Login

संसाराची दुसरी बाजू भाग -2

गोष्ट तुलनेची
सगळे गाडीत बसले. अपर्णा अजूनही नाराजच होती. पण तिच्याकडे दुर्लक्ष करत विनिता भाऊजींसोबत गप्पा मारत छान एन्जॉय करत होती. घराबाहेर पडल्यावर तिने कपाळावरची मोठी टिकली काढून छोटीशी टिकली चिकटवली. हातभर घातलेल्या बांगड्या काढून दोनच बांगड्या शिल्लक ठेवल्या. वेणी घातलेले केस वाऱ्यावर सोडून दिले आणि शिरीष तिच्या या अवताराकडे बघतच राहिला. अपर्णाच्या तोंडून नकळत निघून गेलं.."वहिनी कित्ती छान दिसताय!" झालेल्या कौतुकाने विनिता हरखून गेली.

दुपारी जेवायला मोठ्या हॉटेलमध्ये गाडी थांबली. अपर्णा आपला अवतार ठीक करायला गेली ती बराच वेळ परतली नाही. "वहिनी, एक बोलू का? तुम्ही अपर्णाला जरा समजावून सांगण्याचा प्रयत्न करा."

"का?"

"अहो, ती खूप खर्च करते. सतत नवीन साड्या, कपडे घेत असते. तिच्या मैत्रिणी तर हिच्या पैशांवर डोळा ठेवूनच पार्ट्या करतात. शिवाय दर आठवड्याला फिरायला जायची हिची हौस पूर्ण करता करता मला कंटाळा आलाय. तुम्ही बघताय ना, ऑफिसमध्ये भरपूर काम असतं. दादा आणि मी थकून जातो अन् घरी आल्यावर हिच्या मागण्या, हट्ट काही संपतच नाहीत."
हे ऐकून विनिताला आश्चर्य वाटलं.

"तुम्ही घरची जबाबदारी घेता. आई -बाबांना काय हवं -नको ते बघता. आला -गेला पाहुणा उपाशी जात नाही. तसं अपर्णालाही शिकवा. सासू -सासरे चार दिवसही तिला डोळ्यांसमोर नको असतात. खरं सांगायचं तर तिच्या स्वभावाला मी अक्षरशः कंटाळून गेलोय. वीट आलाय मला." सुहास म्हणाला.

"असं कसं भाऊजी? मला वाटलं तुम्ही सुखी, समाधानी आहात. बाहेरून तर सगळं तसंच दिसतंय." विनिता सुहासचा अंदाज घेत बोलली.

"वहिनी, अपर्णाचं माहेर श्रीमंत आहे. तिला तशी राहायची सवय असल्याने तिचे आई -वडील मला वेठीला धरतात. लेकीला खर्चाला पैसा देतात संसारात एखादी कमी राहिली की ती आपण पूर्ण करतात वर मलाच बोलून दाखवतात. मग उगीच बोलून का घ्या? वाद, भांडण नको म्हणून अपर्णा म्हणेल तसं वागायचा प्रयत्न करतो."

आता मात्र विनिताला आपल्या वागण्याची लाज वाटली. तिने अपराधी नजरेने शिरीषकडे पाहिले. "मला वाटायचं, दोघांच्या संसारात तुम्ही खुश असाल. सारं काही मनाजोगं करता येतं म्हणून मनमोकळेपणाने राहत असाल. खरं बोलायचं तर मला असा स्वतंत्र संसार हवा होता. पण तुमचं चित्र काहीतरी वेगळंच दिसतंय!" विनिता बोलायला आणि अपर्णा यायला एकच गाठ पडली. त्यामुळे विषय बदलला.

रात्री फिरून चौघे घरी आले. विनिताच्या डोक्यात मात्र सुहासने बोललेला विषय अजूनही घोळत होता. ती विचार करता करता म्हणाली,
"शिरीष, चुकलं माझं. धाकटी आणि भाऊजी त्यांच्या स्वतंत्र संसारात खुश, आनंदी असतील अशी माझी समजूत होती आणि मी त्यानुसार आपली तुलना त्यांच्याशी करायला गेले.

0

🎭 Series Post

View all