नीलने अनाथाश्रमाकडे पाहिलं. "तुम्ही इथे नेहमी येता का?"
तिच्या चेहऱ्यावर लगेच एक वेगळाच भाव उमटला.
"हो."
"मुलांना भेटायला?" नील.
"हो." तिने थोडक्यात सांगितले.
"तुमच्या नात्यातील कोणी इथे आहे का?"
ती काही क्षण शांत झाली. मग हलक्या आवाजात म्हणाली,
"नाही. माझं इथे कोणीच नाही."
नील काही न बोलता तिच्याकडे पाहत राहिला.
ती पुढे म्हणाली, "मी स्वतः एका अनाथाश्रमात वाढले. माझे आई-वडील कोण होते हेही मला माहित नाही. माझे या जगात कोणीही नातेवाईकही नाहीत. म्हणून कदाचित मला या मुलांची जास्त ओढ वाटते. त्याचे दुःख मी समजू शकते."
"कारण त्यांच्या डोळ्यांमध्ये मला माझं बालपण दिसतं."
नील काही बोलला नाही.
ती पुढे म्हणाली,
"ज्यांचं कोणी नसतं ना डॉक्टर..."
"त्यांना कोणीतरी आपलं म्हणणारी व्यक्ती किती महत्त्वाची असते हे फक्त त्यांनाच समजतं."
काही क्षण शांतता पसरली. तिच्या डोळ्यात नकळत तरंग उमटत होते.
"म्हणूनच मला त्यांचा आधार व्हायचं आहे."
नीलने तिच्याकडे पाहिलं.
तिच्या डोळ्यांमध्ये खोटेपणा दिसत नव्हता. यावेळी ती अगदी खर बोलत होती.
पण तरीही....
पुढे......
कुठेतरी काहीतरी अपूर्ण नक्की होतं. ती अजून काहीतरी लपवत असल्याचे नीलला सारखे वाटत होते.
तो अजूनही तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकत नव्हता.
कारण त्या झुंबराच्या घटनेच्या वेळी तिची उपस्थिती...
तिची नजर...
आणि त्यानंतरचं तिचं वागणं...
हे सगळं फक्त योगायोग असू शकत नव्हतं.
"बरं, मी निघते." दर्शनी म्हणाली.
"पुन्हा भेटू." तिने पुढे पाऊल टाकताच नील बोलला.
ती त्याचे शब्द कानावर पडताच लगेच वळली.
काही पावलं पुढे गेल्यानंतर अचानक थांबली.
मागे न वळताच ती म्हणाली,
"डॉ. नील..."
"यावेळी तुम्ही माझा जीव वाचविला म्हणून मी तुमची रिस्पेक्ट करते. पुढे कसलीही अपेक्षा करू नका."
"कारण काही काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात."
हे बोलून ती निघून गेली. नील तिच्याकडे पाहत राहिला. ती गर्दीत नाहीशी झाली.
पण तिचे शब्द मात्र त्याच्या मनात घुमत राहिले.
त्या रात्री घरी आल्यानंतरही त्याच्या मनातून ती भेट जात नव्हती.
तो पुन्हा पुन्हा त्याच विचारात अडकत होता.
ती खरंच एक साधी मुलगी होती? की ती काहीतरी लपवत होती?
त्या रात्री घरी परतल्यानंतरही नीलच्या मनातून दर्शनीचा चेहरा काही केल्या जात नव्हता.
खिडकीजवळ उभा राहून तो बराच वेळ बाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत होता. शहराच्या रस्त्यांवर पावसाचे थेंब चमकत होते, पण त्याच्या मनात मात्र प्रश्नांचे वादळ उसळले होते.
"मी स्वतः एका अनाथाश्रमात वाढले..."
"पुढे कसलीही अपेक्षा करू नका..."
"काही काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात..."
तिचे प्रत्येक शब्द त्याच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते.
सगळ्यात जास्त त्रास देत होती ती झुंबराची घटना.
त्या क्षणी तिची उपस्थिती...
झुंबर पडल्या नंतरची तिची विचित्र नजर...
आणि नंतर तिचं अचानक तिथून निघून जाणं...
हे सगळं फक्त योगायोग असू शकत नव्हतं.
"पण जर ती खरंच निर्दोष असेल तर?"
हा विचारही त्याच्या मनात आला.
त्याने डोळे मिटले.
पण पुढच्याच क्षणी त्याच्या डोळ्यासमोर समोर आलं ते तिचं शांत पण कुठेतरी दुःख लपवणारं हास्य.
काही वेळातच त्या विचारांच्या गर्दीत त्याला नकळत झोप लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा अलार्मच्या आवाजाने त्याला जाग आली.
घड्याळात साडेसात वाजले होते. ते पाहून त्याच्या नकळत शब्द निघाला.
"अरे बापरे!"
तो घाईघाईने उठला. आज हॉस्पिटलमध्ये महत्त्वाच्या शस्त्रक्रिया होत्या.
काही मिनिटांतच तो फ्रेश होऊन तयार झाला आणि नाश्ता अर्धवट सोडून घराबाहेर पडला.
रस्त्यावर नेहमीप्रमाणे सकाळची गर्दी सुरू होती. ऑफिसला जाणारी लोकं, शाळेच्या बस, रिक्षा हॉर्नचा आवाज...
तो कार चालवत हॉस्पिटलकडे निघाला.
सिग्नलजवळ गाडी थांबताच त्याची नजर नकळत फुटपाथकडे गेली. आणि पुढच्याच क्षणी त्याला असे काही दिसले की ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसून आले.
समोर दर्शनी उभी होती. ती कोणाशीतरी बोलत होती. त्याला ती कोणासोबत बोलत आहे हे जाणून घ्यायचे म्हणून तो जरा लक्षपूर्वक पाहू लागला.
नीलने नीट पाहिलं. आणि त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो समीर होता. जो दर्शनी सोबत बोलत होता.
दोघं अगदी सहजपणे बोलत होते.
फक्त बोलत नव्हते...
तर एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखत असल्यासारखे बोलत होते.
समीर काहीतरी बोलला.
त्यावर दर्शनी हलकीशी हसली.
पुढच्या क्षणी समीरने तिच्या हातात एक छोटंसं पाकीट दिलं.
दर्शनीने आजूबाजूला एक नजर फिरवली आणि ते पटकन आपल्या पर्समध्ये ठेवलं.
नीलच्या छातीत एक विचित्र धडधड सुरू झाली.
"हे दोघं एकमेकांना ओळखतात?" हा विचार त्याच्या मनात खूप उलट सुलट विचारांना जन्म देत होता.
तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला.
मागून हॉर्न वाजू लागले. तसा तो भानावर आला.
तो पुढे निघाला पण त्याच्या मनातला संशय आता आणखी वाढला होता.
जवळपास अर्ध्या तासाने तो सरळ समीरच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला.
रिसेप्शनवरच्या नर्सने त्याला पाहताच हसून विचारलं,
"सर, डॉक्टर समीर त्यांच्या केबिनमध्ये आहेत."
"धन्यवाद."
नील थेट त्याच्या केबिनकडे गेला.
दार उघडताच समीरने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं.
"अरे नील? तू इथे?"
"हो."
"सगळं ठीक आहे ना?"
नील खुर्चीवर बसला.
"तसं काही नाही. फक्त तुला भेटायचं होतं."
समीरच्या चेहऱ्यावर मात्र काहीतरी वेगळेच भाव होते.
तो थोडासा अस्वस्थ दिसत होता.
"आज अचानक इकडे कसे काय?"
"का? मी तुला भेटायला येऊ शकत नाही का?"नील ने समीर ला प्रश्न विचारला.
समीर हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला,
"तसं नाही रे. पण तू इतक्या सकाळी इथे आलास आणि अचानक काही न सांगता आलास म्हणून विचारलं."
नील काही क्षण शांत राहिला. त्याच्या चेहऱ्याचे निरीक्षण करू लागला. त्याने समीरला दर्शनीबदल विचारले.
"तू दर्शनी नावाच्या मुलीला ओळखतोस का?" मग त्याने मोबाईल बाहेर काढला. स्क्रीनवर एक फोटो होता तो त्याने समीरला दाखवला.
तो फोटो काही दिवसांपूर्वी काढलेला होता. फोटोत दर्शनी उभी होती.
"ही मुलगी ओळखतोस का?"
समीरने स्क्रीनकडे पाहिलं.
क्षणभर त्याचा चेहरा पूर्णपणे निर्विकार झाला.
"नाही."
त्याने ताबडतोब उत्तर दिलं.
"नक्की?"
"हो."
नील त्याच्याकडे पाहत राहिला. त्याचा
काही सेकंदांनी त्याने मोबाईल समीरच्या अगदी जवळ धरला.
यावेळी समीरची नजर फोटोकडे स्थिरावली.
आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. त्याला काय बोलावे हे आता मात्र सुचत नव्हतं.
"ही..." तो अचानक थांबला.
"ओळखतोस ना तिला?"नील ने परत विचारले.
समीरने काही क्षण डोळे मिटले. मग शांतपणे म्हणाला,
"हो."
"कोण आहे ती?"
समीर खुर्चीत मागे रेलला. "ती माझी एक जुनी पेशंट आहे."
नीलच्या भुवया उंचावल्या.
"पेशंट?"
"हो."
"कशाची ट्रीटमेंट चालू होती तिची?"
समीर काही क्षण शांत राहिला.
"मी ते सांगू शकत नाही."
"का?"
"डॉक्टर-पेशंट गोपनीयता. तूही डॉक्टर आहेस हे सगळ तुला माहिती आहे."
"समीर, मी सुद्धा डॉक्टर आहे."
"मला माहित आहे."
"मग?"
समीरने त्याच्याकडे सरळ पाहिलं.
"तरीही मी सांगू शकत नाही."
नील आता खात्रीने म्हणू शकत होता की समीर काहीतरी लपवत होता.
"आज सकाळी मी तुम्हा दोघांना एकत्र पाहिलं."
समीरच्या चेहऱ्यावरचा भाव एका क्षणासाठी बदलला.
"तर आम्हाला पाहिलंस त्यात काय मग? जर माझ्यामुळे तिचा जीव वाचला असेल तर ती कुठेही मला भेटली तर एक व्यक्ती म्हणून आदराने माझ्या बोलण्यात वावगे काय आहे? आणि एक मिनिट तू माझाच पाठलाग करत आहेस की काय? हे बघ कल्याणी ला आता काही त्रास नाही. त्यामुळे आम्हाला आता याबद्दल काही जाणून घ्यायचे नाही. So तू ही आता हे सगळं बंद करावे असे मला वाटते."
काय म्हणाला तू? नीलचा पारा हे ऐकून चांगलाच चढला.....
क्रमशः.....
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
