Login

मतलबी नाती ..

कोणीच कोणाचं नसतं, जो तो आधी आपला स्वार्थ बघत असतो... स्वार्थी नात्यांची कथा
लघुकथा स्पर्धा एप्रिल २०२६.

“संध्याकाळी तयार रहा. फ्लॅट बघायला जायचं आहे.” अशोकचा फोन आला आणि पूनमच्या हृदयाचा ठोकाच चुकला.

एजंट एखादी नवी जागा सुचवणार, आपण आशेने बघायला जाणार, जागा, आजूबाजूचा परिसर सगळंकाही आवडणार पण पैश्याचं सोंग आणता येत नसल्यामुळे व्यवहार फसणार. गेल्या दोन तीन वर्षापासून हेच चालू होतं त्यामुळे हल्ली फ्लॅट बघायला जाणं पूनमला नकोस वाटू लागलं होतं.

“आवाक्या बाहेरची स्वप्न बघायची कशाला? जी गोष्ट सत्यात उतरणार नाही त्याच्या पाठीमागे लागायचं कशाला?” कामावरून आल्यानंतर अशोकच्या हातात चहाचा कप देत पूनम नाराजीच्या सुरात म्हणाली.

“मग काय करायचं? हातावर हात ठेऊन बसून रहायचं. चाळीची अवस्था बघतेस ना काय झाली आहे ते.” अशोक चिडून बोलला.

पूनमला अशोकची तगमग कळत होती पण पदरी निराशा पडणार याची खात्री असल्याने तिची हिंमत होत नव्हती.

साधारण पाच सहा वर्षापूर्वी बनकर चाळीत रीडेव्हलपमेंटचे वारे वाहू लागले. मालक चाळीत बिल्डरला घेऊन आले. मीटिंगमध्ये बिल्डरने पुनर्विकास योजना समजावून सांगितली. स्वतःचे हक्काचे छप्पर होणार हे कळताच अशोक, पूनम भारावून गेले. उत्साहात पैशाची जुळवाजुळव करायला लागले.

माप ओलांडून पूनम या चाळीत आली तेव्हापासून स्वतंत्र खोलीचे स्वप्न ती उराशी बाळगून होती. शिकत असलेला लहान दीर, सासूबाई, डिलिव्हरीसाठी आलेली छोटी नणंद या सगळ्या समवेत छोट्या जागेत एकत्रित कुटुंबात नांदताना तिची फार कुचंबणा होत होती.

पंधरा वर्षानंतर का होईना आपले स्वप्न पूर्ण होणार या विचाराने पूनम हरखून गेली. काटकसरीने संसार करत पैश्याच्या संचय करू लागली.

पण मधल्या काळात पुलाखाऊन बरेच पाणी वाहून गेले. मूळ मालक गणपतशेठचे आकस्मिक निधन झाले. त्यांची मुले, चुलते यांचे इस्टेटीवरून वाद झाले. वारसदार कोर्टकचेऱ्यांच्या कामात गुंतले. काही दिवसांनी चाळीचा पुढचा भाग रस्ता रुंदीकरणात जाणार बातमी येऊन धडकली, बिल्डर बिथरला. तो काम सुरू करण्यास चालढकल करू लागला.

सद्य स्थितीत पुनर्विकास योजना फक्त कागदावर होती. आज ना उद्या चाळ रीडेव्हलप होईल म्हणून मालक चाळीची ना रंगरंगोटी करत होते ना डागडूजी. परिणामी चाळीला अवकळा आली होती, बरीच पडझड झाली होती. कंटाळून बरेच जुने रहिवासी दुसऱ्या जागेत रहायला गेले. हल्ली मालक परप्रांतीय, इतर धर्मीय अगदी कोणालाही जागा भाड्याने देत होते. त्यामुळे दिवसेंदिवस तिथे रहाणे मुश्किल झाले होते.

पोटाला चिमटा घेऊन बचत केली तरी वाढती महागाई, मुलींच्या शिक्षणाचा खर्च, आभाळाला टेकलेल्या घरांच्या किमती याचा ताळमेळ तुटपुंज्या पगारात अशोक आणि पूनमला बसवता येत नव्हता त्यामुळे घराचा प्रश्न निकालात निघत नव्हता.

“आपण भाड्याने दुसरी जागा बघू या का? नशिबात असेल तर आज ना उद्या चाळ रीडेव्हलप होईल. तो पर्यंत तरी…” हतबल होऊन पूनम अशोकला म्हणाली.

“हल्ली पूर्वी सारख्या कायम स्वरुपी जागा मिळत नाहीत. शिवाय भाडीही अवाच्या सवा असतात.” दर अकरा महिन्यांनी विंचवासारखं पाठीवर बिऱ्हाड घेऊन फिरायच नसल्याने अशोकने स्पष्ट नकार दिला.

“माझे दागिने विकूयात का?”

“काही तरीच काय? एकदा विकले तर परत करायला जमणार नाहीत त्यापेक्षा आपण अमोल आणि प्रितीची मदत घेऊयात.” अशोक ठामपणे म्हणाला.

“ते मदत करतील?” पूनमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ती आपल्या धाकट्या दिराला नंदेला चांगली ओळखून होती.

“का नाही करणार? भावाच घर होतंय म्हंटल्यावर आनंदाने करतील.”

वडिलांच्या अपघाती निधनानंतर अशोकने घरची सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. शिक्षण सोडून एमआयडीसीत नोकरी धरली होती. कर्ज काढून लहान भावाच शिक्षण, बहिणीच लग्न करून दिलं होतं. त्याचं आयुष्य मार्गी लावलं होतं त्यामुळे ती दोघं नक्कीच आपल्याला मदत करतील याची त्याला खात्री होती.

“मदत करायची असती तर नोकरीला लागल्यावर भाऊजींनी ब्लॉक घेतला तेव्हाच सगळे तिकडे रहायला चला म्हणले असते. आपल्याला तर सोडा पण आम्ही दोघं कामावर गेल्यावर आई तिकडे कंटाळून जाईल म्हणत त्यांनी सासूबाईंनासुद्धा न्यायचं टाळलं होतं.” पूनम तोंड वाकडं करत म्हणाली.

“अगं त्यावेळची गोष्ट वेगळी होती. नवीन लग्न झालं होतं. लोन चालू होतं. नोकरीत म्हणावा तसा जम बसला नव्हता पण आता परिस्थिती बदलली आहे. तो ऑफिसर झाला आहे. पगार कैकपटीने वाढला आहे त्यामुळे तो नाही म्हणणार नाही.” अशोकला आपल्या भावाबद्दल खात्री वाटत होती.

“चाळ पूर्णपणे मोडकळीस आली आहे. रस्ता रुंदीकरणात बराचसा भाग जात असल्याकारणाने पुनर्विकासाचे काम रखडले आहे. चार महिन्यांपूर्वी धोकादायक इमारत म्हणून पालिकेने नोटीस बजावली आहे. अगदी गळ्याशी आलंय सगळं, आता जागा सोडण्याशिवाय गत्यंतर नाही. आम्ही एक रिसेलचा फ्लॅट बघितला आहे. दोन अडीच लाख कमी पडत आहेत ” अशोकने भावाला सगळी परिस्थिती सांगत मदतीची विनवणी केली.

“लोन होत नाही का भावजी? माझी मैत्रीण आहे बँकेत. मी बोलते तिच्याशी.” भावाचं रडगाणे ऐकून आपला नवरा पैसे देईल असे वाटून शर्वरी पटकन बोलली.

“सत्तर पंच्याहत्तर टक्के लोन होतंय पण बाकीची जमवाजमव करावी लागेल. तशी आम्ही बऱ्यापैकी तरतूद करून ठेवली आहे. तुम्ही थोडी मदत केलीत तर सगळा प्रश्नच सुटेल. मी लवकरात लवकर तुमचे सगळे पैसे परत करेन.” अशोक कळकळीने म्हणाला.

“त्याच काय आहे, भाऊजी माझे पार्लर पूर्वीसारखं चालत नाही. अमोलच्या एकट्याच्याच पगारात सगळं भागवावं लागतं त्यामुळे इच्छा असूनही मदत करता येत नाही.” शर्वरीने हळहळ व्यक्त केली.

“कार लोनसुद्धा चालू आहे तरी काही सोय होते का बघतो आणि तुला कळवतो.” अमोलने आश्वासन देत गोड बोलून भावाची बोलवण केली.

हताश झालेल्या अशोकने बहिणीला फोन लावला. तिने देखील सध्या नवऱ्याला बिझनेस खूप लॉस झालाय, आम्हीच मार्केट मधून पैसे उचलले आहेत, वैगरे कारणे पुढे केली. “ह्यांच्याशी बोलून बघते आणि तुला उद्या फोन करते.” खोटी सहानभूती दाखवत प्रीतीने फोन ठेवला.

“मला माहीत होतं हे असंच होणार. ती दोघं नकार देणार.” पूनम चिडून म्हणाली.

“जरा धीर धर. लगेच निष्कर्ष काढू नकोस. मोठी रक्कम जमा करायला वेळ लागतो.” भोळ्या अशोकचा अजूनही नात्यांवरील विश्वास डळमळीत झाला नव्हता.

पंधरा वीस दिवस होऊन गेले तरी ना प्रीतीचा फोन आला ना अमोलने या विषयावर भाष्य केले.

एजंट घाई करत होता, नसेल जमत तर सरळ सांगा म्हणत होता.

अखेर पूनमने दागिन्यांचा डबा अशोकच्या हातात ठेवला. सोनाराकडे भिशी लावत गुंज गुंज करत जमवलेल सोनं विकण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरला नव्हता.

दिवाळी तोंडावर आल्याने ज्वेलर्स शॉपमध्ये प्रचंड गर्दी होती. सगळेजण सोनं खरेदी करत आहेत आणि आपण विकत आहोत ही गोष्ट अशोकच्या मनाला खात होती. मुलींच्या लग्नाची तरतूद म्हणून जमवलेलं सोनं विकताना पूनमच्या डोळ्यातही असावं जमा होत होती.

थोडी गर्दी ओसरल्यावर आत जाऊ म्हणत दोघंही दुकानासमोर रेंगाळले. जवळच्या बाकड्यावर थोडा वेळ विसावले असता अमोल आणि शर्वरी सोनाराच्या दुकानातून हसत हसत बाहेर पडताना दिसले. हातातल्या पिशव्या, चेहऱ्यावरचे हावभाव मोठी खरेदी केल्याचे सूचित करत होते.

बिझनेसमध्ये लॉस झालाय म्हणून रडगाणं‌ गाणारी बहिण दोन दिवसांपूर्वी केरळ ट्रिपला गेली होती. भावाची जोरदार खरेदी चालू होती.

समोरचे दृश्य पाहून अशोक दीड्मूढ झाला. गरज सरल्यावर पाठ फिरवणाऱ्याच्या स्वार्थी नात्यांचे मुखवट्यामागचे खरे चेहरे समोर आल्यामुळे हादरून गेला. कोणीच कोणाच नसतं, जो तो फक्त आपला स्वार्थ बघत असतो हे सत्य पचवणं त्याला कठीण जात होतं.

“त्यांना सेटल करण्याच्या नादात स्वतःच्या भविष्याकडे दुर्लक्ष करू नका. मी नेहमी बजावत होते पण तुम्हाला पटत नव्हतं.” पूनम कडाडली.

ह्यावर काय बोलावे अशोकला सुचेना. आपल्याच माणसांनी तोंडघशी पाडल्यामुळे तो बिथरला होता.

“ह्यापुढे सर्वात आधी फक्त आपला विचार करणार, झालेली चूक सुधारणार.” थोड्यावेळाने स्वतःला सावरत पूनमचा हात हाती घेत अशोक म्हणाला आणि मतलबी नात्यांना आयुष्यातून वजा करण्याचा निर्णय घेत निर्धाराने ज्वेलर्सच्या दुकानात शिरला.

समाप्त.

©मृणाल महेश शिंपी.

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →