इन्स्पेक्टर साहेबांनी ताबडतोब उत्तर दिलं, "काय आहे ना, ही नोकरी जेव्हा स्वीकारली तेव्हाच खाजगी आयुष्य संपलेलं आहे. म्हणून तर सर्व्हिस मधे टिकून आहे. समजलं का?" राजमाने जरा वैतागूनच म्हणाले, "बोला, आता काय माहिती हवी आहे माझ्या कडून?"
त्यावर इन्स्पेक्टर म्हणाले, "असं आहे, एक मृतदेह सापडलाय, तो ओळखायला आम्हाला मदत करा. कदाचित, तुमच्या मिसेसचा असू शकेल. बरोबर याल तर बरं होईल." असं म्हणून ते वळले.
त्यांना अनुसरून राजमाने म्हणाले, "चला, तेही करुन घेऊ. पण माझी बायको आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हती. उलट तिला जगण्यात जास्त इंटरेस्ट होता."
काही न बोलता सुराडकर गाडीत जाऊन बसले. अर्थातच राजमानेही मागोमाग आले.
हॉस्पिटलच्या शवागारात शिरता शिरता सुराडकर म्हणाले, "काय आहे ना, मृतदेहाचा चेहरा मारण्यापूर्वी पार बिघडवून टाकलाय. तुमच्या मिसेस ड्रेस घालीत होत्या की साडी?"
राजमानेंनी त्यावर उत्तर दिलं नाही. खरंतर आत्ता त्यांना घरी जाऊन विश्रांती घ्यायची होती. शवागारात येणारा एक टिपिकल वास कोणालाही आवडला नाही. सगळ्यांनीच नाकावर रुमाल लावले. ते आता अतिशीत अशा रुममधे शिरले. तिथल्या अटेंडंटनी समोरच्या मोठ्या कपाटातील एक खण त्याने मोठा आवाज करीत उघडला आणि दोनतीन कामगारांच्या मदतीने आतला मृतदेह बाजूच्या मोठ्या टेबलावर ठेवला. मृताच्या तोंडावरची चादर पूर्ण बाजूला करुन दाखवला. खरंतर राजमानेंना उलटीची भावना होतहोती. पण ती दाबून चेहऱ्यापासून पायापर्यंत पाहिला. देहाच्या अंगावर साडी होती. पण ती बऱ्याच ठिकाणी फाटली होती. मालतीच्या गळ्याच्या उजव्या बाजूला चामखीळ असल्याचं राजमानेना आठवलं. ती तिथे नव्हती. चेहरा इतका विद्रुप केला होता की नक्की कोणाचा होता, ते सांगणं कठीण होतं. पण चामखीळ नसल्याने ती मालती नव्हती, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी "ही माझी बायको नाही" हे सांगितलं.
अर्थातच सुराडकरांना कारणही पाहिजे होतं. त्यांनी दोनतीन वेळा तसं विचारलं ही.
मग राजमाने थोडे रागातच म्हणाले "किती वेळा सांगायचं?" असं म्हणून ते रुमच्या बाहेर आले.
मग मात्र सुराडकरांनी त्यांना त्यांच्या घराजवळ सोडले आणि काही न बोलता ते निघून गेले. राजमाने खोलीचं कुलूप उघडून आत शिरले. अचानक खोली खायला उठली. पुढे कसं करायचं हे न ठरवता आल्याने ते आरामखुर्चीत डोळे मिटून बसले.
आता पोलिसांच्या तावडीतून सुटायचं एवढंच जमनाच्या डोक्यात होतं. ती डोकं दोन्ही हातात धरुन जमिनीवर बसली होती. रात्र चढत होती. अस्वस्थता आजपर्यंत तिने बरीच भोगली होती. प्रत्येक वेळी तिच्या मदतीला कोणी ना कोणी आलं होतं. आता ती आणि मंदबुद्धी मुलगी यांच्या शिवाय इतर अत्यंत घाणेरड्या बायका समोर होत्या. त्यातल्या एकीने तिला विचारलं, "कोठा चलाती है क्या? फिर तेरी तो चांदी है. सुबे तक छूट जायगी." जमनाने काहीच उत्तर दिलं नाही.
हळूहळू रात्रीचे बारा वाजत आले. म्हात्रे आणि इन्स्पेक्टर्स आपापली काम पाहात होते. तेवढ्यात म्हात्रेच्या टेबलावरचा फोन खणखणला. फोन उचलला. तो होता शहा साहेबांचा फोन. "अरे ते जमनाबेनला छोडला का नाय? तेला ताबडतोब छोडून दे. उदीया होम मिनिस्टर बरोबर मीटिंग है. अशे कच्चे लोगको आत नको ठेव. मिनिस्टर आठदस पुलिस स्टेशनको सरप्राईज व्हिजिट देगा."
"But sir there is an information. और विद्युतबेन को क्या जवाब देगे, वो प्रेस कान्फरन्स की धमकी देकर गयी है!"
"देखो जितना बोला उतना करो. बाकी मै देख लूगा" असं म्हणून त्यांनी फोन खाली ठेवला.
इन्स्पेक्टर म्हात्रेना नाराजीने घेरले. शेवटी बरोबरीच्या लोकांबरोबर सल्ला मसलत करून त्यांनी जमना आणि मन्द मुलीला सोडण्याचे ठरवले. मनातल्या मनात दात ओठ खात त्यांनी लॉकअप उघडला.
आत शिरल्या शिरल्या तिथलीच एक कैदी सुटकेबद्दल बोलली होती, ती परत म्हणाली, "मैने कहां था न, तू छूट जायगी. तुम लोगोंका रिश्ता पुलीससे जनम जनमका है." त्यावर म्हात्रेना राग आला आणि तिला एक शिवी देत जमनाला म्हणाले, "चल, तेरेकू छोडनेका आर्डर है. इस पागल को लेके निकल जा." असं म्हणून तिला त्यांनी हाताने खेचून बाहेर ढकलले.
जमना रागात बोलली, "मैने बोला था आपको, आप गलती कर रहे है." असं म्हटल्यावर तिरसटपणे तिच्या अंगावर ओरडले.
त्यावर ती बोलली, "नारायण को भी छोडो ना."
मग मात्र भडकून म्हात्रे म्हणाले, "नारायण को छोडनेका आर्डर नही है."
त्यावर भडकून जमना म्हणाली, "उसकोभी मै छुडाके रहूगी, देख लेना इन्स्पेक्टर साब."
आता मात्र जमना आणी ती मुलगी तिथून बाहेर पडल्या. पोहोचता पोहोचता त्यांना दीड वाजला. कोठ्यावर पोहोचता क्षणीच तिला एक मोठी गाडी तिच्या घरासमोर उभी असलेली दिसली. तो होता "वासीम खान" तिच्या मनात आलं हा आत्ता इथे कसा आला. बाईचा वास लागला की सगळे मर्द असेच धावतात. पण वासीमखान तसा नव्हता. त्याला बाईपेक्षा ती आणणार्या पैशांमधे जास्त इन्टरेस्ट होता. पैसा फेका तो दस लडकिया नाचेगी, हे त्याच तत्व होतं. जमना घरात शिरली आणि सोफ्यावर बसलेल्या वासीमखानला तिने सलाम आलेकुम केला. आणि "मै तय्यार होके आती हूँ" असं म्हणून ती वेड्या मुलीसह आतल्या खोलीत शिरली.
आति मात्र तिला ह्या येडीला आपण आश्रय दिल्याचा पश्चाताप होऊ लागला.
माफक मेकअप करून जरा बरे कपडे घालून ती बाहेर आली. आता याला कालची बाई इतक्या रात्री दाखवायचा खरतर कंटाळा आला होता.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर वासीम म्हणाला, "चलो पहले माल तो दिखाओ. बादमें वेव्हारकी बाते करेंगे." असं म्हंटल्यावर जमनाने रंजीबईला हाक मारली. तिला एका बाजूला घेऊन बाईला आणायला सांगितलं.
मग मात्र रंजीबाईने ती झोपेत असल्याच सांगितलं. त्यावर वासीम म्हणाला, "हम जाके देखते हैं."
जमनाने आपल्या खोलीचा दरवाजा हळूच उघडला. आत मालती गाढ झोपेत होती. तिचं बारकाईने निरीक्षण करुन वासीम परत हॉलमध्ये आला. जमनाने विचारलं, "अब बोल कितना देगा? पाच तो मैने बोला है." हातातला व्हिस्कीचा ग्लास संपवीत तो म्हणाला, "पयले तो ये औरत धदेवाली नही लगती. और इसको तयार करना भी बहोत भारी पडेगा. इसकी उमरभी तो ज्यादा है. ये कितने बरस काम करेगी? फिरभी तू बेचना चाहती है, तो मै ज्यादासे ज्यादा दो लाख देगा. ये भी ज्यादा है. सोच ले."
जमनाचा चेहरा चांगलाच पडला. उठून येरझारा घालीत म्हणाली, "चारके नीचे मै नही बेचनेवाली." हे ऐकल्यावर वासीम म्हणाला, "तो बेचती कायकू उसे? रख ले और कमा ले. ऐसे फालतू चीजके लिये मुझे बुलाया क्या. मेरेकू लगा एकदम कच्ची कली होगी. वैसी होती तो मै अपने लिये ही रख लेता." तो उठत म्हणाला, "फालतूकी झंझट मे मै नही पडनेवाला."
जमनाला पैशाचा मोह एवढा होता कि तिने त्याला परत एक ग्लास घ्यायला लावला. त्याच्या लक्षात आलं कि जमना हारणाऱ्यांपैकी नाही. जमनाने पण स्वतःसाठी पेग भरला. ती पीत नसे. पण कंपनी द्यायला ती नेहमीच तयार असे. तिला माहीत होतं समोरच्याच लक्ष नसताना कसं ड्रिंक फेकून द्यायचं. आत्ता ती तेच करीत होती छाती थोडी उघडी करीत ती म्हणाली, "क्या है ना भाईजान आपुन दोनो एकही धंदेमे है. थोडा बहोत इधर उधर तो होताही रयता है नी? तू सिर्फ एक लाख बढा देना."
त्यावर वासीम म्हणाला, "एक लाख क्या, एक रपियाभी नही बढाऊंगा. क्यूँकी ये घरेलू औरत है. धंदेमे ज्यादा दिन नही टिकेगी. पहले ही मैने पचास हजार ज्यादा बोला है. चल अब मै निकलता हूँ. तू तय करके बता देना. नारायण कहां है?"
"वो पुलीसकी हिरासतमे है. उसको छुडाना पडेगा."
"वो तो तेरी परेशानी है." असं बोलून तो उठला. आपला अजस्त्र देह हालवीत गाडीत जाऊन बसला.
जमनाची निराशा झाली. ती चांगलीच विचलित झाली. ती आपल्या खोलीत जाऊन पडली. वासीम हा काही शेवटचा माणूस नाही. दुसरं कोणाला तरी पकडलं पाहिजे. आत्ता निदान नारायण तरी पाहिजे होता. तिने शहा साहेबाना फोन केला. पण त्यांनी उचलला नाही. शेवटी विचार करता करता तिला झोप लागली. दिवसभराचा शीण आणि धडपडीने ती चांगलीच थकली होती. सकाळचे साडेपाच वाजत होते. अचानक धाडकन आवाज झाला. ती झोपेतून जागी झाली. तिने "रंजिबाई" अशी जोरात हाक मारली.
(क्रमश:)
