४-५ मुलींचा घोळका हसत खिदळत गप्पा मारत होता.
त्यांच्यापैकी एका मुलीने सगळ्यांना विचारलं, "ही न्यूज पाहिली का आजची?
दोघी तिघींनी 'कोणती?' या अर्थाने तिच्याकडे पाहिलं.
"अगं ब्रुटल रेप आणि मर्डर ची. किती वाईट झालं ना बिचारीसोबत!"
दुसरी मुलगी म्हणाली, "अगं काल काय, आज काय रोज अशी एक न्यूज येतंच राहते. वय बदलतं, जात बदलते, धर्म बदलतो.... जागा बदलते.... पण बातमी बदलत नाही."
"हो ना यार! प्रत्येक वेळी वाटतं, याहून भयानक अंत नसेल, पण पुढची न्यूज आली की आधीची न्यूज तिच्यापुढे काहीच नाही असं वाटतं." तिसरी मुलगी दुःखाने बोलली.
"नाहीतर काय! ती बिचारी निर्भया..... कॅलेंडरचं शेवटचं पान उलटण्याआधी तिच्या आयुष्यात किती प्रचंड उलथापालथ झाली.... न्याय मिळायला इतकी वर्षे लागली.... पण न्याय मिळाला हे तरी कसं म्हणावं???"
तेवढ्यात एका ठिकाणी एक मुलगी रडत असलेली दिसली त्यांना. तिला असं रडताना पाहून त्या तिच्या बाजूला गोळा होतात आणि प्रश्न विचारू लागतात.
"अगं काय झालं? आणि अशी का रडत आहेस?
"कोण आहेस कोण तू?"
"आणि इतकं हमसून हमसून रडायला काय झालं तुला?"
"काही त्रास होतोय का गं? पिरियडस आलेत का? पोटात वगैरे दुखतंय का?"
त्या सगळ्यांचे इतके सारे प्रश्न ऐकून ती मुलगी भांबावते पण नंतर स्वतःला सावरून त्यांनाच विचारते,
"मला ओळखलं नाहीत?"
"नाही..." त्या सगळ्या एकत्रितपणे म्हणाल्या.
पण तेवढ्यात त्यांच्यातल्याच एका मुलीला काहीतरी आठवलं आणि ती म्हणाली,
"अगं तू तर 'ती'च ना.....ती..... अं....काय बरं नाव...... " ती आपल्या डोक्यावर ताण देत हाताशी अस्वस्थपणे चाळा करत विचार करु लागली. आणि बाकीच्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह घेऊन तिच्याकडे पाहत होत्या.
"छे बाई! आठवेनाच....."स्वतःचच वाक्य पूर्ण व्हायच्या आत अचानक तिला काहीतरी क्लिक झाला आणि ती जोरात ओरडली, "हा ssssss आठवलं आठवलं..... तू तर तीच ना ती निर्भया!!!"
तिने असं म्हणताच बाकी सगळ्या मुली तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या. आपली मान डावीकडे उजवीकडे फिरवत, कधी तिच्याकडे तर कधी त्या रडणाऱ्या मुलीकडे बघू लागल्या. निर्भया! कसं शक्य आहे? ती तर.....! सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं.
"हो, तीच मी! मीच ती! तुमच्या सगळ्यांच्या विचाराने, शब्दांनी जगाशी बोलले, जगासमोर आले. पण माझं मत कुणी विचारलंच नाही कधी. मला काय वाटतं, मी काय विचार करते, हे कुणीच नाही विचारलं. म्हणून मग मीच स्वतः आले इथे.... निर्भयाला काय वाटतं किंवा त्याक्षणी काय वाटलं होतं, हे निर्भयाच्याच तोंडी सांगायला. माझा तडफडणारा आत्मा तुमच्याशी बोलून तरी शांत होतोय का हे पहायला." तिने असं म्हणताच सर्वजनी एकमेकींच्या तोंडाकडे बघू लागल्या.
त्यातल्या एकीने तरी विचारलंच, "म्हणजे तू खरंच निर्भया आहेस?"
"बघितलंत.... माझं खरं नाव सुद्धा माहित नाही तुम्हाला! मला ओळखताय ते निर्भया या नावानेच. माझी खरी ओळख विसरून, विसरायला लावून, मला हे नवीन नाव दिलं..... तुम्ही, तुम्ही सगळ्यांनी, या समाजाने. आता या नावाचा अभिमान बाळगू की लाज माझं मलाच समजत नाहीये. जिथे मूल जन्माला आल्यानंतर त्याचं बारसं केलं जातं, तिथे माझं मरणाच्या दारात झालं होतं बारसं. तुम्ही सगळ्यांनी मिळून तर केलं होतंत..... आठवतंय ना की विसरलात सगळंच! माझं खरं नाव तर विसरलातच!! पण आता, हे तुम्ही स्वतःच मला दिलेलं नावदेखील विसरलात!!!! खरं आहे लोकांना विसर पडतो हळूहळू...... " डोळ्यात उभ्या अश्रूसहित उपहासात्मक हसत रडवेल्या आवाजात ती म्हणाली.
तिचं उपहासात्मक बोलणं मनाला लागलं... सगळ्यांच्याच. पण कुणालाही राग आला नाही, वाईट मात्र वाटलं. डोळ्यांसमोरून पटकन तिच्याबद्दल वाचलेल्या, पाहिलेल्या, ऐकलेल्या सगळ्या बातम्या एखाद्या चित्रपटाप्रमाणे झरझर सरकल्या आणि अंगावर सरसरून काटा उभा राहिला.
"निर्भया!! किती छान नाव दिलं होतं ना तुम्ही मला. अर्थ माहिती आहे का ह्या नावाचा? निर्भया म्हणजे नीडर, निर्भीड! जिला कुणाची भीती नाही, कशाचंही भय नाही, जी घाबरत नाही. पण खरं सांगू? मला वाटते ग भीती..... घाबरते मी.... पण माझ्यासाठी नाही! कारण माझ्यासोबत झालं ते झालं. ते बदलता येणार नाही. पण वाटलं होतं थांबवता तरी येईल. पण आता असं वाटतंय, थांबवणं सुद्धा अशक्य आहे. मी तर गेले.... मरणप्राय यातना सहन करत मेले, नी मेल्यावरही माझ्या यातना संपल्या नाहीत. उशिरा का होईना, मला न्याय मिळाला, पण माझ्या मनाला शांती नाही लाभली.... अजूनही..... कारण माझ्या नंतर अजूनही कितीतरी मुलींना याच गोष्टीला बळी पडावं लागलंय.... . याच नरकयातनांतून जावं लागतंय...आणि मला वाटणारी भीती प्रत्येक वेळी खरी ठरतेय"
क्षणभर थांबून तिने एका बाजूला बघितलं. तिकडे बोट दाखवत ती पुढे बोलू लागली,
"ते बघा ती दिसतीये ना कोपऱ्यामध्ये, पांढरा कोट घातलाय तिने.... ती डॉक्टर आहे. ओह्ह्ह सॉरी सॉरी होती. कधीकाळी, दुसऱ्यांचा जीव वाचवण्याची शपथ घेतली होती तिने. पण स्वतः नराधमांच्या वासनेची बळी ठरली. आपल्या कामाच्या ठिकाणीच शेवटचा श्वास घेतला तिने. ते बघा डोळे पाहिलेत का तिचे?" असं म्हणून तिने सगळ्यांचे लक्ष त्या पांढरा कोट घातलेल्या मुलीकडे पुन्हा वेधलं.
"बघितले तिचे डोळे! त्याच्यातून अश्रू नाही, रक्त वाहतंय! 'डोळ्यात रक्त उतरणं' ही म्हण तुम्ही शिकला असाल, पण डोळ्यातून रक्त वाहणं म्हणजे काय ते तिला विचारा. किती स्वप्नं रंगवली असतील तिने..... तुमच्यासारखीच! पण डोळ्यांतून रक्तावाटे एकेक स्वप्नं वाहून जाताना काय वाटलं असेल तिच्या जीवाला शेवटच्या क्षणी!! एकेक श्वास हिरावून घेतला जात असताना आपल्या जवळच्या सगळ्या माणसांचा चेहरा, बंद होणाऱ्या पापण्यात साठवून घेण्याचा एक वेडा खोटा प्रयत्न केला असेलच..... माझ्यासारखा!!!" डोळ्यातले अश्रूंचा पुर थोपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत निर्भया क्षण भर थांबली. मग पुन्हा दुसरीकडे हात करत म्हणाली,
"आणि तिकडे बघा. तिथे त्या गुलाबाच्या झुडुपाखाली बसलीये ना, ती, तीन चार वर्षाची कोवळी पोर! अगदी गुलाबाच्या कळीसारखी नाजूक.... अल्लड! ती निरागस पोर सुद्धा, कुठल्यातरी नराधमाच्या वासनेला बळी पडून फुल होण्याआधीच कोमेजली गेली. निर्दयीपणे कुस्करून टाकली गेली..... एकेक पाकळी तिची अशी चिरडली गेली की पुन्हा..... " निर्भयाला पुढे बोलवेना. हुंदके देऊन ती रडू लागली. बाकीच्यांनी तिचा हात हातात घेऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न केला.
"की... पुन्हा फुलण्याचीही भीती वाटावी..... तिलाच नाही.... तर तिच्यासारख्या असंख्य कळ्यांना....." हुंदक्याना आवर घालत, कसंबसं तिने वाक्य पूर्ण केलं. आणि पुन्हा रडू लागली.
त्या सगळ्या तिला शांत करत होत्या पण स्वतः आतून किती रडत होत्या हे त्यांनाच माहिती! तिला शांत करता करता कधी डोळे भरून आले, आणि कधी अश्रुनी आपली वाट शोधत धावायला सुरुवात केली त्यांनाही कळालं नाही.
त्यांच्यातल्या कुणी तिच्यासारख्या मरण यातना सहन केल्या नसल्या, तरी गर्दीच्या ठिकाणी... कधी बसमध्ये, कधी ट्रेनमध्ये, कुठे ना कुठे त्यांनीही तो किळसवाना, नको असलेला स्पर्श आणि ती घाणेरडी वखवखलेली नजर अनुभवलेली होतीच की!!! अनुभवाच्या नुसत्या आठवणीनी त्यांच्या अंगावर काटा उभा राहत होता. ती तर या सगळ्यातून, याहून भयंकर अनुभवातून गेली होती. काय काय सहन केलं होतं तिने.
"बलात्कार आधी शरीरावर होतो, मग मनावर.... आणि पीडिता जगली वाचलीस या सगळ्यातून, तर तिच्या अख्या आयुष्यावर होतो! सतत होत राहतो, वेळोवेळी होतो.... पावलोपावली होतो...... क्षणोक्षणी होतो. कुणाच्या नजरेतून..... कुणाच्या विचारांतून..... कोणाच्या प्रश्नातून. तिच्या नरकयातना संपतच नाहीत... मारुतीच्या शेपटीसारख्या लांबतच जातात.... वाढतच जातात..... मारुतीच्या त्या शेपटीने लंका जाळली होती म्हणे, पण आमच्या या शेपटी सारख्या वाढणाऱ्या नरक यातनांमध्ये आम्हीच जळतोय..... वर्षानुवर्षे.... आमचीच होतेय राख.... आम्हाला नासवणारा स्वतः मात्र नामनिराळा होऊन जातो..... कधी तो सज्ञान नाही म्हणून सुटतो.... तर कधी अपुऱ्या पुरव्यांमुळे सुटतो." बोलता बोलता तिचा श्वास अडकला, चेहरा कठोर झाला. आणि अचानक जोरात ओरडत, रागाने, त्वेशाने किंचाळत बोलली,
"कायद्याने तो सज्ञान नव्हता, पण कर्माने मात्र हैवान होता, सैतान होता, राक्षस होता.... योनीमार्गात, त्या नाजूक जागेत काचेची बाटली खुपसून, ती तिथेच फोडणारा, बलात्कार करुन स्वतःची वासनेची भूक शांत करणारा, स्वतःच्या शरीराची आग विझवण्यासाठी एका मुलीचं उभं आयुष्य राखरांगोळी करणारा नराधम अल्पवयीन असूच कसा शकतो?????? सांगा ना....." एका मुलीचे खांदे जोरजोरात हलवत ती त्यांना विचारत होती.
"कुणीतरी सांगा रे..... समजवा मला.... इतकी वर्षे झाली, याच प्रश्नाचं उत्तर शोधतेय..... उत्तर तर नाही मिळालं, पण असेच प्रश्न करणाऱ्या कितीतरी निर्भया भेटल्या मला या ठेचकळणाऱ्या वाटेवर.... आपली रक्तबंबाळ झालेली नाजूक पावलं खुरडत चालणाऱ्या.... भळभळणारी जखम घेऊन, प्रश्नाचं उत्तर शोधत फिरणाऱ्या अश्वत्थामासारख्या ..... माझा काय दोष होता हे स्वतःलाच वेड्यागत विचारणाऱ्या!! कुणीतरी सांगा रे, काय चूक होती आमची....." ओंजळीत स्वतःचा चेहरा लपवत ती पुन्हा धाय मोकलून रडू लागली.
त्या मुलींनी वाचलेली, ऐकलेली, पाहिलेली निर्भया, आतापर्यंत इतरांच्या विचारांतून समोर आली होती. पण आज तीच निर्भया, तिचे स्वतःचे प्रश्न विचारत होती. तिचे विचार मांडत होती.
प्रत्येकाने आपापल्या परीने तिला मांडलं होतं, रेखाटलं होतं, व्यक्त केलं होतं. पण आज ती स्वतः व्यक्त होताना, तिच्या आतून काय तुटलं होतं, तिने काय गमावलं होतं, आतून किती खचली होती हे तिच्या प्रत्येक शब्दात जाणवत होतं... तिच्या एकेका हुंदक्यातुन त्यांच्या मनावर आघात करत होतं.
"तुम्हाला माहितीये, माझ्यासाठी तुम्हा सगळ्यांना रडताना पाहून, मी अगदी निर्धास्त झाले होते. वाटलं होतं माझ्यानंतर पुन्हा कोणीही माझ्या पावलावर पाऊल ठेवणार नाही.... पुन्हा कुठलीच निर्भया जन्म घेणार नाही. माझ्यासाठी लावलेली प्रत्येक मेणबत्ती मशाल होऊन त्या प्रत्येक नराधमांना जाळून राख करेल, आणि त्या राखेतून पुन्हा कुठलाही नराधम असं पाप करण्यास धजावणार नाही. मला अगदी खात्री पटली होती तेव्हा! मनुष्य लोकांतून परलोकात येणारी मी एकमेव निर्भया असेल असं मी स्वतःलाच निक्षून सांगितलं होतं. पण नाही.....माझ्या पावलावर पाऊल ठेवून अशा कितीतरी निर्भयांना या मनुष्यलोकातून परलोकात पाठवणार गेलं.... अजूनही पाठवलं जात आहे. मी हे सगळं बोलत असताना देखील एखादी निर्भया याच वाटेवर असेल......... आणि उद्या पुन्हा सगळ्यांना एक ब्रेकिंग न्यूज मिळेल.... चघळायला"
"खरं आहे. आधी ब्रेकिंग न्यूज आणि नंतर फक्त न्यूज म्हणून राहिलेली एक निर्भया विसमरणात जाते न जते तोच दुसरी निर्भया ब्रेकिंग न्यूज बनून येते..." ती दुसरी मुलगी उपहासाने, पण तितक्याच वेदनेनं म्हणाली, तसं बाकीच्यांनीही दुजोरा दिला.
"हो ना! कधी कधी ना भीती वाटते. ह्या अशा ब्रेकिंग न्यूज वाचताना, ऐकताना, पाहताना एक दिवस आम्ही सुद्धा एक ब्रेकिंग न्यूज बनून जाऊ! सुनसान रस्त्यावरून चालताना, रिक्षा टॅक्सी ड्राइव्हर समोरच्या आरशातून लोचटपणे बघत असताना, रात्री घरी जायला उशीर झाल्यावर, एक अनामिक भीती असते. मनावर सतत दडपण येतं. पण स्वतःलाच 'नाही नाही.... तुझ्यासोबत असं काही होणार नाही...' असं सांगत, स्वतःचीच समजूत घालत राहतो...." अजून एक मुलगी तिची व्यथा मांडत म्हणाली.
त्यावर निर्भया हलकसं हसली. त्या हसण्यात फक्त वेदना आणि उपहास होता. कुठेतरी दूरवर शून्यात पाहत बोलू लागली, जणू आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधत होती, समोरच्या प्रकाशमय अंधारात!
"मी ही अशीच समजूत घालत राहिले स्वतःची! आणि, माझ्यासारखीच, माझ्या मागे आलेली प्रत्येक निर्भया स्वतःलाच समजावत राहते..... 'माझा' नंबर शेवटचा......'मी' शेवटची..... ही शर्यत आता इथेच संपली! पण प्रत्येक वेळेस त्यांचा होरा चुकतो.....माझ्यासारखाच! आणि शेवटून पहिली आलेली ती निर्भया पुन्हा एकदा सेकंड लास्ट ठरते .....माझ्यासारखीच!"
