मागील भागात आपण पाहिल कि रिधानच्या चिडचिड्या स्वभावामुळे आस्थाला पुन्हा एकदा अपमान सहन करावा लागतो. त्याच्या कठोर शब्दांनी तिचे डोळे पाणावतात आणि ती रूममध्ये निघून जाते. अवंतिका रिधानला समजावण्याचा प्रयत्न करते, पण तो आपल्या मनातील वेदना व्यक्त करत घराबाहेर निघून जातो. आता पाहूया पुढे..,
इकडे...आस्था खोलीत येताच तिचा धीर सुटला. तिने पटकन दरवाजा लावला आणि भिंतीला टेकून खाली बसली.एवढा वेळ आवरून ठेवलेले अश्रू आता मात्र थांबायचं नाव घेत नव्हते. तिने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला आणि हुंदके द्यायला सुरुवातीला केली. रिधानचा प्रत्येक शब्द...त्याच्या डोळ्यांतील तिरस्कार...आणि तिच्याबद्दलचा द्वेष...सगळं पुन्हा पुन्हा तिच्या मनात येत होत.
"मी एवढी वाईट आहे का...?आणि ह्यात माझी चूक तरी काय आहे...?"
हे प्रश्न तिला आतून पोखरत होते.काही वेळ ती तशीच रडत राहिली. मग हळूहळू तिने स्वतःचे अश्रू पुसले.आरशासमोर जाऊन उभी राहिली.रडल्यामुळे डोळे लाल झाले होते. तिने चेहऱ्यावर थंड पाण्याचे शिंतोडे मारले...विस्कटलेली साडी नीट केली...पुसलेले कुंकू पुन्हा व्यवस्थित लावलं...आणि आरशात स्वतःकडे पाहत हळूच म्हणाली,
"नाही आस्था... आता रडून चालणार नाही. आता हेच तुझं आयुष्य आहे... आणि ते तुलाच धैर्यानेच जगायचं आहे."
एक खोल श्वास घेत तिने स्वतःला सावरलं...ओठांवर खोटंसं का होईना, पण एक हलकंसं हसू आणलं...आणि पुन्हा बाहेर जाण्यासाठी तयार झाली.
*****************************
संध्याकाळ होताच घरात पुन्हा एकदा लगबग सुरू झाली होती..पूजेसाठी नातेवाईक, शेजारी आणि काही जवळची माणसं एकामागोमाग एक येऊ लागली. संपूर्ण घरात अगरबत्तीचा मंद सुगंध, फुलांचा दरवळ आणि गप्पांचा गोड गजबजाट पसरला होता.
सर्व आवरून आस्था आपल्या खोलीत तयार व्हायला गेली..पाहते तर रिधिमा आधीपासूनच तिची वाट पाहत होती.
"आज माझ्या वहिनीला मी स्वतः तयार करणार! चालेल ना तुला??"
ती उत्साहाने म्हणाली.
त्यावर आस्थाने हसून तिचा होकार दर्शिवला. तस तिने प्रेमाने आस्थाला सुंदर पैठणीची नववारी नेसवली. प्रत्येक घडी इतक्या नीट बसवली की आस्था एखाद्या राजघराण्यातील नववधूसारखी भासत होती.
त्यानंतर तिने तिच्या गळ्यात दागिने घातले.सोन्याचा नाजूक हार...कानात मोत्यांचे झुमके...हातात हिरव्या बांगड्या आणि कपाळावर चंद्रकोर...रिधिमाने तिचे लांबसडक केस सुंदर अंबाड्यात गुंफले आणि त्यात ताज्या मोगऱ्याचा गजरा अलगद माळला आणि क्षणात त्या दरवळणाऱ्या मोगऱ्याच्या सुगंधाने संपूर्ण खोली भारून गेली.
त्यानंतर तिने तिच्या गळ्यात दागिने घातले.सोन्याचा नाजूक हार...कानात मोत्यांचे झुमके...हातात हिरव्या बांगड्या आणि कपाळावर चंद्रकोर...रिधिमाने तिचे लांबसडक केस सुंदर अंबाड्यात गुंफले आणि त्यात ताज्या मोगऱ्याचा गजरा अलगद माळला आणि क्षणात त्या दरवळणाऱ्या मोगऱ्याच्या सुगंधाने संपूर्ण खोली भारून गेली.
आस्था तयार झाल्यावर रिधिमा काही क्षण आस्थाकडे पाहतच राहिली.
"वहिनी..." ती नकळत म्हणाली,
"खरंच... माझ्या दादाचं नशीब किती भारी आहे, कि त्याला एवढी सुंदर बायको मिळाली आहे..."
त्यावर आस्था फक्त हलकंसं हसली. रिद्धीमाला ते हास्य सुंदर दिसल..पण त्यामागे लपलेलं दुःख मात्र फक्त आस्थालाच माहीत होतं.
तर दुसरीकडे...रिधानही मनाविरुद्ध तयार होत होता.
अवंतिकाच्या आग्रहाखातर त्याने पांढरा शुभ्र धोतर आणि रेशमी कुर्ता परिधान केला होता.
पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र अजूनही नाराजी स्पष्ट दिसत होती. काही वेळातच भटजी आले. तस अवंतिकाने सगळ्यांना पूजेच्या तयारीला लागायला सांगितलं.
मग त्या हसतच आस्थाच्या खोलीसमोर आल्या, आणि त्यांनी आस्थाला आवाज दिला.
मग त्या हसतच आस्थाच्या खोलीसमोर आल्या, आणि त्यांनी आस्थाला आवाज दिला.
"आस्था... बाळा, झालीस का तयार? चल... भटजी आलेत."
"हो... आई... आलेच...."
आस्थाने हलक्या आवाजात उत्तर दिलं. ती सावकाश बाहेर आली आणि क्षणभर संपूर्ण घरात जणू वेळच थांबली. कारण तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाची नजर तिच्यावर खिळली. नऊवारीतलं तिचं तेजस्वी रूप, सोन्याच्या दागिन्यांची नाजूक शोभा...अंबाड्यात माळलेला मोगऱ्याचा गजरा आणि चेहऱ्यावरचं निरागस सौंदर्य.
क्षणभर सगळेच तिच्याकडे पाहत राहिले.
त्यामुळे अवंतिकाच्या चेहऱ्यावर अभिमानाचं हसू उमटलं होत तर रिधिमाचा चेहरा आनंदाने फुलला होता अन अच्युतरावांच्या डोळ्यांत समाधान झळकत होतं.

सगळ्यांना तिच्याकडे बघताना पाहून रिधिमा आनंदाने म्हणाली,
"आई. बाबा.... माझी वहिनी किती सुंदर दिसतेय ना!"
त्यावर अवंतिका आणि अच्युतरावांनीही नकळत हसत मान डोलावली. आणि रिधान तोही नकळत तिच्याकडे पाहतच राहिला. काही क्षणांसाठी त्याच्या चेहऱ्यावरचा राग विरला. त्याची नजर तिच्यावरच खिळली होती...जणू त्याला स्वतःलाच कळत नव्हतं की तो इतका वेळ तिच्याकडे का पाहतोय. तो काही क्षण तिच्याकडे एकटक पाहतच राहिला.
नजरेसमोर उभी असलेली हीच ती मुलगी...जिला काल रात्री नको ते शब्द वापरून दुखावलं होतं...आज मात्र ती नववधूच्या रूपात विलक्षण सुंदर दिसत होती.
क्षणभर त्याचं भान हरपलं.
पण पुढच्याच क्षणी त्याने स्वतःला सावरलं. नजर दुसरीकडे वळवली.
"नाही... काहीही झालं तरी हया मुलीमध्ये गुंतायचं नाही."
असं तो स्वतःलाच दहा वेळा बजावत होता.
कदाचित...त्याच कारणासाठी त्याने तिच्याकडे पुन्हा पाहण्याचं टाळलं आणि पुन्हा चेहऱ्यावर तोच कठोरपणा आणला. पण हे सगळं आस्थाच्या नजरेतून मात्र सुटलं नव्हतं...
तेवढ्यात अवंतिका पुढे आल्या.
"चला, आता तुम्ही दोघं पूजेला बसा."
त्यांच्या आवाजाने आस्था व रिधान दोघेही भानावर आले.
रिधानच्या शेजारी बसायचं...या विचारानेच तिच्या मनात पुन्हा भीती दाटून आली.
तरीही ती सावकाश पुढे सरकली. इतक्यात दारातून दोन तीन परिचित चेहरे आत आले. तिचे आई.बाबा आणि भाऊ....
त्यांना पाहताच आस्थाच्या डोळ्यांत दाटलेलं पाणी अखेर ओघळलंच...
ती धावतच जाऊन बाबांच्या मिठीत शिरली.
"बाबा..."
इतकंच तिच्या तोंडून बाहेर पडलं. तिच्या आवाजात दडलेली घुसमट त्यांनी लगेच ओळखली.
त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
"शांत हो, बाळा."
ते हळूच म्हणाले.
"आधी पूजा होऊ दे... मग निवांत बोलू."
आस्थाने डोळे पुसत मान हलवली.
आईनेही तिच्या गालावरून हात फिरवत प्रेमाने हसण्याचा प्रयत्न केला. स्वतःला सावरत आस्था पुन्हा रिधानच्या शेजारी जाऊन बसली.
भटजींनी मंत्रोच्चार सुरू केले. पूजा विधी पुढे सरकत होता.
काही वेळाने भटजी म्हणाले,
"आता पत्नीने पतीच्या उजव्या हाताला हात लावून बसा."
ते शब्द ऐकताच आस्थाचं हृदय धडधडू लागलं.
लगेच तिच्या डोळ्यासमोर रात्रीचा प्रसंग रिधानचा राग, त्याचे कठोर शब्द सगळं पुन्हा उभं राहिलं.
तिचा हात नकळत थरथरू लागला. रिधानला तिची भीती स्पष्ट जाणवत होती. पण घरच्यांसमोर काहीच घडलं नाही, असा आव आणत तो शांत आवाजात म्हणाला,
"आस्था... गुरुजी सांगतायत तसं कर."
बाहेरून त्याचा स्वर अगदी सामान्य होता...पण त्या शब्दांमागचा राग, तो त्याने लपवलेला तिरस्कार फक्त आस्थालाच जाणवला.
तिने एक मोठा श्वास घेतला, अन काहीही न बोलता थरथरणाऱ्या हाताने अलगद त्याच्या हाताला स्पर्श केला.
इकडे गुरुजींचे मंत्रोच्चार सुरू होते. होमकुंडातून उठणारा धूर, समईचा मंद प्रकाश आणि मंत्रांचा गंभीर स्वर संपूर्ण वातावरणात पवित्रता निर्माण करत होता.
बाकीचे पाहुणे मात्र हळू आवाजात एकमेकांशी गप्पा मारत होते. पूजा शेवटच्या टप्प्यात आली होती
तेव्हा ते भटजी म्हणाले,
"आता पतीने तुपाची आहुती द्या... आणि पत्नीने फुल अर्पण करा."
रिधानने हातातला तुपाचा चमचा उचलला. आस्था हातात फूल घेऊन पुढे सरकली.
तेवढ्यात...रिधानने मुद्दाम तो तूप असलेला चमचा काही क्षण अग्नीवर धरून ठेवला.चमचा तापून लालभडक झाला.क्षणभर त्याने आस्थाकडे पाहिलं...आणि आस्था फूल अर्पण करण्यासाठी पुढे होताच, कुणाच्याही नकळत त्याने तो गरम चमचा तिच्या हाताला हलकासा टेकवला.
"आह...!"
जोराच्या चटक्याने आस्था वेदनेने ओरडली. क्षणात तिच्या डोळ्यांत क्षणात अश्रू तरळले.तिचा आवाज ऐकताच अवंतिका, आस्थाची आई-उर्मिलाताई आणि घरातले सगळेच घाबरून तिच्याजवळ धावत आले.
"काय झालं, आस्था?"
उर्मिलाताईंनी काळजीने विचारलं.
रिधानने क्षणाचाही विलंब न करता परिस्थिती सावरली.
त्याने तिचा हात स्वतःच्या हातात घेतला आणि जखमेवर हलकेच फुंकर मारू लागला.
चेहऱ्यावर काळजी आणत तो म्हणाला,
"आस्था... खूप जळतंय का?"
तो अपराधी असल्याचा आव आणत पुढे म्हणाला,
"आय ॲम सॉरी... तू फूल टाकत होतीस आणि माझ्याकडून चुकून हा गरम चमचा तुझ्या हाताला लागला."
त्याच्या आवाजात इतका बनावटी पश्चात्ताप होता की तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच ते खरं वाटलं.
