Login

सासूबाईंचा परीघ भाग-२ अंतिम

सासु सुनेचे नाते कधी खट्टे कधी मिठे
सासुबाईंचा परीघ
भाग -२अंतिम

शुभा सुखावली होती. आज जे घडतेय ते सुखावह होतं पण शितावरून भाताची परीक्षा करायची की...

इतक्या लवकर ठरवता येणार नव्हतं. कारण सहवासात चार सहा महिने राहिल्याशिवाय स्वभाव कळणार नव्हता. आजच काही ठरवणे घाईचे ठरले असते.

शुभाही सुसंस्कृत सुशिक्षित होती.

दिवस उगवत होता आनंद देत होता आणि हसत निरोप घेत होता. महिना उलटला होता लग्नाला.
शुभला माहेरची आठवण येत होती.
बहिणाबाई म्हणतात ना,

माझं सुख, माझं सुख
हंड्या झुंबरी टांगलं

ती सुंदर हंड्या झुंबरं तिला माहेरी टांगायची घाई झाली होती.

संसार म्हणजे स्त्रीसाठी एक जुगार असतो. सासर कसं मिळेल दान तिच्या पदरात पडेल की फासा उलटा पडेल सगळं दैवाधिन. चांगलं सासर मिळण्याला भाग्यच लागतं.

शुभाला सासरचं कौतुक माहेरी सांगण्याची घाई झाली होती.

तिने रात्री शशांक जवळ विषय काढला.
शशांक मुद्दाम तिची मजा करत तिला चिडवत म्हणाला,
" मला काय पुसते बरीच दिसते पुस आपल्या सासूला सासुला..."

शुभा रडकुंडीला आलेली बघून तो म्हणाला," जा गं आईपण थोडीच नाही म्हणणार आहे.पण अस्मादिकांचे काय? किती उपवास घडवणार?"

शुभा लाजेने चूर चूर होऊन गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी नास्त्याच्या वेळी शशांकनेच विषय काढला‌.
त्याला शुभाची चेष्टा करण्याची लहर आली होती. त्याला माहिती होते आपण जास्त चिडवले तर ही फक्त रडायचीच बाकी उरणार आहे. आणि त्याला त्यात मजा येणार होती.
"आई,शुभा माहेरी जायचं
म्हणतेय... म्हणजे चार-दोन दिवसासाठी बरं.
इथे सारखं सासूबाईंच्या निगराणीत राहून दबल्यासारखं झालं असेल ना तिला म्हणून पिंजऱ्याच्या बाहेर पडावं म्हणतेय ती."

"ए,हे काय रे? काहीतरीच.मी असे कधी म्हटले?
नाही हो आई, तुम्ही पण मला आईसारख्याच. किती प्रेम लावता. हा उगाच काहीपण चेष्टा करतोय." ती रडवेली झाली होती.

मेघना हसत म्हणाली,
" तुला माहेरी जायला माझी मुळीच हरकत नाही. त्याला चेष्टा करायला काय लागतं.

स्त्रीसाठी माहेर काय असतं हे एक स्त्रीच जाणू शकते.

पण तू जे म्हणालीस ना की मी आईसारखीच आहे तसं नाही बर कां.

'अहो आई ' आणि 'अगं आई ' तले अंतर हे कधीच मिटत नाही.

तू मला आईच म्हणते पण नात्याने शेवटी आपण दोघी सासा सुनाच.

आणि माझा आई व्हायचा अट्टाहास नाहीच मुळी. मला एक

'चांगली सासू '
व्हायला आवडेल."
मेघना शुभाचा हात हातात घेत म्हणाली.
तसे शुभाने मेघनाच्या गळ्यात हात टाकून मिठी मारली.

शशांक सज्जच होता जणू क्षण मोबाईलमध्ये कैद करायला.

बघता बघता मॅरेज एनिवर्सरी आली होती.
शुभा नोकरी, घर कसरत करत थकून जायची.
तिला मेघनाकडे बघून जाणवायचं आई या वयात आपल्यापेक्षा जास्त जबाबदारीचे काम करून इतक्या कशा शांत आणि फ्रेश राहू शकतात?
दुसरे म्हणजे स्वतःच्या मोठेपणाचा अभिमान नाही की कुणाला कमी लेखणे नाही.
घरात कधीच कोणत्याही विषयावर वाद नाही.
थकलो शब्द कोषात नाही.
प्रत्येकाचं विचार स्वातंत्र्य अबाधित.

तिला राहवले नाही तिने विचारलेच,
"आई या स्वस्थ जगण्याचा कोणता मंत्र आहे?"

मेघना नेहमीप्रमाणे हसत उत्तरली,

"बघ, आपण जे काम करतो ते पुर्ण झोकून करायचं.पण ऑफिसचा मुखवटा तिथेच सोडून यायचा.ताणतणाव तिथेच विसर्जित करायचे.
घरात आले की गृहिणीचा मुखवटा.
प्रत्येक भुमिका समरसून वठवायची निरपेक्ष वृत्तीने.

आपला परीघ आपणच आखायचा...आपणच विस्तारायचा.
दुसऱ्याच्या परीघाला स्पर्श न करता.सामावून जायचं त्याही परीघात.

विचारांचे परीघ जेवढे एकमेकांत मिसळतील तेवढं जीवन आनंदी."

शुभा शांतपणे त्यांचे उच्च विचार ऐकत होती.
त्यांच्या विस्तारलेल्या परीघाला स्पर्श करण्यासाठी आपला जन्म खर्ची पडेल.या जन्मात तर शक्य नाही.
या परीघाबाहेर झेपावायला पंखात बळ त्याच भरु शकतील हा विश्वास जागला आणि...

त्यांच्या परीघापेक्षा मी माझा मोठा परीघ आखेल नाही तर त्यांचा पुसून लहान करेन या इर्षेला सहज पुर्णविराम मिळाला.

त्यांचं मोठेपण मोठ्या मनाने मान्य करत ती म्हणाली,
"या वर्तुळातच मला माझा छोटासा परीघ आखायला आवडेल."
समाप्त
©®शरयू महाजन
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →