सरोळीतील मरगुबाई देवीची यात्रा : धार्मिक एकजुटीचा सुंदर सोहळा

ग्रामीण सणसमारंभ ही संस्कृती जपली पाहिजे.

सरोळी गाव विविध धार्मिक परंपरेने नटलेले आहे. गावात अनेक धार्मिक चालीरीती मोठ्या दिमाखाने जपल्या जातात. दरवर्षी केल्या जाणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात गावक-यांची एकजुट दिसून येते. अशीच दरवर्षी साजरी केली जाणारी मरगुबाई देवीची यात्रा ही गावातील धार्मिक भावनेचा नवा आयाम आहे. यालाच मिरगी म्हाई म्हणून संबोधले जाते.

उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरु होतो आणि शेतीची कामे करत कधी श्रावण महिना जवळ येतो हे समजत नाही. यानंतर चाहूल लागते ती मरगुबाई यात्रेची…!!
त्यामुळे मरगुबाई यात्रेचे नियोजन केले जाते. गावात साथीच्या रोगापासून सुटका व्हावी, जनावारांचे आरोग्य चांगले रहावे, सर्वांना जीवनात समृद्धी यावी, लोकांनी यानिमित्त एकत्र यावे या उदात्त हेतूने ही यात्रा केली जाते.

मरगुबाई यात्रा करण्यासाठी गावात दवंडी दिली जाते. गावक-यांची मिटींग होऊन सर्वानुमते यात्रा ठरवली जाते. यात्रेसाठी लागणाऱ्या निधीसाठी माणसी वर्गणी काढली जाते.यामधून सर्व विधी व सांस्कृतिक परंपरेनुसार नियोजन केले जाते.

मरगुबाई यात्रा नेहमी मंगळवार या दिवशी केली जाते. आदल्या दिवशी कै. गणपती सुतार यांच्या घरी गावकरी भजन म्हणतात. सकाळी पांगी-याचे झाड तोडून आणले जाते. याच्या लाकडी दोन सुबक मुर्त्या बनवण्याचे काम दिवसभर सुतारमंडळी करत असतात. या कामात त्यांचे योगदान व एकजूट खूप मोलाची असते.यात्रेचा दिवस उजाडतो. कै. गणपती सुतार यांच्या घरी मरगुबाई देवीचे पूजन केले जाते. गावातील स्त्रीया सकाळपासून ओटी भरण्यासाठी येतात. मरगुबाई देवीची खणा - नारळाने ओटी भरली जाते. गावक-यांची, स्त्रीयांची गाढ श्रद्धा व प्रेम यातून दिसून येते. आनंद व उत्साहाने वातावरण बहरलेले असते.यावेळी समस्त गावक-यांच्या साक्षीने सर्वजण हातजोडून मरगुबाई देवीकडे मनोमन भक्तीभावाने मागणी करतात.
आई मरगुबाई देवी
तुझ्या चरणी आमचे गाऱ्हाणे।
गावच्या सुखासाठी,
तुझ्या दारी आलो आम्ही भक्तिभावाने॥
देवी, आमच्या गावावर
तुझी सदैव कृपाछाया राहू दे।
गावातील प्रत्येक घरात
सुख, शांती आणि समाधान नांदू दे॥
शेतकऱ्यांच्या शेताला
वेळेवर पाऊस पडू दे।
धान्याची कोठारे भरू दे,
पशुधन सुखी राहू दे॥
गावातील लेकरांना
चांगले आरोग्य आणि शिक्षण मिळू दे।
वृद्धांना सुख-समाधान लाभू दे,
प्रत्येक कुटुंबात आनंद नांदू दे॥
रोगराई, संकटे, आपत्ती
आमच्या गावापासून दूर ठेव देवी।
गावाची एकी, प्रेम आणि बंधुभाव
अखंड टिकवून ठेव देवी।।
या मनोभावे मागणीनंतर मरगुबाई देवीच्या मुर्त्या यांची मिरवणूक महादेव मंदिरापासून सुरु होते. हलगीचा नाद सर्वत्र घुमला जातो. गुलालाची उधळण होते. मरगुबाईच्या नावाचा जयघोष घालत मिरवणूक शाळेजवळ थांबते. माळावर मरगुबाई देवीच्या मुर्त्या ठेवल्या जातात. यानंतर दिवसभर प्रसाद करण्याचे काम गावात सुरु असते. मरगुबाई देवीसाठी आणलेला बोकड बळी दिला जातो.संध्याकाळी प्रसाद वाटप सुरु होते. गावातील सर्व नागरीक प्रसाद घेतात. या यात्रेत सर्व गावकरी, अबालवृध, तरुण, गावातील सरपंच, ग्रामपंचायत, सदस्य हिरीरीने सहभाग घेऊन योग्य नियोजनाने यात्रा पार पाडतात.

या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे मरगुबाई देवीसाठी पूजेच्यावेळी सर्व गावक-यांनी श्रध्देने अर्पण केलेले नारळ पूजा झालेनंतर एकत्र केले जातात. हे सर्व नारळ फोडले जातात याचा प्रसाद केला जातो ; पण हा प्रसाद हातात दिला जात नाही, तर सर्व गावकरी एकत्र जमतात तेंव्हा ती खोबरी उधळली जातात. यावेळी नारळाची खोबरी घेण्यासाठी प्रचंड झुंबुड उडते. या गर्दीतून अनेकजण भरपूर खोबरी गोळा करतात. पूर्वी गर्दीतून खेचून आणलेली खोबरी दगडाच्या गरगाड्यात लपवून ठेवली जायाची नंतर ही खोबरी गरगाड्यातून काढून दुस-या दिवशी खायाला घेतली जायाची.पूर्वी हा कार्यक्रम रात्रीचा असायचा तरीही गावातील लोक मोठ्या संख्येने व श्रध्देने जमत होते. यामध्ये शाळेतील मुलांचा व तरुण मुलांचा विशेष सहभाग असायचा ही आठवण व परपरा आजही सर्व गावक-यांच्या मनात कायम आहे.

दिवसभरातील सर्व धार्मिक विधी आटोपून मरगुबाई देवी पावण्यासाठी रात्री आकरा नंतर गावातील माळावरील बसापुरात सरोळी - निंगुडगे वेशीवर मरगुबाई देवीच्या मुर्त्या ठेवल्या जातात.अशारितीने मरगुबाई यात्रा मोठ्या दिमाखात सगळ्यांच्या सहयोगाने पार पडते.

अशा या यात्रेच्या निमित्ताने गावातील सर्व समाज एकत्र येऊन एकोपा आणि बंधुभावाचे दर्शन घडते. मरगुबाई देवीच्या श्रद्धास्थानांमुळे सरोळी गावाची धार्मिक परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि ग्रामएकता जपली गेली आहे. मरगुबाईची यात्रा ही केवळ धार्मिक उत्सव नसून गावातील सामाजिक ऐक्य, परंपरा आणि भक्तिभाव यांचे जिवंत प्रतीक आहे.

संंकलन व लेखन
नामदेव पाटील


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →