स्फूर्ती २
१९८५साली तिचे थाटामाटात लग्न झालं. माहेरच्या घराचा उंबरा ओलांडून तिने सासरच्या घरी आनंदाने पाय ठेवला.
दोनशे वस्तीचे गाव. पंढरपुरी खापरीची घरं , एका घरात लहान लहान खोल्या प्रत्येक खोलीत एक कुटुंब सहा सात कुटुंबं एकत्र राहायची. तेंव्हा गावात वीज नव्हती. रॉकेलचे दिवे, ग्रामीण भाग म्हटल्यावर शेतातील कामातच सगळ्या स्त्रियांचं आयुष्य गेलं. वाडवडिलोपार्जित भरपूर शेत प्रत्येक वारसाला वारसाहक्काने मिळालेलं होतं. त्यामुळे गावातला प्रत्येकजण अशिक्षित जरी असला तरी श्रीमंत मानला जायचा.
पहाटे कोंबडा बांग देई आणि सर्वांची पहाट होई. तेंव्हा घड्याळे नव्हती. कोंबडा बांग देताच तिला जाग आली. अंगावरचे नऊवारी लुगड्याचा तिने कासोटा घातला. लांबसडक जाड केसांचा अंबाडा (बुचडा) बांधला अन् ती बाहेर आली.परसदारी (परड्यात ) भल्या मोठ्या तांब्याच्या हंड्यात तिने अंघोळीसाठी पाणी तापवायला ठेवलं. चुलीतला विस्तव पेट घेताच ती निश्चित होऊन गोठ्यात शेन काढायला गेली. शेण काढून भरलेली टोपली सारी शक्ती एकटवून डोक्यावर घेऊन ती घरच्या मागच्या बाजूला मोकळ्या शेतात आली. काळोख असल्याने हातात चिमणी घेऊन ती त्या शेणाच्या गोवऱ्या थापू लागली. चिमणी खाली ठेवली की विझण्याची भीती असे. आणि पहाटे अंधार असल्यामुळे आजूबाजूला माळरान असल्याने कोणीतरी येईल ही भीती असायचीच त्यामुळे एका हाताने गोवऱ्या थापायच्या आणि एका हाताने डोक्यावर दिवा धरायचा. डोक्यावर दिवा ठेवला तर तो कधीच विझत नाही. ही त्यावेळी समज होती.
गोवऱ्या थापून ती पुन्हा घराकडे निघाली. टोपलीत वाळलेल्या गोवऱ्या होत्याच. त्या गोवऱ्या परड्यात योग्य ठिकाणी ठेऊन दिल्या आणि ती आता अंघोळीला निघाली. अंघोळ होताच पुन्हा दूध काढण्यासाठी तिची पावले गोठ्याकडे वळली. दूध काढून ती आपल्या घरात आली. दुधाच डीचकी वाष्याला अडकवलेल्या दोरीच्या संगड्यात ठेऊन ती घराच्या अंगणात रांगोळीचा सडा घालायला निघाली. उंबरा पुजवून रांगोळी घालून तिने स्वच्छ अंगाने चूल पेटवली. अन् चहाचं आदन ठेवून स्वयंपाकाची भाजी चिरू लागली. भाजी चिरून होईपर्यंत चहा उकळला होता. त्याच चुलीवर भात आणि पाठीमागे डाळ ठेऊन ती चहा घेऊ लागली. घरातली सगळी कामं आवरून तिला मजुरीसाठी दुसऱ्यांच्या शिवारात जायचं होतं. तिने भरभर स्वयंपाक आवरला. तोवर सासू आणि नवरा उठले होतेच. त्यांना अंघोळीसाठी पाणी देऊन ती अंथरूण पांघरूण घडी करून ठेवू लागली. सासू नवऱ्याच्या अंघोळ्या होताच चहा आणि सकाळची न्याहरी तिने सगळ्यांना दिली. स्वतः कसेबसे चार घास खाऊन ती शेतात जायची तयारी करू लागली.
आजूबाजूच्या नवीन सुना काही सासवा अशा मिळून दहा पंधरा जनी शिवारात जायच्या. त्या स्त्रियात तिच्या चुलत सासवा देखील होत्याच. ज्या तिला खूप जीव लावायच्या. ती होतीच तशी गोरीपान नाकेली, स्वच्छ सुंदर एका ओळीत असलेले दात, गोऱ्यापान चेहऱ्यावर नाकाच्या उजव्या बाजूला जन्मतच चामखीळ होता. तिच्या मोठ्या भावाला कपाळावर आणि तिला चेहऱ्यावर तो एक चामखीळ सोडला तर ती स्वर्गातील अप्सरा भासत असे. अनेक स्त्रियाना तिच्या रूपाचा हेवा वाटायचा. निसर्गाने तिला आणि तिच्या सर्वच भावंडाना भरभरून सौंदर्य दिलं होतं.
अनेक बायका तिला शेतात काम करताना म्हणायच्या “कंबा तुझ्या पोटी पोर जन्मली की तुझ्यावरच जाईल बघ” तिचं नाव कमल पण सगळ्या कंबा म्हणून हाक मारत.आणि हे ऐकून तिला लाजायला व्हायचं. आताच कुठे एक महिनाही झाला नव्हता लग्नाला तोवर बायका मातृत्वाच्या गोष्टी करू लागत. नवरा रंगाने काळा होता. पक्का व्यसनाधीन ती नवीन आल्यामुळे तिला नवऱ्याचे कोणतेच कारनामे माहित नव्हते. हळू हळू कळणार होते.
दहा गड्याच काम एकटी करण्याची ताकत होती तिच्यात. सगळ्या बायकांना आश्चर्य वाटायचं हि काल परवा आलेली पोरं इतकी कामात हुशार कशी? आई वडिलांनी लावलेली कामाची सवय आणि चांगले संस्कार यामुळे ती एक आदर्श सून म्हणून सासरी नांदत होती. आनंदाने सुखी संसाराची स्वप्ने रंगवत होती. पण तिला कुठे माहित होतं…समोर खूप संकटांचा मुकाबला करायचा आहे ते…!!
_sauu
