आरव... आरव, थांब! खाली उतर तिथून!" शांताबाईंच्या किंकाळीने पुण्याच्या त्या आलिशान पेंटहाऊसची शांतता एका क्षणात भंग पावली.
चोविसाव्या मजल्यावरील त्या 'स्काय व्हिला'च्या बाल्कनीच्या ग्रीलवर नऊ वर्षांचा आरव पाय ठेवून वर चढण्याचा प्रयत्न करत होता.
बाहेर धो-धो पाऊस पडत होता, विजा कडाडत होत्या आणि सोसाट्याचा वारा सुटला होता. शांताबाईंनी धावत जाऊन आरवला मागे खेचलं आणि घट्ट जवळ घेतलं.
त्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. आरवच्या डोळ्यात ना भीती होती, ना पश्चाताप. तो अगदी शांत होता."काय वेडेपणा आहे हा आरव? खाली पडला असतास तर?"
शांताबाईंचा आवाज भीतीने थरथरत होता.आरवने अतिशय थंडपणे बाल्कनीबाहेरच्या अंधाराकडे पाहत विचारलं, "खाली पडलो असतो तर आई-बाबांनी लॅपटॉप बंद करून मला बघायला तरी वेळ काढला असता का ग मावशी आजी?
नऊ वर्षांच्या मुलाच्या तोंडून आलेले हे शब्द शांताबाईंच्या काळजाला पार चिरून गेले. त्यांनी वळून मास्टर बेडरूमकडे पाहिले. एवढा मोठा प्रसंग घडूनही अविनाश आणि मेघा यांच्या खोलीचे दरवाजे बंदच होते. तिथून फक्त कीबोर्डवर चालणाऱ्या बोटांचा 'टुक-टुक' असा यांत्रिक आवाज येत होता.
साहेब म्हणून शांताबाईंनी आवाज दिला पण.....
आता नाही मावशी काम आहे दोन तास तरी डिस्टर्ब करू नका.... -अविनाश
आता नाही मावशी काम आहे दोन तास तरी डिस्टर्ब करू नका.... -अविनाश
अविनाश एका आंतरराष्ट्रीय बँकेत व्हाईस प्रेसिडेंट होता, तर मेघा एका नामांकित आयटी कंपनीत सीनियर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत होती. शांताबाई या आरव ला बागायच्या खाऊ पिऊ घालायच्या पण त्याला जे हवं ते त्याला त्याही देऊ शकत नव्हत्या.
बाहेरून बघणाऱ्याला हे घर यशाचं आणि सुबत्तेचं सर्वोच्च शिखर वाटायचं.
घरात पाऊल टाकताच आधुनिक तंत्रज्ञानाचा कमालीचा चमत्कार दिसायचा. "अलेक्सा, लिव्हिंग रूमचे लाईट्स वॉर्म गोल्ड कर," असं म्हणताच क्षणात प्रकाश बदलायचा. जमिनीवर एक रोबोटिक व्हॅक्यूम क्लिनर मानवी स्पर्शाशिवाय स्वतःचं काम शांतपणे करत फिरत असायचा.
दोघंही कॉर्पोरेट जगतातील अत्यंत यशस्वी चेहरे होते, ज्यांना महिन्याला लाखो रुपयांचं पॅकेज आणि समाजात प्रचंड प्रतिष्ठा होती.पण या अत्याधुनिक 'स्मार्ट होम'मध्ये एका गोष्टीची प्रचंड कमतरता होती, आणि ती गोष्ट म्हणजे संवाद आणि वेळ संवाद
त्याच रात्री जेवणाच्या टेबलावरही नेहमीसारखीच शांतता होती. अविनाश आणि मेघा दोघंही समोरासमोर बसले होते, पण दोघांच्या नजरा आपापल्या मोबाईलच्या स्क्रीनवर खिळल्या होत्या.
आरव शांतपणे वरण-भाताचा घास तोंडात टाकत होता.अविनाशने स्क्रीनवरून नजर न हटवता विचारलं, "मेघा, उद्या सकाळी माझी सिंगापूरची फ्लाईट आहे, तू कॅब बुक केलीस का?
"मेघाने ईमेल टाईप करता करताच उत्तर दिलं, "हो, शेड्युल केली आहे. आणि हा, पुढच्या आठवड्यात माझ्या नवीन प्रोजेक्टची डेडलाईन आहे, त्यामुळे मी रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्येच असणार आहे.
ओके." अविनाशने अत्यंत संक्षिप्त उत्तर दिलं आणि तो पुन्हा आपल्या फाईल्समध्ये हरवला.दोघांमधील संवाद एवढ्यापुरताच मर्यादित होता. त्यांच्या या सुखवस्तू जगात भावनांना, सुखाच्या चार क्षणांना फारसा वाव नव्हता; कारण तिथे प्रत्येक गोष्टीचं नियोजन वेळेच्या आणि पैशाच्या गणितानुसार केलं जात होतं.
आरवने दोघांकडे पाहिले. त्याच्यासाठी आई आणि बाबा म्हणजे अशा दोन व्यक्ती होत्या ज्या त्याच्या प्रत्येक हट्टाला एका क्लिकवर ऑनलाईन महागड्या वस्तू मागवून पूर्ण करायच्या.
त्याला हवं ते गॅजेट, हवे ते ब्रँडेड कपडे घरात हजर असायचे. अविनाश आणि मेघाला वाटायचं की आपण आपल्या मुलाला जगातलं सगळं सुख देतोय, त्यामुळे तो खूप आनंदी आहे.
जेवण संपवून आरव आपल्या खोलीत गेला आणि त्याने आयपॅडवर हाय-ग्राफिक्स व्हिडिओ गेम सुरू केला. त्याच्या कानात महागडे एअरपॉड्स होते, ज्यामुळे त्याला बाहेरच्या जगाचा कोणताही आवाज ऐकू येत नव्हता.
गेममध्ये शत्रूला मारताना त्याच्या लहानशा चेहऱ्यावर एक अस्वस्थ थरार उमटत होता, पण त्याच्या डोळ्यांत एक खोल एकाकीपणा जाणवत होता
.त्या महागड्या सुखवस्तूंच्या मागे आरवचं निष्पाप बालपण एका कोपऱ्यात शांतपणे कोमेजत होतं, हे पाहण्याची सवड त्या पालकांकडे नव्हती.
एकाच छताखाली राहूनही हे कुटुंब एकमेकांपासून मैलोन्मैल दूर निघून गेलं होतं. तंत्रज्ञानाने त्यांना संपूर्ण जगाशी जोडलं होतं, पण स्वतःच्याच पोटच्या गोळ्यापासून पार तोडलं होतं.
