Login

स्वाभिमान हा... भाग १

ही कथा आहे अश्या स्त्रीची जी ला सासरी पैसे पुरवणारी मशीन तर माहेरी स्वतःची आई ओझं समजायची. काय असेल रावीची कहानी ? नक्की वाचा.

स्वाभिमान हा... भाग १


©® आरती पाटील - घाडीगांवकर


" निलेश ss निलेश ss, आपल्या जॉईन अकाउंट मधून तू एवढे पैसे कशाला काढलेस ? " रावी किचन मधून बाहेर येत, आपल्या रागावर नियंत्रण ठेवत म्हणाली.

" ये, माझ्या मुलाशी अश्या सुरात अजिबात बोलायचं नाही. कळलं ना ? " निलेशच्या बाजूला बसलेल्या रेवतीबाई रावी समोर रागाने बोट रोखून म्हणाल्या.

" बरोबर बोलतेय आई. रावी तुला ना नवऱ्याशी कसं बोलायचं ? ते अजूनही कळत नाहीये. " निलेश सुद्धा रागाने म्हणाला.

" आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. थोडे थोडके नाही तर तीन लाख काढले आहेस तू. मला न विचारता. का ते मला माहितीही नाही. " रावी रागाने पेटली होती.

" ताईला हवे होते, म्हणून पाठवले. " निलेश थंड स्वरात म्हणाला.

" का ? कोण हॉस्पिटल मध्ये आहे ? की घर जप्ती आली त्यांच्यावर ? जे ३ लाख पाठवलेस ? " रावीचा राग निलेशचा थंडपणा पाहून अजून भडकत होता.

" ये सटवे, बोलताना जरा विचार कर. तिच्या घरावर जप्ती यायच्या भाषा काय करतेस ? " रेवतीबाई आग ओकत होत्या.

" सटवे  ? ही तुमची भाषा ? छान आहे. पण मला अजून कारण कळालं नाही. पैसे का पाठवले ? आधीच दोन वर्षांपूर्वी त्यांनी पाच लाख घेतले होते. तेच अजून परत केले नाहीत. आणि आता परत ३ लाख ? " रावीचा संयम सुटत होता.

" हो, ताईला गाडी घ्यायला पैसे कमी पडत होते. म्हणून दिले. " निलेश बेफिकीरीने म्हणाला.

" वाह निलेश..! छान केलंत. मी इथे दिवस रात्र काम करून घर घेण्यासाठी पैसे जमा करते आणि तुम्ही फालतू आणि चैनीच्या वस्तूंसाठी ते पैसे ताईंना पाठवले ? त्या जॉईन अकाउंट मध्ये मीच पैसे टाकते. तुम्ही आजवर एक पैशाही टाकला नाहीये. आणि ताईंना तरी काही वाटायला हवं ? माझे आधीचे पैसे द्यायचे सोडून गाडी घेतायत ? आणि त्यातही पैसे कमी पडले म्हणून परत मागितले ? लाज, स्वाभिमान असं काही तुमच्या घराण्यात नाहीच वाटत. " आज रावीला खूप राग आलेला.

" ये घराणं आणि लाज कोणाची काढतेयस ? तू या घरात राहतेस, खातेस, पितेस त्याचा खर्च आम्ही करतो ना ? मग ते पैसे आम्ही घेतले तर काय फरक पडतो ? " निलेशला एवढं करूनही काही फरक पडला नव्हता.

" तुम्ही खर्च करता माझ्या खाण्या पिण्याचा ? लाईट बिल मी भरते, किराणा मी भरते, दुध - भाजीपाला मी बघते मग तू काय करतोस नक्की खर्च ? हे तुझं वन रूम किचन च घर. यात आपल्याला प्रायवसी नाही. एखादा पाहुणा आला तर राहता येत नाही की सर्व एकत्र सुद्धा बसू शकत नाही. म्हणून आपण थोड मोठं घर बघत होतो ना ? अजून एक तुझी आई.... हो हो तुझी आई मला उठता बसता ' हे घर माझं आहे. ' हे ऐकून दाखवतात. मग राब राब राबून मी एक एक पैसा जोडला घरासाठी तर असं वागणं ? " रावी रागाने म्हणाली.

" आईचं काय एवढं मनावर घेतेस ? तुझी आई बोलली असती तर एवढा बाऊ केला असतास का ? शेवटी काय सुनच.. " निलेश.

" तुमच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. माय - लेक एकसारखे आहात. ते काही नाही. मला माझे सर्व पैसे उद्या संध्याकाळपर्यंत पाहिजेत. सर्व म्हणजे आधी घेतलेले सुद्धा टोटल आठ लाख. जर उद्या संध्याकाळपर्यंत पैसे माझ्या अकाउंटला नाही आले, तर पुढे जे होईल, त्याला सर्वस्वी तुम्ही स्वतः जबाबदार असाल. " असं बोलून रावी आपली बॅग भरून माहेरी जाते.

या लोकांशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. यांची मानसिकता बदलू शकत नाही. आणि अश्या स्वार्थी लोकात राहणं म्हणजे आयुष्यभरासाठी स्वतःला शिक्षा देणं. हे रावीला कळून चुकलं होत.

रावी नक्की काय करणार ? ते पुढील भागात पाहू.


क्रमश :


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →