पहाटेच्या सुमारास...
समीरची झोप अचानक उघडली.
त्याने त्याची नजर असावधपणे चहूबाजूंनी फिरवली. आणि समोर पाहतच....
आयसीयूच्या काचेपलीकडे...
कॉरिडॉरच्या टोकाशी...
एक स्त्री काही क्षण उभी असल्यासारखी त्याला दिसली.
तिचे लांब केस चेहऱ्यावर आले होते.
ती हलली नाही.
फक्त उभी होती.
समीर घाबरून उठण्याचा प्रयत्न करू लागला.
"नील..."
त्याने पूर्ण ताकदनिशी हाक मारली.
नील धावत आला.
"समीर काय झालं?"
"तिथे..."
समीरने थरथरत्या हाताने कॉरिडॉरकडे बोट दाखवलं.
नीलने मागे वळून पाहिलं.
कॉरिडॉर पूर्ण रिकामा होता.
"तिथे कोणी नाही."
समीर काही बोलला नाही.
कारण...
त्याला खात्री होती.....
त्याने कोणालातरी पाहिलं होतं.
---
त्याच क्षणी...
हॉस्पिटलच्या जुन्या रेकॉर्ड रूममध्ये ठेवलेल्या अनेक वर्षांपूर्वीच्या फाईलींच्या कपाटातून...
एक जुनी फाईल स्वतःहून खाली पडली.
त्या फाईलच्या मुखपृष्ठावर धुळीतून एक शब्द स्पष्ट दिसत होता—
"प्रकरण क्रमांक १७..."
आणि त्याच्या खाली...
एक नाव लिहिलेलं होतं. जे अस्पष्ट झालं होतं वाचता येत नव्हते.
नीलला याची अजून कल्पनाही नव्हती...
पण त्या फाईलमध्ये दडलेलं सत्य त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का ठरणार होतं.
पुढे.......
सकाळचे साडेसात वाजले होते.
रात्रभर सुरू असलेल्या पावसाने आता थोडी उसंत घेतली होती. हॉस्पिटलच्या काचेच्या खिडक्यांवरून अजूनही पावसाचे थेंब हळूहळू खाली घसरत होते. बाहेरचं वातावरण धूसर होतं, पण हॉस्पिटलमध्ये नेहमीप्रमाणे धावपळ सुरू झाली होती.
कोणी रुग्णांची तपासणी करत होतं, कोणी रिपोर्ट्स घेऊन इकडून तिकडे धावत होतं. कॉरिडॉरमध्ये औषधांचा मंद वास दरवळत होता.
पण या सगळ्या गडबडीत एकच व्यक्ती रात्रभर झोपली नव्हती...
नील.
तो आयसीयूच्या काचेपाशी उभा राहून समीर आणि कल्याणीकडे एकटक पाहत होता.
रात्रभर त्याच्या डोळ्यांसमोर त्या जुन्या वाड्यातील प्रत्येक क्षण फिरत होता. अंधार, मोडकळीस आलेल्या भिंती, तुटलेली चित्रं, ३:१७ वर थांबलेलं घड्याळ आणि बेशुद्ध अवस्थेत सापडलेली कल्याणी.
सकाळी समीर झोपेतून उठला. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही अशक्तपणा होता.
"नील..."
त्याचा आवाज अजूनही मंद होता.
नील हलकंसं हसला.
"गुड मॉर्निंग."
त्याने डोळे मिटले. आणि बोलण्याचा प्रयत्न केला. पण हसत त्याने ही "गुड मॉर्निंग " म्हटले. आणि
"आता कल्याणी ची तब्येत कशी आहे?"हे विचारण्यास ते विसरला नाही.
नील, "ती ठीक आहे लवकरच तीही या सगळ्यातून बाहेर पडेल."
समीर ने परत नील ला विचारले, तुला या सगळ्या बाबत काय वाटते?
मी जे काही पाहिलं नेमकं त्याबद्दल मी काहीही सांगू शकत नाही पण या सगळ्यांमध्ये ते चिन्ह चे कल्याणीने तुझ्या घरात काढलं होतं, जे किचनमध्ये भिंतीवर होतं. तेच एक कॉमन असल्याचे मला जाणवले.
"तुला वाटतं... हे सगळं त्या चिन्हाशी संबंधित आहे?"समोर.
नीलच्या डोळ्यांसमोर पुन्हा ते रक्ताने काढलेलं चिन्ह आलं..
एक डोळा... आणि त्याच्या मध्यभागी छोटंसं हृदय.
"हो."
तो ठामपणे म्हणाला.
"मला तसंच वाटतं."
"समीर, आतापर्यंत जे काही घडलं आहे, त्यात एक गोष्ट समान आहे."
"ते म्हणजे फक्त ते चिन्ह."
"ते तुझ्या घरी दिसलं."
"त्या मुलीशी त्याचा काहीतरी संबंध आहे."
"वाड्याजवळही त्याचे संकेत मिळाले."
"हे सगळं योगायोग असू शकत नाही."
समीर शांत झाला.
मग तो हळू आवाजात म्हणाला,
"नील..."
"आपण पोलिसांना सांगूया का?"
नीलने लगेच नकारार्थी मान हलवली.
"नाही."
"आत्ता नाही."
"का?"
"कारण आपल्याकडे कोणताही ठोस पुरावा नाही."
"आपण सांगितलेल्या गोष्टीवर ते विश्वास ठेवणार नाही."
"आणि त्याचा सर्वात मोठा परिणाम कल्याणीवर होईल."
समीर विचारात पडला.
"म्हणजे?"
"तिची मानसिक आणि शारीरिक अवस्था आधीच कमकुवत आहे."
"ती शुद्धीवर आल्यानंतर तिच्यावर चौकशीचा ताण येईल जो तिच्या आरोग्याला योग्य नाही."
"आधी ती पूर्ण बरी होऊ दे."
"तोपर्यंत..."
नील थोडा थांबला.
"वाड्याबद्दल किंवा काल रात्री घडलेल्या घटनांबद्दल कोणालाही काही सांगू नकोस."
समीरने नीलकडे पाहिलं.
"तू काहीतरी लपवतो आहेस."
नील हलकंसं हसला.
"हो."
"एक गोष्ट."
"काय?"
"मी स्वतः आधी खात्री करून घेईन."
"त्यानंतरच तुला सांगेन."
समीरला त्याचा स्वभाव माहिती होता.
तो अर्धवट माहिती कधीच देत नसे.
म्हणून त्याने पुढे काही विचारलं नाही.
...
त्याच वेळी नर्स पूजा आत आली.
"सर..."
"कल्याणी मॅडमची तपासणी पूर्ण झाली."
दोघांची नजर तिच्याकडे वळली.
"काय म्हणतात डॉक्टर?"
"त्यांची प्रकृती स्थिर आहे."
"रक्तदाब सामान्य आहे."
तो आणि समीर दोघेही कल्याणीच्या बेडकडे गेले.
ती शांतपणे झोपली होती.
तिच्या चेहऱ्यावर कालच्या भीतीचा लवलेशही नव्हता.
हातांवर पट्ट्या बांधलेल्या होत्या.
बोटांवरील जखमा स्वच्छ करण्यात आल्या होत्या.
समीरच्या डोळ्यांत पाणी आलं.
"माझ्यामुळे..."
"हे सगळं झालं."
नीलने लगेच त्याचा हात धरला.
"स्वतःला दोष देणं थांबव."
"हे तुझ्यामुळे झालेलं नाही."
"पण..."
"तू आत्ता तिच्यासाठी मजबूत राहणं जास्त महत्त्वाचं आहे."
समीरने कल्याणीकडे पाहिलं.
"ती जागी झाली की..."
"मी तिला पुन्हा कधीच एकटी सोडणार नाही."
नील काही बोलला नाही.
कारण त्यालाही माहिती होतं...
ही फक्त सुरुवात होती.
...
दुपार झाली.
हॉस्पिटलमध्ये पुन्हा नेहमीची वर्दळ सुरू झाली.
समीरला आयसीयूमधून स्पेशल रूममध्ये हलवण्याची तयारी सुरू झाली.
नीलने स्वतः सर्व रिपोर्ट्स पुन्हा तपासले.
सगळं सामान्य दिसत होतं.
पण त्याच्या मनात मात्र एकच प्रश्न सतत घोळत होता....
कल्याणी त्या वाड्यात नेमकी कोणत्या खोलीत गेली होती?
आणि ती बेशुद्ध कशी पडली?
त्याने अजून याबद्दल समीरलाही सांगितले नव्हते.
...
संध्याकाळी चारच्या सुमारास...
नील आपल्या केबिनमध्ये बसून त्या जुन्या वाड्याचा हाताने काढलेला साधा आराखडा तयार करत होता.
त्याने आठवणीप्रमाणे प्रत्येक खोली चिन्हांकित केली.
मुख्य दरवाजा...
जिना...
कॉरिडॉर...
आणि वरच्या मजल्यावरील ती खोली...
जिथे कल्याणी सापडली होती.
तो विचारात असतानाच त्याचा मोबाईल वाजला.
स्क्रीनवर हॉस्पिटल लॅबचा नंबर होता.
"सर..."
"कल्याणी मॅडमच्या नखांखाली अडकलेल्या मातीचा प्राथमिक अहवाल आला आहे."
नील सावध झाला.
"काय निष्कर्ष?"
"ती साधी बागेतील माती नाही."
"त्यात जुन्या विटांची भुकटी आणि चुन्याचे सूक्ष्म कण आहेत."
नील काही क्षण विचारात पडला.
याचा अर्थ...
ती वाड्याच्या बाहेर नव्हती.
ती घराच्या आतल्या एखाद्या जुन्या भागात गेली होती.
पण...
कोणत्या?
तो खुर्चीत मागे रेलला.
त्याला जाणवलं...
वाड्याचं रहस्य हळूहळू त्याच्यासमोर स्वतःचे दरवाजे उघडत होतं. तिथे असे काहीतरी आहे जे ते अदृश्य शक्तीसाठी महत्त्वाचे आहे. पण काय शोधत होती कल्याणी तिथे हेच शोधणे मला आता आवश्यक आहे.
हळूहळू सूर्य मावळतीला जातो आणि सर्वत्र परत शांतता पसरते. रात्र झाली असली तरीही नीलच्या डोळ्यात झोप नाही. तो कल्याणी आणि समीर वर लक्ष ठेवून होता. कदाचित त्यांना परत कोणता त्रास होऊ शकतो किंवा ती अदृश्य शक्ती त्यांच्यावर हल्ला चढवू शकते, ही भीती सारखी त्याच्या मनात रेंगाळत होती. त्याच काळजीपोटी तो स्वतः जागरण करून त्या दोघांवर लक्ष ठेवून होता. ते दोघेही औषधांच्या प्रभावाखाली शांत झोपेत होते.
पण आज सदैव आणि त्यांच्यावर कोणतेही वाईट परिस्थिती ओढवली नाही आणि कोणताही संकट चालून आले नाही ही रात्र शांततेत निघून गेली.
दुसऱ्या दिवशी सूर्य हा शांतता आणि आनंद घेऊन आला आहे असा नीलच्या मनात विचार आला. तो काही वेळासाठी नर्सला सांगून घरी फ्रेश होण्यासाठी निघून गेला. दोन वेगवेगळ्या नर्स दोघांच्या रूममध्ये त्यांच्या देखरेखी साठी सज्ज होत्या. दुसरीकडे दैनंदिन पेशंटची, कर्मचारी यांची वर्दळ हॉस्पिटलमध्ये वाढत होती. दुसरीकडे ती जुनी रिपोर्ट फाईल रेकॉर्डर रूम मध्ये साफसफाई करताना एका कर्मचाऱ्याला दिसली. त्याने ती बाकीच्या फाईल सोबत उचलण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये काही विशेष वाटले नाही. त्याने ती उचलून परत वर ठेवण्यासाठी हात वर केला आणि अचानक बाहेरून......
