Login

शेवटची इच्छा (भाग २)

आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते विधिलिखित असतं,नाही का?


आज अंजलीचे मन काही केल्या कामात लागेना...तिच्या मनाला राहून राहून अपराधी झाल्या सारखं वाटत होतं कारण आईला आपण जिवंत आहे यासाठी फोन करायला लागणं, ही तिची गरज नाही तर तिच्या मुलांसाठी लाजेची गोष्ट होती.


दुपारचे दोन वाजले....अंजली एकटक कॉम्प्युटर कडे बघत होती. डोक्यात वेगळेच विचार घोळत होते.


"अंजली..ऐ अंजली..."

तिच्या कलिगने तिला जेवणासाठी आवाज दिला. पण अंजली काहीतरी विचारात मग्न होती.
शेवटी सौदामिनीने हाताने तिला हालवले.... "अंजली...डबा आणला ना?"


"अहह!! हो...हो..."

"चल  जेवायला."

"नाही, अगं मूड नाही."


"मूड नाही म्हणजे?"


"अगं म्हणजे सकाळी खाऊन आले ना."

"अगं आता दुपारचे दोन वाजले."

"नको, आज नाही भूक."

अंजलीने डबा उचलून हात पुढे केला.

"हे, घे...खा ...तुझी आवडती मसाला भेंडी केली आहे."

"तुला माहित आहे मी तुझ्याशिवाय जेवणार नाही...चल उठ पटकन."


सौदामिनीने अंजलीचा हात धरला आणि तिला जेवायला नेल.

जेवण झाल्यावर लगेच अंजलीने अनिलला कॉल केला...

"हॅलो दादा"


"अंजली काय झालं? एवढी अपसेट का आहेस?"


अंजलीला खूप बरं वाटलं की साधा कॉल केला तरी दादाने तिची मनस्थिती ओळखली. 

"काही नाही रे! असंच... बरं संध्याकाळी तुला वेळ आहे का?"

"का गं? कशासाठी?"

"अरे आईकडे जाऊ या का?"


"आज नको ना ...आज एक अर्जंट मीटिंग आहे. उद्या जाऊ या ना."


"नको आज जाऊ अनुराग दादा पण येतोय."

"बरं मग मी तुझ्या वहिनीला केतकीला पाठवतो...आणि मी थोड उशिरा येईल चालेल."


"हमम..पण लवकर ये मागच्या वेळी आम्ही घरी निघून गेलो पण तू आला नाहीस."


"येतो गं... चल बाय...बरीच काम पडली आहेत."


संध्याकाळ झाली,अंजली ऑफिसवरून थेट आई कडे निघाली.मध्ये थांबून तिने आईची आवडती रस मलाई घेतली आणि घरी कॉल केला.

"सासूबाई तुम्ही जेऊन घ्या, सियाला पण जेवू घाला मी भाजी करून ठेवली होती, संध्याकाळी बाई पोळ्या करून जाईल , मला जरा उशीर होईल."


" हो...चालेल ...जास्त उशीर नको करू बाई.."


" नाही ..."


अंजली आईकडे गेली...

दारावरची बेल वाजवली, टिंग टॉग.. टिंग टॉग..

आई कडे असणाऱ्या कामवाल्या मावशींनी दरवाजा उघडला...


"अंजली ताई..या ना."


"कशा आहात मावशी तुम्ही?"

"मी मजेत...."

अंजली आत आल्याबरोबर मावशी इकडे तिकडे बघून म्हणाल्या,

"ताई काही तरी सांगायचं आहे तुम्हाला."

"हो....थांबा जरा...आईला भेटून येते."


अंजली आईच्या रूममधे जाऊ लागली... दरवाजात मावशींनी तिला अडवले....

"नाही ताई!!! थांबा!!!! मला काही तरी महत्वाचं बोलायचं आहे."

"अहो मावशी! एवढं काय महत्वाचं बोलायचं?"

"ताई, आई तुम्हाला बोलतील की मला काढून टाका.मला नका काढून टाकू."

"अरे!  ती कशाला म्हणेल.तिला कुणी तरी नको का २४ तास जवळ."


ते ऐकून आई आतूनच ओरडली

"काय कुजबुज चालली आहे बाहेर? रमा...अग कोण आलाय बाहेर?"

"अंजली ताई आल्या."

काय बोलायचं असेल रमा मावशीला? त्यांना त्यांच्या नोकरीची काळजी असेल का?की अजून काही कारण?
वाचूया पुढच्या भागात.

क्रमशः...
©®कल्पना सावळे
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →