त्याने काहीही न बोलता ते चिन्ह चव्हाणांना दाखवलं.
दोघांनाही आश्चर्य झाले. नील पेक्षा जास्त तर चव्हाण यांना आश्चर्य वाटले. दोघेही काही क्षण स्तब्ध होऊन पाहत होते.
आता योगायोगांवर विश्वास ठेवणं कठीण होतं.
समीर...
शेखर...
आणि आता स्वाती...
या तिन्ही मृत्यूंमध्ये एक समान धागा स्पष्ट दिसू लागला होता.
२०१८ चा फोटो...
डोळा आणि हृदयाचं चिन्ह...
आणि...
अजूनही सावल्यांमध्ये लपलेलं एक अज्ञात सत्य.
पुढे.....
रेकॉर्ड रूममधील त्या धुळीवर उमटलेल्या डोळा आणि हृदयाच्या चिन्हाकडे नील आणि इन्स्पेक्टर चव्हाण काही क्षण निःशब्द उभे राहून पाहत होते.
त्या छोट्याशा चिन्हाने जणू संपूर्ण खोलीतील शांतता अधिकच गडद केली होती.
चव्हाणांनी एक दीर्घ श्वास घेतला,
"डॉ. नील... आता हे प्रकरण साधे फक्त खून करण्याच्या दृष्टीने केलेले दिसत नाही."
नीलने त्यांच्याकडे पाहिलं.
"मलाही असेच वाटते आहे. पण आपण पुराव्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढू शकत नाही. आणि नेमका कोणताही पुरावा आपल्याजवळ नाही."
"बरोबर."
चव्हाण लगेच फॉरेन्सिक टीमकडे वळले. आणि परत एकदा त्यांच्या टीमला त्यांनी सूचना दिल्या.......
"या खोलीचा एक-एक इंच तपासा. प्रत्येक फाईल, प्रत्येक कपाट, प्रत्येक भिंत, प्रत्येक बोटाचा ठसा... काहीही सुटता कामा नये. की केस आता आपल्या हाताबाहेर जात आहे. वरुण प्रेशर येण्याआधी याचे कमी करावे तरी आपल्याला मिळायला हवे."
"येस, सर."
---
पुढची तीन तास संपूर्ण रेकॉर्ड रूम पालथी घालण्यात आली.
जुन्या फाईली एक-एक करून उघडल्या गेल्या.
२०१८ सालातील रुग्णांच्या नोंदी...
जुन्या ऑपरेशनच्या फाईली...
डिस्चार्ज सारांश...
पोस्टमॉर्टेम अहवाल...
सर्व काही तपासलं गेलं.
काही फाईली इतक्या जुन्या झाल्या होत्या की, त्यांची पानं हातात घेताच तुकडे पडत होते.
फॉरेन्सिक टीमने कपाटांवरून बोटांचे ठसे घेतले.
जमिनीवरील धुळीचे नमुने गोळा केले.
बाकी कर्मचाऱ्यांची साक्ष नोंदवली.
पण...
चार तासांच्या तपासानंतरही एकही ठोस पुरावा मिळाला नाही.
---
"सर..."
फॉरेन्सिक अधिकारी निराश स्वरात म्हणाला,
"काहीही संशयास्पद सापडलेलं नाही."
"ज्या फिंगरप्रिंट्स मिळाल्या आहेत त्या सर्व हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या आहेत."
"बाकी काहीच नाही."
चव्हाणांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती.
"आणि ते चिन्ह?"
"ते धुळीत बोटाने काढलेलं आहे."
"डीएनए?"
"नाही."
"फिंगरप्रिंट?"
"नाही."
"काहीच नाही."
---
नील शांतपणे त्या कपाटासमोर उभा राहिला.
त्याने पुन्हा एकदा त्या चिन्हाकडे पाहिलं.
मनात एकच विचार करत होता.
"जो कोणी हे करत आहे... तो प्रत्येक वेळी आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे. आपल्याला जर त्याला पकडायच असेल तर त्याच्याच पद्धतीने विचार करावा लागेल."
---
दुसऱ्या दिवशी...
पोलिसांनी हॉस्पिटलमधील प्रत्येक कर्मचाऱ्याची चौकशी सुरू केली.
स्वातीच्या जवळच्या मैत्रिणी...
डॉक्टर...
वार्डबॉय...
सुरक्षा रक्षक...
सफाई कर्मचारी...
शिवाय तिच्या परिवारातही तिच्याबद्दल चौकशी केली.
कोणालाही सोडलं नाही.
सगळ्यांना सारखे प्रश्न विचारले गेले.
स्वातीचे कोणासोबत भांडण वगैरे होते का?
कोणासोबत काही देणे घेणे होते का?
"स्वाती कोणाला घाबरत होती का?"
"तिने काही सांगितलं होतं का?"
"२०१८ मधल्या एखाद्या घटनेचा उल्लेख केला होता का?"
पण...
प्रत्येक उत्तर जवळजवळ सारखंच होतं.
"नाही."
"तिच्या वागणुकीत कोणताही बदल आम्हाला जाणवला नाही या आधी जशी वागत होती तशीच या दोन दिवसातही होती."
"काही दिवसांपासून मात्र थोडी अस्वस्थ दिसत होती."
यापेक्षा कोणाकडेही काही माहिती नव्हती.
---
इन्स्पेक्टर चव्हाणांनी समीरच्या मृत्यूची फाईल, शेखरच्या अपघाताची फाईल आणि स्वातीच्या मृत्यूची फाईल एकाच टेबलावर ठेवल्या.
तिन्ही प्रकरणांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला.
तीन वेगवेगळे मृत्यू...
तीन वेगवेगळी ठिकाणं...
तीन वेगवेगळ्या परिस्थिती...
पण...
एकच समान धागा.
तो फोटो.
आणि...
डोळा व हृदयाचं चिन्ह.
तरीसुद्धा...
कायदेशीरदृष्ट्या कोणताही पुरावा नव्हता. आणि जे त्या ठिकाणी सापडले त्याला पुरावा म्हणून पुढे करणे आणि गुन्हेगारांना पकडणे अशक्य होते.
---
दुसरीकडे...
नीलनेही स्वतःच्या पद्धतीने तपास सुरू ठेवला.
रात्री उशिरापर्यंत तो हॉस्पिटलच्या लायब्ररीत बसून जुन्या मेडिकल रेकॉर्ड्स, वृत्तपत्रं आणि पोलीस नोंदी तपासत होता.
२०१८ मध्ये नेमकं काय घडलं होतं?
त्या फोटोतील लोक कोण होते?
त्यांचा आणि वाड्याचा संबंध काय?
त्याला अनेक बातम्या सापडल्या.
काही अफवा...
काही अपूर्ण नोंदी...
काही अर्धवट माहिती...
पण कोणतीही गोष्ट पूर्ण चित्र स्पष्ट करत नव्हती.
जणू कोणीतरी मुद्दाम त्या काळातील सत्य पुसून टाकलं होतं.
---
चार दिवस उलटून गेले होते. तरीही तपास जागच्या जागीच होता.
ना नवीन पुरावा...
ना नवीन साक्षीदार...
ना संशयित.
नीलच्या मनात अस्वस्थता वाढत चालली होती. त्याला समीरची सारखी आठवण येत होती. का तो तिकडे गेला असेल? का त्याचा मृत्यू झाला असेल? त्याच्यासोबत यावेळेस तो का गेला नाही? अशा बऱ्याच गोष्टी त्याला त्रास देत होत्या आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एवढं सगळं होऊन तो त्याच्या गुन्हेगाराला पकडू शकत नाही ही एक दुर्दैवाची गोष्ट त्याच्यासाठी होती.
---
त्या दिवशी संध्याकाळी मानसिक दृष्ट्या थकलेला नील कारने हॉस्पिटलमधून घरी निघाला होता. एका चौकात सिग्नल लागल्यामुळे त्याने कार थांबवली.
बाहेर काचातून इकडे तिकडे पाहत असताना त्याची नजरसमोर गेली.
आणि...
क्षणभर त्याचा श्वास अडकला. जणू त्याला काहीतरी जुन्या गोष्टीतून नवीन सुगावा मिळाला असे वाटले.
रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला...
भावना उभी होती.
ती शांतपणे रस्ता ओलांडत होती.
नील काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला.
अचानक...
त्याच्या मनात विज चमकल्यासारखं झालं.
"भावना... की दर्शना?"
" हीच तर होती जिने यादी आपल्या नजरेसमोर समीर वर अप्रत्यक्ष हल्ला केला होता याही वेळेस कदाचित अप्रत्यक्षरीत्या हिचाच त्याच्यामध्ये हात नसेल..."
त्याला काही महिन्यांपूर्वी घडलेल्या समारंभातील ती झुंबर ची घटनांची आठवण झाली.
तेव्हा देखील भावना काही विचित्र वागत होती. समीर च्या आसपास दिसत होती.
पण...
त्याही वेडी आपण तिच्याविरुद्ध कधीच काही सिद्ध झालं नव्हतं. तर आज सिद्ध करणे कशी काय जमेल?
---
"ती मला आज अशी अचानक दिसली. काय हा फक्त योगायोग आहे?"
नील स्वतःशीच पुटपुटला.
सिग्नल हिरवा होताच त्याने कार सावकाश तिच्या मागे घेतली.
भावनाला त्याची चाहूल लागू नये याची तो पूर्ण काळजी घेत होता.
---
भावना या आधी ज्या अनाथ आश्रमात जाताना त्याला दिसली होती त्याच अनाथ आश्रमासमोर थांबली.
ती आत गेली.
नीलने दूरच कार उभी केली.
जवळपास तासभर तो बाहेरच थांबला.
त्या वेळात अनेक लहान मुलं अंगणात खेळताना दिसत होती.
भावना त्यांच्यासोबत हसत-खेळत होती.
कधी एखाद्या मुलाला जेवण वाढत होती.
कधी एखाद्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती.
तिच्या वागण्यात संशयास्पद असं काहीच नव्हतं.
---
साधारण तासाभराने ती पुन्हा बाहेर आली.
नीलने पुन्हा तिचा पाठलाग सुरू केला.
यावेळी ती सरळ तिच्या ऑफिसमध्ये गेली.
याही वेळेस त्याने तिच्यावर ऑफिसमध्ये नजर ठेवण्याचे ठरविले. पण याहीवेळी त्याला विशेष तिच्या वागण्यात काही दिसल नाही. ती तिच्या कामातच मग्न होती. शिवाय सहकाऱ्यांशी बोलली आणि त्यांच्यासोबत बोलताना ही काही संशय आपण त्याला वाटले नाही.
संध्याकाळचा तिने ऑफिसमध्ये चहा घेतला.
संध्याकाळी साडेसहा वाजता ती ऑफिसमधून बाहेर पडली.
---
नील अजूनही तिच्यावर लक्ष ठेवून होता. समीरच्या बाबतीत घडलेल्या सर्व घटना, आठवणी होत्या त्याचा मेन धागा म्हणजे हीच तरुणी जी कधी भावना तर अधिक दर्शनी म्हणून त्याला भेटली होती. त्याच्या दृष्टीने तीच संशयित होती.
"आता ती कुठे जाते ते पाहू."
पण...
भावना थेट तिच्या घरी गेली.
ती घरात शिरली. आणि सोफ्यावर बसून राहिली. खिडकीतून तिची आई दिसत होती.
तो दूर असला तरीही पूर्ण लक्ष देऊन होता. त्याला सगळं अगदी सामान्य वाटतं होते.
---
नील जवळपास अर्धा तास तिच्या घराबाहेर थांबला.
कोणीही बाहेर आलं नाही. किंवा
कोणी आतही गेलं नाही.
शेवटी त्याने एक दीर्घ श्वास घेतला.
"नाही..."
"इथे काहीच संशयास्पद नाही."
---
घरी परतताना त्याच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं.
"मी चुकीच्या दिशेने विचार करतोय का?"
"भावनाचा या सगळ्याशी काहीच संबंध नाही?"
"की तुझे यादी विचार केला किंवा मी जे पाहिले ते फक्त आणखी एक योगायोग आहे?"
पण यावेळेस त्याच्याच प्रश्नाची त्यालाच उत्तर काहीच मिळत नव्हतं.
---
त्याच रात्री...
इन्स्पेक्टर चव्हाणांचा फोन आला.
"डॉ. नील..."
"उद्या सकाळी लवकर भेटूया."
"का?"
"२०१८ मधल्या एका जुन्या फाईलबद्दल माहिती मिळाली आहे."
नीलचा श्वास वेगाने चालू लागला.
"काय माहिती?"
चव्हाण काही क्षण शांत राहिले.
मग म्हणाले,
"फोनवर सांगणं योग्य नाही."
"तुम्ही सकाळी पोलीस स्टेशनला या."
फोन कट झाला.
---
नील बराच वेळ मोबाईलकडे पाहत राहिला.
अनेक दिवसांनी...
पहिल्यांदाच त्याला वाटलं...
कदाचित तपासाला आता एखादी नवी दिशा मिळणार होती.
पण...
त्याला अजूनही कल्पना नव्हती...
की त्या जुन्या फाईलमध्ये दडलेलं सत्य केवळ समीरच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार नव्हतं...
तर त्याच्या स्वतःच्या आयुष्यालाही एका अशा वळणावर नेणार होतं, जिथून परत फिरणं कदाचित अशक्य होणार होतं.
क्रमशः
हा भाग वाचता तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुमची एक कमेंट मला पुढील भाग लिहिण्यासाठी प्रोत्साहित करते. फक्त वाचून कमेंट करून निघून नका जाऊ तर कमेंट सोबतच फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
