Login

सुरुवात भाग-१

नात्यांसाठी काही गोष्टींची नव्याने केलेली सुरुवात!
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक: सुरुवात भाग-१

आभा लग्न होऊन सासरी आली होती. सर्व नवीन असल्याने तिला प्रत्येक गोष्ट करताना धाकधुक असायची. त्यात काही नातेवाईकांनी तिला त्यांचे अनुभव सांगून सासरच्या बाबतीत एक वेगळीच प्रतिमा बनवली होती.

लग्नानंतरचे विधी झाल्यावर ती रीतीप्रमाणे हळद उतरवण्यासाठी माहेरी गेली होती.

"काय गं, तुझे सासर कसे आहे ?" एका वयस्कर आजीबाईंनी तिला विचारले.

" चांगले आहे." ती म्हणाली.

"आता नव्याचे नऊ दिवस आहेत म्हणून चांगले आहे म्हणशील, नंतर तुला चांगलाच अनुभव येईल." आभाची काकी म्हणाली.

" घरी नीट पोहोचलीस का ? "  आभाचा नवरा राम तिला मेसेज करुन विचारत होता.

" हो. " तिने एवढे उत्तर देऊन मोबाईल बाजूला ठेवला.

पाच दिवस कोणत्याही कामाला हात लावायचा नाही, असे सासरी आणि माहेरी सांगितले असल्याने ती शांत बसून होती.

तेवढ्यात तिच्या जिवलग मैत्रिणीचा फोन आला.

" हॅलो आभा, कशी आहेस ?" तिने विचारले.

" मी ठीक आहे. तू कशी आहेस ? " आभाने विचारले.

" मी ठीक आहे. काय मग आता तू पण आमच्या टीम मध्ये आलीस. मिसची मिसेस झालीस."

" हो. " तिने हसून आपल्या मैत्रिणीच्या बोलण्यावर प्रतिक्रिया दिली.

" सर्व ठीक आहे ना ? " काळजीने तिच्या मैत्रिणीने विचारले.

थोडा वेळ दोघी मैत्रिणी फोनवर बोलल्या आणि त्यानंतर आभाने आपल्या आई-बाबांशी थोडा वेळ घालवून झोपी गेली.

पाच दिवसांनी ती सासरी जाण्यास निघाली. आपल्या मुलीला तिच्या सासरच्या लोकांना देताना आई-वडिलांचे डोळे भरून आले होते. आपली मुलगी नांदायला जाणार हे सुख आणि ती आपल्यापासून दूर जाणार हे दुःख घेऊन तिची पाठवणी करताना मुलीचे पालक नेहमीच संमिश्र भावनेत असतात, असेच आभाचे पालकही झाले होते.

" तुमच्या मुलीची काळजी करू नका." आभाचे सासरे म्हणाले.

राम हा आभाचा नवरा, त्याच्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता. एका मोठ्या कंपनीत तो चांगल्या हुद्द्यावर होता. नातेवाईकांच्या मध्यस्थीमुळे त्यांचे लग्न जुळले होते. तसेच आभा ही काही वर्ष  वेगळ्या राज्यात राहिल्याने तिला तिथलं सगळं नवीन होते.

हळद उतरवून आल्यावर तिने हळूहळू काम करायला सुरुवात करावी, असे तिच्या सासुने सांगितलं.

आभाला येत तर सर्व होतं, परंतु नवीन ठिकाणी थोडसं तिला असहज झाल्यासारखं होत होतं, त्यात सारखा  गोंधळ सुद्धा उडत होता, त्यामुळे सर्व विचारूनच करण्याचे तिने ठरवले होते.

रामला सुद्धा इथे आपली बायको सर्वांसोबत मिळून मिसळून राहील की नाही, याबद्दल थोडी चिंता होती. आपली आई आणि आपली बायको ह्यांना एकत्र स्वयंपाकघरात तसेच इतर कामे करताना बघून त्याला जरा हायसे वाटले.

दोघांनाही आता एकाच खोलीमध्ये राहण्यास मुभा दिली होती. त्याच्या मनामध्ये नवीन नात्याची थोडीशी भीती सुद्धा वाटत होती. आभालाही त्याबद्दल भीती वाटत होती.

सर्व घरातील काम आटपून सासुबाईंच्या मदतीने रात्री ती खोलीमध्ये आली होती. राम आधीच तिथे बसून मोबाईलमध्ये काहीतरी बघत होता.

आभाची आल्याची चाहूल लागल्यावर त्याने मोबाईल बाजूला ठेवून तिला बघून स्मितहास्य दिले. तिने सुद्धा त्याच्याकडे पाहून स्मितहास्य देवून प्रतिसाद दिला.

त्याने नजरेने तिला स्वतःच्या बाजूला बसायला सांगितले तसेच हातात हात घेण्याची परवानगी विचारून त्याने अर्धी रात्र बोलण्यातच घालवली होती.

" मला कोणत्याच गोष्टीची घाई नाहीये. आपण दोघांच्या सहमतीनेच आपल्या वैवाहिक जीवनात पुढे जाऊया."  हे आश्वस्त करणारे बोल रामने तिला झोपताना सांगितले.

दुसऱ्या दिवशी लवकर उठायचा विचार केलेला असून सुद्धा आभाला उठायला उशीर झाला होता.

नव्या नवरीकडे सगळ्यांचेच लक्ष असते, त्यामुळे बाजूलाच राहणाऱ्या भावकीतल्या बायका सकाळपासून मुद्दामच आभाच्या सासूला सुनेबद्दल विचारत होत्या.

" काय अजून उठली नाही का ?  किती उशीर झाला आहे?  आणि काम कोण करणार ?" त्यातलाच एका बाईने आभाच्या सासूला विचारले.

" आमच्याकडे तुमच्या सारखे जास्त कामे करण्यासारखं काही नसतं. आम्ही चौघंच तर आहोत. तिला जेव्हा उठायचं असेल तेव्हा ती उठू शकते. कारण आम्ही आमच्या घरी नात्याने सून जरी आणली आहे तरी आम्ही तिला मुलगी म्हणूनच तिच्याशी वागणार आहोत. " आभाच्या सासुने त्यांना सांगितले.

गजर झालेला ऐकू न आल्यामुळे आभा पटकन आवरून खोलीच्या बाहेर आली. कशीतरी साडी गुंडाळलेली बघून सासुने तिला ज्या कपड्यात तिला सहजता वाटेल तेच कपडे घालण्यास सांगितले आणि म्हणून आभाने ड्रेस घालण्यास सुरुवात केली.

थोड्याच वेळाने काहीतरी मागण्यासाठी आभाची चुलत आजे सासू आली होती आणि तिने आपल्या नातसुनेला  ड्रेस घातलेला बघून कपाळावर आठ्या आणल्या.

" काय मग आभा बाई, लवकर तर उठायचं नसतच तुला. आता हे पण सुरू केले आहेस का ? " रागातच त्या आजे सासुबाईंनी तिला विचारले.

क्रमशः

काय वाटते पुढे काय होईल?

© विद्या कुंभार

कथेचा भाग कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.

(सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारे कॉपी करण्याचा प्रयत्न केल्यास त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, ह्याची नोंद घ्यावी.)
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →