मागील भागात आपण पाहिलं कि, आस्थाचा नवरा तिला रडवून शांतपणे झोपतो. इकडे रिधिमा सकाळी तिला चिडवते. आता पाहूया पुढे,
रि्धिमाने आणून दिलेला चहा आस्था शांतपणे पीत बसली होती. रात्रभर रडल्यामुळे आणि कालच्या दगदगीमुळे तिचं डोकं जड झालं होतं. हातातला गरम चहाचा कप तिने दोन्ही हातांनी घट्ट पकडला होता.
अवंतिका तिच्याकडेच पाहत होती. अचानक तिची नजर आस्थाच्या हाताकडे गेली.
हातातल्या हिरव्या बांगड्या तुटलेल्या होत्या... आणि मनगटावर एक ताजी जखम स्पष्टपणे दिसत होती.
ते पाहून अवंतिकाला काळजी वाटली...
"आस्था... हे काय झालं गं?कस काय एवढं लागलं???"
तिने त्याच काळजीने तिचा हात आपल्या हातात घेतला.
"ही तुझ्या हाताला एवढी मोठी जखम कशी झाली? आणि बांगड्या कशा फुटल्या?"
अवंतिकाचे एका मागून एक प्रश्न ऐकताच आता मात्र आस्थाचं हृदय जोरात धडधडू लागलं.
ती काही बोलणार, इतक्यात रिधिमाच्या डोक्यात पुन्हा खोडकरपणा जागा झाला.
"ओह्हो... म्हणजे असं आहे तर!"
ती मोठ्याने हसत म्हणाली.
"दादाने काल रात्री वहिनीला खूपच त्रास दिला वाटतं. बांगड्याही फुटल्या... आणि हे डोळे बघा ना... अजूनही सुजलेले आहेत. म्हणजे झोपायलाही दिलं नाही का, दादाने ?"
असं म्हणत तिने आस्थाला हलकासा कोपर मारला. ती एकदम कावरी बावरी झाली...
पण...इकडे मात्र आस्थाच्या चेहऱ्यावरचा उडलेला रंग, तिच्या डोळ्यांतली भीती आणि ओठांवरचं जबरदस्तीचं हसू पाहून अनुभवी अवंतिकाला मात्र उगाचच काहीतरी खटकून गेलं.
तिने लगेच रिधिमाकडे रागाने पाहिलं.
"रिधू!"
तिच्या आवाजात जरब होती, ती एकदम रागावून बोलली
"बस झालं आता... किती ती मस्ती...... नको तिला असं चिडवूस... नवीन आहे ती......"
मग तिने हॉलमध्ये बसलेल्या आपल्या नवऱ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा रिधिमाकडे वळत म्हणाली,
"त्यात स्वतःच्या बाबांसमोर असं काहीही बोलताना तुला अजिबात लाज वाटत नाही का?"
आता रिधिमा मात्र खट्याळपणे हसली.
"अगं आई, त्यात लाज कसली? बाबा तर माझे बेस्ट फ्रेंड आहेत."
असं म्हणत ती वडिलांकडे पाहून हसली.
"हो कि नाही रे ... अच्युत?"
तिने मुद्दाम बाबांना नावाने हाक मारत त्यांच्याकडे टाळीसाठी हात पुढे केला. तस त्यांनीही हसत तिच्या हातावर टाळी दिली... तस अवंतिका अजूनच बडबडल्या...
"ही मुलगी ना... कधीच सुधारणार नाही."
त्यावर तिला चिडवून दाखवत रिधिमा अजून खळखळून हसू लागली.
पण...त्या सगळ्यांच्या हसण्यातही आस्था मात्र हसू शकत नव्हती. तिच्या मनगटावरील जखम अजूनही ठणकत होती...आणि त्या जखमेपेक्षाही खोल जखम तिच्या मनात झाली होती...
"ही पोरगी ना... एक दिवस माझंच नाक कापणार आहे!"
अवंतिका कपाळावर हात मारत म्हणाली.
"स्वतःच्या वडिलांना कोणी नावाने हाक मारतं का? आणि तुम्ही..."
ती अच्युतरावांकडे वळली,
"तुम्हीही तिला साथ देता. टाळ्या काय देता तिच्याबरोबर?"
रिधिमाने निवांतपणे ताटातली रोल केलेली चपातीचा घास घेतला आणि डोळा मारत म्हणाली,
"चिल, अवंतिका डार्लिंग...! एवढं टेन्शन घेऊ नकोस. काही होत नाही."
तिचं बोलणं ऐकताच अच्युतरावांच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं.
"अगं कार्टे!"
अवंतिका पुन्हा रागावली..
"स्वतःच्या बापाला नावाने हाक मारतेस, तेवढं पुरेसं नव्हतं का? आता आईलाही 'अवंतिका डार्लिंग' म्हणायला लागलीस?"
"हो ना!"
रिधिमा उठत म्हणाली.
"थांब, आता दाखवतेच तुला..."
असं म्हणत तिने रिधिमाच्या पाठीवर हलकासा धपाटा मारला.
"आई..ग.... ग.....!"
रिधिमा लगेच नाटकी चेहरा करत म्हणाली,
"खूप लागलं ना मला...! वाहिनीसमोर माझी इमेज खराब करतेस तू."
सगळे तिची नौटंकी पाहून हसू लागले.
या सगळ्या गडबडीत मात्र आस्थाने अलगद आपल्या जखमी मनगटावर ओढणी ओढली. कुणाचं लक्ष पुन्हा त्या जखमेवर जाऊ नये म्हणून तिने घाईघाईने उरलेला चहा संपवला.
कप खाली ठेवत ती हळू आवाजात म्हणाली,
"आई... मी आवरून येते."
ती उठणार, इतक्यात अवंतिकाने पुन्हा तिला थांबवलं.
"अगं हो... पण तू अजून सांगितलंच नाहीस. ही जखम नेमकी झाली कशी ते ?"
क्षणभर पुन्हा आस्थाचा श्वास अडकला.
रात्रीचं सगळं तिच्या डोळ्यांसमोर झरकन आलं पण पुढच्याच क्षणी तिने स्वतःला सावरलं आणि ओठांवर खोटं हसू आणत म्हणाली,
"आई... बहुतेक झोपेत हात बेडच्या कडेला लागला असावा. मला सुद्धा सकाळी उठल्यावरच लक्षात आलं."
अवंतिकाने सुस्कारा सोडला.
"तुम्ही आजकालच्या मुली ना... स्वतःच्याच काही गोष्टींचं भान नसतं. बरं, जा आता. लवकर तयार हो. आणि त्या साहेबांनाही उठव. अजून किती वेळ झोपणार आहे तो ?"
"हो... आई."
आस्थाने फक्त मान हलवली.
ती वळली आणि हळूहळू आपल्या खोलीकडे निघाली.
हॉलमध्ये काही वेळापूर्वी सुरू असलेलं ते खेळीमेळीचं वातावरण पाहून तिच्या मनावरचं ओझं क्षणभर हलकं झालं होतं.
"किती छान आहेत हे सगळे..."
तिच्या मनात विचार आला.
"मग... रिधानच असा का आहे...?"
हा प्रश्न पुन्हा एकदा तिच्या मनाला स्पर्शून गेला.
ती त्याच्या खोलीत गेली आणि दार हलकेच बंद करून तिने नजरेने बेडवर पाहिलं.
रिधान अजूनही गाढ झोपला होता. रात्री जसा झोपला होता, तसाच.
त्याच्याकडे काही क्षण पाहत ती नकळत नकारार्थी मान हलवली. तिच्या डोळ्यांत क्षणभर वेदना दाटून आल्या.
एक दीर्घ श्वास घेत तिने स्वतःला सावरलं आणि शांतपणे बाथरूममध्ये निघून गेली...
###########################
आस्था खोलीत गेल्यानंतर अवंतिकाची नजर बराच वेळ पाठमोऱ्या आस्थाकडेच खिळून राहिली होती. तिच्या मनात मात्र विचारांचं वादळ उठलं होतं.
ती हळूच अच्युतरावांच्या शेजारी येऊन बसली आणि एकदम हळू आवाजात म्हणाली,
"अहो, ऐकलंत का...?"
अच्युतरावांनी तिच्याकडे पाहिलं आणि प्रश्नार्थक नजरेने विचारलं
"काय ग, काय झालं...?"
तस अवंतिकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली,
"मला ना.असं वाटतंय कि .. आस्था आपल्यापासून काहीतरी लपवत आहे..."
ते ऐकून अच्युतराव क्षणभर शांत राहिले.
"पण असं का वाटतंय तुला?"
"अहो, तिच्या चेहऱ्याकडे पाहिलंत का तुम्ही ? काल सासरी येताना किती आनंदी होती ती. चेहऱ्यावर नव्या नवरीचं तेज होतं... डोळ्यांत कितीतरी स्वप्नं होती. पण आज..."
ती बोलता बोलता थांबली.
"आज तिच्या चेहऱ्यावर ना आनंद आहे... ना उत्साह. डोळेही रडल्यामुळे सुजलेले दिसत होते. मला काहीतरी बरोबर वाटत नाही हो... काहीतरी चुकीचं घडलं असेल का??"
त्यावर मग अच्युतरावांनी तिच्या हातावर हलकेच हात ठेवला.
"अगं, नवीन आहे ती या घरात. आई-वडिलांना सोडून पहिल्यांदाच दुसऱ्या घरात आली आहे. थोडी घाबरलेली असेल, दडपणाखाली असेल. काही दिवस गेले की सगळं सुरळीत होईल."
पण त्यांच्या बोलण्यानेही अवंतिकाची काळजी काही कमी झाली नाही.
ती किंचित संकोचत म्हणाली,
"नक्की ना हो...?"
क्षणभर थांबून तिने मनातली भीती त्यांच्यासमोर व्यक्त केलीच.
"अहो... मला भीती वाटते, आपल्या रिधानने... काही केलं तर नसेल ना?"
हा प्रश्न ऐकताच अच्युतरावांच्या देखील चेहऱ्यावरचं हसू क्षणात गायब झालं.
रिधानचं नाव ऐकताच त्यांच्या मनातही क्षणभर काळजी दाटली.
तरीही त्यांनी स्वतःला सावरत शांतपणे उत्तर दिलं,
"नाही अवंतिका... तू उगाच जास्त विचार करतेयस. रिधान आता असं काही करणार नाही. आणि जर त्याला हे लग्न मान्य नसतं, तर त्याने लग्नालाच होकार दिला नसता."
अच्युतरावांनी तिला धीर दिला खरा...
पण त्यांच्या स्वतःच्या मनातही शंकेचं एक बीज रुजलं होतं.
इतक्यात त्यांची शांतता रिधिमाने मोडली.
ती हसतच म्हणाली,
"अरे रिलॅक्स, भाईलोग ..! एवढं टेन्शन का घेताय?"
तस दोघांचंही लक्ष तिच्याकडे गेलं.
"आय मिन दादा थोडा रागीट आहे, हे खरं आहे .. पण तो वहिनीसोबत नीटच वागेल आणि त्या मूर्ख साराने त्याला सोडलं... त्यात वहिनीचा काय दोष आहे?हे तर त्यालाही माहित आहे..."
रिधिमा काही क्षण थांबली आणि पुन्हा हसत म्हणाली,
"तुम्ही दोघंही उगाच पुढचं पुढचं विचार करत बसू नका. चला, आधी शांतपणे नाश्ता करा. वहिनीही आवरून बाहेर येईलच थोड्या वेळात..."
तस रिधिमाचं बोलणं ऐकून कुणीच काही बोललं नाही.
अवंतिका आणि अच्युतरावांनी एकमेकांकडे पाहिलं.
दोघांच्या मनात एकच प्रश्न होता...
"खरंच सगळं ठीक असेल ना...?"
पण त्या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी कुणाकडेच नव्हतं.
घरात शांतता पसरली...आणि सगळेजण काहीही न बोलता नाश्ता करू लागले.
रिधानच्या अश्या वागण्यामागे सारा तर नसेल ना???
काय असेल रिधानचा भूतकाळ?
आणि ही सारा कोण?
रिधान आस्थाला का त्रास देतो.?
काय वाटत तुम्हाला??
क्रमश :-
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
