Login

साया - 28

कल्याणी ने केला समीर वर हल्ला. ती नेमकी कल्याणी की ती विकृत शक्ती?

                     मागील भागात.......

नील ने मोबाईलचा प्रकाश त्या दिशेने वळवला.

कल्याणी भिंतीजवळ उभी होती.

पण...

ती ज्या पद्धतीने उभी होती, ते पाहून दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला.

तिचं डोकं एका बाजूला जवळजवळ नव्वद अंश वाकलं होतं.

दोन्ही हात शरीराला चिकटलेले.

आणि डोळे...

पापणी न लवता त्यांच्याकडे रोखून धरले होते. ते एवढे मोठे आणि भीतीदायक दिसत होते की, काही वेळ असेच ती पाहत राहिली तर डोळे बाहेर पडतील.

ती हळूहळू म्हणाली, तिच्या आवाजात एक भीती निर्माण करणारी धार होती.

"ती... परत... आली आहे..."

"कोण?" नीलने धैर्य एकवटत विचारलं.

ती उत्तरली नाही.

फक्त उजवा हात वर करून खोलीच्या कोपऱ्याकडे बोट दाखवलं. तिच्या चेहऱ्यावरून त्या दोघांनी हळूहळू तिच्या हाताच्या दिशेने नजर फिरवली.

भीत भीत दोघांनीही त्या दिशेने पाहिलं.

पण तिथे काहीच नव्हतं.

पुन्हा परत त्यांनी त्याच गतीने त्यांची नजर कल्याणीकडे वळविली...

आणि तिकडे पाहतात त्यांचा जीव मुठीत आला. क्षणभर दोघांचाही श्वास थांबला.


                         पुढे.......



ती त्यांच्या अगदी समोर येऊन उभी होती. तीही अशा अवस्थेत कोणीही सामान्य माणूस पाहता घाबरून भीतीनेच मरून जाईल.

कधी आली...

कशी आली...

दोघांनाही समजलंच नव्हतं.

ती नीलच्या अगदी जवळ आली.

तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्यापासून काही इंचांवर होता.

ती कुजबुजली,

"डॉक्टर..."

"तू फार हुशार आणि संयमी आहेस तू सत्याच्या खूप जवळ आहेस लवकरच तुला सत्य कळेल."

हे बोलून ती अचानक जोरात किंचाळली.

त्या किंचाळीने संपूर्ण फ्लॅट हादरल्यासारखा वाटला.


समीरने घाबरून डोळे मिटले.

दोन-तीन सेकंदांनी शांतता पसरली.

दोघांनी पुन्हा पाहिलं...

कल्याणी जमिनीवर बेशुद्ध पडली होती.

तिचा श्वास सामान्य होता.

चेहरा पूर्वीसारखाच शांत दिसत होता.

जणू काहीच घडलं नव्हतं.

नीलने तिची नाडी तपासली.

ती व्यवस्थित होती.

काही क्षणांनी कल्याणीने हळूहळू डोळे उघडले.

ती गोंधळून आजूबाजूला पाहू लागली.

"समीर...?"

"नील...?"

"तुम्ही दोघे माझ्याकडे असे का पाहताय?"

तिच्या आवाजात नेहमीचीच सहजता होती.

"मी... इथे खाली कशी पडले?"

समीर आणि नीलने एकमेकांकडे पाहिलं.

कल्याणीच्या चेहऱ्यावर निरागस गोंधळ होता.

तिला काहीच आठवत नव्हतं.

मात्र...

नीलच्या मनात तिची शेवटची कुजबुज अजूनही घुमत होती.

आता प्रश्न फक्त इतकाच उरला होता...

तो इशारा कल्याणीने दिला होता... की तिच्या शरीरातून बोलणाऱ्या कोणीतरी दुसऱ्याने?


त्या रात्री घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण फ्लॅटमध्ये एक अनैसर्गिक शांतता पसरली होती.

नीलने कल्याणीची पुन्हा एकदा काळजीपूर्वक तपासणी केली.

तिचा रक्तदाब सामान्य होता.

नाडी व्यवस्थित होती.

शरीरावर कोणतीही नवीन दुखापत नव्हती.

वैद्यकीय दृष्टीने ती पूर्णपणे स्थिर दिसत होती.

पण...

पण काही मिनिटांपूर्वी जे घडलं होतं, त्याचं स्पष्टीकरण नीलकडे नव्हतं.

समीर मात्र अजूनही हादरलेला होता. त्याची नजर वारंवार कल्याणीकडे जात होती. काही केल्या त्याच्या मनातून आणि त्याच्या नजरेतून तो आधी पाहिलेला कल्याणीचा चेहरा दूर जात नव्हता.

"नील..." तो हळू आवाजात म्हणाला, "तूही तेच पाहिलंस ना? मला भास झाला नव्हता ना?"

नील काही क्षण शांत राहिला.

"मी जे पाहिलं ते सहज दुर्लक्षित करता येणार नाही. पण आपण घाईघाईने निष्कर्ष काढणार नाही. आधी तिची काळजी घेणं महत्त्वाचं आहे."

कल्याणी हळूहळू उठून बसली.

तिने कपाळावर हात ठेवला.

"माझं डोकं खूप जड झाल्यासारखं वाटतंय."

"काही आठवतंय का तुला?" नीलने विचारलं.

ती काही क्षण विचार करू लागली.

"नाही... मला एवढंच आठवतं की मी माझ्या खोलीत होते... त्यानंतर सगळं धूसर आहे."

तिच्या डोळ्यांत गोंधळ दिसत होता. काहीशी ती घाबरलेली ही वाटत होती.

नीलने तिच्याकडे निरखून पाहिलं.

तो एक अनुभवी डॉक्टर होता.

एखादा माणूस अभिनय करतो आहे की खरंच गोंधळलेला आहे, याचा अंदाज त्याला साधारण यायचा.

कल्याणीचा चेहरा पाहून त्याला ती खोटं बोलत आहे असं वाटलं नाही.


---

त्या रात्री नीलने समीरला एकटं न सोडण्याचा निर्णय घेतला.

दोघेही हॉलमध्ये बसून जागत राहिले.

कल्याणी आपल्या खोलीत झोपली होती.

अधूनमधून नील तिच्यावर नजर ठेवून होता.

ती शांत झोपलेली दिसत होती.

रात्रीचे तीन वाजले.

मग चार.

कुठलीही विचित्र किंवा अघटीत घटना घडली नाही.

पहाटेच्या मंद प्रकाशाने घर उजळायला सुरुवात झाली होती. तेव्हा समीरने हे सगळ पाहून सुटकेचा श्वास घेतला.

"बहुतेक... सगळं संपलं आहे. म्हणजे आधी सर्व नॉर्मल झाले."

नीलने मात्र यावर काही उत्तर दिलं नाही.

पण तरीही त्याच्या मनात एकच गोष्ट येत होती -

इतक्या सहजासहजी संपेल का?


---

पुढचे दोन दिवस वरवर सर्व काही सामान्य वाटत होत. कल्याणी पुन्हा नेहमीप्रमाणे घरकाम करू लागली. ती हसत होती, बोलत होती. समीरची काळजी घेत होती. तिला पाहता वाटत नव्हते की तिच्या सोबत काही वाईट झालेल आहे. म्हणून इतकी नॉर्मल आणि दैनंदिन जीवनात व्यस्त वाटत होती.

नील दोनदा भेटून गेला. प्रत्येक वेळी त्याने तिची तपासणी केली. तिचे सगळे अहवाल नॉर्मल होते. यामुळे समीरचा आत्मविश्वास परत येऊ लागला.

"मला वाटतं आपण विनाकारण घाबरलो होतो."
नीलने फक्त एवढंच म्हटलं,

"तसं असेल तर सर्वात जास्त आनंद मला होईल."


---

तिसऱ्या दिवशी...

समीर सकाळी हॉस्पिटलमध्ये गेला.

दिवसभर शस्त्रक्रिया, रुग्ण आणि तपासणी यामध्ये तो सगळ्यांमध्ये व्यस्त राहिला.

संध्याकाळी जवळपास सातच्या सुमारास तो घरी परतला.

दार उघडताच त्याला घरात अंधार जाणवला. त्याने घरात जाताच तिला आवाज दिला......

"कल्याणी?"

पण मागच्या सारखे याहीवेळी तसेच झाले. यामधून त्याला उत्तर मिळाले नाही.

त्याने घरातील लाईट लावले.

ती हॉलमध्येही नव्हता. हॉलमध्ये रिकामा होता.

त्याने किचनमध्ये जाऊन ही पाहिले, तेही शांत होतं. त्याने बाहेर येऊन परत एकदा आवाज दिला.....

"कल्याणी?"

या वेळी त्याचा आवाज थोडा मोठा झाला.

त्याला बेडरूमचं दार अर्धवट उघडं दिसलं. हळूहळू तो त्या दिशेने चालत गेला. हळूच त्याने आत डोकावले. नंतर तो आत गेला. त्याने खोलीत पूर्ण नजर फिरवली.

कल्याणी खिडकीजवळ उभी होती. तिची पाठ त्याच्याकडे होती. ती पूर्णपणे स्थिर होऊन उभी होती. जनु काही पुतळा उभा केला असावा.

"कल्याणी..."

ती त्याच्या आवाजाने जराही हलली नाही.

"परत काही झाले का?"

समीर तिच्याजवळ गेला.

"तुझी तब्येत ठीक आहे ना?"

हळूहळू ती त्याच्याकडे वळली.

तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता.

डोळे निर्विकार.

"मी ठीक आहे."

आवाज शांत होता.

पण त्यात नेहमीची ऊब नव्हती.

समीरने हसण्याचा प्रयत्न केला. पण कुठेतरी त्याच्या मनात थोडी भीती होती. तरीही त्याने तिला विचारले,

"आज इतकी शांत का आहेस?"

क्षणभर ती काही ही न बोलता गप्प राहिली.

मग ती म्हणाली,

"तुला शांतता आवडत नाही का?"

समीरला तिचं बोलणं विचित्र वाटलं. त्याच्या मनात एक भीतीची लहर निर्माण झाली.

"तसं नाही... पण तू अशी कधी वागत नाहीस ना म्हणून मी विचारले."

हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावरचा भाव बदलू लागला.

भुवया आकुंचनल्या.

श्वास जोरात होऊ लागला.

"म्हणजे?"

"मी कस वागायला हवं?"

समीर तिचे शब्द कानावर पडताच दचकला. त्याच्या मनातील भीती अजूनच वाढली.

"अगं, मी तसं काही म्हणालो नाही."

"मग काय म्हणालास?"

तिचा आवाज आता चढला होता.

"तुला माझ्यात नेहमी काहीतरी चूकच दिसते!"

"कल्याणी, शांत हो..."

"मला शांत राहायला सांगू नकोस!"

ती अचानक मोठ्याने ओरडली.

तो एव्हढा घाबरला की, नकळत समीर दोन पावलं मागे सरकला.

तो तिला समजावण्यासाठी पुढे झाला.

"ऐक, आपण बसून बोलूया."

त्याने तिच्या खांद्याला हलकासा स्पर्श केला.

पुढच्याच क्षणी...

तिने जोरात त्याला ढकललं.

समीरचा तोल गेला. आणि तो मागे जाऊन भिंतीवर आपटला.



क्रमशः....


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →