Login

स्वार्थ

अलमारीतुन एक फाईल काढून तिने नीता च्या हातात दिली
लघुकथा स्पर्धा २०२६

विषय- संयमाचा अंत

स्वार्थ

साक्षीने पर्स उचलली ली व ती घरी जायला खोलीतून बाहेर गेटपर्यंत पोहोचली.
बाहेरच्या खोलीत नीता, तिची वहिनी फोनवर बोलत होती.साक्षीला पाहून मुद्दाम म्हणाली, “अगं सगळं नाटक आहे पैशांसाठी! आईचे दागिने पैसा हवा ना म्हणून सेवा करण्याचे नाटक! दाखवायला की आम्ही यांच्या आई, म्हणजे सासूबाईंकडे लक्ष देत नाही..”

साक्षीला आता नीता च्या या बोलण्या वागण्याची सवय झाली होती. ती रिक्षा करून घरी आली.
पियू तिची मुलगी तिला पाहतात धावत आली. सासूबाई ही उठून देव घरात दिवा लावायला गेल्या.
साक्षी हात पाय धुऊन स्वयंपाकाला लागली. सौरभ घरी येतात सर्वांचे जेवण झाले.
सर्व आवरून साक्षी झोपायला आली तिला आईच्या घरून निघताना नीता ने मारलेले टोमणे आठवले .

आईची अवस्था आता ‘अरत्र न परत्र ‘ अशी होती. हात पाय संधीवाताने अकडलेले, उठता बसता त्रास होत होता.आईला अशी बिछान्यात पाहून साक्षीचे मन गलबलून यायचं. किती कर्मठ होती आई.
बाबा- साक्षीच्या लक्षात होते पण नितीन तिचा लहान भाऊ, अगदी दोन-तीन वर्षाचा होता बाबा गेले तेव्हा..
आईने नोकरी करून दोघा मुलांचं संगोपन केलं शिक्षण, लग्न सर्व स्वतःच्या हिम्मतिवर आणि तीच आई आता गलितगात्र होऊन एकटी खोलीत बिछान्यावर पडलेली..
नितीन च्या लग्नाला फक्त दोनच वर्षे झाली, नीता ला नसेल वाटत आई बद्दल आपुलकी प्रेम पण् नितीन तोही इतका कोरडा कसा काय?

एक केअर टेकर रात्री येत असे ती सकाळी नऊ पर्यंत जायची. साक्षी आपल्या घरचे सर्व आवरून बारापर्यंत आईकडे येत असे ती संध्याकाळी घरी परतत असे.
तिला आलेली पाहिलं कि आईचा चेहरा आनंदी होई, आईचं साक्षी सर्व करून देई. कपडे बदलणे वेणीघालणं, चादर बदलणं, जेवायला घालणं..

“रोज रोज कसं काय जमतं? तुमची सासू नाही बोलत काही? आणि आम्ही यांचं काहीच करत नाही हेच तुम्हाला सर्वांना दाखवायचे असते”. नीता तिला बोलली..

‘ हे बघ नीता तू सकाळी चहा ठेवायला खोलीत येते. त्यानंतर दुपारी जेवणाचं ताट. अग आईची हाताची बोट पहा कधी तिला साधा कप ही धरता येत नाही, चहा अंगावर सांडतो ती तशीच न बोलता पडून राहते. आम्ही तिची मुलं असून काय उपयोग? माझ्या घरचे मी सर्व करून येते, सासुबाई समजूतदार आहेत त्या नाही कटकट करत.. साक्षीने निताला समजवायचा प्रयत्न केला .
दुसऱ्या दिवशी परत तेच, साक्षी आईच्या खोलीतून निघत होती तेव्हा नीता नी तिला अडवलं” हे जे आईच्या सेवेचे नाटक करत आहात ना तुम्ही त्याच्या मागे तुमचा काय स्वार्थ आहे हे मला कळत नाही कां ?आईचे दागिने संपत्ती आपल्या नावाने करून घ्यायची ही धडपड आहे …”
नीताने अगदीच ताळतंत्र सोडला होता. आता मात्र तिचं बोलणं साक्षीच्या सहनशक्तीच्या बाहेर गेल तिच्या “संयमाचा अंत” झाला ती उसळून म्हणाली
“हो आहे माझा स्वार्थ! आहे मला संपत्तीची हाव! पण तू समजते ती संपत्ती नाही. माझा स्वार्थ माझ्या आईचं प्रेम, तिचं दर्शन. कोण जाणे उद्या मी येईन तेव्हा ती मला दिसेल की नाही! ती जिवंत आहे तोपर्यंत मी येत राहणार तुला आवडो किंवा न आवडो.


सकाळी सकाळी नितीन ने आई गेल्याचा फोन केला, साक्षीला पायातली शक्तीच गेल्यासारखे झाले ते धपकन खाली बसली.

सौरभ तिला सावरत म्हणाला ‘साक्षी उठ आपल्याला तिकडे जायचे आहे.’

आईची अंतिम क्रिया करायला पुरुष मंडळी गेली आलेले शेजारी गेल्यावर घरात साक्षी व नीता दोघीच होत्या.

आता काय उरलय तुमचं? झालं ना तुमच्या मनासारखं सर्व घेऊन. असे म्हणताच साक्षी ने तिचा हात धरला,
“चल आईच्या खोलीत चल, नीता ला ओढत आत घेऊन गेली. आईची अलमारी उघडून तिने एक फाईल नीता च्या हातात दिली.

“ पहा नीट वाच काय आहे! हे घर आईच, तिने नितीन च्या नांवाने केले, तिचे सर्व दागिने तुला दिले,त्यातले तोडे ती माझ्या मुलीला देणार होती. पण् मी नाही घेतले, ते तुमच्या दोघांच्या येणाऱ्या बाळासाठी ठेवले आहे. बघ नीट बघ तिची व माझी सही पण आहे, झालं तुझं समाधान?

नीता तोंडात मारल्या सारखी कधी फाईल मधल्या पेपर्स कडे तर कधी निघून जाणार्या साक्षी कडे पाहतच राहिली ..

—----+++++++++++-----------------------
लेखन..सौ.प्रतिभा परांजपे
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →