स्क्रीनशॉट-1
"श्रद्धा, आज परत तेच. भर जेवणात, यांच्या मावशीसमोर, सासूबाई म्हणाल्या, सुनेच्या हाताला चव नाही, आमच्या वेळी बायका जेवण बनवायला शिकून यायच्या. मी काय शिकून आले नाही का ग ? रोज तीन वेळा या घरात राबते. कधी कधी वाटतं, या बाईला माझं काहीच दिसत नाही, फक्त चुका दिसतात. मी आज खरंच रडले ग बाथरूममध्ये."
तेजस्विनीने मेसेज टाईप केला, पाठवला, आणि फोन उशीखाली ठेवला. रात्रीचे अकरा वाजले होते. शेजारी नवरा झोपला होता. आणि तिच्या छातीतलं ओझं थोडं हलकं झालं होतं. श्रद्धा होती ना. कॉलेजपासूनची मैत्रीण.
दोघींची लग्नं एकाच वर्षी झाली, दोघींचं सासर एकाच गावात. श्रद्धाचं सासर तेजूच्या सासरपेक्षा कडक होतं, तिच्या सासूबाई तर कुणाशीही बोलत नसत. म्हणून दोघींचं एकमेकींशी बोलणं जास्त. रोज रात्री. सासरचे किस्से, नवऱ्यांच्या तक्रारी, कधी हसणं, कधी असं रडणं.
लगेच रिप्लाय आला. "रडू नकोस ग तेजू. सासू म्हणजे सासू. सांग मला सगळं, मन मोकळं कर."
आणि तेजू सांगत राहिली. आठवड्यातून दोन तीनदा.
आणि तेजू सांगत राहिली. आठवड्यातून दोन तीनदा.
"आज म्हणाल्या, माहेरून एवढंच शिकवलं का." "आज म्हणाल्या, पोरगा बायकोच्या तालावर नाचतो." "श्रद्धा, कधी कधी वाटतं, या घरात मी एकटीच आहे ग."
तेजूच्या सासूबाई, कुमुदताई, खरंच बोलायला फटकळ होत्या. पण फक्त तेवढ्याच. लग्नाला दोन वर्षं झाली होती आणि त्या दोन वर्षांत त्यांनी सुनेवर कधी जास्त काम टाकलं नव्हतं, कधी माहेरी जायला अडवलं नव्हतं. फक्त जीभ. ती त्यांच्या ताब्यात नव्हती. मागच्या वर्षी तेजूला टायफॉईड झाला तेव्हा त्याच कुमुदताई तीन आठवडे तिच्या उशाशी बसल्या होत्या, मऊ भात भरवत. आणि बरी झाल्यावर पहिलं वाक्य, "आता चांगली जाड झालीयेस, कामाला लाग." तेच वाक्य तेजूने श्रद्धाला लिहिलं होतं, पण उशाशी बसलेल्या तीन आठवड्यांबद्दल तिने काहीच लिहिलं नव्हतं. रडताना ते आठवत नव्हतं.
तिच्या नवऱ्याने, सौरभने, एकदा विचारलं होतं, "तू श्रद्धाशी रोज रात्री एवढं काय बोलतेस ?" "गप्पा." "आईबद्दल ?" तेजू क्षणभर थांबली होती आणि मग "काहीही काय" म्हणून तिने फोन उलटा ठेवला होता.
सौरभने पुढे विचारलं नव्हतं. पण त्याने त्या दिवशी एवढंच म्हटलं होतं, "आईचं बोलणं टोचतं हे मला माहितीये. पण ते बाहेर गेलं की परत घरात येतं. एवढं लक्षात ठेव." आणि तेजूला ते बोलणं टोचायचं, म्हणून ती श्रद्धाला लिहायची. लिहून हलकं व्हायची. हे तिचं औषध होतं.
श्रद्धा दर वेळी उत्तर द्यायची. "तुझ्या सासूबाई फारच आहेत हा." "तेजू, तू सोसतेस खूप." आणि तेजूला ते उत्तर हवं असायचं. कुणीतरी "तू बरोबर आहेस" म्हणणारं.
ती कधी थांबून विचार करायची नाही, की श्रद्धा स्वतःच्या सासरबद्दल कधीच काही का लिहीत नाही. एकदा तिने विचारलं होतं, "तुझ्याकडे कसं चाललंय ग ?" आणि श्रद्धाने "चालतंय, सोड ते, तुझं सांग" म्हणून विषय फिरवला होता.
एक गोष्ट तेजूला कधी खटकली नव्हती. श्रद्धा दर मेसेजनंतर "स्क्रीनशॉट ठेव हा, कधी उपयोगी पडतील" असं म्हणायची. तेजूला वाटायचं, मैत्रीण काळजीने म्हणते. तिने कधी ठेवले नाहीत. श्रद्धाने ठेवले होते, हे तिला नंतर कळणार होतं.
गणपतीचे दिवस आले. घरात पाहुणे. कुमुदताईंची बहीण, भाची, शेजारच्या दोन बायका. तेजू स्वयंपाकघरात होती, आणि तिला जाणवलं, आज सासूबाई वेगळ्या आहेत. काहीच बोलत नाहीयेत. टोमणा नाही, सूचना नाही. फक्त शांत. एकदा त्यांनी तेजूकडे बघितलं, आणि ती नजर तेजूला ओळखीची वाटली नाही. त्यात राग नव्हता. काहीतरी वेगळंच होतं.
आरती झाली. प्रसाद वाटला. पाहुण्या गेल्या. आणि संध्याकाळी कुमुदताईंनी तेजूला त्यांच्या खोलीत बोलावलं.
"बस."
तेजू बसली. कुमुदताई बराच वेळ काही बोलल्या नाहीत. मग त्यांनी उशीखालून मोबाईल काढला, काहीतरी उघडलं, आणि तेजूसमोर धरला.
"हे तू लिहिलंयस ?"
तेजूने स्क्रीनकडे बघितलं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली.
स्क्रीनशॉट होता. तिचाच चॅट. श्रद्धाबरोबरचा. "या बाईला माझं काहीच दिसत नाही, फक्त चुका दिसतात." "या घरात मी एकटीच आहे." "पोरगा बायकोच्या तालावर नाचतो म्हणाल्या." एक नाही, चार स्क्रीनशॉट. महिन्याभरातले. आणि ते आले होते कुमुदताईंच्या भजनी मंडळाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून. कुणीतरी फॉरवर्ड केलेले. मंडळातल्या पंधरा बायकांनी वाचलेले.
"आज सकाळपासून चार फोन आले मला," कुमुदताई शांतपणे म्हणाल्या. "'तुमची सून तुमच्याबद्दल काय लिहिते बघा' म्हणून. मी काय उत्तर देऊ त्यांना ?"
तेजूच्या तोंडून शब्द फुटेना. हे स्क्रीनशॉट फक्त एका माणसाकडे होते. श्रद्धाकडे.
