एकाच छताखाली राहूनही हे कुटुंब एकमेकांपासून मैलोन्मैल दूर निघून गेलं होतं. तंत्रज्ञानाने त्यांना संपूर्ण जगाशी जोडलं होतं, पण स्वतःच्याच पोटच्या गोळ्यापासून पार तोडलं होतं.
पुढे.....
भाग 2
बाल्कनीतील त्या घटनेला दोन दिवस उलटून गेले होते.
आज आरवचा नववा वाढदिवस होता. २४ व्या मजल्यावरील त्या 'स्काय व्हिला'मध्ये संध्याकाळी मोठी पार्टी आयोजित केली होती.
अविनाश आणि मेघाचे कॉर्पोरेट मित्र, सोसायटीतील काही श्रीमंत पाहुणे आणि आरवचे दोन-तीन क्लासमेट्स तिथे आले होते.
घर महागड्या लायटिंगने आणि रंगीबेरंगी फुग्यांनी सजलं होतं. बॅकग्राउंडला अलेक्सावर वाढदिवसाची ट्रेंडी गाणी वाजत होती. संपूर्ण हॉल माणसांनी गजबजलेला होता.केक कापायची वेळ आली.
हॉलच्या मध्यभागी तीन मजली आलिशान केक ठेवला होता. अविनाश आणि मेघाने आरवच्या हातात एक मोठी, चमकदार सुबक पेटी ठेवली. "हॅपी बर्थडे, माय बॉय! हे बघ, तुझ्यासाठी काय आणलंय!" अविनाश मोठ्या उत्साहाने म्हणाला.
आरवने तो बॉक्स उघडला. आत नुकताच लॉन्च झालेला, अत्यंत महागडा 'आयफोन १६ प्रो' चमकत होता. तिथल्या पाहुण्यांनी "Wow! What a gift!" म्हणत टाळ्या वाजवल्या.
आरवच्या मित्रांचे डोळे तो फोन पाहून विस्फारले. पण आरवने त्या फोनकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची एक साधी लकीरही उमटली नाही. त्याने अगदी शांतपणे तो फोन बाजूला ठेवला
मेघाने आरवच्या खांद्यावर हात ठेवत हळू आवाजात विचारलं, "काय झालं आरव? आवडला नाही का फोन?"आरवने आजूबाजूच्या गर्दीकडे पाहिलं, जे लोक आपापसात बिझनेस आणि शेअर्सबद्दल गप्पा मारत होते.
मग त्याने मेघाच्या कानात अत्यंत हळू आवाजात विचारलं, "आवडला आई... पण हे सगळे पाहुणे गेल्यावर आज रात्री तरी तुम्ही दोघं माझ्या शेजारी बसणार आहात का? की दरवर्षीसारखं फोटो काढून परत लॅपटॉपवर काम करायला बसणार आहात?"आरवचा हा प्रश्न ऐकून मेघाच्या चेहऱ्यावरचा उत्साह क्षणात मावळला.
तिने दूर उभ्या असलेल्या अविनाशकडे पाहिलं. मुलांना 'वस्तू' देऊन स्वतःची 'वेळ' वाचवण्याची पालकांची ही जुनीच सवय होती, जी आज आरवने गर्दीतही ओळखली होती.
खरं तर, आजही ही पार्टी संपल्यानंतर दोघांचेही रात्री नऊ वाजता आंतरराष्ट्रीय क्लायंट्ससोबत महत्त्वाचे कॉल्स शेड्युल होते."हॅलो एव्हरीवन, लेट्स कट द केक!" अविनाशने मायक्रोफोनवरून घोषणा केली आणि विषय बदलला.
आरवने यांत्रिकपणे केक कापला, पाहुण्यांनी टाळ्या वाजवल्या, स्नो-स्प्रे उडाला. अविनाश आणि मेघाने आरवला केक भरवतानाचे, पाहुण्यांसोबत हसतानाचे डझनभर फोटोज मोबाईलमध्ये घेतले आणि सोशल मीडियावर 'परफेक्ट फॅमिली'चे स्टेटस अपडेट केले
.रात्रीचे साडेआठ वाजले. पाहुणे एक-एक करून निघून गेले होते. अपेक्षेप्रमाणे, पाहुणे दाराबाहेर पडताच पुढच्या पाच मिनिटांत अविनाश आपल्या स्टडी रूममध्ये आणि मेघा बेडरूममध्ये लॅपटॉप उघडून बसली.
आरव पुन्हा एकदा आपल्या खोलीत त्या अथांग एकाकीपणात परत गेला. पाहुण्यांच्या गर्दीतही तो एकटाच होता आणि आता रिकाम्या घरातही तो एकटाच होता.
त्याच वेळी बाहेर पावसाचा जोर प्रचंड वाढला. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यामुळे खिडकीच्या काचा थरथरत होत्या.
अचानक, एक तीव्र विजांचा चमचमाट झाला आणि संपूर्ण पुण्याचा वीज पुरठा खंडित झाला.'टक्क' करून स्काय व्हिलामधील अलेक्सा बंद झाली, हवेत तरंगणारे सुंदर लाईट्स विझले. २४ व्या मजल्यावरील त्या आलिशान पेंटहाउसमध्ये संपूर्ण काळोख पसरला.
अरे यार! व्हॉट द हेल! इंटरनेट गेलं!" मास्टर बेडरूममधून मेघाचा ओरडण्याचा आवाज आला."माझं प्रेझेंटेशन अर्धवट राहिलंय! जनरेटर का नाही सुरू झाला अजून?" स्टडी रूममधून अविनाश वैतागून बाहेर आला.सोसायटीचा मोठा जनरेटर बॅकअपही काही तासांपूर्वीच तांत्रिक बिघाडामुळे बंद पडला होता.
मोबाईलचे नेटवर्क गायब झाले होते आणि लॅपटॉपची बॅटरीही शेवटच्या टप्प्यात होती. संपूर्ण जगाशी इंटरनेटद्वारे जोडलेले हे दोन हाय-प्रोफाइल लोक गॅजेट्स बंद पडताच एका क्षणात अपंग आणि हतबल झाले होते.
अंधारात काय करावं, हेच त्यांना सुचत नव्हतं.तेवढ्यात, अंधाराला चिरत एक लहानसा प्रकाश हॉलच्या दिशेने येताना दिसला. शांताबाई देव्हाऱ्यातील एक जुनी मेणबत्ती पेटवून घेऊन येत होत्या.
त्या मेणबत्तीच्या अंधुक, पिवळसर प्रकाशाने त्या अथांग घराला एका वेगळ्याच शांततेने वेढून टाकलं.शांताबाईंनी ती मेणबत्ती डायनिंग टेबलवर ठेवली आणि म्हणाल्या, "साहेब, बाई... वीज यायला खूप वेळ लागणार आहे.
आरव एकटाच खोलीत आहे, त्याला अंधाराची भीती वाटते. आपण सगळे इथेच टेबलपाशी बसुया ना. अविनाश आणि मेघाने नाईलाजाने आपापले मृत झालेले फोन्स बाजूला ठेवले.
मेणबत्तीच्या त्या लहानशा प्रकाशात, पहिल्यांदाच हे तिघेही - अविनाश, मेघा आणि आरव - कोणत्याही स्क्रीनशिवाय, समोरासमोर एकत्र बसले होते. इंटरनेटचा तो आभासी प्रकाश विझला होता आणि एका छोट्या मेणबत्तीने त्यांच्या आयुष्यातील खऱ्या संघर्षावर प्रकाश टाकण्यास सुरुवात केली होती.
