Login

संसाराची दुसरी बाजू भाग -1

गोष्ट तुलनेची
जलद कथा लेखन स्पर्धा - फेब्रुवारी 2026
विषय : दुसरी बाजू.


"बघा, आजही जाऊबाई आणि भाऊजी फिरून आले आणि आपण दर सुट्टीला घरीच बसतो." विनिता आपल्या नवऱ्याला म्हणाली.

"एकच दिवस मिळतो ग मला. घरात जरा निवांत वाटतं. रोज तेच, तेच काम करून कंटाळा येतो." शिरीष.

"तसंही तुम्हाला कशातच इंटरेस्ट नसतो. जाऊबाई आणि भाऊजी आठवड्याला फिरायला जातात. बाहेर जेवायला जातात. धाकटी तर सतत नवीन साड्या, ड्रेस खरेदी करत असते. पार्टी, भिशीला जात असते आणि एक मी..कुठं जाणं नाही की येणं नाही.
सारखं आपलं सासू -सासऱ्यांना काय हवं नको ते बघा. आज काय भाजी संपली, सामान संपलं ते आणा. आई - बाबांना दवाखान्यात न्या. त्यांची औषधं - गोळ्या न चुकता आणा. ती मात्र वेगळी राहते अन् मिरवते." विनिताच्या मनातली खदखद बाहेर पडली. शिरीषने एक मोठा उसासा टाकला.

"तूही बाहेर जात जा. मी कुठं नाही म्हणतो? हवं ते कर, खरेदी कर. तुझी हौस पूर्ण करून घे. मला सध्या अजिबात वेळ नाहीय. हे दिसतंय ना तुला?"

शिरीष आणि त्याचा धाकटा भाऊ, सुहास घरचा व्यवसाय सांभाळत होते. शिरीष आई -वडीलांच्या सोबत तर सुहास बाजूच्या घरात वेगळा राहत होता. त्याची बायको अपर्णा, मोठ्या घरची होती. जात्याच छानछोकीत राहायची सवय असल्याने ती स्वतःची हौसमौज भागवून घ्यायची. म्हणूनच तिला स्वतंत्र राहायचं होतं.
हे बघून विनिताला आपणही तसंच राहावं, तिच्यासारखं सुंदर दिसावं, मेकअप करावा, चार मैत्रिणींत आपली छाप पडावी असं वाटायचं. पण घरच्या जबाबदाऱ्या असल्याने तिला स्वतःसाठी म्हणावा तितका वेळ देता यायचा नाही अन् शिरीष व्यवसायातल्या वाढत्या कार्यभारामुळे थकून जायचा. साहजिकच त्याला घरी वेळ देता यायचा नाही.

"सगळं मी एकटीने करायचं तर लग्न कशाला केलं? बायकोप्रती तुमची पण काही जबाबदारी आहे की नाही?" विनिता चिडून म्हणाली. "ते काही नाही, येत्या रविवारी आपण भाऊजी आणि धाकटीसोबत फिरायला जायचं."
हे ऐकून शिरीषने तोंड वाकडं केलं. "तुझं तू जा. मी त्या दोघांना सांगून ठेवतो."

"अरे, एक दिवसाने काही होत नाही. ती म्हणते तर जा ना." आई म्हणाली आणि शिरीष कसाबसा तयार झाला.

शनिवारी रात्री विनिता धाकटीच्या घरात शिरली. "उद्या फिरायला जाणार असाल ना? आम्ही पण येतोय." हे ऐकून अपर्णाचा चेहरा पडला. पण सुहास हो म्हणाल्याने ती काही बोलू शकली नाही.


दुसऱ्या दिवशी विनिता जीन्स -टॉप घालून थाटात तयार झाली. तिला अशा अवतारात बघून शिरीष हसायला लागला. सासुबाई ही गालातल्या गालात हसत होत्या.
"हसायला काय झालं? धाकटी असेच कपडे घालते तेव्हा मस्त तिची स्तुती करत असता की!" ती डोळे मोठे करत म्हणाली.
0

🎭 Series Post

View all