Login

साया - 22

यावेळी नील ने त्या अनोळखी मुलीचा जीव वाचवून तिच्यासोबत बोलण्याचे धाडस केले.
नील, अच्छा म्हणजे तुम्ही जे केलं ते तुम्हालाच कळत नाही आहे. तुम्ही झुंबर नजरेने कशे काय हलवले आणि खेचले, समोरच्या दिशेने कसे नजरेने लोटले. ही मॅजिक तुम्हाला कशी जमते मलाही शिकवा."


तिने आजूबाजूला एकदा नजर टाकली आणि परत नीलवर आपला निशाणा साधला, "तुम्ही मूर्ख आहात का? स्वतःला डॉक्टर म्हणून घेतात आणि नजरेने कोणी एवढे मोठे झुंबर हलवू शकते का? डोक्यावर पडले  का? स्वतःचा आधी इलाज करा. आणि मग स्वतः नावापुढे डॉक्टर ही उपाधी लावा. अशा फालतू गोष्टीसाठी माझ्याकडे वेळ नाही.

एवढे बोलून ती त्या ठिकाणाहून घाईघाईत निघून गेली.
नील ही तिच्या पाठीमागे निघाला. पण लगेचच मधात लागोपाठ एका मागे एक दोन तीन कार आल्या आणि ती तेवढ्यात कुठे नाहीशी झाली ती परत त्याच्या नजरेस पडली नाही. नील ने तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती त्याला कुठेही दिसली नाही. तो पुरता निराश झाला होता. आता कुठे शोधायचं या विचारात असतानाच त्याचा फोन परत वाजला आणि तो गाडीच्या दिशेने निघून गेला. तो गाडीत बसला आणि हॉस्पिटलमध्ये निघून गेला. पण त्याच्या डोक्यात तेच विचार फिरत होते. तीच तरुणी जी आपल्याला हॉलमध्ये दिसली होती. तिने सर्व काही घडून आणले असे तिच्या हावभावावरून वाटत होते. पण आता ते आपल्याला कधी पाहिले नाही असा आव आणत तिने उत्तर दिले. तिला परत शोधावेच लागेल. ती इथेच कुठेतरी राहत असेल. परत दुसऱ्या दिवशी या ठिकाणी याच वेळी येण्याचा त्याने निर्णय घेतला.

                   
पुढे.......


त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आल्यापासून नीलचं मन कुठेच लागत नव्हतं. त्याने काही रुग्णांची तपासणी केली खरी, पण त्याचं लक्ष वारंवार दुसरीकडेच जात होतं.  त्याच्या डोळ्यांसमोर सतत तीच दृश्यं येत होती.

झुंबर...

समीर...

आणि ती रहस्यमय तरुणी...

विशेषतः तिची ती नजर.

त्या नजरेमध्ये भीती नव्हती.

आश्चर्य नव्हतं.

तर एक विचित्र शांतता आणि काहीतरी विशेष त्या दिवशी त्या हॉलमध्ये तिच्या नजरेत त्याला जाणवले होते. जे ते तिला प्रत्यक्ष भेटून शोधण्याचा प्रयत्न करीत होता.

जणू ती आधीपासूनच काय होणार आहे हे तिला माहीत  होते. किंवा...

जे काही घडणार त्याची तिला खात्री होती. याच विचारांनी त्याचं डोकं जणू काही गोंधळून गेले होते.

शेवटी त्याने निर्णय घेतला.

"मला तिला पुन्हा भेटायलाच हवं. हो त्याशिवाय मला स्वस्थ बसता येणार नाही."


दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच वेळी तो पुन्हा त्या अनाथ आश्रमासमोर विरुद्ध बाजूला जाऊन उभा राहिला.

काल सारखे थेट गेटजवळ उभे राहणे आज धोक्याचे ठरेल हे त्याला जाणवले होते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या एका झाडामागे तो शांतपणे उभा राहिला.

त्याची नजर सतत प्रवेशद्वारावर होती. तो तिची वाट पाहत होता. ती येईल की नाही येईल हे त्याला माहीत नव्हते. पण तरीही त्याचं मन सांगत होते. तिथे ती तरुणी नेहमी येते म्हणजे आज ती येणारच. तिचं काहीतरी नातं त्या जागेशी  असल्यासारखं त्याला वाटत होतं.

पाच मिनिटं गेली.

दहा मिनिटं झाली.

पंधरा मिनिटं होत असताना

मग...

त्याला ती दिसली.

तीच तरुणी.

आज तिच्या चेहऱ्यावर कालसारखी कठोरता नव्हती. तिचा चेहरा एकदम शांत वाटत होता त्यावर कसलीही काळजी घेते त्याला जाणवली नाही.

ती रस्त्याच्या समोर असलेल्या एका छोट्याशा अनाथाश्रमाच्या गेटमधून आत जात होती.

नीलच्या कपाळावर आठ्या पडल्या. ती आत मध्ये काय करते हे पाहण्याची उत्सुकता त्याला होती म्हणून तो थोडा जवळ गेला. आतलं दृश्य पाहून तो काही क्षण स्तब्ध झाला.

कारण ती आजही त्या ठिकाणी काही विशेष न करता फक्त त्या निरागस मुलांमध्ये बसली होती. जणू त्यांचे जुने नाते असावे, एवढी ती आणि मूल त्या ठिकाणी आनंदी वाटायचे.

त्या लहान मुलांसाठी तिने  रंगीत फुगे आणले होते. काही मुलं तिच्या भोवती बसून हसत होती, गप्पा गोष्टी करत होती. तर काहींना तिने चॉकलेट दिले होते.

एक लहान मुलगा तिच्या मांडीवर तिला गोष्ट सांगण्याचा अट्टाहास करीत बसला होता. त्या मुलाला प्रेमाने कुरवाळत तिने त्याला गोष्ट सांगण्यास सुरुवात केली.

काही वेळाने ती त्या मुलांसोबत खेळू लागली.

कधी धावत होती, कधी हसत होती. कधी एखाद्या पडलेल्या मुलाला उचलून घेत होती.

काल दिसलेली ती गंभीर आणि कठोर मुलगी आणि आज दिसणारी ही आनंदी मुलगी...

दोघी एकच व्यक्ती आहेत यावर विश्वास ठेवणं कठीण होतं.

जवळपास तासभर ती त्या मुलांसोबत होती. नंतर तिने त्या मुलांचा निरोप घेतला आणि परतीच्या मार्गाने निघाली.

अनाथाश्रमातील कर्मचारी मुलांना आत घेऊन गेले. तशी ती तरुणी गेटमधून बाहेर आली.

तिने आजूबाजूला एक नजर टाकली. पण यावेळी नील तिला दिसला नाही. ती विचारातच रस्ता ओलांडण्यासाठी पुढे झाली. आणि त्याच क्षणी...

एक कार भरधाव वेगाने तिच्या दिशेने येताना नीलच्या नजरेस पडली. ती अजूनही विचारात होती. तिचं त्या भरधाव येणाऱ्या कारकडे लक्षच नव्हतं.

"ओ मॅडम जरा पुढे पहा!"

नील मोठ्याने ओरडला. पण उशीर झाला होता. कार तिच्या जवळ येत होती आणि अजूनही तिचे लक्ष त्याकडे नव्हते.

क्षणाचाही विलंब न करता नील धावत तिच्याकडे गेला आणि तिचा हात पकडून जोरात स्वतःकडे खेचलं. तशी ती भांबावून गेली. दोघेही रस्त्याच्या कडेला येऊन पडले. पुढच्याच क्षणी ती कार त्यांच्या अगदी समोरून वेगाने निघून गेली.
काही सेकंद दोघांच्याही तोंडून शब्द फुटले नाहीत. ते अजूनही त्या धक्क्यातून बाहेर पडले नव्हते. त्या तरुणीचा श्वास वाढला होता. तिचे शरीर भीतीने थरथरायला लागले होते. तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच नील ला भीती दिसत होती.

"तुम्ही ठीक आहात ना?" नीलने तिला आपुलकीने विचारलं.

ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिला बोलणेही सुचत नव्हते. काही वेळाने ती हळू आवाजात म्हणाली,

"हो..."

तिने स्वतःला थोड सावरले, काही क्षणांनी ती म्हणाली,

"धन्यवाद."

नील हलकंसं हसला.

"मला वाटलं तुम्ही पुन्हा मला मूर्ख डॉक्टर म्हणणार."

हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. "त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. म्हणून बोलले होते. पण आज नाही." ती म्हणाली.

"कारण आज तुम्ही माझा जीव वाचवला आहे."

दोघे काही क्षण शांत उभे राहिले. मग नील म्हणाला,

"Hi, माझं नाव नील." तो हात पुढे करत म्हणाला.

ती हसली. "माहितीय."

"माहितीय?" त्याला तिच्या या उत्तराने आश्चर्य वाटले.

"हो. तुम्ही त्या दिवशी स्टेजवर होतात."

नील हसला. "बरं मग तुमचं नाव?"

ती काही क्षण शांत राहिली. काही विचारात पडली. मग म्हणाली, "दर्शनी."

"छान नाव आहे." नील.

"धन्यवाद." ती.

नीलने अनाथाश्रमाकडे पाहिलं. "तुम्ही इथे नेहमी येता का?"

तिच्या चेहऱ्यावर लगेच एक वेगळाच भाव उमटला.

"हो."

"मुलांना भेटायला?" नील.

"हो." तिने थोडक्यात सांगितले.

"तुमच्या नात्यातील कोणी इथे आहे का?"

ती काही क्षण शांत झाली. मग हलक्या आवाजात म्हणाली,

"नाही. माझं इथे कोणीच नाही."

नील काही न बोलता तिच्याकडे पाहत राहिला.

ती पुढे म्हणाली, "मी स्वतः एका अनाथाश्रमात वाढले. माझे आई-वडील कोण होते हेही मला माहित नाही. माझे या जगात कोणीही नातेवाईकही नाहीत. म्हणून कदाचित मला या मुलांची जास्त ओढ वाटते. त्याचे दुःख मी समजू शकते."

"कारण त्यांच्या डोळ्यांमध्ये मला माझं बालपण दिसतं."

नील काही बोलला नाही.

ती पुढे म्हणाली,

"ज्यांचं कोणी नसतं ना डॉक्टर..."

"त्यांना कोणीतरी आपलं म्हणणारी व्यक्ती किती महत्त्वाची असते हे फक्त त्यांनाच समजतं."

काही क्षण शांतता पसरली. तिच्या डोळ्यात नकळत तरंग उमटत होते.

"म्हणूनच मला त्यांचा आधार व्हायचं आहे."

नीलने तिच्याकडे पाहिलं.

तिच्या डोळ्यांमध्ये खोटेपणा दिसत नव्हता. यावेळी ती अगदी खर बोलत होती.

पण तरीही....


क्रमशः
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →