Login

साया - 24

नील समोर दोन नावाने ओळख देणारी ती तरुणी कोण?

"हो. नक्कीच बंद करेल. पण आता यामध्ये मला काही प्रश्न पडले आहेत त्याचे उत्तर मला मिळवायचे आहे. त्याशिवाय तरी मी यातून बाहेर पडणार नाही." नील ने स्पष्ट शब्दात सांगितले.

"मग? त्यात माझा काय संबंध? तू माझ्या मागे का पडला आहेस?"

"तुमची ओळख  असतांनाही तु माझ्या सोबत खोट बोलण्याचा प्रयत्न का केलास?"

समीर उठून खिडकीजवळ गेला.

बाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत तो म्हणाला, "तुझा काही गैरसमज झाला आहे. ती मुलगी माझी पेशंट आहे. आणि तिचे नाव दर्शनी नाही तर भावना प्रधान आहे. तिचे वडील माझे मित्र आहेत. त्यातूनच तिचे उपचार मी केला. त्यावेळेस आमची ओळख झाली."

"आणि तू मला दर्शनी म्हणाला तू जर  भावना म्हटले असते तर मी सांगितले असते. आणि हो म्हटले असते."

समीरने एका दमात उत्तर दिलं नाही. पण त्याचे उत्तर ऐकून मात्र नीलच्या पायाखालची जणू जमीन सरकली.

पुढे......

समीरचं उत्तर ऐकल्यानंतर काही क्षण नील जागेवरच उभा राहिला. त्याला समीरच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे कठीण झाले होते. पण तो पुराव्याशिवाय समीर चे म्हणणे नाकारू शकत नव्हता.

त्या खोलीत शांतता पसरली होती. बाहेर पावसाच्या सरी खिडकीवर दत्तक देऊन जात होत्या. पण यासगळ्यामुळे नीलच्या मनात मात्र विचारांचं वादळ सुरू झालं होतं.खरे काय आणि खोटे काय हे समजणे त्याच्यासाठी अवघड होऊन बसले होते.

"भावना प्रधान..."

तो मनातल्या मनात पुटपुटला.

कारण त्याच्या माहितीनुसार ती मुलगी स्वतःला "दर्शनी" म्हणाली होती.

तिने स्वतः तिचं नाव दर्शनी सांगितलं होतं.

तिने स्वतः सांगितलं होतं की ती अनाथाश्रमात वाढली होती.

तिचं कोणीही नाही.

मग समीर जे सांगत होता ते काय होतं?

खोटं?

की...

सत्य?

कदाचित त्याला भेटलेली मुलगी खोटं बोलत होती?

"तू ठीक आहेस ना?" समीरचा आवाज ऐकून नील भानावर आला.

"हो."नील अडखळत म्हणाला, "पण मला तिच्याशी बोलायचं आहे."

समीरने त्याच्याकडे पाहिलं. "कशासाठी?"

"कारण आता या सगळ्यात खूप विरोधाभास आहेत. मी ऐकलेले आणि अनुभवलेले आणि तू सांगितलेले त्यांची उत्तरं मला मिळवायची आहेत."

समीर काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला,

"तिचं ऑफिस शहराच्या मध्यभागी आहे. ती एका स्वयंसेवी संस्थेत काम करते."

"पण नील..."

तो थोडा थांबला.

"कदाचित तू जास्त विचार करतो आहेस."

नील हलकंसं हसला.

"कदाचित हो, पण कदाचित नाही ही."

......

दुसऱ्या दिवशी सकाळी नील त्या पत्त्यावर पोहोचला. इमारत ही फार मोठी नव्हती. इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ संस्थेचा फलक होता.

आत येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची वर्दळ सुरू होती.

रिसेप्शनवर बसलेल्या महिलेने त्याच्याकडे पाहिलं.

"Yes sir?"

"मला भावना प्रधान यांना भेटायचं आहे."

महिलेने संगणकावर काही तपासलं.

"त्यांची अपॉइंटमेंट आहे का?"

"नाही."

"मी त्यांचा परिचित आहे."

काही क्षणांनी तिने फोन केला.

मग म्हणाली,

"तुम्ही आत जाऊ शकता."

......

नील कॉरिडॉरमधून चालत तिच्या केबिनसमोर आला.

दारावर नेमप्लेट होती.

'भावना प्रधान – कार्यक्रम समन्वयक'

त्याने हलकेच दार ठोठावलं.

"मे आय कम इन?"

"यस."

आतून आवाज आला.

नीलने दार उघडलं.

आणि काही क्षण तो तिथेच जमिनीवर खिळला. त्याच्यासमोर तीच तरुणी बसलेली होती. जी त्याला दर्शनी म्हणून भेटली होती.

ती तीच होती.

तीच चेहऱ्याची ठेवण.

तीच नजर.

तीच व्यक्ती.

फक्त आज तिच्या चेहऱ्यावर कालची गंभीरता नव्हती.

ती संगणकावर काम करण्यात व्यस्त होती.

तिने वर पाहिलं.

"हो?"

काही क्षण दोघे एकमेकांकडे पाहत राहिले.

पण तिच्या चेहऱ्यावर ओळखीचा कोणताही भाव नव्हता.

"बसा ना." ती सहजपणे म्हणाली.

नील समोरच्या खुर्चीवर बसला. "माझी काही मदत हवी होती का?"

नीलच्या कपाळावर आठ्या पडल्या. "तुम्ही मला ओळखलं नाही?"

ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग हलकंसं हसली.

"मला वाटतं आपण पहिल्यांदाच भेटतो आहोत."

आता मात्र नील गोंधळला. "काल..."

तो बोलता बोलता थांबला. "काल आपण अनाथाश्रमाबाहेर भेटलो होतो."

"आणि त्याआधी समीरच्या कार्यक्रमात."

तिच्या चेहऱ्यावर क्षणभर काहीतरी बदललं.

पण पुढच्याच क्षणी ती पुन्हा शांत झाली.

"मला वाटतं तुमचा काही गैरसमज झाला आहे."

"मी काल दिवसभर इथेच होते."

"आणि कोण समीर? कोणत्याही समीरच्या कार्यक्रमाला मी गेले नव्हते."

नील तिच्याकडे अविश्वासाने पाहत राहिला.

"पण..."

"तुम्ही स्वतः तुमचं नाव काल मला दर्शनी सांगितलं होतं."

हे ऐकताच ती काही क्षण पूर्ण शांत झाली. तिच्या हात जागेवरच थबकला.

तिची नजर काही क्षण टेबलावर स्थिर राहिली.

मग ती हळूहळू म्हणाली,

"दर्शनी?"

"हो."

ती काही क्षण विचार करत राहिली. मग हलकंसं हसली.

"नाही डॉक्टर."

"माझं नाव भावना प्रधान आहे."

"आणि माझ्या माहितीनुसार मी कोणत्याही दर्शनीला ओळखत नाही."

खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरली ज्यामध्ये अस्वस्थता होती.

नीलच्या मनात प्रश्नांचं वादळ सुरू झालं होतेच पण आता त्या वादळाने कल्लोळ करण्यास सुरुवात केली होती.

कारण तिचा आवाज...

तिची नजर...

तिच्या बोलण्याची पद्धत...

सगळं काही त्याला त्या मुलीचीच आठवण करून देत होतं.

पण ती इतक्या आत्मविश्वासाने बोलत होती की तिच्यावर संशय घेणं कठीण होतं.

"ठीक आहे."

नील उठत म्हणाला.

"कदाचित माझाच गैरसमज झाला असेल."

ती फक्त हसली.

"काही हरकत नाही."

नील दारापर्यंत गेला.

पण अचानक तो थांबला. "एक शेवटचा प्रश्न विचारू का?"

"विचारा."

"तुम्ही कधी अनाथाश्रमात जाता का?"

या वेळी मात्र तिच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणभर गायब झालं.

"हो." ती शांतपणे म्हणाली.

"आमच्या संस्थेचं तिथे काम चालतं."

"म्हणून कधी कधी जावं लागतं."

नीलने मान हलवली. आणि तो त्या ऑफिसमधून बाहेर पडला.

......

कॉरिडॉरमध्ये येताच त्याने एक खोल श्वास घेतला. त्याला काहीच समजत नव्हतं. तो द्विधा परिस्थित सापडला होता. पण यातून मार्ग काढणे त्याला महत्त्वाचे होते. करण तो ज्या कामासाठी त्याठिकाणी आला होता. त्याची महत्त्वाची पायरी होती ती.

जर ती भावना होती...

तर दर्शनी कोण होती?

आणि जर तीच दर्शनी होती...

तर ती खोटं का बोलत होती?

तो याच विचारातच इमारतीबाहेर आला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. तो फोनवर बोलत पार्किंगकडे जाऊ लागला.

आणि त्याच वेळी...

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून कोणीतरी त्याच्याकडे पाहत होतं.

नीलची नजर सहज वर गेली.

आणि तो क्षणभर थांबला.

खिडकीजवळ ती उभी होती.

भावना.

किंवा...

दर्शनी.

ती त्याच्याकडे एकटक पाहत होती.

पुढच्याच क्षणी...

तिने हळूहळू हात वर केला.

आणि काचेवर बोटाने एक चिन्ह काढलं.

एक डोळा.

त्याच्या मध्यभागी एक छोटंसं हृदय. ते पाहून नीलच्या मनात भीतीची लहर निर्माण झाली. त्याच्या छातीत जोरात धडधड होऊ लागले.

कारण हेच चिन्ह त्याने समीरच्या घराच्या किचनमध्ये पाहिलं होतं. त्याला पाहूनच समीर घाबरला होता.

तो घाईघाईने पुन्हा इमारतीत शिरला. यावेळी त्याने रिसेप्शनवर बसलेल्या महिलेने त्याच्याकडे पाहिलं त्याला आवाज दिला पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले. किंवा तो एवढ्या घाईत गेल की तिचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहचलाच नाही. लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर पोहोचला.
आणि तिच्या केबिनकडे धावत गेला. त्याने केबिन चा दरवाजा उघडला

पण...

केबिन रिकामी होती.

खुर्ची रिकामी होती.

खिडकी बंद होती.

आणि काचेवर कोणतंच चिन्ह नव्हतं.

जणू काही काहीच घडलं नव्हतं.

फक्त टेबलावर ठेवलेल्या एका कागदावर एक सही केलेली होती. त्याने तो हातात घेऊन पहिला. त्यावरून त्याला काही तरी समजले. आणि तो त्याचे निरीक्षण करत होता.

नीलच्या हातातून तो कागद जवळजवळ निसटला.

कारण त्या ठिकाणी त्याला एक फोटो दिसला. आणि जवळच काही औषध ठेवलेले होते. जे कदाचित त्याच तरुणीचे होते.

दर्शनी की भावना.....


क्रमशः...
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →