Login

संसाराची दुसरी बाजू भाग -3 अंतिम

गोष्ट तुलनेची
पण मी माझ्या संसारात सुखी आहे. मला नकोत त्या पार्ट्या, श्रीमंत मैत्रिणी. आपल्या घरात जोडीला मोठी माणसं आहेत. कष्ट करून मिळवणारा नवरा आहे अन् माझं माहेर श्रीमंत नसलं तरी लेकीच्या संसारात ढवळाढवळ करत नाही हं." विनिताने नवऱ्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं.

"विनिता, सगळं दिसतं तसं नसतं. सुहास हे आधी बोलला असता तर काहीतरी मार्ग निघाला असता. पण आता उशीर झालाय. अपर्णा कोणाचं काही ऐकेल असं मला वाटत नाही." शिरीष.

"नाही कसं? आपल्या आई भांडण -तंटा न करता गोड बोलून तिला सुतासारखं सरळ करतील. मी उद्याच आईंशी बोलेन. प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते हे मी विसरूनच गेले होते."

"ह्मम..ते तुमचं तुम्ही बघून घ्या. पण आज फिरून आल्यावर मला खूप बरं वाटलं. कामाचं टेन्शन कमी झालं. मुख्य म्हणजे माझ्या बायकोसोबत वेळ घालवायला मिळाला. तुझी दुसरी बाजू मला आजच दिसली." शिरीष मनापासून हसला.
"आपण महिन्यातून किमान एकदा तरी फिरायला जात जाऊ." शिरीष विनिताला जवळ घेत म्हणाला. ती छान हसून त्याच्या मिठीत शिरली.
आज दोघांनाही एकमेकांच्या गरजा, इच्छा समजल्या होत्या. दिसतं तसं नसतं, हे विनितालाही कळून चुकलं होतं.

दुसऱ्या दिवशी विनिताच्या सासुबाई आपल्या धाकट्या लेकाकडे राहायला गेल्या. धाकट्या सुनेचं वागणं त्यांना खटकत होतं. पण वादविवाद नकोत म्हणून त्या गप्प होत्या अन् खरी बाजू विनिताकडून कळल्याने सासुबाई जोमाने कामाला लागल्या.

एरवी गोड बोलून सुना सासरच्या मंडळींची मनं जिंकतात. इथे सासुबाईंनी प्रेमाने सुनेचं मन जिंकलं. तिला आपलंसं केलं. माहेर आणि सासर यातला फरक समजावला. आता दोन्ही जावा एकत्र राहतात. एकमेकीची हौस मिळून पूर्ण करतात. सुहास आणि शिरीष आज व्यवसायात आणखी यशस्वी झाले आहेत. कारण आज त्यांचं कुटुंब मिळून -मिसळून एकत्र राहतंय.

प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते. तशीच कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची एक बाजू असते. ती समजून उमजून त्या व्यक्तीला आपलंसं केलं की कलह, द्वेष, मत्सर याला जागा उरत नाही.
तसंच सुखी संसाराचं गणित फक्त सोडवायचं नसतं तर त्याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार अन् भागाकार करत केवळ आकडेमोड करत ते मांडत राहायचं असतं हे विनिता आणि अपर्णाला नव्याने उमगलं होतं. अपर्णालाही आपल्या कुटुंबाची चांगली बाजू कळल्याने ती आपल्या संसारात, सुखी समाधानी आहे.