Login

साया - 26

समीरच्या जीवनात परत आली ती भयानक आकृती.

त्या रात्री तो घरी परतला. नेहमीप्रमाणे आईने दार उघडलं.

"आज खूप उशीर झाला." तिने काळजीने विचारलं


"हो थोडं काम होतं." त्याने नेहमीप्रमाणे उत्तर दिलं.

पण आईने त्याचा चेहरा पाहताच विचारलं,

"नील, काय झाले. काय सुरू आहे मनात."

"सांगशील का?"

तो काही क्षण शांत राहिला. मग तिला खांद्याला धरून तिच्या शेजारी सोफ्यावर जाऊन बसला.

"आई..."

"कधी असं होते का..."

"की समोर सत्य दिसत आहे..."

"पण तरी ते खोटं वाटतं?"

आई काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली.

मग शांतपणे म्हणाली,

"हो."

"आणि कधी कधी खोटं इतक्या विश्वासाने समोर येतं..."

"की आपण त्यालाच सत्य मानतो."

"म्हणून निर्णय घाईत घेऊ नकोस."

"सत्याला समोर यायला वेळ लागतो."

आईचं हे वाक्य नीलच्या मनात खोलवर उतरलं.


---

रात्री उशिरा तो पुन्हा त्या फोटोसमोर बसला.

मोबाईलमध्ये झूम करून प्रत्येक चेहरा पाहू लागला.

अचानक...


पुढे........


त्याच्या नजरेस एक गोष्ट आली. फोटोच्या अगदी मागच्या बाजूला...

झाडाच्या सावलीत...

कोणीतरी उभं होतं. जो अस्पष्ट दिसत होता.

त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता.

पण...

त्या व्यक्तीचा पोशाख...

आणि उभं राहण्याची पद्धत...

त्याला कुठेतरी पाहिल्यासारखी वाटली.

तो फोटो आणखी मोठा करून पाहू लागला.

प्रतिमा पिक्सलेट झाली.

तरीही...

एक गोष्ट स्पष्ट दिसत होती.

त्या व्यक्तीच्या हातात...

एक गोल लॉकेट लटकत होतं.

आणि त्या लॉकेटवर काही तरी कोरलेलं होतं...

कदाचित एक डोळा.

त्याच्या मध्यभागी...

एक छोटंसं हृदय.

नीलच्या हातातून मोबाईल निसटता निसटता राहिला.

त्याच्या अंगावर काटा उभा राहिला.

याचा अर्थ...

हे चिन्ह केवळ समीरच्या घरापुरतं मर्यादित नव्हतं.

यामागे...

काहीतरी खोल एक गूढ दडलं होतं.

आणि कदाचित...

नील नकळत त्या रहस्याचा अगदी मध्यभागी येऊन पोहोचला होता.

त्याला अजूनही कल्पना नव्हती...

की पुढचं पाऊल त्याला सत्याजवळ नेणार होतं...

की अशा अंधारात...

जिथून परत येणं कदाचित शक्यच नव्हत. नील त्या सगळ्या विचारात स्वतःला हरवत चालला होता. त्याला जीवन जगताना आनंद घेणे आवश्यक आहे. किंवा शांत झोप व
मिळणे ही कठीण झाले होते. कशातही त्याचे मन लागत नव्हतं.


त्या रात्री नीलला झोपच लागली नाही.


                     पुढे...


त्या रात्री नीलला डोळ्याला डोळा लागला नव्हता.

खिडकीतून येणारा पावसाचा मंद आवाज, घड्याळाची टिक-टिक आणि मनात घोंगावणारे वेगवेगळे प्रश्न...

सगळंच त्याला बेचैन करत होतं. कधी  न कळत पहाटेच्या सुमारास त्याने डोळे मिटले खरे...

पण झोप मात्र त्याच्या  डोळ्यापर्यंत पोहोचली नाही. सारखे त्याच्या नजरेपुढे वेगवेगळ्या घटना घडत असल्याचे त्याला जाणवत होते. पण ते स्वप्न की अस्तित्वाची जाणीव करून देणारे काही दृश्य होते याची त्यालाही कल्पना नव्हती.

...

त्याच वेळी...

शहराच्या दुसऱ्या बाजूला...

म्हणजे समीरच्या फ्लॅटमध्ये...

सगळीकडे भयाण शांतता पसरली होती. ज्यात आज भीती वाटण्यासारखे काहीतरी होते. ज्याची कल्पना कोणालाही नव्हती.

भिंतीवरचं घड्याळात रात्रीचे अडीच वाजल्याचं दिसत होतं.

समीर गाढ झोपला होता. ज्याला आता कसलीही भीती किंवा काळजी नव्हती.

पण अचानक  ....

  बाजूच्या बेडरूममधून अगदी मंद असा खरवडण्याचा आवाज येऊ लागला.

खर्र... खर्र... खर्र...

सुरुवातीला तो आवाज अगदी हलका होता.

मग हळूहळू वाढत गेला.

खिडकीच्या काचेवर जणू कोणीतरी नखांनी रेघोट्या मारत होतं.

कल्याणी झोपेतच अस्वस्थ झाली. कदाचित तो आवाज तिच्यापर्यंत पोहोचला असावा.

तिने कुशी बदलली.

तेवढ्यात...

खिडकी अचानक स्वतःहून उघडली. थंडगार वाऱ्याचा झोत खोलीत शिरला.

पडदे जोरात फडफडू लागले. ते वाऱ्यावर जणू ताल धरत होते.

अंधार अधिकच गडद झाला.

...

खिडकीबाहेर...

कोणीतरी उभं असल्याचं दिसत होतं.

मानवी आकृती...

पण जणू ती पूर्ण काळी सावली असलेली.

तिचा चेहराही दिसत नव्हता.

फक्त...

दोन फिकट पांढरे डोळे. जनु काही बॅटरी असावी.

ते सरळ कल्याणीकडे पाहत होते.

क्षणभर सगळं स्थिर व्यवस्थित वाटत होते.

मग ती सावली धुराच्या स्वरूपात...

खिडकीतून आत शिरली.

जणू काही धुक्याचा लोटच उसळला असावा.

तिच्या येण्याचा किंचितही आवाज नव्हता.

श्वास नव्हता.

फक्त...

थंडावा.

अस्वाभाविक...

अंगावर काटा आणणारा.

ती सावली हळूहळू कल्याणीच्या पलंगाजवळ आली.

कल्याणी झोपेतच काहीतरी पुटपुटत होती.

"नाही......"

"नको..."

"कोण आहेस तू...?"

"जा इथून...."

आणि अचानक...

तिचे डोळे उघडले.

पण ते तिचे डोळे वाटत नव्हते.

तिची नजर सरळ त्या सावलीवर खिळली.

सावलीने हळूहळू कल्याणीच्या शरीरात प्रवेश केला.

त्याने कल्याणीच्या शरीरात स्पर्श करताच...

तिचं संपूर्ण शरीर जोरात थरथरू लागलं.

तिचा श्वास वाढला.

हातपाय अकडले.

जणू ती कोणाशी झुंज देत होती.

"नको..."

"माझ्या जवळ येऊ नकोस..."

ती ओरडण्याचा प्रयत्न करत होती.

पण आवाज बाहेर पडत नव्हता.

सावली तिच्या आणखी जवळ आली.

क्षणभरात...

ती धुक्यासारखी विरघळली...

आणि...

सरळ कल्याणीच्या शरीरात शिरली. कल्याणीचा संपूर्ण देह ताठ झाला. डोळे पूर्ण उघडे राहिले. तोंडातून एक विचित्र घरघर ऐकू आली.

मग...

थोडावेळ्यात सगळं शांत झालं.

पूर्ण शांत.

काही सेकंदांनी...

ती हळूहळू पलंगावर बसली. तिने मान खाली घातली.

तिचे केस पूर्ण चेहऱ्यावर विखुरलेले होते. तिचे ओठ काळे पडले आणि त्यावर भेगा पडल्यासारखे वाटत होते.


तिच्या ओठांवर...

एक विचित्र, अस्वाभाविक हास्य उमटलं. यासगळ्यापासून  समीर मात्र अनभिज्ञ होता.


---

सकाळचा सूर्य हा आकाशाला लालीमा देत उगवला. मात्र समीर आणि  कल्याणीच्या जीवनाला परत एकदा ग्रहण लागले होते.


म्हणजे  त्या घरात उजेड असूनही अंधार असल्यासारखं वाटत होतं.

समीर उठला.

नेहमीप्रमाणे त्याने कल्याणीला आवाज दिला.

"कल्याणी..."

"कल्याणी उजाडलं ग उठायचे नाही का आज?"

तरीही त्याला काही उत्तर नाही मिळाले.

"कॉफी करू का तुझ्यासाठी?"

तरीही तिचे काही उत्तर आले नाही.

त्याला वाटलं, ती अजून झोपली असावी.

तो स्वतःची तयारी करून हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तयार झाला.

तेवढ्यात हॉस्पिटलमधून एक अर्जंट फोन आला.

एका गंभीर रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार साठी आणल्या गेला. त्याला डॉक्टरची  गरज होती. दुसरा कोणीही डॉक्टर हॉस्पीटल मध्ये उपस्थित नव्हता. जवळपास फक्त समीर असल्याकारणाने त्याला बोलावण्यात आले.

समीरने घाईघाईने कपडे बदलले.

"कल्याणी... मी हॉस्पिटलला जातो."

यावेळी ही त्याला उत्तर मिळाले नाही.

"बहुतेक झोपली आहे..."

असं स्वतःशी म्हणत तो बाहेर पडला.

त्याला कल्पनाही नव्हती...

की ज्या व्यक्तीला तो झोपलेली समजत होता...

ती आता पूर्वीसारखी उरलीच नव्हती.


---

दुसरीकडे...

दुपारच्या सुमारास नील हॉस्पिटलमध्ये होता. त्याचं मन अजूनही कामात लागत नव्हतं.

तेवढ्यात त्याचा फोन वाजला.

स्क्रीनवर नाव झळकलं.

समीर.

"हॅलो?"

"नील, वेळ आहे का?"

"हो."

"आज संध्याकाळी घरी ये ना मला तुझ्यासोबत बोलायचे आहे."

"कल्याणी सकाळपासून काहीशी विचित्र वाटली होती."

"तिला बरं वाटत नाही बहुतेक."

नील लगेच तयार झाला.

"मी येतो."


---

संध्याकाळी...

दोघे सोबत समीरच्या फ्लॅटमध्ये पोहोचले.

घराचं दार उघडंच होतं.

"कल्याणी..."

"कल्याणी....."

समीरने हाक मारली.

यावेळी मात्र त्याला फारच आश्चर्य वाटले. सकाळी ती झोपलेली असेल किंवा तिची तब्बेत बरी नसेल, पण आता यावेळी ती मला आवाज तर देऊ शकते ना. पण यावेळी ही त्याला उत्तर कानी पडले नाही.

घरात एक विचित्र शांतता होती. जणू प्रत्येक भिंत काहीतरी लपवत होती. नीलची नजर सहज घरभर फिरली.

घरात काहीच विस्कटलेलं नव्हतं. पण तरीही वातावरणात एक अनामिक दडपण होतं. आजूबाजूला निरीक्षण करत ते
दोघेही हळूहळू बेडरूमकडे गेले.

दार अर्धवट उघडं होतं.

समीरने हलकासा धक्का दिला.

दार चर्रकन उघडलं.

आत...

कल्याणी खुर्चीवर बसली होती.

मान पूर्ण खाली झुकलेली.

केस चेहऱ्यावर पसरलेले.

हात मांडीवर स्थिर.

ती पूर्णपणे निश्चल होती.

"कल्याणी..."

समीरने हळू आवाजात हाक मारली.

कोणताही प्रतिसाद नाही.

तो तिच्याजवळ गेला.

"काय झालं?"

तरीही ती काही बोलले नाही किंवा कोणतीही हालचाल तिने केली नाही.

"कल्याणी..."

तरीही काही तिने प्रतिसाद दिला नाही.

नीलने समीरकडे पाहिलं.

"बहुतेक तिची तब्येत बिघडली आहे."

तो डॉक्टर म्हणून पुढे झाला.

"मी पाहतो."

नील हळूहळू तिच्याजवळ गेला. आणि.........


क्रमशः...
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →