Login

सोयीचा न्याय

सोयीचा न्याय भाग १
सोयीचा न्याय
भाग १

" अमर, हे बघ... हे शेवटचं आणि फायनल सांगतेय तुला. माझ्याकडून नाही होत आता ! मी नाही सांभाळू शकत तुझ्या आई-वडिलांना. माझं ऑफिस, अर्णवची शाळा, इतर अँक्टिव्हिटी क्लास , त्याचा अभ्यास, घरचं मॅनेजमेंट आणि वरून या दोघांचं दिवसातून दहा वेळा होणारं आजारपण... मी काय मशीन आहे का ?

उद्याच्या उद्या त्यांना जवळच्या एखाद्या चांगल्या '
केअर सेंटरमध्ये शिफ्ट करा, नाहीतर मी हे घर सोडून कायमची निघून जाईन ! "

नीताचा तो करडा, धारदार आवाज त्याच्या फ्लॅटच्या भिंतींवर आदळला. बेडरूममध्ये औषधांच्या वासात पडून असलेल्या अमरच्या आई-वडिलांच्या काळजात जणू सुरी खुपसली गेली. अमरचे वडील, जे एकेकाळी सरकारी खात्यात अधिकारी होते, त्यांनी फक्त खिडकीबाहेर पाहिलं. त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहत होतं, पण ओठ शिवलेले होते.

अमरने हताशपणे नीताकडे पाहिलं.

" नीता, अगं काय बोलतेयस हे ? बाबांचं गुडघ्याचं ऑपरेशन झालंय, आईला विसरभोळेपणाचा त्रास सुरू झालाय. अशा वेळी त्यांना बाहेर कसं काढायचं ? हे त्यांचं घर आहे, त्यांनी पेन्शनचे सगळे पैसे लावून हे घेतलंय."

" घर कोणाचं आहे यापेक्षा ते कोण चालवतंय हे महत्त्वाचं आहे अमर ! " नीताने आपला फोन टेबलावर जोरात आपटत उत्तर दिलं.

" तुझ्या आईला साधं औषध वेळेवर घ्यायचं कळत नाही, मग मी काय दिवसभर त्यांच्या मागे धावत बसू ? मला माझा मी-टाइम हवा आहे, मला माझी प्रायव्हसी हवी आहे.
जर तुला मी आणि अर्णव या घरात हवे असू, तर तुला या ओझ्याचा निकाल लावावा लागेल. चॉईस तुझा आहे ! "

अमर सुन्न झाला. त्याला त्याचं बालपण आठवलं, पण नीताचा तो आक्रमक अवतार, त्याचा संसार, हे घर तुटण्याची भीती या कचाट्यात तो सापडला होता. तो कमालीचा हतबल झाला होता.
दुसऱ्या दिवशी, जड अंतःकरणाने अमरने आपल्या आई-वडिलांच्या बॅगा भरल्या. वडिलांनी एक अवाक्षरही काढलं नाही.

वृद्धाश्रमाच्या त्या लोखंडी गेटपाशी त्यांना सोडताना अमरला वाटलं की तो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा गुन्हा करतोय. वडिलांनी अमरच्या खांद्यावर हात ठेवला आणि धीर गंभीर आवाजात म्हणाले,

" काही वाटून घेऊ नकोस बाळा. संसार सुखाचा कर. तुला काही अडचण येऊ नये एवढीच आमची इच्छा आहे."

अमर तिथून पळून आला. घरी आल्यावर नीताने घराचं पूर्ण मेकओव्हर काढलं होतं. तिने सासू-सासऱ्यांच्या खोलीतलं सगळं सामान काढून तिथे स्वतःसाठी एक योग रूम बनवायला सुरुवात केली. जणू काही तिथे कोणी कधी राहतच नव्हतं. अमरच्या मनात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती, पण नीताच्या चेहऱ्यावर मात्र एक विजयी समाधान होतं.

पुढची पाच वर्षं अशीच गेली. नीता आपल्या कॉर्पोरेट आयुष्यात आणि सोशल मीडियाच्या जगात व्यग्र झाली. अमर मात्र आतून खचलेला होता.

एके दिवशी नीताच्या माहेराहून एक फोन आला. तिचा भाऊ, सुमित आणि वहिनी, स्नेहा यांच्यात आई-वडिलांच्या जबाबदारीवरून मोठं भांडण झालं होतं. स्नेहाने स्पष्ट सांगितलं होतं की तिला सासू-सासर्‍यांचा भार उचलता येणार नाही.
नीता तावातावाने माहेरी गेली. तिथे गेल्यावर तिने वहिनीला अक्षरशः धारेवर धरलं.

" कशी आहेस गं तू स्नेहा ? लाज वाटत नाही तुला ? माझ्या आई-बाबांना घराबाहेर काढण्याची भाषा करतेस ? विसरलीस वाटतं, हे घर आई-बाबांनीच कष्टाने उभं केलंय ! लेक म्हणून मी हे मुळीच सहन करणार नाही."

नीताने तिथे खूप गोंधळ घातला. तिने सुमितलाही सुनावलं,
" तू कसला रे भाऊ ? बायकोच्या तालावर नाचतोयस ? आई-बाबांना त्रास दिलात तर गाठ माझ्याशी आहे."

नीता घरी परतली तेव्हा तिचं डोकं रागाने भणभणत होतं. ती अमरला म्हणाली,

" अमर, तू बघच आता. सुमित आणि वहिनीने आई-बाबांना नीट सांभाळलं नाही, तर मी त्यांना इथे घेऊन येणार. माझे आई-बाबा मला मुळीच जड नाहीत. वहिनीला वाटतंय ती एकटीच हुशार आहे, पण तिला माहिती नाही की मी अजून जिवंत आहे ! "

अमर सुन्नपणे फक्त पाहतच राहिला. त्याच्या कानात पाच वर्षांपूर्वीचे नीताचे तेच शब्द घुमू लागले,
" मी नाही सांभाळू शकत... मी काय मशीन आहे का ? "

त्याला प्रश्न पडला, पाच वर्षांत नीता बदलली होती की फक्त उंबरठा बदलला म्हणून न्यायाचे नियम बदलले होते ?

क्रमशः
0

🎭 Series Post

View all