Login

साया - 40

डॉक्टर समीर चा मृत्यू कशाने झाला आणि त्याच्या जवळ असलेल्या फोटोमध्ये रहस्य काय आहे?

"डॉ. नील... तुम्ही लगेच डॉ समीरच्या नवीन हॉस्पिटलच्या प्रांगणात या."

"का? काय झालं?"

काही क्षण चव्हाण काहीही न बोलता गप्प  राहिले.

मग इन्स्पेक्टरचा गंभीर आवाज आला.

"इथे एक मृतदेह सापडला आहे."

नीलचं हृदय धडधडू लागलं.

तो लगेच घटनास्थळी पोहोचला.

संपूर्ण परिसर पोलिसांनी बंदिस्त केला होता.

लोकांची तिथे गर्दी जमली होती. त्यातून वाट काढत

नील पुढे गेला.

जमिनीवर पांढरं कापड टाकलेलं होतं.

इन्स्पेक्टर चव्हाणांनी त्याच्याकडे पाहिलं.

"तो स्वतःला सावरत होता..."


हळूहळू त्यांनी कापड बाजूला केलं.

नील च्या चेहऱ्याचा रंग उडाला त्याचा चेहरा एकदम गंभीर आणि दुःखी झाला त्याच्या डोळ्यात अविश्वास दिसत होता कारण त्या कापडाखाली जो मृत देव होता,

तो समीर होता.

पण...

त्याच्या चेहऱ्यावर भीती गोठलेली होती.

डोळे पूर्ण उघडे.

जणू मृत्यूपूर्वी त्याने काहीतरी अकल्पनीय पाहिलं होतं.

शरीरावर  मारहाणीच्या खुणा नव्हत्या.

फक्त मनगटावर मातीचे डाग...

आणि उजव्या तळहातावर नखांनी ओरबाडल्यासारखं उमटलेलं एक चिन्ह.

एक डोळा.

आणि त्याच्या मध्यभागी...

एक छोटंसं हृदय.

इन्स्पेक्टर चव्हाण हळू आवाजात म्हणाले,

"आश्चर्याची गोष्ट म्हणजे..."

"घटनास्थळी कोणतेही पावलांचे ठसे नाहीत."

"ना झटापटीच्या खुणा."

"ना वाहनाचे चिन्ह."

"जणू कोणीतरी यांना मारल्यानंतर इथे शांतपणे ठेवून गेलं."

नील समीरकडे पाहतच राहिला.

त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत होता,


तो इथे कसा आला?

आणि त्याच्या मृत्यूमागचं सत्य काय?...


                           पुढे.......


आकाशात अजूनही काळे ढग होते. रात्रीच्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरला होता. पण नीलच्या मनात मात्र भीती, दुःख आणि असंख्य प्रश्नांचं वादळ घोंगावत होतं.

समीरच्या मृत्यूची बातमी संपूर्ण शहरात पसरली होती.

नवीन हॉस्पिटलच्या प्रांगणात पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि काही मोजके कर्मचारी अजूनही उपस्थित होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता. हे नेमकं घडलं कसं?


"डॉ. नील," चव्हाण शांतपणे म्हणाले, "आम्ही संपूर्ण परिसराची तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासलं. रात्री उशिरा इथे कोणी येताना दिसले नाही. सॉरी पण मृतदेह इथे कसा आला, याचंही उत्तर आमच्याकडे नाही."

नील काहीच बोलला नाही. फक्त प्रश्नार्थक नजरेने इन्स्पेक्टर चव्हाण आणि निर्जीव असलेल्या समीरच्या शरीराकडे पाहत होता.

काही वेळाने त्याची नजर समीर पडलेला होता त्याच्या आजूबाजूच्या जमिनीवर फिरू लागली.

ओल्या मातीत असंख्य पावसाचे टपोऱ्या थेंबाचे ठसे दिसत होते.

मात्र...

समीर जिथे सापडला होता, त्या जागेभोवती जमीन विलक्षण सपाट आणि ती जागा स्थिर होती. म्हणजे त्यावर

ना पावलांचे ठसे...

ना वाहनाचे टायर...

ना ओढल्याच्या खुणा...

ना पावसाचे टपोऱ्या थेंबाचे ठसे.

जणू तो अचानक त्या जागी प्रकट झाला होता.

"हे नैसर्गिक वाटत नाही..." नील हळू आवाजात म्हणाला.

इन्स्पेक्टर चव्हाणने मान डोलावली.

"आम्हालाही असेच वाटत आहे."

तेवढ्यात फॉरेन्सिक विभागातील एक अधिकारी हातात पारदर्शक पुराव्याची पिशवी घेऊन आला.

"सर, मृतदेहाजवळ हे सापडलं."

त्याने ती पिशवी नील आणि चव्हाण यांच्या समोर धरली.

आत एक जुना, पावसाने अर्धवट भिजलेला फोटो होता.

नीलने काळजीपूर्वक तो फोटो बाहेर काढला.

फोटोचा कागद पिवळसर झाला होता.

कोपरे फाटलेले होते.

त्यावर चार माणसं उभी होती.

एक मध्यमवयीन दांपत्य...

त्यांच्या मध्ये सुमारे वीस-बावीस वर्षांची एक तरुणी...


नीलच्या कपाळावर आठ्या पडल्या.

"हे सगळं कोणी मुद्दाम केलं तर नसेल. कदाचित वैयक्तिक शत्रुत्वाचा भाग. पण या ठिकाणी दुसरे पुरावे काही ही कसे मिळत नाही..."

पावसामुळे तो फोटो जरा अस्पष्ट झाला होता. चेहरे फारसे स्पष्ट दिसत नव्हते. म्हणून नील ने तो फोटो जवळ धरून पाहण्याचा प्रयत्न केला. फोटो पाहत असताना त्याच्या मागे काहीतरी लिहिले आहे हे त्याच्या लक्षात आले.

फोटोच्या मागे फिकट शाईने काही शब्द लिहिलेले होते.

"सत्य लपवलं... म्हणून ते संपलं नाही..."

त्याखाली तारीख होती.

१७ ऑक्टोबर २०१८

हीच ती तारीख...

ज्या तारखेचा उल्लेख त्याने आधीही पाहिला होता.

नीलच्या छातीत धडधड वाढली.

"२०१८..."

तो मनातच पुटपुटला.

"याच वर्षी त्या वाड्याशी संबंधित घटना घडली होती..."

फोटो इन्स्पेक्टर चव्हाण ना परत दाखवला. आणि विचारले, इन्स्पेक्टर चव्हाणने फोटो हातात घेतला.

"या मुलीला ओळखता का?"

नीलने ही पुन्हा एकदा त्या मुलीच्या चेहऱ्याकडे पाहिलं.

तिचा चेहरा त्याला परिचित वाटत होता.

पण त्याला नेमकं काही आठवत नव्हतं.

"मलाही नेमकं नाही... पण मी हा चेहरा याआधी कुठेतरी पाहिलाय असे वाटते."

चव्हाण म्हणाले,

"आम्ही हा फोटो स्कॅन करून जुने रेकॉर्ड तपासतो."

नीलने मान हलवली.

पण त्याच्या मनात वेगळाच विचार सुरू झाला होता.

समीर हा फोटो कोठून घेऊन आला होता? त्याच्याकडे हा फोटो कोणी दिला असेल का?

की...

कोणीतरी मुद्दाम त्याच्या मृतदेहाजवळ ठेवला होता?

---

दुसरीकडे...

हॉस्पिटलमध्ये...

कल्याणी अजूनही निरीक्षणाखाली होती.

तिची प्रकृती स्थिर होती.

मात्र ती शुद्धीवर आल्यानंतर सतत एकाच दिशेने पाहत होती.

नर्सने हळू आवाजात विचारलं,

"मॅडम... काही त्रास होतोय का? तुम्हाला काही हवं आहे का?"

कल्याणीने काही उत्तर दिलं नाही.

ती फक्त खिडकीबाहेर पाहत राहिली.

काही क्षणांनी ती कुजबुजली,

"तो... फोटो..."

नर्स दचकली.

"कोणता फोटो?"

कल्याणीने डोळे मिटले.

तिच्या श्वासाचा वेग वाढला.

"तो... जाळू नका..."

"तोच... सत्य आहे..."

नर्सने लगेच धावत डॉक्टरांना बोलवायला गेली.

"डॉक्टर.. डॉक्टर कल्याणीला सुद्धा आली आहे आणि ती विचित्र वागत आहे. काहीतरी सांगण्याचा, बोलण्याचा प्रयत्न  करत आहे."

डॉक्टर ही लगेच धावत कल्याणीच्या वॉर्डमध्ये गेले. तिचा चेकअप केला.  इंजेक्शन देऊन तिला शांत केले. यावेळेस तशीही कल्याणी शांतच होती फक्त ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती जे कोणालाही कळले नाही.

काही तासानंतर नील हॉस्पिटलमध्ये परत आला तेव्हा त्याला ही माहिती मिळाली.

तो ताबडतोब कल्याणीच्या रूममध्ये गेला.

"कल्याणी..."

त्याने शांतपणे तिचं नाव घेतलं.

ती हळूहळू त्याच्याकडे पाहू लागली.

तिच्या डोळ्यांत अजूनही भीती स्पष्ट दिसत होती.

"तुला काही आठवतंय का?"

नीलने विचारलं.

ती काही क्षण शांत राहिली.

मग अतिशय मंद आवाजात म्हणाली,

"मला... एक खोली दिसते..."

"भिंतीवर मोठं चित्र..."

"कोणीतरी रडत होतं..."

"आणि..."

ती अचानक थांबली.

तिच्या चेहऱ्यावर भीती पसरली.

"त्याच्या हातात फोटो होता..."

"कोणाच्या हातात?" नीलने तत्काळ विचारलं.

कल्याणीने डोळे घट्ट मिटले.

"चेहरा दिसत नव्हता..."

"पण..."

"तो मला म्हणाला..."

"हा फोटो जप... नाहीतर पुन्हा सगळं सुरू होईल..."

इतकं बोलून ती पूर्ण शांत झाली.

नीलच्या अंगावर काटा आला.

त्याने खिशातून घटनास्थळी सापडलेला फोटो जो मोबाईल मध्ये काढून घेतला होता तो बाहेर काढला.

क्षणभर त्याने तो कल्याणीसमोर धरला.

फोटो पाहताच तिचे डोळे विस्फारले.

तिने घाबरून दोन्ही हात मागे घेतले.

"नाही... तिकडे करा तो फोटो... दूर ठेवा माझ्यापासून."

"हा तोच फोटो..."

"हा इथे कसा आला?"

नील आणि नर्सने एकमेकांकडे पाहिलं.

आता एक गोष्ट निश्चित झाली होती.

कल्याणीने हा फोटो याआधी पाहिला होता.

पण...

कुठे?

आणि कधी?

आणि त्या फोटोतील ती मुलगी कोण होता?

हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच होते.

नीलने मोबाईल परत खिशात ठेवला. त्याची खिडकीबाहेर नजर गेली.

आकाश पुन्हा काळ्या ढगांनी भरलं होतं. वीजही कडकडाट होती.

तेवढ्यात एक जोरदार विज चमकली.

क्षणभर त्या प्रकाशात हॉस्पिटलच्या खिडकीबाहेर एक व्यक्ती उभी असल्याचा भास झाला.

नीलने लगेच परत लक्षपूर्वक तिकडे पाहिलं.

पण...

यावेळी तिथे कोणीच नव्हतं.

त्याने पुन्हा खिशावर हात ठेवला ज्यामध्ये मोबाईल ठेवला होता.

त्याला जाणवत होतं...

या फोटोतच त्या रहस्याची पहिली खरी किल्ली दडलेली होती.

आणि कदाचित...

समीरनेयाच कारणासाठी त्याचा जीव गमावला.

क्रमशः
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →