हणून तर तुला कळायला लागल्यापासून सगळं काही शिकवतोय. माझ्या नंतर तुलाच हे सर्व करायचे आहे. तू आत्ताच किती छान पद्धतीने जादू दाखवतोस. मला खात्री आहे की पुढे जाऊन तूही मोठा जादूगार बनशील. अगदी माझ्यापेक्षाही मोठा जादूगार!" ते त्याचे डोके प्रेमाने कुरवाळत म्हणाले.

"नो पप्पा. यू आर बेस्ट! तुमच्यासारखी जादू कोणीच नाही करू शकणार; पण मी प्रयत्न नक्कीच करेन." तो त्यांच्या कमेराला प्रेमाने विळखा मारत म्हणाला.

त्यांच्या बोलण्याने राजू यांना गहिवरून आले. ते त्याला छाताशी कवटाळून घेत म्हणाले,"हो, बाळा. तू नक्कीच मोठा जादूगार बनशील. बरं ते सोड. तुला आईस्क्रीम खायची होती ना."

त्याने होकारार्थी मान डोलावली. त्यांनी केतनला नजरेने इशारा केला. ते दोघे जाणार तोच मगाशीचे जोडपे रागाने रूममध्ये घुसले.

"हे काय वागणे आहे तुमचे? असे न विचारते आत का आलात?" राजेंद्र रागाने त्यांच्याकडे पाहत म्हणाले.

त्यातील पुरुष पुढे येत रागाने म्हणाला,"त्याच कारण तुलाही चांगलच माहिती आहे, मग का विचारत आहेस तू?"

राजेंद्रने जितूकडे पाहिले तर तो घाबरलेला दिसला. त्यामुळे त्यांनी स्वतःला सावरत चेहरा नाॅर्मल करत केतनला त्याला घेऊन जाण्यास सांगितले.

केतन त्याला समजावत बाहेर घेऊन गेला.

तो जाताच राजेंद्र चिडून त्या पुरुष व्यक्तीला म्हणाला,"तुम्हाला मी मागेच सांगितले होते. ते सगळं विसरुन जा. तुम्हाला जे‌ पाहिजे ते कधीच तुम्हाला मिळणार नाही."

"असं कसं मिळणार नाही. ते आमचं आहे ते तर आम्हाला मिळायलाच पाहिजे!" त्या पुरुषांची बायको पुढे येत तावातावाने म्हणाली.

"ते तुमचं नाही, आता माझं आहे. गुपचूप इथून चालते व्हा, नाहीतर धक्के मारून बाहेर काढायला मला वेळ लागणार नाही." राजेंद्र त्या दोघांना दाराकडे बोट करत रोखून पाहत म्हणाले.

"तू हे चांगले करत नाहीयेस, राजू. यांचे परिणाम खूप वाईट होतील." तो पुरुष जवळपास धमकी देत म्हणाला आणि त्याच्या पत्नीला घेऊन निघून गेला.

जितेंद्र बाहेर उभे राहून त्यांचे बोलणे ऐकत होता. तो घाबरून आत आला आणि राजेंद्रला विचारले,"पप्पा, ते‌ लोक कोण होते? का तुमच्याशी भांडत होते?"

"अरे बाळा, काही नाही. हा तुझा पप्पा आहे ना, तो बघून घेईल. तू नको टेन्शन घेऊन. तू जा, मस्त आईस्क्रीम खाऊन घरी ये. मी घरी जातो आता." राजेंद्र त्याला दिलासा देत म्हणाले आणि त्याला पाठवून दिले.

केतनच्या चेहऱ्यावरही प्रश्न निर्माण झाले होते. ते ओळखून त्यांनी नजरेनेच 'नंतर सांगतो' असे खुणावले. तो जितूला घेऊन निघून गेला.

क्रमशः

कोण होते ते जोडपे? ते राजेंद्रकडे कशाची मागणी करत होते?