मागील भागात आपण पाहिलं कि, लग्नाच्या पहिल्याच रात्री रिधानच्या वागण्याने आस्थाची सगळी स्वप्नं एका क्षणात तुटतात. सकाळी ती स्वतःला सावरत घरच्यांसमोर काहीही न झाल्यासारखं वागण्याचा प्रयत्न करते. पण तिच्या हातावरील जखम आणि चेहऱ्यावरचं हरवलेलं तेज पाहून अवंतिकाला तिची काळजी वाटू लागते. मात्र आस्था सत्य लपवते, तर रिधिमा सगळं सुरळीत होईल, असा विश्वास देत आई-वडिलांची समजूत काढते...आता पाहूया पुढे काय होते ते..,
आस्था खोलीत गेल्यावर हॉलमध्ये काही क्षण शांतता पसरली. डायनिंग टेबलावर बसलेले अच्युतराव परांजपे आस्थाचे सासरे शांतपणे वर्तमानपत्राची पानं उलटत होते. वनविभागातून निवृत्त झालेले अधिकारी.अत्यंत प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व. आयुष्यभर जंगलात राहून त्यांनी माणसांपेक्षा निसर्ग जास्त जवळून पाहिला होता. त्यामुळे माणसांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याची सवय त्यांना होती. शिस्त त्यांच्या स्वभावात होती, पण मुलांवर बंधनं लादण्यापेक्षा त्यांना विश्वासाने घडवण्यावर त्यांचा नेहमीच भर होता. ते शांत स्वभावाचे असले तरी चुकीच्या गोष्टींविरुद्ध ठामपणे उभे राहणारे होते.

त्यांच्या शेजारी अवंतिका बसली होती, आस्थाची सासू. देवपूजा, घर आणि कुटुंब... एवढंच तिचं विश्व. मुलांवर जीवापाड प्रेम करणारी आई, पण घरातलं प्रत्येक काम तिच्या म्हणण्यानुसारच व्हावं, असा तिचा स्वभाव. आस्थाला पाहिल्यापासून तिच्या मनात कुठेतरी काळजीचं घर करून बसलं होतं."माझं तेच खरं" हा तिच्या स्वभावातील दोष सोडला, तर तिच्यासारखी प्रेमळ स्त्री भेटणार नाही. तिला घरातील शिस्त आणि परंपरा जपणं तिला मनापासून आवडतं.

तेवढ्यात रिधिमा पुन्हा आपल्या नेहमीच्या खोडकर अंदाजात आली. घरातलं लाडकं शेंडेफळ. बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला शिकणारी, बिनधास्त, मनमोकळी आणि कायम हसतमुख आणि खोडकर. आधुनिक विचारांची असली तरी कुटुंबावर तिचा प्रचंड जीव आहे.तिच्या येण्याने घरातला प्रत्येक कोपरा जिवंत व्हायचा. आस्था आणि तिच्यात वयाचं फारसं अंतर नसल्यामुळे ती तिला वहिनीपेक्षा मैत्रीणच मानत होती.घरात कायम हसतं-खेळतं वातावरण ठेवणारी आणि सगळ्यांची लाडकी रिधिमा...

आणि...
या सगळ्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू...
रिधान परांजपे, आस्थाचा नवरा..आणि परांजपे कुटुंबाचा मोठा मुलगा. एमबीए करून एका नामांकित कंपनीत उच्च पदावर काम करणारा. देखणा, बुद्धिमान आणि व्यक्तिमत्त्वाने प्रभावी. पण त्याच्या चेहऱ्यावरचा रुबाब आणि मनातल्या वादळाची कल्पना कुणालाच नव्हती. बाहेरच्या जगासाठी तो यशस्वी होता... पण आतून तो नेमका कोणत्या जखमा घेऊन जगत होता, हे अजून कुणालाच माहीत नव्हतं.

आस्था तयार होऊन बाहेर आली तरी झोपलेला होता.. तिने एक सुस्कारा सोडला आणि हॉलमध्ये आली, तेव्हा अच्युतराव, अवंतिका आणि रिधिमा तिघंही गप्पांमध्ये रंगले होते.
तिच्या येण्याची चाहूल लागताच रिधिमाची नजर तिच्याकडे गेली...
आणि ती क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिली.
आस्थाने फिकट गुलाबी रंगाची सिल्कची साडी नेसली होती. त्यावर नाजूक मोत्यांची मॅचिंग ज्वेलरी, गळ्यातलं छोटंसं मंगळसूत्र, कानातले झुमके, कपाळावर छोटीशी कुंकवाची टिकली... आणि नुकतेच धुतलेले लांबसडक केस मोकळे सोडल्यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत होतं.

हया सगळ्यात रात्रीच्या वेदना तिने अजिबात चेहऱ्यावर येऊ दिल्या नव्हत्या.जबरदस्तीचं का होईना...पण तिच्या ओठांवर एक हलकंसं हसू होतं.
तिला पाहताच रिधिमा अक्षरशः उडी मारून तिच्याजवळ गेली.
"Oh My God...!!"
ती दोन्ही हात गालांवर ठेवत म्हणाली.
"दादा किती लकी आहे ना...! एवढी सुंदर बायको मिळाली आहे त्याला."
असं म्हणत तिने प्रेमाने आस्थाला मिठी मारली.
त्यावर आस्थाने फक्त लाजून हळूच तिला thank you म्हंटल..... आणि तेवढ्यात अवंतिका उठली.
"अगं.... अग..., बाजूला हो जरा..."
ती हसत म्हणाली...
"माझ्या सुनेला दृष्ट लावशील तू ."
असं म्हणून तिने अलगद रिधिमाला बाजूला केलं.
मग स्वतःच्या डोळ्यांतलं थोडंसं काजळ बोटावर घेतलं आणि आस्थाच्या कानामागे हलकासा काळा ठिपका लावत प्रेमाने म्हणाली,
"कुणाचीही दृष्ट लागू नये तुला...अगदी माझीसुद्धा नको..."
ते ऐकून आस्थाच्या डोळ्यांत नकळत पाणी तरळलं.
तिच्या आई नंतर पहिल्यांदाच कुणीतरी तिची इतक्या मायेने दृष्ट काढत होतं.
तिच्या आई नंतर पहिल्यांदाच कुणीतरी तिची इतक्या मायेने दृष्ट काढत होतं.
ती काही बोलणार, इतक्यात रिधिमा पुन्हा मध्येच म्हणाली,
"ओह्ह...! म्हणजे आता 'माझी सून' झाली लगेच? मगाशी तर मोठी सासूपणा दाखवत होतीस... लवकर उठायचं न ऑल ...."
आणि मग मुद्दाम ती गाल फुगवत अच्युतरावांकडे वळली.
"बाबा... ऐकताय ना? अजून दोन दिवस झाले नाहीत आणि आई मला विसरूनच गेली...."
तस अच्युतराव हसत म्हणाले,
"अगं, तू तर कायमच आमची लाडोबा आहेस.."
"हं... बघूया हा......!"
इकडे रिधिमा अजूनच नाटकी चेहरा करत म्हणाली,
"तिकडे दादा उठेल ना... मग समजेल ही तुमची सून आहे की त्याची बायको!"
क्षणभर सगळेच हसू लागले.
पण...
हे सगळं ऐकून आस्थाच्या चेहऱ्यावरचं आलेलं हसू लगेच विरलं.
'त्याची बायको...'
हे दोन शब्द तिच्या मनात वेदनेची एक नवी लाट उठवून गेले.
पण हया सगळ्यांना काय सांगणार म्हणून तिने कसबस स्वतःला सावरलं...
आणि पुन्हा एकदा चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केला.
अवंतिकानेही हसत आस्थाकडे पाहिलं, अन तिच्या चेहऱ्यावरून माया मोडत म्हणाली,
"अगं... रिधू.....बायको त्याचीच आहे ... पण सून तर माझी आहे ना!"
तिचं बोलणं ऐकून सगळेच हसले.आता मात्र आस्था क्षणाचाही विलंब न लावता खाली वाकली आणि अवंतिकाच्या पाया पडली.
क्षणभर अवंतिका दचकली, पण लगेच तिने मायेने तिच्या डोक्यावर हात ठेवला.
"अखंड सौभाग्यवती भव..."
तिच्या तोंडून सहज आशीर्वाद बाहेर पडला.
आस्थाने डोळे मिटले...
पण तो आशीर्वाद ऐकताच पुन्हा एकदा तिच्या मनात वेदनेची एक थंड लहर उठली.
"अखंड सौभाग्यवती..."
एका विवाहित स्त्रीसाठी यापेक्षा मोठा आशीर्वाद कोणता असतो?
पण...
ज्याने तिला पत्नी म्हणून स्वीकारलंच नव्हतं...त्याच्या नावाचं सौभाग्य आपल्या नशिबात खरंच आहे का?
हा प्रश्न तिच्या मनाला आतून कुरतडत होता.
तिने कसाबसा तो विचार मनातून दूर सारला आणि अच्युतरावांच्या पाया पडली.
अच्युतरावांनी तिला लगेच उठवलं.
तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत ते म्हणाले,
"आस्था... जशी रिधिमा आमची मुलगी आहे, तशीच आजपासून तूही आमची मुलगी आहेस."
त्यांच्या आवाजात एक वेगळीच आपुलकी होती.
"या घरात तुला कधी कोणती अडचण आली... काही बोलायचं असेल... किंवा मन मोकळं करावंसं वाटलं, तर अजिबात संकोच करू नकोस."
ते हसत पुढे म्हणाले,
"बिनधास्त येऊन माझ्याशी बोल. मी आधी तुझा बाबा आहे... मग सासरा."
ते शब्द ऐकून आस्थाच्या डोळ्यांच्या कडा नकळत ओलावल्या.
तिने हसतच मान हलवली.
"हो... बाबा."
हे दोन शब्द तिच्या तोंडून सहज बाहेर पडले.
अच्युतरावांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं.
थोड्याच वेळात चौघेही एकत्र बसून आस्थासोबत आधीच राहिलेला नाश्ता करू लागले.
रिधिमाच्या खोड्या, अच्युतरावांची शांत पण विनोदबुद्धी असलेला स्वभाव आणि अवंतिकाची काळजी...हे सगळं पाहताना आस्थाच्या मनावरचं ओझं क्षणभर हलकं झालं.
"किती छान आहेत हे सगळे..."तिने मनोमन पुन्हा एकदा दाद दिली..
"या अश्या स्वभावाच्या माणसांच्या घरात मला यायला मिळालं, हे माझं भाग्यच आहे."
पण...अजूनही एकच गोष्ट तिला राहून राहून अस्वस्थ करत होती.
ती म्हणजे रिधान...त्याचा राग...त्याचे शब्द...आणि त्याच्या डोळ्यांत तिच्याबद्दल दिसलेला तिरस्कार...
हे सगळं अजूनही तिच्या मनातून जात नव्हतं.
हे सगळं अजूनही तिच्या मनातून जात नव्हतं.
"घरातले सगळे इतके प्रेमळ, समजूतदार आणि माणुसकी जपणारे आहेत... मग रिधान इतका वेगळा का आहे?आणि जर त्याला हे लग्न खरंच मान्य नव्हतं... तर या सगळ्यांसमोर त्याने होकार दिलाच कसा? ह्यांच्यापैकी तर कोणच जबरदस्ती करणारे वाटतच नाही...खरंच हे लग्न जबरदस्तीचं होतं... की यामागे अजून काहीतरी आहे...? मी विचारू तर विचारू कुणाला ह्याबद्दल.... आणि ह्यांना कोणाला काही ठाऊक नसेल तर माझ्यासोबत त्यांना देखील त्रास होईल..."
ती विचार करत होती, तिच्या समोर फक्त प्रश्न होते...उत्तरं कुठेच नव्हती...आणि त्या प्रश्नांनी तिचं मन अधिकाधिक अस्वस्थ होत होतं.
तेवढ्यात हॉलमधून येणाऱ्या हसण्याच्या आवाजाने रिधानची झोप मोडली. काही क्षणांनी तो वैतागलेल्या चेहऱ्याने बाहेर आला.
तो बाहेर आला तेव्हा त्याचे केस विस्कटलेले, डोळ्यांत असलेली झोप आणि चेहऱ्यावर स्पष्ट चिडचिड असा अवतार झाला होता...
हॉलमध्ये नजर फिरवत तो वैतागून म्हणाला,
"काय आहे हे...? सकाळी सकाळी काय बाजार भरलाय?"
त्याचा आवाज ऐकताच सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या.
आस्था सांगू शकेल का घरातल्याना??
किंवा त्यांनाच समजेल का रिधानचे वागणे??क्रमश
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
