Login

कथा : शिवबांच्या राज्यात ! पार्ट 2

.
जलद कथा स्पर्धा फेब्रुवारी 2026

दिवाण-ए-आममध्ये अनेक सरदार उमराव जमले होते. जनान्यातील प्रमुख बेगमांनी आणि इतर स्त्रियांनीही पडद्यामागून गर्दी केली होती. महाराज येताच कुजबूज सुरू झाली.

" यही है अफजल खान को मारने वाला सिवा !"
" इसी ने शाहिस्ताखान कि ऊँगलीया काट दी !"
" सूरत को लूटने वाला यही है !"

औरंगजेब आला आणि तख्तावर विराजमान झाला. झीनतने हुशारीने राख औरंगजेबच्या पायाखाली टाकली होती.

महाराजांनी औरंगजेबाकडे नजर रोखून धरली. औरंगजेब हसला. सह्याद्रीचा वाघ आज आपल्या दरबारात उभा आहे याचा त्याला अहंकार झाला.

" औरंगजेब, हे सिंहासन सम्राट पृथ्वीराज, अजातशत्रू, धर्मराज युधिष्ठिर, समुद्रगुप्त , हर्षवर्धनचे ,महाराणा प्रतापचे ! तुझ्यासारख्या धर्मांध आणि कपटी व्यक्तीला या सिंहासनावर बसण्याचा काही अधिकार नाही. उतर इथून. " महाराज मनातल्या मनात म्हणाले.

" राजाजी, कुर्निश करा. "

" आम्ही स्वतंत्र राजे आहोत. फार फार तर मुजरा करू. तेही सम्राट पृथ्वीराज चौहानच्या सिंहासनाला. "

मग एका-एका मनसबदाराला खिल्लत देण्यात आल्या. राजा जसवंतसिंहला महाराजांच्या पुढच्या रांगेत उभे केले. तेव्हा महाराजांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

" रामसिंग , हमारे आगे कौन खड़ा है ? आमच्या मावळ्यांनी पाठ दाखवून ज्याला पळायला भाग पाडले तो जसवंतसिंह ?" महाराज विजेप्रमाणे कडाडले.

" शांत राजाजी. "

" काय गोंधळ चालू आहे रामसिंग." औरंगजेबने विचारले.

रामसिंग पुढे आला.

" वो राजाजी थोडे नाराज हुए. "

" खिल्लत दो. खिल्लत दो. " औरंगजेब हात हलवत म्हणाला.

महाराजांना पुढे येऊन खिल्लत देण्यात आली.

" रामसिंग , तुमच्या बादशहाची खेळी आमच्या चांगल्याच ध्यानात आली आहे. तुमच्या बादशहाला दुनियादारी कळते का नाही ? आम्ही स्वतंत्र राजे आहोत. आमच्या आबासाहेबांनीदेखील साडेतीन वर्षे निजामशाही चालवली होती. आणि आम्हाला अशी हीन वागणूक ? एका मनसबदाराचा दर्जा? आदिलशाह कुतुबशाह आमची कृपा रहावी म्हणून प्रयत्न करतात. फिरंगी सिद्दी पोर्तुगीज आम्हाला घाबरतात. एवढे बलाढ्य आरमार आमचे. जे तुमच्या मुघल फौजांना जमले नाही ते आम्ही करून दाखवले आहे. आम्ही आमचे राज्य मनगटाच्या बळावर निर्माण केले आहे. भावाचे रक्त सांडून आणि पित्याला विष देऊन नाही. सह्याद्रीचा स्वाभिमान दिल्लीसमोर झुकणारा नाही. अश्या खिल्लती आम्ही आमच्या सरदारांना रोज वाटतो." असे म्हणून महाराजांनी ती खिल्लत फेकून दिली.

" चला शंभूराजे. " महाराजांनी शंभूराजेचा हात धरला आणि चार पावले पुढे आले. एक कटाक्ष औरंगजेबवर टाकला आणि पाठ दाखवून निघून गेला. औरंगजेबला मराठी माणसाचा स्वाभिमान काय असतो ते समजले.महाराज सिंह गर्जना करून परत गेले होते.