जलद कथा स्पर्धा फेब्रुवारी2026
महाराज नजरकैदेत अडकले. चौकी-पहाऱ्या बसवण्यात आल्या. रेशम झीनतचे पाय दाबत होती.
" कोणत्या विचारात बुडाल्या आहात शेहजादी?"
" मी त्या सिवाबद्दल विचार करत आहे. "
" बादशहा आता काय शिक्षा देतील कुणास ठाऊक. तुम्हाला तर काही खबर नसेलच. कारण या गोष्टी जवळच्या लोकांनाच माहिती असतात. "
" तुला काय म्हणायचे आहे की आम्ही जवळचे नाही ?"
" आहात पण इतक्या नाहीत जितक्या बाकीच्या बेगम आणि शेहजादी आहेत. "
" सिवाला अफगाणिस्तानला पाठवायचा इरादा आहे अब्बाहुजूरचा. " झीनत हळू आवाजात इकडे तिकडे बघत कुजबुजली.
पहाटे रेशम पुन्हा एका मशिदीत गेली. तिथे त्या फकिराला खबर दिली.
***
सुरुवातीला सर्व सरदार चिडले होते पण महाराजांनी वझीरपासून इतर छोट्या मोठ्या सरदारांची भेट घेतली. त्यांना अमूल्य नजराणे दिले. त्यामुळे बादशाहचे कान भरणे बंद झाले. महाराजांना मृत्यूची शिक्षा दिली असती तर मिर्झाराजे जयसिंह चिडला असता कारण पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजेंनीच महारांजाच्या सुरक्षिततेची हमी दिली होती. म्हणून अफगाणिस्तानातल्या मोहिमेला पाठवून तिथेच गुप्तपणे ठार करण्याची योजना औरंगजेबने बनवली.
***
" रेशम , मी असे ऐकले आहे की सिवा आपले सैन्य माघारी दख्खनमध्ये पाठवत आहे. " झीनत म्हणाली.
" हो शेहजादी. खरे आहे. त्यांचे सैनिक भांडण करत आहेत. घरी जायचे आहे."
" बेवकुफ आहे सिवा. परमुलुखात स्वतःचीच सुरक्षा कमी करून घेतली. "
" मी तर असेही ऐकले आहे की ते फार आजारी आहेत. बादशहाचा अपमान करून आपण फार पाप केले आहे असा त्यांचा समज झाला आहे. म्हणून दानधर्म करत आहेत. पूर्ण शहरात मिठाई वाटत आहेत. "
" जितके मी अब्बाहुजूरला ओळखते त्यानुसार सिवाचे माघारी परतणे असंभव आहे. सह्याद्रीचा वाघ अडकला आहे मुघलांच्या पिंजऱ्यात. "
रेशम हसली.
***
दिवस ठरला. महाराजांनी आपल्या जागी हिरोजी फर्जंदला झोपवले. स्वतः तिथून निसटले. मग मदारी मेहतर आणि हिरोजीही औषध आणण्याचे सांगून निसटले. शंभूराजे आणि महाराज काही साथीदारांसह उत्तरेच्या दिशेने निघाले. रेशमही अजमेरच्या दर्ग्याला जाऊन येते म्हणून निघाली. महाराजांनी आधीच गुप्तहेरांचे जाळे पेरले होते. रेशमने आग्र्याच्या आसपासच्या गुलाम स्त्रियांना एक करून लहानशी फौजच बनवली होती. या सर्व स्त्रिया महाराजांच्या गुप्तहेरांना माहिती पुरवत. मुघलांच्या जनानखान्यात सामील होऊन माहिती गोळा करत. त्यांना फारसे निर्बंध नव्हते. आता मिळालेल्या सूचनेप्रमाणे जिथे जिथे शोध घेणारे मुघल सैनिक दिसतील त्यांना ते अडवत आणि काही जण पुढे जाऊन महाराजांच्या गुप्तहेरांना सतर्क करत.
***
मथुरा शहराजवळ असलेल्या "रावल" गावी मुघल तुकडी महाराजांना शोधत पोहोचली. त्यांना महाराजांची खबर मिळाली होती. रेशमनेही आपल्या साथीदारांना जमा केले. त्याने काही जणांना पुढे पाठवले. उरलेल्या साथीदारांमध्ये शस्त्रे वाटली.
" गड्यांनो, आपण गुलाम असलो तरी या मातृभूमीची लेकरे आहोत. आपला देश देव धर्म संकटात आहे. या देशाला फक्त महाराजच वाचवू शकतात. तेच आशेची शेवटची किरण आहेत. बाजीप्रभूंनी जसे खिंड लढवून महाराजांचे प्राण वाचवले तसेच आपल्याला या मुघल तुकडीला पुढे पोहोचू द्यायचे नाही. महाराज वाचले पाहिजे. महाराष्ट्रात पोहोचले पाहिजे. कारण लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे. हिंदू धर्म टिकला पाहिजे. आपले धर्मांतर झाले पण महाराजांमुळे भविष्यात तशी नामुष्की कुणावरही ओढवणार नाही. आपली मंदिरे राहतील आणि संस्कृती टिकेल. हर हर महादेव. शिवाजी महाराज की जय ! "
" शिवाजी महाराज की जय !" सर्वांनी जयघोष केला.
रेशमने काही जणांना मुघलांकडे पाठवले आणि त्यांनी मुघलांना महाराज जंगलात लपले असल्याचे सांगितले. मुघल तुकडी जंगलात आली. जंगलात घनघोर युद्ध सुरू झाले. मुघलांसाठी हा अनपेक्षित हल्ला होता. मुघल तुकडी कापली गेली. रेशम जखमी झाला. तेव्हा तिथे महाराजांचा एक गुप्तहेर आला. रेशम शेवटचे श्वास मोजत होता.
" महाराज सुरक्षित आहेत रेशम."
" या मुघलांच्या प्रेतांचा बंदोबस्त कर. कुणालाही संशय नको यायला. माझी तलवार महाराजांच्या चरणापाशी ठेव. त्यांना माझा मुजरा सांग. माय मातीसाठी जितकं करता आलं तेवढं केलं. माझा अखेरचा मुजरा. " असे बोलत रेशमने प्राण सोडले.
***
शंभूराजेना मथुरेत सोडून महाराज रायगडावर परतले. दरबार भरला. शंभूराजे यांचे निधन झाल्याचे कळल्यावर सर्वच हळहळत होते. मुघलांनी शोध थांबवावा म्हणून मुद्दाम महाराजांनी अफवा पसरवली होती. आग्र्याच्या मशिदीत फकीर बनलेला गुप्तहेर दरबारात आला. त्याने रेशमची तलवार महाराजांच्या पायाशी ठेवली. सर्व हकीकत सांगितली. महाराजांना अतीव दुःख झाले.
" स्वराज्य हा त्याग कधीच विसरणार नाही. भरतभूमीची सर्वच लेकरे अशी एकत्र झाली तर यवनांना त्यांच्या मुलुखात परत पाठवायला फार वेळ लागणार नाही. या स्त्रियांच्या कुटूंबाला आर्थिक मदत करा. "
" जी महाराज. " मोरोपंत म्हणाले.
महाराजांनी रेशमची तलवार उचलली आणि त्या तलवारीला सन्मानाने शस्त्रागारात ठेवले. तिथे दिवाबत्तीची सोय करण्यात आली.
( प्रस्तुत कथा काल्पनिक असून काही ऐतिहासिक प्रसंगाचा आधार घेऊन लिहिली आहे.)
©® पार्थ धवन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा