Login

स्फूर्ती ३

जिद्द डोंगराएवढी
स्फूर्ती ३


दहा माणसाचं काम एकट्याने करण्याची तिची सवय कामाला आलेल्या बायकांना थक्क करून सोडायची. जरा म्हणून कंटाळा नाही. सकाळी नऊ पासून सुरू झालेली शिवारातली कामं दुपारी एक वाजता जेवायच्या वेळीच थांबायची. भरभर आणलेली भाजी भाकरी खाऊन ती संध्याकाळी घरच्या गुरांना दहा बारा पेंड्या गवत कापून ठेवायची. सगळ्यांची जेवणे होईपर्यंत तिची गुरांच्या पोटाची व्यवस्था झालेली असे. कारण आता काम सुरू झालं की अंधार पडायला कामं थांबवली जायची. नंतर गवत कापून घरी जायला भरपूर अंधार व्हायचा. घरी जाऊन घरची कामे पण असायचीच. सासू फक्त खाऊन पिऊन गावभर गप्पा मारत फिरायची. दुपारी जेवलेली भांडी, केर सुद्धा तीच्याने व्हायची नाहीत. आता सून आले तर मी का करू? अशा हेकेखोर स्वभावाने ती गावभर सांगत फिरायची. त्यामुळे गावातल्या बायका तिच्या माघारी खूप बोलायच्या. कंबांचं गोडवे गायच्या कारण लग्न झालेल्या दुसऱ्या दिवसापासून तिचा सुरू झालेला दिनक्रम अख्ख्या गावात चर्चेचा विषय होता. दिसायला सुंदर आणि कामात तरबेज बायको मिळाली म्हणून तिच्या नवऱ्याची अनेकजण स्तुती करायचे.

चुलत सासवा आणि जावा नेहमी तिच्या सोबत असायच्या. त्यात चुलत सासवा तिचं नेहमी गोडवे गातात म्हणून चुलत जावा आता धुसफुसत असत. कारण आपली सासू आता आलेल्या आपल्या चुलत जावेला खूप मान देते म्हणून त्यांचा जळफळाट होऊ लागलेला.

असेच दिवस जात होते. लग्नानंतरचे नव्याचे नऊ दिवस कामातच संपले. अन् एका सकाळी गोवऱ्या थापत असताना तिच्या ओटी पोटी दुखू लागलं. तिला तसं का दुखतयं कळून चुकलं. तिला सासरी पहिली मासिक पाळी आली होती. आणि त्याचा तिला त्रास जाणवू लागला होता. त्या काळी पाळी झाल्यावर बाईने कशाला हात लावायचा नाही ,देवधर्म पाळायचा नाही, जेवण खोलीत जायचं नाही, तिला जनावरांच्या गोठ्यात पाच दिवस जागा मिळायची. तिथेच तिला सारे काही आणून दिले जायचे. त्यावेळच्या बायकांना महिन्यातले हे पाच दिवस खूप त्रासाचे वाटायचे. त्यात आतासारख्या सुखसुविधा नव्हत्या. रोज नदीवर जाऊन पाणी आणावे लागायचं. पाळी झालेल्या स्री ने पाच दिवस नदीवर जायचं नाही, पाण्याला शिवायचे नाही, अशा दिवसात घरातल्या पुरुषाला पाणी आणावे लागे. कारण सासू नावाचा प्राणी काही काम करण्यास तयार नसायचा मग राहिलं कोण? नवरा त्याला हे पाच दिवस नदीवर जाऊन पाणी अनावेच लागे. त्यात नदीवर अनेक बायका असायच्या. एखादीचा नवरा पाणी नेण्यासाठी आला तर समजून जायचं त्याच्या बायकोला पाळी आलीय.

मग बायकांना आयता विषय मिळायचा. त्यात काही जणी मुद्दाम चांगल्या संसारात भांडण लावण्यासाठी काहीबाही मोठमोठ्याने बोलत. तेच नेमकं पाणी भरायला आलेल्या पुरुषांच्या कानावर पडत असे. पूर्वी व्यसनाधीनता पाचवीला पुजलेली होती. लग्नाच्या आधीपासूनच मुलं दारूच्या आहारी गेले असल्याने आणि व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडण्याची शक्यता जवळजवळ अशक्य असल्याने जन्मदेनाऱ्या आया देखील त्यावेळी मेटाकुटीला आलेल्या असायच्या. त्यावेळचं शिक्षण मॅट्रिक पर्यंत असायचे. त्यात गणित खूप अवघड आणि शिक्षक(मास्तर)कडक शिकवण्याची पद्धत इतकी कडक की शेर, पावशेर, पावकी अशी सूत्र सोडवता सोडवता सगळ्यांची पाचावर धारण बसे. आणि ती सूत्रे नाही जमली तर बांबूचे कोंब अर्थातच कोवळ्या काठ्यानी सर्वांच्या पायावर लालभडक वळ उठत. त्या मास्तरांच्या मारालाच घाबरून अनेक जण शिक्षणाला राम राम ठोकायचे आणि शिवारात कामाला जायचे.अशा गणिताच्या धास्तीने म्हणा किंवा पुढे शिकण्याच्या ना खुशीने म्हणा कंबाच्या नवऱ्याने इयत्ता चौथीतच शाळेला राम राम ठोकला. शाळा सोडल्यावर इकडे तिकडे असे करता करता लग्नाचं वय आले. आणि मग लग्नानंतर काडीचे काम न करता फिरू लागला. बायको मात्र नशिबाने सौंदर्यवती आणि कामात तरबेज होती. त्यामुळे कामधंदा करायची इच्छा त्याच्या मनालाही शिवत नसे.

ओटी पोटी दुखणं वाढलं…गोठ्यातल्या माळ जागेत एक वाकळ आणि खाली अंथरायला गोणपाट इतकीच सामग्री होती. पिण्यासाठी पितळेचा एक मोठा तांब्या आणि एक वाटी एक पितळेचं ताट ज्यात तिला पुढचे पाच दिवस जेवण ग्रहण करायचे होते. अशा जागेत ती विश्रांती घेऊ लागलेली. आता पाच दिवस तिला घरातून बाहेर पडता येणार नव्हते. कोणाशी बोलता येणार नव्हते…जरी बोलायचं असेल तरी दुरूनच बोलायचं. तिच्या अंगाला शिवायचे नाही. त्यामुळे तिच्या सासूला घरचं सगळं काम करावं लागणार होतं. आणि काम करावे लागणार म्हणून सासूने जो काही तोंडाचा पट्टा आणि तोंडाला येईल त्या शिव्यांचा भडीमार सुरू केला होता. आधीच बीचारीचे पोट दुखीमुळे पुरते हाल होत होते. त्यात सासूच्या शिव्या ऐकून ती मूकपणे रडत होती. त्या दिवशी मुद्दाम सासूने तिला जेवण दिलेच नाही. त्या गोठ्यात ती बिचारी एकटीच असंख्य वेदनांनी तडफडत होती…भुकेने व्याकूळ झालेली ती मध्यरात्री कधीतरी रडून रडून झोपी गेली.

_sauu

क्रमशः…..

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →