दुःख, चिंता आणि शांतता, आपल्या मनाचा प्रवास. लेखक -सुनिल पुणेTM 9359850065.
"जर तुम्ही दुःखी असाल तर तुम्ही भूतकाळात जगत आहात.
चिंतीत असाल तर भविष्यकाळात,
आणि शांत असाल तर वर्तमानात..!"
चिंतीत असाल तर भविष्यकाळात,
आणि शांत असाल तर वर्तमानात..!"
जीवनात प्रत्येक माणूस आनंद, दुःख, चिंता, आशा आणि निराशा यांचा अनुभव घेत असतो. पण या सर्व भावनांचे मूळ कुठे आहे, याचा विचार आपण फारसा करत नाही. खरं तर आपलं मनच आपल्याला कधी स्वर्गात तर कधी नरकात घेऊन जात असतं.
जेव्हा आपण भूतकाळातील एखाद्या घटनेत अडकून राहतो, तेव्हा दुःख जन्म घेतं. "असं झालं नसतं तर..", "मी तसं केलं असतं तर.." अशा विचारांच्या भोवऱ्यात माणूस अडकत जातो. गेलेली वेळ, हरवलेली माणसं किंवा झालेल्या चुका यांचा विचार करत राहिल्याने वर्तमानातील आनंद हरवून बसतो. भूतकाळ हा अनुभव देण्यासाठी असतो, त्यात कायम राहण्यासाठी नाही.
त्याचप्रमाणे भविष्याची अति चिंता माणसाला अस्वस्थ करते. उद्या काय होईल? मुलांचे काय? नोकरी टिकेल का? व्यवसाय वाढेल का? आरोग्य कसे राहील? अशा असंख्य प्रश्नांनी मन व्यापून जाते. पण सत्य हे आहे की उद्या अजून आलेलाच नाही. आपण आजचा दिवस गमावून उद्याच्या कल्पनांमध्ये जगत राहतो. त्यामुळे चिंता वाढते आणि मनःशांती दूर जाते.
मात्र जो माणूस वर्तमानात जगायला शिकतो, तोच खऱ्या अर्थाने शांततेचा अनुभव घेतो. आजचा क्षण, आजची माणसं, आजची संधी आणि आजचा आनंद यांना मनापासून स्वीकारणारा माणूस समाधानी राहतो. वर्तमान म्हणजे देवाने दिलेली सर्वात मोठी भेट आहे. म्हणूनच त्याला "Present" असे म्हणतात.
आजच्या डिजिटल युगात ही गोष्ट अधिक महत्त्वाची झाली आहे. मोबाईल, सोशल मीडिया आणि सततच्या स्पर्धेमुळे माणूस स्वतःपासून दूर जात आहे. दुसऱ्यांचे यश पाहून भविष्याची चिंता वाढते आणि जुन्या आठवणी पाहून भूतकाळाचे दुःख जागे होते. अशा वेळी स्वतःकडे पाहण्याची गरज आहे.
जीवनाचा खरा आनंद भूतकाळ बदलण्यात किंवा भविष्य जाणून घेण्यात नाही, तर वर्तमान सुंदर करण्यात आहे. आज आपण कोणाला हसवले, कोणाला मदत केली, कोणावर प्रेम केले आणि स्वतःसाठी किती आनंद निर्माण केला, हेच महत्त्वाचे आहे.
म्हणूनच चला, भूतकाळातून धडे घेऊया, भविष्याची योग्य तयारी करूया; पण जगूया मात्र वर्तमानात. कारण शांतता, समाधान आणि आनंद यांचा खरा पत्ता वर्तमानातच आहे.
लेखक–सुनिल पुणेTM 9359850065, topsunil@gmail.com
लेख माझ्या नावासकट फॉरवर्ड करण्यास कायदेशीर संमती, परवानगी आहे.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
