जलद कथा स्पर्धा फेब्रुवारी 2026
कथा : शिवबांच्या राज्यात !
कथा : शिवबांच्या राज्यात !
रात्रीचा प्रहर होता. झीनतउन्नीसाला झोप लागत नव्हती. तिने हुकूम देऊन दासी रेशमला बोलावले. रेशम एक दासी होती.
" शेहजादी , एवढ्या रात्री बोलावले. काय सेवा करू आपली ?"
" रेशम , तू महाराष्ट्रातली आहे ना. "
" होय. माझी मालकीण पुण्यातील एक प्रसिद्ध नर्तकी होती. नंतर बादशहा शहाजहान यांच्या आदेशानुसार आम्ही आग्र्याला आलो. "
" पूर्ण हरममध्ये सिवाची चर्चा आहे. कुणी म्हणते सुरत बदसुरत करणारा सिवा तर कुणी म्हणते शाहिस्तेखानची बोटे कापणारा आणि अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा सिवा येतोय. तुला अजून काय माहीत आहे ?"
" शेहजादी , शिवाजीराजे जादूगार आहे. काला जादू करतात ते."
" काय?"
" होय. मी असे ऐकले आहे की शाहिस्तेखानवेळी ते भिंत फोडून प्रकट झाले आहे. जादूई तलवार आहे त्यांच्याकडे. म्हणून ते कोणतीच लढाई हरत नाहीत."
" मला नाही विश्वास. "
" तुमचे मीठ खाल्ले आहे शेहजादी. खोटे नाही बोलणार. पण आलमगीर बादशहाला शिवाजीराजेपासून दूरच राहायला सांगा. जर उद्या भर दरबारात त्यांनी शाहिस्तेखान किंवा अफजलखानप्रमाणे बादशहावरपण.."
" रेशम. खामोश. " झीनत ओरडली.
" माफ करा शेहजादी. काळजी वाटते म्हणून बोलले. ही राख उद्या बादशहाच्या पावलांखाली टाका. एकदा यावर बादशहाची पावले पडली की ते सुरक्षित राहतील."
" ही राख मला दे आणि तू जा. "
झीनतला मुजरा करून रेशम निघून गेली.
***
दुसऱ्या दिवशी पहाटे रेशम एका मशिदीत गेली. बाहेरच एक फकीर बसला होता. रेशम त्याच्या कानाजवळ जाऊन कुजबूजली ,
" पूर्ण जनानखान्यात राजे जादूटोणा करतात अशी अफवा पसरवली आहे."
" शाब्बास. !"
***
महाराज आणि युवराज रामसिंग यांची भेट झाली.
" क्षमा करा राजे. बादशहाचा आज पन्नासावा वाढदिवस आहे. त्या धावपळीत भेट घ्यायला उशीर झाला."
" आम्ही जाणतो. पण आग्र्याला पोहोचेपर्यंत शेहजादेची वागणूक आणि आता साध्या हवेलीत व्यवस्था ?"
" क्षमा राजाजी. "
थोड्या वेळाने महाराज बादशहाची भेटीसाठी निघाले. आठ वर्षाचे शंभूराजे आणि चार सेवकही सोबत होते. आग्र्याचा तो उंच किल्ला शंभूराजे आश्चर्य चकित होऊन नेत्रांमध्ये साठवत होते.
" हा किल्ला आवडला का बाळराजे?" महाराजांनी हसत विचारले.
" नाही आबासाहेब. इथे आपल्या सह्याद्रीसारखा कणखरपणा नाही. स्वातंत्र्य नाही. मुख्य म्हणजे आऊसाहेब नाहीत. जिथे आऊसाहेब नाहीत तो स्वर्गही व्यर्थ. "
महाराजांच्या मुखावर स्मितहास्य प्रकटले. सर्वांनी मुख्य दरबारात प्रवेश केला.
क्रमश..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा