साठवणूक (भाग १)
“भांड्याची साबणं एवढी!” पंकज म्हणाला.
“हो लागतात म्हणून आणली.” कीर्ती म्हणाली .
“एवढी डझनभर!” पंकज साबणं मोजत होता.
“हो. अरे लागतातच भांड्याची साबणं आणि ऑफर होती म्हणून घेऊन ठेवली.” कीर्ती
“त्या भांड्यावालीला जरा बोलत जा की साबण जरा जपून वापरत जा आणि भांडी जरा स्वच्छ घास म्हणा कपाला वास येतो कधी कधी.” पंकज काही साबणं बाजूला काढत म्हणाला.
“कप वगैरे मीच दूध असते. भांड्यावाल्यांचे नखरे असतात मोठे! कप, ग्लास धूत नाहीत त्या.” कीर्ती म्हणाली.
“काढून टाक मग तिला कामावरून.” पंकज म्हणाला कीर्तीच्या कपाळावर आठ्या पसरल्या.
“हे काय, भांड्याच्या घासण्याही एवढ्या !” पंकज
“हो रे, पाकीट घेतलं की स्वस्त पडतं. एक एक घासणी घेतली की महाग पडते म्हणून मोठं पाकीट घेऊन ठेवते. काही काही गोष्टी गांधी रोडवर स्वस्त भेटतात. तिकडे जाणं झालं की घेऊन ठेवत असते.” कीर्ती
“आणि ही बकेट कशाची?” पंकज
“अरे वॉशिंग पावडरवर फ्री भेटलेली.” कीर्ती
“आणि कपड्याची साबणं एवढी कशाला पाहिजे? आपल्या घरी तर वॉशिंग मशीन आहे ना.” पंकज
“लागतात रे. फरशी पुसायचा कापड, ओट्यावरची, हाताखालची कापडं धुवायला कपड्याची साबणं लागतातच आणि मशीनमध्ये कपडे टाकायचे म्हटले तर तुझ्या शर्टचे कॉलर आणि कफ आधी साबणानं घासून टाकावे लागतात. साबणं लागतातच कपड्याची.” कीर्ती म्हणाली.
“पण एवढी! डझनभर!” पंकज परत कपड्याची साबणं मोजत होता.
“लागतात रे… साबणं काय वाया जात नाहीत.” किर्ती म्हणाली.
“हे काय दोन-दोन फ्लोअर क्लीनर!” पंकच
“दोन नाही. मोठ्या वर छोटं फ्री.” कीर्तीला आता पंकजचा राग येऊ लागला.
“ म्हणजे दोनच झाले ना. एक लहान एक मोठं . आणि हे काय कचऱ्याच्या पिशव्या किती गोळा केल्यात!” पंकज गार्बेज बॅगची पाकिटं मोजत होता
“लागतात रे। आता उन्हाळ्यात जास्त कचरा साठवता येत नाही लवकर फेकावा लागतो त्यामुळं तेवढ्या लागतात.” कीर्ती म्हणाली.
“इथं लोकं कॅरीबॅग वापरू नका म्हणून आंदोलन करत आहेत आणि तू मात्र कचऱ्यासाठी पण कॅरीबॅग विकत घेऊन येतेस.” पंकजनं बोलता-बोलता बाजूला काढलेल्या सामान काही कचऱ्याच्या पिशव्यांचे पाकीटही टाकले. फ्री मिळालेली बकेटही बाजूला काढली.
कीर्तीला मात्र पंकज राग येत होता. पंकजची आवरावर कमी आणि तिची झडती घेतल्यासारखंच तिला वाटत होतं.
