Login

स्पर्श ..

माणुसकीच्या निरागस स्पर्शाने कसा धर्म हरवून जातो ही सांगणारी कथा

लघुकथा लेखन स्पर्धा- एप्रिल:-२०२६

विषय:- धार्मिक अधर्मी

शीर्षक:- स्पर्श

"ए पोरी, सकाळी सकाळी का आलीस इथे? सांगितले होते ना मी, उंबऱ्याच्या आत पाऊल ठेवायचे नाही म्हणून." सुलेखा छोट्या आनंदीवर कडाडल्या.

त्या कडक आवाजाने आनंदी दचकली.

"हे..हे पैसे पडले होते. तेच द्यायले आले होते." आनंदी हिसमसून पन्नास रुपयांची नोट पुढे करत दबक्या आवाजात म्हणाली.

"हा.. हा.. ठीक आहे. ठेव त्या तिकडे. कशालाही हात न लावता निघून जा." तिच्याकडे तुच्छतेने पाहत सुलेखा म्हणाल्या.

तिने ती नोट अलगद कट्ट्यावर ठेवली आणि रडवलेल्या चेहऱ्याने जाऊ लागली.

सुलेखाचे ओरडणे ऐकून आनंदीचा वडील सदा पळतच वाड्याच्या दारात मान झुकवून हात बांधून उभा राहिला.

"ए सदा, घेऊन जा तुझ्या मुलीला. तुला बजावता येत नाही का रे तिला? या वाड्यात तिला यायला मज्जाव आहे, हे सांगितले नाहीस का तुझ्या मुलीला? जेव्हा बघावं तेव्हा काही ना काही बहाणा शोधून वाड्यात घुसत असते, निर्लज्ज कुठली? आता सकाळी हिचं तोंड बघितले तर संपूर्ण दिवस खराब जाईल माझा." तिच्याकडे रागीट कटाक्ष टाकत त्या सदावर खेकसल्या.

"माफ करा, थोरल्या मालकीणबाई. पोरं लहान हाय. न्हाई समजत ती तिला. वाईज समजून घ्या की वं. पुन्यांदा इथं येणार न्हाईजी. म्या समजावतो तिला." सदा मान खाली घालून आनंदीला जवळ घेत म्हणाला आणि तिला सोबत घेऊन गेला.

"गोमूत्र शिंपडून पवित्र करावे लागेल ही जागा आणि ही नोट. या खालच्या जातीच्या लोकांना कितीही सांगा. पण ऐकतील तर शप्पथ. माझ्या अजयने यांना लाडावून ठेवले आहे." सुलेखा सगळीकडे गोमूत्र शिंपडत रागात पुटपुटली.

"आपले हात घाणेरडे हायती का? म्या तर चांगले काम केले होते, मग तरीही त्या माझ्यावर ओरडल्या." आनंदी मनात विचार करत होती.

सुलेखा गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होत्या. खूप धार्मिक वृत्तीच्या. त्या जातपात, कुळाचार पाळत.

सदा त्याची बायको हिरा आणि मुलगी आनंदी सोबत राहत होता. या वाड्यात तो आणि त्याची बायको घरगडी म्हणून काम करायचे.

आनंदी सात वर्षाची खूपच चुणचुणीत, चाणाक्ष, हुशार मुलगी होती. तिला त्या वाड्याचे खूप आकर्षण होते. तिला शिक्षणाची आस होती. पण परिस्थितीमुळे तिला शाळेत जाता येत नव्हते. अजयची मुलगी परी जी तिच्या एवढीच होती. शाळेचा गणवेश घालून, दप्तर घेऊन तिला शाळेत जाताना आनंदी खूप कुतूहलाने पाहायची.

अजय सुलेखाचा मुलगा, गावचा सरपंच होता. तो सुलेखाच्या अगदी उलट होता. तो माणुसकी जाणायचा. गोरगरिबांसाठी झटत असायचा. तो जातपात, धर्म मानत नव्हता. पण सुलेखाच्या पुढे त्याचे काही चालत नसायचे. तो काही बोलायला गेला तर त्या कांगावा करायच्या.

"आंदू, लेकरा किती वेळा तुला बजावलं होतं. वाड्यात जाऊ नगो. तर का गेलीस तू?" घरी आल्यावर सदा तिला समजावत म्हणाला.

"बा, म्या फकस्त बाहेर पडलेली नोट द्यायला गेली होती." आनंदी मुसमुसत म्हणाली.

"बयो, तिथं जात जाऊ नगस. मालकीणबाई काय बी बोलती तुला. जे आम्हास्नी बेस न्हाई वाटतं." हिरा तिला गळ्याशी लावत म्हणाली.

"आय, मालकीणबाई असं का वागतात गं, माझ्यासंग? मला परीशी खेळू बी देत न्हाईत. लगेच वसकून अंगावर येतात." आनंदीने बारीक चेहरा करून प्रश्न विचारला.

"ते मोठे लोक हायती, पोरी. त्यांची गोष्ट वेगळी हाय. तुला आता न्हाई कळायचं." सदाने बाकी काही सांगायचं टाळलं.

दिवसामागून दिवस जात होते. एके दिवशी परीचे एक जुने फाटके पुस्तक गायीच्या गोठ्याजवळ पडले होते. आनंदी हिराला मदत करत होती. तिच्या हाती ते पुस्तक पडले. अजय जेव्हा परीचा अभ्यास घ्यायचा तेव्हा ती बऱ्याच वेळा खिडकीच्या बाहेर उभी राहून ऐकत असायची. तेव्हा बरेचसे शब्द तिला कानावर पडत असत. ऐकून ऐकून तिला बरेच शब्द लक्षात असायचे.

त्या पुस्तकातील अक्षर जमिनीवर काटकिने गिरवत ती वाचण्याचा प्रयत्न करू लागली. ते अजयने पाहिले.

तो तिच्या जवळ गेला आणि तिला विचारले ,"आनंदी, तुला शिकायचे आहे का?"

तिने लगेच आनंदाने मान डोलावली. तिच्या डोळ्यांत शिक्षणाविषयी चमक होती. त्याने तिला शिकवण्याचे आश्वासन दिले. हिरा आणि सदाला खूप आनंद झाला.

पण जेव्हा ही गोष्ट सुलेखाला समजली तेव्हा मात्र त्यांना ही गोष्ट रूचली नाही. त्या तांडव करू लागल्या.

"काय गरज आहे तिला शिकवायची? त्यांच्या हद्दीतील राहू दे त्यांना." सुखेला संतापाने म्हणाल्या.

तो वाद न घालता दुर्लक्ष करून निघून गेला.

एके दिवशी भर दुपारी सुलेखा मंदिरात गेल्या होत्या. अचानक त्यांना भोवळ आली आणि त्या खाली पडल्या.

आनंदी तिथे असलेल्या एका झाडाखाली खेळत होती. तिने ते पाहिले आणि पटकन पळत तिथे गेली.

सुलेखाच्या गालावर हात थोपटत घाबरून तिने विचारले,"मालकीणबाई, काय झाले तुम्हास्नी? उठा ना."

त्यांचा काहीच प्रतिसाद आला नाही तेव्हा तिने मंदिरातील कलशाचा तांब्या उचलून आणला आणि ते पाणी तिच्या तोंडावर शिंपडले.


तरीही ती उठेना तेव्हा तिने हाका मारून लोकांना गोळा केले. एक दोन माणसे आली तेव्हा ती धावत वाड्यात गेली आणि तिने अजयला बोलवून आणले. सुदैवाने तो वाड्यातच होता.

तो घाबरून तिथे आला. तोपर्यंत तिथे असलेल्या व्यक्तीनी सुलेखाला जवळच्या इस्पितळात नेले होते. ते कळल्यावर तेथून तो इस्पितळात गेला.

त्यांच्यावर उपचार सुरू झाले होते. थोड्यावेळाने त्या शुद्धीवर आल्या. आणलेल्या व्यक्तीने जेव्हा त्यांना आनंदीमुळे लवकर उपचार मिळाले हे सांगितले तेव्हा त्यांना स्वतःची लाज वाटली.

"ज्या मुलीच्या हाताला अपवित्र, अस्पृश्य मानले. त्याच स्पर्शाने आज मला वाचवले." अपराधी भावनेने त्यांचे मन त्यांनाच खात होते.

अजय आनंदीला जवळ घेत म्हणाला,"बघितलंस आई, या मुलीमुळे आज तुझे प्राण वाचले. नुसते धार्मिक असून चालत नाही. तू धार्मिक असूनही अधर्मी राहिलीस. आई, मुले म्हणजे देवाघरची फुले असतात. त्यांच्याबरोबर तू कशी वागलीस. असो आता तरी डोळे उघडले असतील तुझे."

त्या तेव्हा काही बोलल्या नाहीत. फक्त आनंदीकडे एक कटाक्ष टाकला. ती निरागसपणे त्यांना बघत होती.

पाच-सहा दिवस गेले. या दिवसात आनंदी एकदाही वाड्याकडे फिरकली नाही. त्यांना आनंदीचा चेहरा दिसत होती. ती आली नाही म्हणून त्यांना त्यांचेच मन खात होते.

सातव्या दिवशी अजय बाहेर येत तर आनंदीने विचारले,"काका, मालिकणबाईंना बरे वाटते का?"

"हो, बरे वाटते. जा तू आत विचार त्यांना." तो हसून तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवत म्हणाला.

"नको.. नको काका, त्या ओरडतील मला!" आनंदी बारीक चेहरा करून म्हणाली.

आतून हे सुलेखा ऐकत होत्या. त्यांना गलबलून आले.

त्यांनी आतून आवाज दिला,"आनंदी, आत ये."

"चल, तुला आईने बोलावलेय." ती नको म्हणत असतानाही अजयने तिला आत नेले.

ती दबकत आत आली आणि अजयच्या पाठीमागे लपली.

"घाबरू नकोस, आनंदी. इकडे ये माझ्याजवळ." त्याने मायेने पहिल्यांदा जवळ बोलावले.

तिने अजयकडे एक नजर पाहिले. त्याने हसून नजरेने जा म्हणून सांगितले.

"आजपासून तू मला, मालकीणबाई नाही, आजी म्हणायचं." त्या मायेने तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या.

आनंदीचे डोळे आनंदाने चमकले.

"अजय. मी उगाच या लेकराशी वाईट वागले. तिला शिकायचे आहे ना. तिच्या शिक्षणाचा सर्व खर्च आपण करू. काय गं पोरी, शाळेत जाशील ना!" त्यांनी आनंदीच्या प्रेमाने पाहत विचारले.

अस्पृश्यतेचा स्पर्श आनंदीच्या निरागसपणात हरवला. माणुसकी मायेच्या स्पर्शाने वाडा फुलून गेला.

आनंदीने आनंदाने मान डोलावली.

समाप्त -

माणुसकीच्या निरागस स्पर्शाने धर्म हरवून जातो.

©️ जयश्री शिंदे


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →