Login

आत्महत्या की हत्या?

A Young Girls Death
लघुकथा लेखन स्पर्धा - एप्रिल

विषय- संयमाचा अंत

शीर्षक - आत्महत्या की हत्या?

लेखिका - स्वाती बालूरकर, सखी


"नक्की आत्महत्याच आहे ना की हत्या? किंवा काही घातपाताचा संशय म्हणजे कोणी शत्रू वगैरे ?" पोलिसांच्या या प्रश्नाने ग्रेसी अधिकच बिथरली .

ती घाबरून म्हणाली ,"अहो हे काय बोलताय तुम्ही? अहो ते माझं लेकरू आहे ,त्याचे काय शत्रू ?"

"हे पहा मॅडम, हे आमचं काम आहे विचारायचं. कधी कधी आपण लेकरू म्हणतो पण तसं नसतं. वेगळंच निघतं काहीतरी. आम्हाला काही संशय घ्यायला आवडत नाही पण आम्ही एक शक्यता नोंदवून घेतो आणि तपासात नंतर मग ते भलतच काहीतरी निघतं. म्हणून ही चौकशी. "

"अहो, परीसारखी कोवळी 22 वर्षांची पोर, माझी एंजल, तिचे कोण शत्रू असणार ?" ग्रेसी रडायला लागली.

" मग? एक सांगा, घरी कोण कोण राहतं? तुमच्याशी कसं होतं त्याचं नातं? तुमच्याशी काही वैयक्तिक भांडण, राग वगैरे ?"

"अहो मी आई आहे तिची !"

हवालदार बॉस कडे पहात होते मग इन्स्पेक्टर घाटगे चिडले.

"हे पहा मॅडम जेवढे विचारतो तेवढं सांगा. तुम्ही दोघीच सोबत रहात होतात ना, काय भांडत नाहीत का मुली आईशी? किती केसेस दाखवू तुम्हाला ?"

" नाही हो सर, तसं काही नाही! माहेरपणाला आली होती परी."

"अच्छा म्हणजे लग्न झालेला आहे.!"
आता घरी पंचनामा करायला आलेल्या पोलिसांनी प्रश्न विचारण्याचा रोख बदलला.

"नवऱ्याचं नाव काय तुमच्या? आणि मुलीचे नाव या फॉर्म मध्ये लिहा. तिच्या घरी कोण कोण असतं ?"

" इथे सध्या तर मी आणि माझ्या दोन्ही मुली असतो. पण गेल्या चार दिवसांपासून मी आणि ही धाकटी मुलगीच होती. म्हणजे माझे मिस्टर . . "

"आहेत ना? दिसले नाहीत म्हणून विचारलं. "

"ते दुसऱ्या गावी असतात वाराणसीला. "

"आणि मुलीचे सासर कुठल्या गावी?"

" आपल्याच शहरात, जवळच आहे . तिच्याघरी तिचे सासू सारे , एक नणंद आणि आमचे जावई." डोळ्यातून अश्रू वहात होते, टाहो फोडून रडावे वाटत होते पण सुशिक्षित असल्याने तिला आरडा ओरडा पण करता येत नव्हता. एव्हाना आजू बाजूचे लोक जमा झाले होते. लटकलेल्या एंजेल ची बॉडी पोलिसांनी खाली उतरवली होती आणि तिला आत झोपवून , बाहेर पंचनामा चालू होता.

सकाळी निघताना बाय म्हणून आईला घट्ट मिठी मारणारी मुलगी ऑफिसात जाऊन आल्यावर अशी लटकलेली मिळेल, हे अविश्वसनीय होतं. अजूनही विश्वास बसत नव्हता.

" मॅडम, आवरा स्वतः ला, आम्ही समजू शकतो पण . . सहकार्य करा. आज सकाळी घटना घडली आहे किंवा दुपारी. म्हणजे काल रात्री दोघात काही भांडण झालं होतं का?सकाळी काही वादावादी ?"

"नाही साहेब. कसं सांगू तुम्हाला तिची परीक्षा आहे पुढच्या महिन्यात. एंजल ते हॉल तिकीट आणण्यासाठी कॉलेजला जाणार होती आज .आणि हे काय करून बसली पहा!"

ग्रेसी तिथेच डोकं खुर्चीवर बसली . "हे काय सगळं काय बोलावं लागतंय . . ?"
पोलीस घरी आले होते. डॉक्टरांना देखील बोलावलं होतं. एंजल चा जीव तीन तासांपूर्वी गेला होता असं लिहून दिलं त्यांनी.

घरमालकाची मुलगी बॉबी कुटुंबाशी बऱ्यापैकी क्लोज होती. तिनेच पोलिसांना बोलावलं होतं . काही स्थानिक नातेवाईकांना कळवलं होत. एंजल चा फोन सतत वाजत होता व उचलून बोलण्याची शक्ती नव्हती. तीच मधे मधे सर्वांशी बोलत होती आणि कळवीत होती.

ग्रेसी रडत विचार करत होती, एफ आय आर, केस दाखल होणार आणि मग एंजलला सगळे जण ती बॉडी , तिची बॉडी असं म्हणणार, बॉडी कसं म्हणावं माझ्या लेकराला? असं काय झालं असेल?

पोलिसांनी फोन जप्त केला, घरात तपास घेतला. त्यांच्या प्रश्नांनी आईचं मन घायाळ होत होतं. अभ्यासाच्या टेबलावर एका पुस्तकात चिठ्ठीसारखं काहीतरी दिसलं आणि बॉबीने ते पाहिलं. सोबतच्या महिला कॉन्स्टेबल ने हात लावू नका असा इशारा केला.
चिठ्ठी इन्स्पेक्टर ने घेतली होती. त्यांच्या परवानगीने ग्रेसी ने ती वाचली. ती आत्महत्या का करत आहे, असे तिने लिहिले होते. या गोष्टीवर काल रात्री माय लेकींची चर्चा झाली होती आणि छोटीशी गोष्ट इतकी मरण्यापर्यंत जाईल असं ग्रेसीला देखील वाटलं नव्हतं.
घरात सासू बरोबर वाद झाला त्याबद्दल तिने सांगितलं होतं.

पोलिसांची टोळी घरात सर्वत्र पाहत होती. कुणी आलं होतं का? काही अस्ताव्यस्त पडलं आहे का वगैरे.

इतक्यात मोठ्या मुलीचा फोन आला, ती घाबरून गेली होती, ती शिकायला बाहेर होती हॉस्टेलवर म्हणून दोन दिवस आजीकडे गेली होती. ती आईला पन्नास प्रश्न विचारत होती. "आता सकाळीच तर छान आनंदी होती ती, आम्ही फोनवर बोललो . मग तिला काय झालं? तू काही रागावलीस का तिच्यावर?"

" नाही गं ss जेनी, मी का रागावेन? मी तिला पैसे दिले. कॉलेजात जाणार होती आज हॉलतिकीट आणायला, तिने मिठी मारली आणि मग मी ऑफिसमध्ये गेले. स्वयंपाक करून ठेवला होता घरात . . . तो तसाच आहे आणि परत आले आज थोडी लवकर तर ती अशी लटकलेली. काय झालं असेल? कोण आलं असेल माझ्या माघारी?".

आता मात्र ती विकल होऊन रडू लागली आणि डोक्याला हात लावून खाली जमिनीवरच बसली . ग्रेसीचं डोकेच काम करेना. आजुबाजूच्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली . पोलिसांनी त्यांना तिथून जायला सांगितलं . गर्दी कमी केली.

तर आता फक्त ग्रेसी आणि बॉबी तिथे होत्या. बॉडी पोस्टमार्टम शव विच्छेदना करिता पाठवण्यात आली. , त्यावेळी मात्र ग्रेसीने एकच टाहो फोडला. एंजलच्या ट्रॅक पॅन्टच्या खिशात आईसाठी एक सॉरी नोट होती आणि तिच्या दुसऱ्या खिशात" त्याला सोडू नका" अशी इंग्लिशमध्ये लिहिलेली चिठ्ठी होती.

दोन्ही चिठ्ठ्या पोलिसांनी पुरावा म्हणून घेतल्या. "त्याला म्हणजे कुणाला सोडू नका? "

घाटगे ग्रेसी ला विचारत होते. ग्रेसी रडत म्हणाली," ती तिच्या नवऱ्यावर म्हणजे रॉबर्ट वर रागावली होती, त्याचं भांडण झालं होतं . खूप सेन्सिटिव्ह आहे माझी एंजल. . . तिला अपमान सहन होत नाही. तिच्या फोनवर पहा ना काही कळतय का?" तिला आता बोलताही येत नव्हतं.

" मॅडम, वास्तविक पाहता , आज काल अशा प्रकरणांमध्ये फोन सगळ्यात मोठा एव्हिडन्स असतो आणि आम्ही आल्या आल्या पहिले तिचा फोन घेतला. फोन बंद आहे . अंजली मॅडमनी चार्जिंग लावून ही पाहिले पण बहुतेक फोन फेकला गेला असण्याची शक्यता आहे, स्क्रीन फुटली आहे. तो बंद झालेला आहे. फोन ठीक झाला तर कदाचित तिचं कुणाकुणाची फोनवर बोलणं झालं हे आम्हाला कळेल त्यानुसार थोडेसे धागे दोरे मिळतील. तिच्या सासरच्या बद्दल माहिती सांगाल का ?"

मनावर आलेल्या अतीव स्ट्रेसमुळे ग्रेसी जणू अचेतन झाली. बॉबीने पटकन तिच्या तोंडावर पाणी मारलं, तिला एका बाजूला सरकवून बसवलं , तोपर्यंत बाकीचे नातेवाईक लोक तिथे वरती आले आणि त्यांनी तिला सांभाळले .
ॲम्ब्युलन्स आली होती, त्यांनी बॉडी पोस्टमार्टम साठी नेली. ग्रेसी सगळं फॅट होती पण थांबवू शकत नव्हती. इन्स्पेक्टर माघारी चौकशीसाठी थांबले.

" तुम्ही घरमालक न? या भाडेकरू. तर केव्हापासून या इथे राहतात ?"

"चार-पाच वर्षे झाली सर. आनंदी राहतात सर एरवी. . कधी असं?"

"तुम्हाला या कुटुंबाबद्दल जी पण माहिती आहे ते सांगाल का? हवालदार लिहून घ्या."

तिला जितकी माहिती आहे तितकी तिने पोलिसांना सांगितली .


" सर, ग्रेसी ऑंटीचे मिस्टर त्यांच्यासोबत राहत नाहीत म्हणजे ते सेपरेट झालेले आहेत म्हणजे घटस्फोट झाला नाही पण ते वेगळे राहतात. आंटी च्या दोन मुली आहेत, मोठी मुलगी जेनी फार्मसी च्या शेवटच्या वर्षाला आहे आणि ही छोटी ग्रॅज्युएशन च्या दुसऱ्या वर्षात होती , मागच्या वर्षी तिचं लग्न झालं आणि इथेच सासरी राहते. पुढच्या महिन्यात परीक्षा आहेत म्हणून दोन -तीन दिवसांपूर्वी ती आली होती. म्हणजे मला इतकंच माहित आहे. "

"म्हणजे मोठ्या मुलीचं लग्न झालं नाही आणि धाकटीचं झालं आहे?"

" हो म्हणजे लव्ह मॅरेज होतं ना!"

" अच्छा , आय सी! ग्रेसी मॅम पीएम रिपोर्ट येईल , फोन नंबर दिला आहे ना तुम्ही? आमचा कॉल येईल त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये या आणि कुणाच्या विरोधात तुम्हाला फिर्याद वगैरे करायची असेल तर तसे सांगा. आता तर सध्या आम्ही प्रथम दर्शनी आत्महत्या असे नोंदवून घेतलेली आहे पण अजूनही आम्हाला संशय आहे. आत्महत्या करण्याचं कारण किंवा काहीच आधार सापडत नाहीय ."

ग्रेसीला त्यावेळी खूपच ओरडून ओरडून बोलावं वाटत होतं पण अंगात त्राण उरलं नव्हतं, हात पाय लटपट कापत होते. पुढे काय वाढून ठेवले माहित नव्हतं.
मनात आठवणींचा गोंधळ माजला होता, रडून रडून डोळे सुकले होते. लहान पणी अंगणात खेळणाऱ्या एंजलचा चेहरा आठवत होता, मग शाळेत जाणाऱ्या एंजल चा चेहरा, लग्न झाल्यावर चर्चमध्ये आनंदाने आईला मिठी मारणारी एंजल आणि काल रात्री अभ्यास करता करताच घरच्या त्रासाला कंटाळून चर्चा करणारी एंजल आणि आज. . . ? काही तासात ती जगातच नव्हती. खूप काही बोलायचं होतं पण हिम्मत एकवटणं गरजेचं होतं.

ग्रेसीचा भाऊ आई-वडील त्याचे मोठे मुलगी सगळे ईकडे यायला निघाले होते, शहरात राहणारे बाकीचे नातेवाईक आहे फोन करत होते
. एंजल गेली हे सांगणं जितकं जड होतं तितकच त्याचं कारण सांगणे देखील. कारण तिच्याकडे सांगण्यासाठी काहीच नव्हतं , जे बोलावं वाटत नाही तेच पुन्हा पुन्हा बोलावं लागतं या गोष्टीचा सगळ्यात जास्त दुःख वाटत होतं. तिला सावरायला ऑफिसच्या स्टाफ मधल्या दोन जणी जवळच्या मैत्रिणी आल्या होत्या.

खालच्या घर मालकांनी वर चहा पाठवला ग्रेसीने हात लावला नाही घोटभर पाणी तेवढे प्याली.

मनात विचार चक्र सुरू झालं-

'मुलगी म्हणून अयशस्वी ठरले होते मग पत्नी म्हणून अयशस्वी ठरले आणि आता असं वाटत होतं की आई म्हणून देखील!
हे जीजस, का माझी परीक्षा पाहता? माझा स्वभाव सहनशील आहे, माझ्याकडे संयम खूप आहे म्हणून इतकी परीक्षा पहायची का? आई-वडिलांच्या मनाविरुद्ध नवरा पसंत केला म्हणून त्यांना वाटलं आदर्श मुलगी नाही होऊ शकली. मान्य केलं, आहे त्या परिस्थितीत संसार केला. नवऱ्याने आर्थिक अडचण असेपर्यंत तिच्याशी चांगले संबंध ठेवले. तिने देखील बरोबरीत नोकरी करून संसाराला हातभार लावला. सोन्यासारख्या दोन मुली झाल्या.
मग त्याला चांगली नोकरी लागली, पगार वाढली आणि हळूहळू त्याने तिच्याकडे दुर्लक्ष सुरू केले. त्याचवेळी त्याच्या मोठ्या भावाचे अपघाती निधन झालं आणि त्याची सुंदर नाजूक वहिनी कोलमडून गेली. त्या वहिनीची काळजी घेण्यासाठी त्यांनी वहिनीकडे इतकं लक्ष द्यायला सुरुवात केली की स्वतःच्या संसाराकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. दिसायला साधारण असणाऱ्या ग्रेसीपुढे , मुलबाळ नसणारी नाजूक वहिनी तशी उजवीच होती.
हे सगळं जुना आता आठवायला लागलं होतं . तिच्या मुलींनी कधीच तक्रारी केल्या नाहीत कारण तिच्यासारख्या सहनशीलच होत्या पण धाकटी मुलगी एंजल नंतर खूप हळवी झाली होती. मोठी होताहेत तिच्याकडे संयम नव्हता. प्रत्येक गोष्टीत काय तो सोक्षमोक्ष एकदाच लावायचा असा स्वभाव तयार झाला. त्याचं कारण कुटुंबाचं विलग होणं!

नवरा जेव्हा वहिनी सोबत जास्तच गुंतला तेव्हा ग्रेसीला काहीच पर्याय उरला नाही. तो ऐकूनच घेत नव्हता.
"आहे ते असं आहे. राहायचं तर रहा नाहीतर रस्ता मोकळा आहे ". त्याच्या या वाक्यावर तिचा होता नव्हता स्वाभिमान गळून पडला.
" याच्या दारात पडून राहिल्या पेक्षा माझ्या मुलींना मी कष्टाने वाढवेन" असं म्हणून तिने वाराणसी सोडलं आणि या शहरात येऊन राहायला लागली.

तिने इथे चांगली नोकरी मिळवली, माणसं कमावली. मुली मोठ्या होत होत्या, एंजलला खूप जपावं लागायचं कारण तिचा वडिलांवर खूप जीव होता.

जेव्हा एके रविवारी चर्चमध्ये त्यांच्या ओळखीच्या एका आंटी ने मोठ्या मुलीसाठी स्थळ आणलं. नेहमी भेट होणारे कुटुंब होते. बऱ्यापैकी नोकरी लागली होती मुलाला घरची परिस्थिती चांगलीच होती. रॉबर्टला पाहिलं भेटली परंतु तेव्हा मोठी मुलगी लग्नाला स्पष्ट नाही म्हणाली .

"शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी लग्न करणारच नाही!" असं तिने ठरवलेलं होतं.
आलेल्या स्थळातले सासरे खूप मायाळू स्वभावाचे होते. त्यांच्याशी एंजलला का कुणास ठाऊक एक वेगळं नातं आहे असं वाटायला लागलं. तिच्या वडिलात आणि त्या होणाऱ्या सासऱ्यात थोडंसं साम्य होतं.
मोठी मुलगी नाही म्हणाली तोपर्यंत तो मुलगा रॉबर्ट तिच्याशी व्यवस्थित बोलायचं. केव्हातरी बोलण्या बोलण्यात त्याने एंजल चा नंबर घेतला होता.

ग्रेसी ला पत्ता देखील लागला नाही की एंजल किती किती वेळ त्या रॉबर्ट शी बोलते, बाहेर भेटते वगैरे.
सहा महिन्यात एका रविवारी असं झालं की चर्चमध्ये त्यांनी सरळ एंजलला मागणी घातली. एंजल त्या मुलावर इतकी भाळली होती आणि ती सासऱ्याच्या मायेला तरसली होती कदाचित तिने पटकन होकार दिला. तिचं शिक्षण पूर्ण झालं नव्हतं तरीही "मला लग्न करायचं आहे, डॅड मला शिकवतील." ती अगोदर त्यांच्याशी बोलली होती.

तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता. मुलीच्या आनंदासाठी , तिच्या ऐपतीप्रमाणे तिने धाकट्या मुलीचं लग्न करून दिलं. त्यावेळी उपस्थिती लावण्यासाठी तिचा नवरा आला होता इतकच. पण तो जास्त दिवस राहिला नाही.

काही दिवसात ग्रेसीच्या लक्षात आलं की सासूला इतकं साधं लग्न केलेला आवडलं नाही . ग्रेसीने काही जास्त सोनं किंवा गिफ्ट दिले नव्हते ते पण तिला पटलं नव्हतं आणि मग ती सारखी एंजलच्या कामात चुका काढायला लागली.
सासरे तिला अभ्यास कर म्हणायचे आणि ती अभ्यास करताना सासू तिच्या कामावरून तक्रारी करायची. नवरा या सगळ्यात पडायचं नाही.
"आई काय म्हणते तसं वाग ना!" इतकच तो तिला सांगायचं. त्यामुळे तिच्या स्वप्नातलं त्याचे रोमँटिक जग होतं ते हळूहळू वितळून गेलं .

चार दिवसांपूर्वी कुठल्यातरी एका कामात एंजल कडून चूक झाली सासूला भयंकर राग आला आणि तिने एंजलच्या कानाखाली लगावली.

आयुष्यात कधीच मार न खाल्लेल्या एंजल ला सासूची ती थप्पड जिव्हारी लागली.

नेमका त्यावेळी तिचा नवरा रॉबर्ट तिथेच सोफ्यावर बसलेला होता तो येऊन आईला काहीतरी बोलेल किंवा तिला समजावेल असं वाटलं.
त्याने मोबाईल कडे पाहत या घटनेकडे दुर्लक्ष केलं. एंजलचे डोळे भरून आले होते. ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली आणि गालावरचे वळ त्याला दाखवले .आता तरी तो काहीतरी बोलेल आईला रागावेल किंवा तिला समजावेल असं वाटलं तर तो म्हणाला " एंजल सहा महिने झालेत ना लग्नाला, चुका करू नकोस ना मग. आला असेल आईला राग. . जाऊ दे बरं सोड तो विषय !"

रागात भरलेली एंजल त्या रात्रीच बॅग भरून आईकडे आली होती.
दोन दिवसांनी हॉल तिकीट आणायचं होतं आणि दहा दिवसांनी परीक्षा होती .

मी फायनल इयर ची परीक्षा चांगली देणार, ग्रॅज्युएट होणारा आणि मी नोकरी करणार असं तिने आईला सांगितलं होतं .

आईला पण रॉबर्टचं हे वागणं आवडलं नाही पण तेवढ्या कारणावरून मुलीने काही वेगळा विचार करू नये, घर तोडू नये म्हणून आईने तिला समजावलं.

सकाळी ती म्हणाली, " उद्या तर मी येऊन घरी बोलते, सासरे कामानिमित्त बाहेर आहेत ते आल्यावर त्यांना सांगू." असं काहीतरी दोन दिवस समजावलं. तिच्या आवडीच सगळं तिला करून खाऊ घातलं. ती कालपासून नॉर्मल वाटली आणि आज सकाळी ग्रेसी ऑफिसला गेली होती ,परत येईपर्यंत हे झालं होतं.

दरम्यान काय झालं तेच कळत नव्हतं . पोलिसांनी कॉल रेकॉर्ड चेक करून शेवटचा कॉल तिच्या नवऱ्याचा होता आणि बारा मिनिटे दोघांमध्ये बोलणं झालं होतं असं सांगितलं. म्हणजे तू काहीतरी टोकाचे बोलला असेल आणि फोन फेकून दिला आणि चक्क स्वतःला ओढणीने लटकवून घेतलं. मागचा पुढचा काहीच विचार केला नाही.

ग्रेसी ला वाटलं, तिचं नशीब तर वाईट होतच पण तिच्या कोवळ्या पोरीचं नशीब इतका वाईट असावं? असं मरण तिला यावं? हे राहून राहून पचत नव्हता.

मनात सगळा राग साठत गेला. मग नवऱ्याला ही तिने एंजल गेलेला सांगितलं .
त्याच्याकडून खूप शॉकिंग प्रतिक्रिया येईल असं वाटलं होतं पण तो थंडपणे म्हणाला," रहा अजून एकटी! कर लाड तुझ्या पोरींचे! तू इथून निघून गेलीस ना, तुलाच भोगावे लागेल आता. येतो मी नाहीतर लोक काय म्हणतील, पोरगी मेल्यावर पण आला नाही ?"

तिला खूप राग आला होता, "लोकांच्या म्हणण्यासाठी येणार असशील तर येऊ नकोस ,त्या पोरीचा तुझ्यावर खूप जीव होता त्या मायेने यायचं असेल तर ये नाहीतर राहू दे. आणि तिला आणि नकोस सोबत."

तिने फोन ठेवून टाकला होता.

संध्याकाळी पोलीस स्टेशन मधून फोन आला. पोलिसांनी तिच्या सासरच्या लोकांनी कळवलं होतं
पोस्टमार्टम चा रिपोर्ट मध्ये काहीच निघालं नाही, तिने बांधून घेतलेल्या ओढणीनेच गळा आवळून तिचा मृत्यू झाला होता, घातपाताचा काही संशय देखील नव्हता.

ग्रेसीला राहून राहून ती चिठ्ठी आठवत होती त्याला सोडू नका
तिने पत्रातही लिहिलं होतं की किमान फोनवर रॉबर्ट ने तिला समजवायला हवं होतं किंवा इकडे येऊन घेऊन जायला हवं पण तू आईचीच तरफदारी करत होता. सासूने मारलेली थप्पड आणि नवऱ्याचं काहीच न बोलणं ह्या दोन गोष्टी मनाला लावून घेऊन तिने आपला आयुष्य संपवलं होतं.

पोलीस स्टेशनमध्ये बाकीच्या फॉरमॅलिटी करून बरीयल ग्राउंड कॉफीन हे सगळं सांगण्यासाठी तिच्या चर्चमधल्या काही मित्र लोकांनी मदत केली.
पोलीस स्टेशन मध्ये सासू आणि जावई रॉबर्ट जेव्हा आले आता मात्र ग्रेसीच्या संयमाचा बांध तुटला आणि तिने सरळ रॉबर्टची कॉलर धरली.

"माझ्या पोरीला गोड बोलून पटवलं ,मग तिची काळजी घेता नाही आली का तुला? तुझी आई तिला थोबाडीत मारते तर तू काहीच बोलत नाहीस? हेच प्रेम होतं का तुझं ?माझ्या लेकराचा जीव घेतला आहेस, तू मी तुला सोडणार नाही! तुम्हाला सर्वांना मी जेलमध्ये टाकेन . डोमेस्टिक वायलंस ची केस टाकेन . माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल. ती तोंडाला येईल ते बोलत होती त्याची कॉलर सोडत नव्हती .
शेवटी पोलीस मध्ये पडले आणि म्हणाले ,"मॅडम आवरा काय चाललंय ? संयम ठेवा थोडा?"
आता ग्रेसीने स्वतःलाच दोन थोबाडीत मारून घेतले.

" संयम संयम म्हणजे तरी काय असतं? पोरीचा जीव गेला तरीही बोलायचं नाही ?मग कधी बोलायचं माझं जीव गेल्यावर का?" ती जोरात ओरडली.

"इन्स्पेक्टर साहेब मला या लोकांच्या विरोधात तक्रार करायची आहे यांच्या छळामुळे . . . माझ्या मुलीला यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं आहे असं. "


ले डी कॉन्स्टेबल जवळ आली आणि म्हणाली "तुम्ही या लोकांना काहीच करू शकत नाही, त्यांच्या खूप ओळखी आहेत. सध्या तरी त्यांनी ऑलरेडी अँटीसेपेटरी बेल घेऊन ठेवलेली आहे. "

"ग्रेसी मॅडम तुम्ही पुन्हा कोर्टात केस टाका. आधी आपण या बॉडीला हॅन्ड वर करण्याच्या प्रोसिजर पूर्ण करूया. "

ते ऐकून ती बसूनच पडली .

तिची आई, वडील भाऊ आणि तिची मोठी मुलगी पोलीस स्टेशनमध्ये आले होते.
मुलीचे बॉडी कॉफीन मध्ये ठेवण्यासाठी तो माणूस माप घ्यायला आला आणि ग्रेसी ने आयुष्यभराचं रडणं दाबून ठेवलेला होता ते बाहेर काढलं.
आज मात्र तिच्या संयमाचा बांध तुटला होता. त्या कोवळ्या मुलीला स्मशानात पुरणार या कल्पनेनेच तिच्या जिवाची काहीली काहीली होत होती.
सगळं जग या घटनेला आत्महत्या म्हणून पाहिल पण मनातून कुणाला इतकं दुखावणे की ती व्यक्ती जीव देईल, ही मौन हत्याच आहे ना! ग्रेसीच्या डोक्यातून तो विचार जात नव्हता. का कुणाला स्वतः का संपवावं वाटेल?
"प्रेम विवाह होता, रॉबर्ट अगोदर किती काळजी घ्यायचा, फोनवर पण तो आईचं समर्थन करत होता, मग मी पुढे काय करायचं? प्रेम करणारा नवरा जर वेळेवर तिच्यासाठी उभा राहू शकत नाही, तिला सुरक्षा देऊ शकत नाही तर कशाला जगायचं? त्यापेक्षा मेलेलं बरं!" असं एंजल ने त्या पत्रात लिहिलं होतं.

समाप्त
©® स्वाती बालूरकर, सखी
दिनांक 30 एप्रिल 2026.



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →