अजाण बंध.

कथा मैत्रीची
प्रकरण १ – अब्जाधीश होण्याचं स्वप्न

पहाटेची कोवळी सूर्यकिरणे खिडकीतून मृत्युंजयच्या बेडरूममध्ये अलगद पसरली होती. पण मृत्युंजय अजूनही गाढ झोपेत होता. त्याच्या ओठांवर एक मंद, निरागस हास्य उमटलं होतं,

त्याच घर म्हणजे एखाद्या राजवाड्यालाही लाजवेल असा भव्य महाल होता. महालासमोर गोल्फच्या मैदानाइतकं विस्तीर्ण हिरवं लॉन पसरलेलं होतं. त्या लॉनमध्ये अनेक आकर्षक कारंजी उडत होती. एका बाजूला हेलिपॅड होतं, ज्यावर "MK" अशी पांढऱ्या अक्षरांत इनिशिअल्स छापलेल, काळ्या रंगाचं त्याचं खासगी हेलिकॉप्टर उभं होतं.

मुख्य प्रवेशद्वारापासून महालाच्या संगमरवरी प्रवेशमार्गापर्यंत पेव्हर ब्लॉक्सचा रुंद रस्ता बनवलेला होता. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना देखणे स्ट्रीट लॅम्प उभे होते. मुख्य फाटकावर सशस्त्र सुरक्षा रक्षक तैनात होते, तर लॉनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मेटल डिटेक्टर यंत्र बसवलेलं होतं.

महालाचं विशाल प्रवेशद्वार उघडलं की समोर प्रशस्त दिवाणखाना दिसत होता. छताच्या मध्यभागी भव्य काचेचं झुंबर लटकत होतं. दिवाणखान्याच्या मध्यातून वरच्या मजल्याकडे जाणारा रुबाबदार जिना होता. तळमजल्यावर चारही कोपऱ्यांत चार आलिशान शयनकक्ष होते. स्वयंपाकघर आधुनिक आणि पारंपरिक शैलीचा सुंदर मिलाफ होतं. वरच्या मजल्यावरही आणखी चार शयनकक्ष होते.

त्या सर्व वैभवाच्या मध्यभागी, तांबूस-तपकिरी रंगाचा नाइटगाऊन परिधान केलेली त्याची सुंदर आणि प्रेमळ पत्नी त्याच्या मिठीत निर्धास्त झोपली होती.

आणि त्या संपूर्ण वैभवावर उठून दिसत होतं त्याच्या राजवाड्याचं नाव—

"कारखानीस पॅलेस."

अचानक—

"जय.. जय!"

रागाने भरलेला आवाज त्याच्या कानावर पडला.

सुनंदा धडधड आवाज करत त्याच्या खोलीत आल्या आणि तो झोपीतून उठला.

मृत्युंजय वास्तवात परत आला,

तो ना जगातील सर्वात श्रीमंत माणूस होता, ना एखाद्या राजवाड्याचा मालक. तो फक्त कॉलेजमध्ये शिकणारा एक सर्वसामान्य किशोरवयीन मुलगा होता.

"मृत्युंजय, उठ! आज तुला कॉलेजला जायचं नाही का?" सुनंदा म्हणाल्या आणि त्यांनी त्याच्यावरची चादर झटकन ओढून घेतली.

मृत्यूंजयने अर्धवट डोळे उघडले. झोपेच्या गुंगीतच तो पुटपुटला,

"आई... अजून फक्त पाच मिनिटं... प्लीज..."

सुनंदांचा संयम संपला,

त्यांनी त्याला जबरदस्तीने अंथरुणावरून उठवलं, जवळजवळ ढकलत बाथरूमपर्यंत नेलं आणि त्याचे कपडे त्याच्या अंगावर फेकत रागाने म्हणाल्या,

"पुढच्या दहा मिनिटांत तू खाली आला नाहीस, तर तुला उपाशीपोटी कॉलेजला जावं लागेल. आणि कॅन्टीनमध्ये काही खाण्यासाठी एक पैसाही मिळणार नाही."

असं म्हणून त्या तणावग्रस्त चेहऱ्याने खाली उतरून गेल्या.

खाली जेवणाच्या टेबलाजवळ बसलेले सुनील यांनी पत्नीचा उदास चेहरा पाहिला.

काळजीने त्यांनी विचारलं,

"अगं, काय झालं? एवढी नाराज का दिसतेस?"

सुनंदा यांनी एक दीर्घ श्वास घेतला. दोन्ही हात जेवणाच्या टेबलावर टेकवत त्या वैतागलेल्या स्वरात म्हणाल्या,

"अहो, हा मुलगा अगदी वेडाच आहे. त्याच्या भविष्याची मला खूप काळजी वाटते. पुढे आयुष्यात तो कसा निभावून नेणार, काहीच कळत नाही."

सुनील मिश्कील हसले,

"कोणाबद्दल बोलते आहेस?"

सुनंदा यांनी कपाळावर हात मारला.

"देवा! एक दिवस तुमच्या या बाप-लेकाच्या जोडीमुळे मी नक्की वेडी होईन."

असं म्हणत त्या रागाने वळल्या आणि स्वयंपाकघराकडे निघाल्या.

सुनील यांनी हसतच त्यांचा हात धरला.

"अगं, माझ्या सुंदर राणी... कुठे चाललीस? इकडे ये."

असं म्हणत त्यांनी त्यांना हलकेच आपल्या जवळ ओढलं आणि प्रेमाने आपल्या जवळ बसवलं.

"आज मी तुझ्या हाताने नाश्ता करणार. आज तूच मला भरवणार आहेस."

क्षणभर दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत हरवून गेले. जणू त्या क्षणी या संपूर्ण जगात त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच अस्तित्वात नव्हतं.

सुनील यांनी नजरेनेच समोर ठेवलेल्या ऑम्लेटच्या ताटाकडे इशारा केला.

सुनंदा यांनी ऑम्लेटचा एक घास उचलून त्यांच्या तोंडाजवळ नेला.


इतक्यात—

"आई! बाबा! गुड मॉर्निंग!"

जिन्यावरून धावत खाली येणाऱ्या मृत्युंजयचा आवाज संपूर्ण घरात घुमला.

त्या आवाजाने दोघेही दचकले.

सूनंदांना प्रचंड अवघडल्यासारखं वाटलं. आपल्या किशोरवयीन मुलासमोर त्या पतीच्या इतक्या जवळ बसल्या होत्या. त्या घाईघाईने उठून उभ्या राहिल्या. लाजेमुळे त्यांच्या गालांवर नववधूसारखी गुलाबी लाली पसरली.

मृत्युंजय आई-वडिलांकडे पाहत मिश्कीलपणे हसला.

"वा! किती रोमँटिक!" तो म्हणाला. "सॉरी... बहुतेक मी चुकीच्या वेळी आलो."

त्याने दुसऱ्या ताटात ऑम्लेट वाढून घेतलं. टोस्टरजवळ ठेवलेले ब्रेडचे तुकडे उचलले आणि ते नीट चावण्याचीही तसदी न घेता घाईघाईने गिळून टाकले.

"बाय, आई... बाय, बाबा! तुम्ही दोघं तुमचा क्वालिटी टाइम एन्जॉय करा. पुन्हा भेटू!"

असं म्हणत तो घराबाहेर पळतच निघून गेला.

मृत्यूंजय गेल्यानंतर सुनंदा लाजत म्हणाल्या,

"आपल्या एवढ्या मोठ्या मुलासमोर तुम्ही असं कसं वागू शकता? आणि या वयात?"

सुनील खट्याळपणे हसले.

"या वयात म्हणजे? तुला स्वतःला म्हातारं वाटत असेल तर तो तुझा प्रश्न आहे. पण मी अजूनही तरुणच आहे."

क्षणभर थांबून त्यांनी डोळा मारला.

"आणि तसंही... जशी जुनी रम अधिक मादक होत जाते, तसंच नातं जितकं जुनं होतं तितकंच ते अधिक गहिरे आणि रोमँटिक होत जातं."

सुनंदांनी त्यांच्या डोळ्यांत पाहत हळूच विचारलं,

"काय ओ मिस्टर आज ऑफिसला सुट्टी आहे का?"

सुनील यांनी तिच्या कमरेभोवती हात ठेवत तिला अलगद जवळ ओढलं,

गंभीर, प्रेमळ आवाजात ते म्हणाले,

"नाही ग, खरं सांगायचं तर आज ऑफिसला जाण्याचा माझा अजिबात विचार नाही."

सुनंदा पुन्हा एकदा लाजल्या. त्यांनी हलकेच त्यांना दूर सारलं आणि हसत म्हणाल्या,

"चला, आता कामावर जा. पैशाशिवाय पोट भरत नाही. घरी बसलात म्हणून कोणी मोफत पैसे देणार नाही."

सुनील यांनी दोन वर्षांच्या हट्टी मुलासारखा चेहरा केला आणि निरागस नजरेने पत्नींकडे पाहू लागले.

सुनंदा दारापर्यंत गेल्या. त्यांनी त्यांच्या कानाजवळ हळूच कुजबुजलं,

"मी तुमची वाट पाहीन... लवकर या."

सुनील हसले आणि ऑफिसकडे निघून गेले.

सुनंदा दारातच उभ्या राहून त्यांना जाताना पाहत राहिल्या. त्यांच्या डोळ्यांत प्रेम, समाधान, अभिमान आणि आपल्या पतीवरचा अढळ विश्वास स्पष्ट दिसत होता.

---

थोड्याच वेळात मृत्यूंजय कॉलेजच्या आवारात पोहोचला. तिथे पोहोचताच त्याने आपल्या जिवलग मित्र गणेश जोशीला सतत फोन करायला सुरुवात केली.

फोन लागताच तिकडून गणेशचा चिडलेला आवाज आला,

"कुठे मरून गेला होतास तू?"

मृत्युंजय लगेच गडबडला.

"अरे भाई, एवढा रागावतोस कशाला? तुला माहीत आहे ना, राग आला की माणसाचा मेंदू नीट काम करत नाही. आणि हो, जगातला सर्वात चांगला माणूस कोण असेल तर तो तूच आहेस!"

गणेश मोठ्याने हसला.

"अरे, माझ्या लेकरा! फक्त तू माझा लहानपणापासूनचा मित्र आहेस म्हणून मला लोणी लावू नको. तुझ्या गोड बोलण्याला मी फसणार नाही. तुझे एकेक डाव, एकेक खोड्या आणि तुझ्या सगळ्या चलाख्या मला चांगल्याच माहीत आहेत. तू काय करतोस, काय विचार करतोस ते मला लगेच कळत "

मृत्युंजयही हसला.

"म्हणूनच तर तू माझा सर्वात जिवलग मित्र आहेस. तू मला इतकं ओळखतोस की कधी कधी मलाच माझ्याबद्दल तेवढं माहीत नसतं.

गणेश म्हणाला,
"बरं, मिस्टर तत्त्वज्ञानी! आता कृपा करून सांगशील का, तू नक्की कुठे आहेस?"

मृत्युंजयने मुद्दाम गंभीर आवाज काढत उत्तर दिलं,
"होय सर! मी कॉलेजच्या मेन गेट वर उभा आहे, पार्किंग मध्ये भेट."

"ठीक आहे. लवकर ये."
इतकंच बोलून गणेशने फोन ठेवला.

काही मिनिटांतच मृत्युंजय पार्किंगला पोहोचला.

गणेश त्याची वाट पाहत उभाच होता.

मृत्यूंजय हसत त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला,
"काय रे गण्या आज कॉलेजमध्ये काही खास प्लॅन आहे का?"

गणेश शांतपणे उत्तरला,
"हो आहे. आज आपण सगळे लेक्चर्स नीट अटेंड करणार आहोत. आणि त्यानंतर आज जे शिकवलं जाईल त्याची व्यवस्थित सेल्फ स्टडी करणार आहोत."

मृत्युंजयने दोन्ही हात डोक्यावर ठेवले

"अरे यार! पुन्हा तेच? अभ्यास, अभ्यास आणि फक्त अभ्यास! त्यात तुझी ती महान प्रवचनं—प्रामाणिक बना, मन लावून अभ्यास करा, आयुष्याबद्दल गंभीर व्हा, भविष्याचा विचार करा... बस कर यार!"

गणेशच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात नाहीसं झालं.

तो गंभीर स्वरात म्हणाला,

"म्हणजे तुझ्या मते आयुष्याबद्दल गंभीर होणं हा मूर्खपणा आहे?"

मृत्यूंजय काही बोलणार, इतक्यात गणेश पुढे म्हणाला,

"ठीक आहे. मला आपला मूड खराब करायचा नाही. पण माझी एक गोष्ट कायम लक्षात ठेव."

तो काही क्षण शांत राहिला.

"आयुष्य हा व्हिडिओ गेम नाही, जिथे प्रत्येक अपयशानंतर पुन्हा पुन्हा संधी मिळते. आयुष्य प्रत्येकाला फक्त तीन संधी देतं."

मृत्यूंजय शांतपणे ऐकत राहिला.

"पहिली संधी — जेव्हा तू एखादी गोष्ट पहिल्यांदाच करण्याचा प्रयत्न करतोस."

"दुसरी संधी — जेव्हा तू तुझी पूर्ण ताकद पणाला लावतोस आणि स्वतःवर अढळ विश्वास ठेवतोस."

गणेशचा आवाज आणखी गंभीर झाला.

"आणि तिसरी... शेवटची संधी — जेव्हा तुझे हेतू पूर्णपणे शुद्ध असतात, तू मनापासून प्रयत्न करतोस, तरीसुद्धा तुला तुझं ध्येय, तुझं स्वप्न किंवा तुझं उद्दिष्ट गाठता येत नाही."

तो पुढे म्हणाला,

"त्या क्षणी आयुष्य तुझ्याकडून सर्व काही हिरावून घेतं. तू जिवंत असतोस, पण एखाद्या पुतळ्यासारखा. परिस्थिती तुला समजते, पण ती बदलण्याची ताकद तुझ्यात उरत नाही. आणि शेवटी... तुझ्याच हातून तुझा विनाश होतो."

मृत्यूंजयच्या चेहऱ्यावरचं हसू पूर्णपणे गायब झालं होतं.

गणेशने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

"आज तुला वाटत असेल की मी उगाचच मोठमोठ्या गोष्टी बोलतोय. पण एक दिवस तुला माझ्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजेल. आणि त्या दिवशी तुझ्याकडे उरेल ती फक्त एकच गोष्ट..."

तो क्षणभर थांबला.

"...पश्चात्ताप."

असं म्हणत त्याने मनगटावरील घड्याळाकडे पाहिलं.

"चल, लेक्चरची वेळ झाली आहे."

दोघेही वर्गाच्या दिशेने चालू लागले.

संपूर्ण वर्गात विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरू होता. कोणी मोठ्याने गप्पा मारत होतं, तर कोणी खळखळून हसत होतं. त्यामुळे वर्गात प्रचंड गोंगाट झाला होता.

सुमारे पाच मिनिटांनी CR (class representative) आकाश उठला. तो फळ्याजवळ गेला आणि मोठ्याने म्हणाला,

"मित्रांनो, मला तुम्हा सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे..."

पण त्याचं बोलणं कुणाच्याच कानावर गेलं नाही.

सगळेच आपल्या गप्पांमध्ये इतके रमले होते की कोणी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही.

आकाशने एक दीर्घ श्वास घेतला. तो खिडकीजवळ गेला, शिक्षकांच्या टेबलावर ठेवलेला डस्टर उचलला आणि समोरच्या बाकावर जोरात आपटला.

धाड!

त्या कडक आवाजाने संपूर्ण वर्ग दचकला.

क्षणात सगळ्यांचं लक्ष आकाशकडे गेलं.

गरुडासारख्या तीक्ष्ण नजरेने तो संपूर्ण वर्गाकडे पाहत म्हणाला,

"मी इतक्या वेळापासून बोलत होतो, आणि तुम्ही सगळे मला जणू मी अस्तित्वातच नाही अशा प्रकारे दुर्लक्ष करत होतात!"

शीतल लगेच उठली.

"आकाश, आम्हाला माफ कर. आता तू बोल. यापुढे तुला कोणीही अडवणार नाही."

असं म्हणत तिने संपूर्ण वर्गाकडे पाहिलं.

क्षणात सगळ्यांनी एकाच सुरात म्हटलं—

"सॉरी!"

हे पाहून शीतल लाजून हसली.

कारण वर्गातल्या प्रत्येकाला माहीत होतं...
शीतलला आकाश आवडत होता. आकाशला सोडून.

आकाशने वर्गाकडे पाहत विचारलं,
"बरं, माझ्याकडे तुम्हा सगळ्यांसाठी दोन बातम्या आहेत—एक चांगली आणि एक वाईट. आधी कोणती ऐकायची?"

आशुतोष लगेच म्हणाला,
"अर्थातच चांगली! आधी वाईट बातमी ऐकायची, एवढा मूर्ख कोण असेल?"

गणेश शांतपणे म्हणाला,
"माझ्या मते आधी वाईट बातमी सांग. कारण आयुष्यात वाईट काळ संपल्यानंतर मिळणारा आनंद जास्त मौल्यवान वाटतो."

आकाश हसला.
"बरोबर. मग आता आपल्या तीन बातम्या झाल्या—वाईट, चांगली आणि पुन्हा वाईट."

संपूर्ण वर्ग त्याच्याकडे उत्सुकतेने पाहू लागला.

आकाश पुढे म्हणाला,
"तर ऐका... पहिलं लेक्चर इतिहासाचं आहे."

हे ऐकताच धीरज कपाळावर हात मारत म्हणाला,
"अरे यार! ही वाईट बातमी नाही... ही तर भयानक बातमी आहे!"

वर्गात एकच हशा पिकला.

आकाश पुन्हा बोलू लागला.
"आता चांगली बातमी... आज फक्त एकच लेक्चर आहे."

अनिकेत लगेच खुश झाला.
"वा! म्हणजे आजच्या धावपळीच्या वेळापत्रकातून थोडी तरी सुटका मिळाली."

त्याच्या चेहऱ्यावरचे भाव असे होते, जणू एखाद्या मोठ्या उद्योगसमूहाचा मालक दिवसभराचा ताण कमी झाल्यामुळे सुटकेचा निःश्वास टाकत होता.

आकाश मिश्कील हसत म्हणाला,
"एवढ्यात आनंदी होऊ नकोस मित्रा. अजून एक गोष्ट बाकी आहे."

क्षणभर थांबून तो म्हणाला,
"आजचं इतिहासाचं लेक्चर तीन तास चालणार आहे. आणि नवीन प्रोफेसर येणार आहेत."

क्षणातच वर्गातील सगळ्यांचे चेहरे उतरले.

ज्यांच्या चेहऱ्यावर क्षणापूर्वी आनंद होता, त्यांची जागा आता निराशा आणि वैतागाने घेतली.

तेवढ्यात मंगेश जागेवरून उठला आणि मोठ्याने म्हणाला,
"हा आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय आहे! आम्ही याचा निषेध करतो!"

संपूर्ण वर्गाने त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं.

क्षणातच मंगेश ओशाळून पुन्हा खाली बसला.

त्याच वेळी सगळ्यांचं लक्ष वर्गाच्या दरवाज्याकडे गेलं.

नवीन इतिहासाचे प्राध्यापक कधी येतात, याची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत होते.

इतक्यात वर्गाचा दरवाजा उघडला.

एक तरुणी वर्गात प्रवेश करताच क्षणभर संपूर्ण वर्ग स्तब्ध झाला.

ती उंचीने थोडीशी बुटकी होती. तिचे नितळ, घारे डोळे, कोवळे लालसर ओठ, हनुवटीवरील छोटासा तीळ आणि दुधासारखी गोरी कांती तिचं सौंदर्य अधिक खुलवत होते.

तिने पांढऱ्या रंगाचा फुलांच्या नक्षीचा गुडघ्यापर्यंत येणारा स्कर्ट, पांढरे स्नीकर्स आणि उजव्या खांद्यावर निळ्या रंगाची बॅग घेतली होती.

इतक्या सुंदर तरुणीला पाहून संपूर्ण वर्गाला वाटलं—

"हीच बहुतेक नवीन इतिहासाची प्राध्यापिका असावी!"

सर्व विद्यार्थी आदराने उभे राहिले आणि एकसुरात म्हणाले,

"गुड मॉर्निंग, मॅडम!"

ती मात्र गोंधळून गेली.

आश्चर्याने ती आकाशकडे पाहत म्हणाली,

"मॅडम? म्हणजे?"

आकाश नम्रपणे म्हणाला,

"आमचा अर्थ... गुड मॉर्निंग, मॅडम. तुम्हीच नवीन इतिहासाच्या प्रोफेसर आहात ना?"

हे ऐकताच ती हलकंसं हसली.

"नाही, मी प्राध्यापिका नाही."

ती वर्गाकडे वळली आणि म्हणाली,

"मीसुद्धा तुमच्यासारखीच स्टूडेंट आहे. माझ्या बाबांची बदली या शहरात झाली आहे, म्हणून आम्ही इथे शिफ्ट झालोय आणि माझ नवीन ॲडमिशन झालंय "

तिने हसत स्वतःचा परिचय करून दिला.

"हॅलो, सगळ्यांना... माझं नाव अपूर्वा आहे."

मृत्यूंजय तिच्याकडे एकटक पाहतच राहिला.

तो हळूच गणेशच्या कानात पुटपुटला,

"अपूर्वा... किती सुंदर नाव... आणि त्याहूनही सुंदर ती स्वतः! मला वाटलं होतं ही आपली इतिहासाची शिक्षिका असेल. क्षणभर तर मी कल्पनाही केली होती की अशी सुंदर शिक्षिका आपल्याला शिकवणार. पण ती आपली वर्गमैत्रीण निघाली... खरं सांगू? हे तर त्याहूनही छान झालं. तिच्याशी मैत्री करता येईल... कोण जाणे, कदाचित हीच माझ्या आयुष्यातील ती खास व्यक्ती असेल..."

हे बोलता बोलता मृत्यूंजय पूर्णपणे तिच्या विचारांत हरवून गेला.

अपूर्वाने त्याच्यासमोर हात हलवला.

पण मृत्यूंजयची पापणीसुद्धा हलली नाही.

गणेशने हळूच मृत्यूंजयचा हात खाली ओढला.

तेव्हा तो भानावर आला.

तो लाजून गेला.

त्याने अपूर्वाकडे पाहत अवघडलेलं हसू दिलं.

अपूर्वाही मंद हसली आणि आपल्या जागेवर जाऊन बसली.

क्रमशः

Please कमेंट्स करा.



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →