Login

समाजाला लागलेला डाग अंधश्रद्धा भाग ३

जागृती एक नवीन पहाट


भाग ३


रात्र झाली तसं पुन्हा पाटील वाड्यात गर्दी जमायला लागली .


"आज बाबा शेवटचा उपाय करणार म्हणे..."
"आज ती सावली बाहेर पडणार..." गावकरी पुन्हा कुजबुजत होते .


घराच्या आत गौरी अर्धबेशुद्ध अवस्थेत पडली होती .
तिचा श्वास जड झाला होता .


तिची आई तिच्या बाजूला बसून डोळे पुसत होती.


"बाळा... थोडं सहन कर... सगळं ठीक होईल..." पण तिच्या स्वतःच्या आवाजातही आता विश्वास उरला नव्हता .



आज वाड्याच्या मोठ्या अंगणात राखेने गोलाकार चिन्ह काढलेले होते, आजूबाजूला धूप चालू, एक दोन मानवी डोक्याचा सांगाडा तसेच दोन मोठी हाडे बाजूला ठेवली होती.


मोठ्या होमजवळ बाबा बसून मंत्र म्हणत होते.
काही क्षण गेले बाबांनी डोळे उघडले आणि शिष्यांना गौरीला आणायला सांगितले.



दोन तीन शिष्य गौरीला बळजबरीने ओढत आणू लागले,
गौरी जमेल त्या पद्धतीने तीव्र विरोध करत होती,
तोच एका शिष्याने तिच्या केसांना जोरात पकडले आणि फरपटत दरवाजाच्या चौकटीतून बाहेर काढले ..


गौरी वेदनेने विव्हळत होती पण सगळे जण मन घट्ट करून बघत होते, आई वडिलांच्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते.



शेवटी शिष्यांनी गौरीला त्या चक्रात बसवले, गौरी वेदनेने रडत होती.
बाबांनी होम मध्ये धुप टाकले, दूर सगळीकडे पसरू लागला.


होम हवन जवळ असल्याने गौरीला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला ती जोरात खोकला येवू लागला ..


बाबांनी एक काठी हातात घेऊन त्यावर काही रंगीत पाणी लावले,जोडीला राख लावून काही मंत्र म्हणून काठी आपल्या शिष्यांना दिली..


शिष्य काठी घेऊन गौरीच्या मागे उभे राहिले, बाबा एक एक मंत्र म्हणून लागले तसे शिष्य गौरीला काठीने मारू लागले..
गौरी तीव्र वेदना भोगत होती..


तेवढ्यात बाहेर अचानक गाड्यांचे आवाज आले,
एकामागून एक दोन पोलीस जीप वाड्यासमोर येऊन थांबल्या.


सगळे घाबरून बाहेर बघायला लागले.

"पोलीस...?" कुणीतरी घाबरून म्हणालं.

जीपमधून आदित्य, नेहा, काही डॉक्टर आणि पोलीस खाली उतरले . आदित्य जवळजवळ धावतच घरात शिरला .



वाड्याचा मोठा दरवाजा उघडला तसा धूराच लोट बाहेर पडला, त्याने पटकन तोंड रूमालाने झाकले आणि आतमध्ये आला.

समोरच चित्र स्पष्ट दिसू लागले.


मोठ्या होमसमोर गौरी बसवलेली होती .
तिचे केस पूर्ण विस्कटले होते, हातावर काठीचे वळ उठले होते .

ती वेदनेने थरथरत होती .



तिच्या आजूबाजूला बाबा आणि त्यांचे शिष्य मंत्र म्हणत उभे होते .
क्षणभर आदित्यच्या पायाखालची जमीनच सरकली .



"गौरी !" तो जोरात ओरडला .
त्याचा आवाज ऐकताच गौरीने हळूच डोळे उघडले .


"आ...दि..." तिच्या तोंडातून कसाबसा आवाज बाहेर पडला .


तेवढ्यात बाबांचा एक शिष्य पुढे आला .
"मध्ये पडू नका ! विधी सुरू आहे !"


"विधी नाही हा अत्याचार आहे !" आदित्य रागाने ओरडला .

तो गौरीकडे जाणार इतक्यात दोन शिष्य त्याच्या आडवे आले.
आदित्य रागात त्यांना बाजूला ढकलून देतो,
बाकी शिष्य आदित्यला पकडणार त्याआधीच पोलीस आत आले.


"कोणीही पुढे यायचं नाही !" इन्स्पेक्टरचा कडक आवाज घुमला.

पोलिस बघून बाबा आणि त्यांच्या शिष्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.


आदित्य आणि नेहा दोघेही गौरीच्या दिशेने धावले,
अर्धबेशुद्ध अवस्थेत गौरीला उभं राहता येत नव्हते, ती अचानक खाली कोसळली.


तसे सगळेजण घाबरून गेले,सगळीकडे शांतता पसरली
गावकरी घाबरून एका बाजूला झाले
डॉक्टरांची टिम पुढे सरकली,

तिची अवस्था बघून ते हादरलेच .

"ओह गॉड..." एक डॉक्टर हळू आवाजात म्हणाले .
गौरीचा श्वास खूपच मंद झाला होता.तिच्या कपाळावरून घाम वाहत होता .


"आपल्या लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल, पेशंटची अवस्था खुप वाईट आहे." डॉक्टर इन्स्पेक्टरकडे बघून म्हणाले.


त्यांनी होकारार्थी मान डोलावली,
आदित्य दोन्ही हात तिला उचलून घेतल आणि सगळ बाहेर निघून गेला, त्याच्या पाठी डॉक्टर,नेहा आणि गौरीची आई धावली.


बाबांचा एक शिष्य पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला तोच एका कॉन्स्टेबलने त्याला पकडले.


"खबरदार, जर पळून जाण्याचा प्रयत्न केला तर..."इन्स्पेक्टर जोरात म्हणाले.


इन्स्पेक्टर बाबांसमोर जाऊन उभे राहिले.
"खुप झालं दुसऱ्यांच्या अंगातील वाईट शक्ती काढून, आता आमची पद्धत बघा.." इन्स्पेक्टर बाबाला उभे करत म्हणाले.


" घ्या तुमच्याविरुद्ध अटक वॉरंट आहे बाबा.." त्यांनी खिशातून कागद बाहेर काढत म्हटलं .


हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर धक्का बसला .


"क-कसलं वॉरंट ?" गौरीचे वडील घाबरत म्हणाले .



"लोकांना फसवणं , अंधश्रद्धा पसरवणं , उपचाराच्या नावाखाली शारीरिक अत्याचार करणं... आणि अनेक लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणं ."इन्स्पेक्टर गंभीर आवाजात म्हणाले


हे ऐकताच गावकऱ्यांमध्ये कुजबुज सुरू झाली .


"म्हणजे...?" "बाबा खोटे आहेत...?"
"आपण इतके दिवस"


"हे सगळं माझ्याविरुद्ध कट आहे !"बाबा जोरात ओरडले


"आवाज खाली ठेवायचा बाकी जे सांगायचे ना कोर्टात सांगाल ." इन्स्पेक्टर थंड आवाजात म्हणाले .


त्यांनी लगेच पोलिसांना इशारा केला .
पोलीस पुढे येताच बाबा आणि त्यांचे शिष्य निसटण्याचा प्रयत्न करू लागले , पण पोलिसांनी सगळ्यांना पकडलं .



सगळेजण हादरले होते,


ज्यांना काही वेळापूर्वी बाबा देवमाणूस वाटत होते,
तेच आता पोलिसांच्या ताब्यात उभे होते .


गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर भीती, लाज आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता .


इन्स्पेक्टरने सगळ्यांकडे नजर फिरवली .

"डोळे उघडा आता !" ते मोठ्या आवाजात म्हणाले .


सगळीकडे शांतता पसरली .


"हे बाबा नाहीत... भोंदू आहेत !
लोकांच्या भीतीचा फायदा घेऊन स्वतःचा धंदा चालवतात

हे !"

गावकरी मान खाली घालून ऐकत होते .


"आज तुमच्या डोळ्यांसमोर एका मुलीची काय अवस्था झाली बघितली ना ? जर आम्ही वेळेवर आलो नसतो तर त्या मुलीचा जीवही गेला असता !"इन्स्पेक्टर म्हणाले


गौरीचे वडील रडत एका कोपऱ्यात बसले होते, त्यांना स्वतःचीच घृणा वाटत होती . आपल्या हाताने आपल्या लेकीची हि अवस्था करून घेतली होती.


तेवढ्यात एका कॉन्स्टेबलने बाबांच्या बॅगा बाहेर आणल्या .


"सर... हे बघा ."


इन्स्पेक्टरने बॅग उघडली.
"दाखवा सगळ्यांना बाबाचे सामान.." इन्स्पेक्टर म्हणाले.


आत वेगवेगळ्या बाटल्या, नशेच्या गोळ्या, राखेची पुडी, बनावट ताईत, लिंबू, काळे दोरे आणि काही लोकांचे फोटो होते .


गावकरी अवाक होऊन बघत होते .


"हीच आहे यांची जादू !" इन्स्पेक्टर रागाने म्हणाले .

"मग... इतके दिवस आम्ही जे बघत होतो ते.?"एका म्हाताऱ्या आजीने थरथरत्या आवाजात विचारलं


"अहो, आजी नाटक ! पूर्ण नाटक !"इन्स्पेक्टर कटाक्ष टाकत म्हणाले

ते बाबांकडे वळले.


"लोकांना आधी घाबरवायचं... मग त्यांच्या आजाराला भूत-प्रेताचं नाव द्यायचं... आणि नंतर उपचाराच्या नावाखाली अत्याचार करायचे ."

एक पोलीस अधिकारी पुढे आले,


"सर, मागच्या गावात पण अशाच प्रकारात एका महिलेचा मृत्यू झाला होता ." म्हणाले.


"मुलं होत नव्हतं म्हणून घरचे असल्या भोंदू बाबाकडे घेऊन आले,
आणि या नराधमांनी नको ते कृत्य करत तिला जीवानिशी घालवलं.." तो अधिकारी पुढे येऊन बाबाच्या थोबाडीत मारत म्हणाला.


हे ऐकताच गावकरी घाबरले .


"काय...?"
"म्हणजे हे आधीपासून"


"हो !" इन्स्पेक्टर मध्येच म्हणाले .
"तुमच्या अंधविश्वासामुळे असे लोक अजून मोठे होतात !"


गावातला सरपंचही मान खाली घालून उभा होता,


"आजार असला की डॉक्टरांकडे जायचं !
भूत-प्रेत, सावल्या, जादूटोणा या गोष्टींवर विश्वास ठेवून तुम्ही स्वतःच आपल्या माणसांचा जीव धोक्यात घालता !"इन्स्पेक्टरचा आवाज पुन्हा घुमला.


गावात एकदम शांतता होती .


सगळ्यांच्या डोळ्यांसमोर गौरीची अवस्था फिरत होती .
तिच्या आईचे रडणं..तिच्या वेदनेने भरलेल्या किंकाळ्या.
आणि त्या सगळ्यावर स्वतःचा विश्वास ठेवून उभे असलेले ते स्वतःआज पहिल्यांदाच त्यांना स्वतःची चूक जाणवत होती .


पोलीस बाबा आणि त्यांच्या शिष्यांना जीपमध्ये बसवू लागले .


"तुम्ही मोठी चूक करताय !
त्या मुलीच्या अंगातली शक्ती आता सगळ्या गावाला

संपवेल !"जाताना बाबा अजूनही ओरडत होते


क्षणभर काही गावकरी पुन्हा घाबरले .



"बस करा तुमचं हे नाटक !
आता कुणीही याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा नाही !"पण यावेळी इन्स्पेक्टर जोरात ओरडले


सगळे शांत झाले, बाबांना घेऊन पोलीस जीप निघून गेली .


धुपाचा वास अजूनही हवेत पसरला होता .
अंगणात पडलेली राख... ते काळे दोरे... सांगाडे... सगळं काही आता भयानक वाटत होतं .


ज्या वस्तूंना लोक काही वेळापूर्वी "दैवी शक्ती" समजत होते...
त्या आता फक्त अंधश्रद्धेचं कुरूप रूप वाटत होत्या .


गौरीचे वडील अजूनही तिथेच खाली बसले होते,
त्यांच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते.सरपंच त्यांच्या जवळ आले.


"पाटील... स्वतःला सावर..." ते हळू आवाजात म्हणाले .


"कसं सावरू...?" ते रडत म्हणाले .
"माझ्या मुलीने किती विनवण्या केल्या... डॉक्टरांकडे घेऊन चला म्हणाली... पण मीच तिचं ऐकलं नाही..."


त्यांचा आवाज भरून आला .
"बाप असून मीच तिचा सर्वात मोठा अपराधी ठरलो..."


आजूबाजूला उभे असलेले गावकरीही मान खाली घालून उभे होते .
कारण चूक फक्त पाटलांची नव्हती..
त्या अंधविश्वासाला खतपाणी घालणाऱ्या प्रत्येकाची होती .



तेवढ्यात नेहा पुन्हा वाड्यात आली.


तिचे डोळे लाल झाले होते .

"गौरीला ICU मध्ये ठेवलंय..." ती हळू आवाजात म्हणाली .


हे ऐकताच गौरीच्या वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली .


"माझी मुलगी ठीक आहे ना...?" त्यांनी रडत विचारले .

नेहाने स्वतः ला सावरलं .

"डॉक्टर प्रयत्न करतायत काका..."

आदित्य हॉस्पिटलमध्येच थांबला होता.
गौरीची आई बाहेर शांत बसून होती.


ICU बाहेर उभा राहून तो सतत काचेआड गौरीकडे बघत होता . तिच्या हाताला सलाईन लावलेली होती, डोक्यावर पट्टी बांधलेली होती .


कालपर्यंत हसणारी, स्वप्न बघणारी गौरी आज मृत्यूशी झुंज देत पडली होती.आणि या सगळ्याला कारण होतं — अंधश्रद्धा .


त्या रात्रीनंतर गावात बरंच काही बदललं . लोकांनी पहिल्यांदाच डॉक्टर आणि उपचार यांचं महत्त्व समजून घेतलं.


कारण शेवटी,
भूत, प्रेत, सावल्या नसतात..

असतं ते फक्त अज्ञान आणि अज्ञानापेक्षा भयानक दुसरं काहीच नसतं...

समाप्त.

कशी वाटली कथा नक्की सांगा,
अशांचे नवनवीन कथा वाचण्यासाठी मला फॉलो करा.


धन्यवाद

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →