"तुला माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीची भेट घालून द्यायची आहे."
गौरीने भुवया उंचावल्या.
"कोण?"
"आई."
हे ऐकताच गौरी काही क्षण शांत झाली. काही वेळाने ती म्हणाली, "आत्ता? आता नको, असे अचानक आणि मीही फक्त तुला भेटायला आलेली होते. त्यांना कसा मी सामोरे जाऊ."
"हो."
"नको, नाही."
"त्यात काय झालं?"
"पहिली भेट आहे."
"माझ्या आईला तू नक्की आवडशील."
गौरी त्याच्याकडे पाहून हसली "तुला इतका विश्वास आहे?"
"हो मला पूर्ण विश्वास आहे."
आता मात्र तिचा नाईलाज झाला. नील ऐकायलाच तयार नव्हता. तशी तिचीही इच्छा होती. पण नील ने आईचा विषय काढताच तिच्या मनात भीती निर्माण झाली. आणि छातीत धडधड व्हायला लागले. अचानक ती नर्व्हस झाली.
पुढे......
काही वेळानंतर गाडी नीलच्या घरासमोर येऊन थांबली.
गौरीने घराकडे पाहत होते. त्याच घर मोठं नव्हतं. पण खूप सुंदर वाटत होतं. दारासमोर फुलझाडं होती.
बाल्कनीमध्ये ठेवलेल्या कुंड्यांमध्ये रंगीबेरंगी फुलं उमलली होती.
"खूप छान आहे तुझं घर."
"घर आईमुळे सुंदर वाटतं." नील हसत म्हणाला.
दोघे आत आले.
हॉलमध्ये बसलेल्या नीलच्या आईने दाराचा आवाज ऐकून मागे वळून पाहिलं.
"आलास का नील?"
"हो आई."
मग तिने गौरीकडे पाहिलं. काही क्षण ती गौरीकडे पाहत राहिली. आई च्या चेहऱ्यावर त्याला आश्चर्य आणि प्रश्न उभा दिसला. ते पाहून लगेच नील हसत म्हणाला,
"आई, ही गौरी."
"आणि गौरी, ही माझी आई."
गौरीने आदराने नमस्कार केला.
"नमस्कार काकू."
आईने हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
"आयुष्यभर सुखी रहा बाळ."
गौरीच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं.
"अरे आधी सांगायचं तरी होतंस." आई हसत म्हणाली.
"आई तुला सरप्राईज द्यायचं होतं."
"आजकाल सगळेच सरप्राईज देत आहेत वाटतं."
नील आणि गौरी दोघेही एकमेकांकडे पाहून हसू लागले.
आईने लगेच स्वयंपाकघराचा रस्ता धरला.
"बसा तुम्ही दोघं, मी चहा घेऊन येते."
"आई, राहू दे ना."
"पहिल्यांदाच मुलगी घरी आली आहे आणि मी काहीच करणार नाही?" तिचे बोलणे ऐकून नील शांत बसला.
"या विषयावर आईशी वाद घालणं म्हणजे ऑपरेशन थिएटरपेक्षा कठीण काम आहे." नीलच्या तोंडून शब्द ऐकून
गौरी हसू लागली.
गौरी हसू लागली.
काही वेळातच चहा आणि गरम पोहे टेबलावर आले.
"घे बाळ."
"काकू, याची काय गरज होती?"
"पहिल्यांदा आली आहेस घरी. तसेच कसे जाऊ देऊ तुला."
गौरीच्या चेहऱ्यावर आपुलकीचे भाव उमटले.
हळूहळू गप्पा रंगू लागल्या.
आईने गौरीबद्दल विचारायला सुरुवात केली.
तिचं शिक्षण...
तिचं गाव...
तिचे छंद...
गौरीही मनमोकळेपणाने बोलत होती.
काही वेळातच दोघींमध्ये छान मैत्री निर्माण झाली.
नील मात्र शांत बसून त्या दोघींकडे पाहत होता.
त्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होते.
"नील लहानपणी खूप खोडकर होता." आई अचानक म्हणाली.
"आई!"
"खरं सांगते आहे."
गौरी उत्सुकतेने म्हणाली,
"खरंच?"
"अगं, एकदा तर सायकल शिकताना थेट शेजारच्या कुंपणात शिरला होता."
गौरी मोठ्याने हसू लागली.
"म्हणजे सायकल आणि झाडाची गोष्ट खरी होती तर!"
नीलने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं,"तू आणि आई आधीपासून ओळखता का?"
"नाही, पण आता ओळख होईल असं वाटतं."
आई आणि गौरी दोघीही हसू लागल्या.
थोड्या वेळानंतर गौरी बाल्कनीत आली.
रात्र झाली होती.
पावसामुळे वातावरणात एक गारवा पसरला होता.
नील तिच्या शेजारी येऊन उभा राहिला.
"काय विचार करते आहेस?"
"एक गोष्ट."
"काय?"
"तुझं घर खूप छान आहे."
"धन्यवाद."
"नाही, मी घराबद्दल नाही बोलत."
नीलने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं.
गौरी हसली.
"इथे खूप आपुलकी आहे."
नील काही क्षण शांत राहिला.
मग म्हणाला,
"बहुतेक त्यामुळेच इथे परत यावंसं वाटतं."
तेवढ्यात आतून आईचा आवाज आला.
"अरे, तुम्ही दोघे बाहेरच राहणार आहात का?"
दोघेही हसत आत आले.
रात्र बरीच झाली होती.
गौरीला परत जायची वेळ झाली होती.
दारापर्यंत सोडायला नील तिच्यासोबत आला.
गाडीत बसण्यापूर्वी गौरी थांबली.
"आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही."
"मीसुद्धा."
"आणि तुझी आई खूप छान आहे."
नील हसला.
"मी सांगितलं होतं ना?"
गौरीने हलकंसं मान डोलावली. आणि नील च्या आईचा निरोप घेऊन गौरी निघाली तिला सोडून देण्यासाठी सोबत निल ही गेला.
काही वेळातच नील परत आला. त्यावेळेस आई हॉलमध्ये बसून त्याची वाट पाहत बसलली होती. तो येताच आईने नीलला पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं.
आई त्याच्या समोर येऊन उभी राहिली.
"छान मुलगी आहे."
नील हसला.
"हो."
आईने त्याच्याकडे पाहिलं.
"आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे..."
"काय?"
"तिच्यासोबत असताना तू खूप आनंदी दिसतोस."
नील काही बोलला नाही.
आईने मुलाच्या मनातील त्या मुलीबद्दल असलेले प्रेम ओळखले होते.
कधी कधी आयुष्यात काही माणसं येतात...
कधी कधी आयुष्यात काही माणसं येतात...
आणि नकळत घराला आणखी घरपण देऊन जातात.
कदाचित...
गौरी तशीच एक व्यक्ती होती.
आणि अनेक दिवसांनी...
नीलच्या आयुष्यातील अंधाऱ्या वाटांमध्येही आता कुठेतरी प्रकाश दिसू लागला होता. त्याच्या मनात तरी आता घरी बसून जास्त ओढ निर्माण झाली होती पण जोपर्यंत कल्याणी आणि समीरच्या जीवनातील समस्या तो सोडवत नाही तोपर्यंत स्वतःच्या आयुष्यात आनंदाचा विचार आहे तो करू शकणार नाही.
कित्येक दिवसांपासून त्याच्या आयुष्यात फक्त हॉस्पिटल, काम, जबाबदाऱ्या आणि समीरभोवती घडणाऱ्या रहस्यमय घटना होत्या. पण आजचा दिवस वेगळा होता.
आज अनेक दिवसांनी तो मनापासून हसला होता. आणि स्वतः साठी जगाला होता.
गौरीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण त्याच्या मनात पुन्हा पुन्हा उमटत होता.
तिचं हसणं...
तिची बोलण्याची पद्धत...
आईसोबत ती लगेच मिसळून गेली होती ते दृश्य...
आणि जाताना तिने दिलेलं ते छोटंसं स्मित...
सगळंच त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू आणत होतं.
घरी पोहोचल्यावर त्याने कपडे बदलले आणि बाल्कनीत जाऊन उभा राहिला. रात्रीचा थंडगार वारा वाहत होता. सर्वत्र शांत वातावरण होते. शहरातील लाईट ची रोषणाई दूरवरून चमकतांना दिसत होती.
"खूप दिवसांनी तू एवढा आनंदी दिसतो आहेस." आईचा आवाज ऐकून तो मागे वळला.
आई त्याच्याकडे पाहून हसत होती, "आईपासून काही लपून राहतं का? तू जरी मला काही सांगितलं नसेल तरी मला सगळ समजलं."
नील काहीही न बोलता फक्त हसला.
"ती मुलगी मला खूप चांगली वाटली." आईच परत म्हणाली.
"हो आई."त्याच्या ओठांवर आपोआप उत्तर आलं.
आईने त्याच्या खांद्यावर हात ठेवला ," कायम असच आनंदी राहा."
नीलने हलकंसं मान डोलावली. त्या रात्री तो खूप दिवसांनी शांत मनाने झोपायला गेला. बेडवर आडव पडताच त्याच्या मनात पुन्हा गौरीचे विचार यायला लागले.
तिचं हसणं...
तिचं बोलणं...
"हसणं विसरू नकोस."
तिचा तो आवाज अजूनही त्याच्या कानात घुमत होता. तिच्या विचारात मग्न असलेला नीलने हळूहळू डोळे मिटले. आणि काही वेळातच त्याला झोप लागली.
पण...
ही शांत झोप फार काळ टिकली नाही. लगेच त्याने झोपेतच मान हलवायला सुरुवात केली आणि डोळेही तो फिरवत होता.
सर्वत्र काळोख...
नील जोरजोराने धावू लागला. त्याचा श्वास फुलला होता. हृदय जोराने धडधडत होतं. त्याचे अंग घामाने भिजले, पण तो का धावत होता? आणि कोणापासून धावत होता?
त्याला काहीच समजत नव्हतं. आणि
त्याला काहीच समजत नव्हतं. आणि
अचानक...
त्याच्या मागून कोणाच्यातरी पावलांचा आवाज ऐकू आला.
टप...
टप...
टप...
नीलने मागे वळून पाहिलं.
आणि त्याचे पाय जागेवरच थबकले. डोळे विस्फारल्या गेले.
कारण...
त्याच्या मागे एक मुलगी धावत होती. तिचे केस वाऱ्याने उडत होते. चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. पण तिची नजर मात्र सरळ त्याच्यावर रोखलेली होती. नीलने तिला पाहिले आणि तो पुन्हा धावू लागला.
आता त्याचा वेग आधीपेक्षा वाढला होता. तो ज्या रस्त्यावर धावत होता तो पूर्ण खाली होता. त्याच्या चारही बाजूंनी कोणीही नजरेस पडत नाही.
चारही बाजूला फक्त अंधार पसरला होता.
मागून येणाऱ्या पावलांचा आवाज मात्र जवळ येत होता.
मागून येणाऱ्या पावलांचा आवाज मात्र जवळ येत होता.
अजून जवळ...
आणखी जवळ...
आणि अचानक...
