Login

सख्या रे भाग एक

आस्थाच लग्न होत



तिचं घर पूर्णपणे तिच्या आवडीने सजवलं होतं. कारणच तस होत म्हणा, त्या घरातल्या लाडक्या लेकीचं आज लग्न होतं. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फुलांचा सुगंध पसरला होता. रंगीबेरंगी दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण घर उजळून निघालं होतं. अंगणात उभारलेला मंडप, फुलांनी सजवलेले दरवाजे, पाहुण्यांची लगबग, घरभर येणारा हास्याचा आवाज आणि दारापुढची भव्य रांगोळी पाहून प्रसन्न वाटत होत. तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फक्त आनंदच ओसंडून वाहत होता.

फुलांच्या सजावटीपासून ते मंडपाच्या प्रत्येक पडद्यापर्यंत... जेवणाच्या मेन्यूपासून ते तिच्या अंगावरच्या प्रत्येक दागिन्यापर्यंत... प्रत्येक गोष्ट तिच्या आवडीने निवडली गेली होती. जणू त्या घरात आज तिची प्रत्येक इच्छा पूर्ण होत होती.

आई-वडिलांनी आयुष्यभर जपलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात उतरलं होतं. त्यांच्या लाडक्या लेकीचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं.

पाठवणीची वेळ आली, तसं आतापर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असलेले हसणं क्षणात विरून गेलं. तिच्या आईच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. तिचे वडील तिला धीर देत होते; पण ते सुद्धा त्यांच्या डोळ्यांतलं पाणी व मनातलं दुःख प्रयत्न करून देखील लपवू शकत नव्हते . तिचे दोन्ही भाऊ हसण्याचा प्रयत्न करत होते, पण बहिणीला निरोप देताना त्यांचाही कंठ दाटून आला होता.

तिनेही आपल्या डोळ्यांतलं पाणी लपवत सगळ्यांचा निरोप घेतला. तिच मन जड झालं होतं..एवढी वर्ष राहिल्यानंतर हे घर सोडून जाणे तिला जीवावर आलं होत . पण त्याच वेळी मनात एका नव्या आयुष्याची गोड ओढही होती.

आता ती कोणाची तरी फक्त मुलगीच नव्हती..तर आता ती कोणाची तरी पत्नी झाली होती. हा विचार तिच्या मनात आला, आणि तिच्याही नकळत तिच्या गालांवर लाजेची गुलाबी छटा उमटली.

नव्या नवरीच्या मनात पहिल्या रात्री जी गोड धाकधूक असते... जी अनामिक ओढ असते... जी हजारो प्रश्नांनी भरलेली उत्सुकता असते... अगदी तसंच काहीसं तिच्याही मनात सुरू होतं.

लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीच्या गोष्टी... हनिमूनचे किस्से... नवऱ्याने केलेलं पहिलं कौतुक... पहिल्यांदा हातात हात घेणं... हे सगळं तिने आजवर फक्त चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये आणि नुकत्याच लग्न झालेल्या तिच्या मैत्रिणींच्या तोंडून ऐकलं होतं.

त्या आठवणी मनात येताच ती नकळत हसायची... आणि पुढच्याच क्षणी लाजून स्वतःचाच चेहरा दोन्ही हातांनी झाकून घ्यायची.

मनात असंख्य स्वप्नं होती...तिच्या....ती स्वप्नं होती तिच्या होणाऱ्या संसाराची... तिच्या जीवनसाथीची....आयुष्यभर तिचा हात घट्ट धरून साथ देणाऱ्या त्या व्यक्तीची.

तिच्या पोटात जणू हजारो फुलपाखरं उडत होती. हृदयाची धडधड प्रत्येक क्षणाला वाढत होती. तिच्या मनात गोड गुदगुल्या होत होत्या. प्रत्येक क्षण तिच्यासाठी नवीन होता... प्रत्येक भावना नवीन होती... प्रत्येक श्वास नव्या आयुष्याच्या स्वागतासाठी आतूर झाला होता.

कारण...हे सगळं तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत होतं. त्याबद्दल तिला अजिबात कल्पना नव्हती...तिच्या आयुष्यात तिचे भाऊ सोडून कोणता मुलगा आलाच नव्हता.

पण ज्या स्वप्नांच्या दुनियेत ती हरवली होती, त्याच स्वप्नांचा चुराडा होण्यासाठी नियतीने अवघे काही तास राखून ठेवले होते...




तर ही आहे आपल्या कथेची नायिका गोड आस्था गोडबोले.....नावाप्रमाणेच प्रत्येकाबद्दल मनापासून आस्था असणारी...देवाने तिला रूप, गुण आणि सुरेल आवाजाचं असं सुंदर वरदान दिलं होतं की ती गाऊ लागली की ऐकणारा प्रत्येकजण क्षणभर मंत्रमुग्ध व्हायचा.असं वाटायचं जणू काही साक्षात सरस्वतीच तिच्या कंठात वास करत होती.

तिचे ते लांबसडक काळेभोर केस... दुधासारखी गोरी कांती... बोलके, टपोरे डोळे... गुलाबाच्या पाकळ्यांसारखे लालचुटूक ओठ... आणि चेहऱ्यावर कायम खुलणारं निरागस हास्य...तिच्या कडे पाहून कुणालाही वाटावे कि देवाने तिला जणू फुरसतीत घडवलं होतं.

पण तस पाहिलं तर तिचं खरं सौंदर्य तिच्या चेहऱ्यात नव्हतं...तर ते तिच्या मनात, स्वभावात होतं.

ती आई-वडिलांच्या लाडात वाढलेली असली, तरी आस्था कधीच हट्टी नव्हती. उलट परिस्थिती समजून घेणारी, प्रत्येकाची काळजी करणारी आणि दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारी होती.

रस्त्यावर दिसणाऱ्या एखाद्या भुकेल्या मुलाकडे तिची नजर गेली की तिच्या हातातला डबा कधी त्या मुलाच्या हातात जायचा, हे तिचंच तिला कळायचं नाही. त्या मुलांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहूनच तिचं मन भरून यायचं.

कुणाच्याही डोळ्यांत अश्रू पाहिले की तिचेही डोळे नकळत पाणावायचे.

दुसऱ्याचं दुःख तिला स्वतःचं वाटायचं...

आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवणं, हाच तिचा सर्वात मोठा आनंद होता.

अशी ही निरागस... प्रेमळ... मनाने श्रीमंत असलेली आस्था...

आज नव्या नवरीच्या रूपात आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सजून बसली होती.

हातभर हिरव्या चुड्या... गळ्यात मंगळसूत्र... कपाळावर कुंकू... आणि मनातं खूप सारी गोड स्वप्नं...

तिच्या डोळ्यांत आज एक वेगळीच चमक होती.

ती वारंवार दरवाज्याकडे पाहत होती.

पण हाय रे..! ज्याची ती एवढ्या आतुरतेने वाट पाहत होती...तो अजूनही आलाच नव्हता.

पण थोड्याच वेळापूर्वी तिची नणंद रिधिमा त्यांच्या खोलीत आली होती. जाता-जाता ती तिला मनसोक्त चिडवून गेली होती.

"काय मग, वहिनी...?"

ती खट्याळपणे हसत म्हणाली.

"आज तर तुमची पहिली रात्र...म्हणे तुमचा मधुचंद्र... आणि तुला सांगू का... आज दादाचं काही खरं नाही बरं का! एवढी सुंदर दिसतेयस तू... तो तर तुझ्यावर एकदम फिदा होणार. त्यामुळे जरा स्वतःला जप हं...आणि हा दुधाचा पेला.. दोघीनी तू एक घोट मि एक घोट असं करून दूध प्या हा...."

रिधिमाचं ते बोलणं आठवताच आस्थाच्या गालांवर पुन्हा गुलाबी लाली पसरली.

तिने तशीच लाजून मान खाली घातली.

खरं तर रिधिमाचं ते चिडवणं तिलाही आवडत होतं. पण नवी नवरी असल्यामुळे लाजन्याशिवाय तिला दुसरं काही करताच अथवा बोलता आलं नाही ..ती गेल्यानंतरही तिचे शब्द आस्थाच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होते.

नकळत तिच्या ओठांवर हसू उमटलं.

पण...

क्षणाक्षणाला वेळ पुढे सरकत होती. इकडे भिंतीवरच्या घड्याळाने बारा वाजल्याची चाहूल दिली...

आणि तिच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू काळजीत बदलू लागलं.

"अजून कसे आले नाहीत..हे.....?"

तिने स्वतःशीच हळूच पुटपुटत पुन्हा एकदा दरवाज्याकडे नजर टाकली...


एव्हाना त्या जड लेहेंग्यात आणि खूप साऱ्या दागिन्यामुळे आस्था पुरती वैतागली होती. दिवसभराच्या लगबगीमुळे तिच शरीरही थकून गेलं होतं. गळ्यातले दागिने, हातभर बांगड्या, कमरेभोवतीचा जड लेहेंगा... सगळंच आता तिला बोचू लागलं होतं. त्यात एवढं जड घालून राहायची तिला सवय पण नव्हती.

"कधी एकदा हे सगळं काढून आराम करते..."

असा विचार तिच्या मनात क्षणभर येऊन गेला.

पण लगेचच तिला तिची जिवलग मैत्रीण राधा आठवली.
लग्नाच्या आदल्या दिवशीच राधा तिला चिडवत म्हणाली होती,

"आस्था... लग्नानंतरची पहिली रात्र म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला खूप खास क्षण असतो. याच दिवशी दोन अनोळखी माणसं खर्‍या अर्थाने एकमेकांची होतात. आयुष्यभराच्या प्रवासाची ती पहिली सुंदर पायरी असते. त्यामुळे तो प्रत्येक क्षण मनापासून जगायचा."

राधाचे ते शब्द आठवताच आस्थाच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं.

"मग... कपडे बदलून झोपू का? ते आले की उठेन..."

तिने स्वतःशीच विचार केला.

पण पुढच्याच क्षणी राधाचं दुसरं वाक्य आठवलं...

"अगं वेडे... नवरीचा सगळ्यात सुंदर लूक पाहण्याचा पहिला हक्क नवऱ्याचाच असतो आणि हा शृंगार उतरवण्याचा देखिल.... समजतंय ना तुला मला कायम बोलायचं आहे ते..."

राधाच्या अश्या बोलण्याने तिने तेव्हा तिला दाटावलं पण आता तो विचार मनात येताच तिच्या गालांवर लाजेची गुलाबी छटा पसरली. तिने अलगद आपल्याची दोन्ही तळहातांनी आपलाच चेहरा झाकला आणि स्वतःशीच हळूच हसली.

क्षणभरापूर्वीचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला होता. नकळत तिचे विचार त्याच्याभोवती फिरू लागले.

तसं पाहिलं तर त्यांचं अरेंज मॅरेज होतं. घरच्यांनी पसंत केलेलं.

त्यामुळे त्याच्याबद्दल तिला फारसं काहीच माहीत नव्हतं.

तिचा तिच्या वडिलांवर अपार विश्वास होता. त्यांनी ज्या मुलाची निवड केली, तो नक्कीच तिच्यासाठी योग्य असेल, याची तिला पूर्ण खात्री होती. म्हणूनच त्यांनी सांगितलेल्या मुलाशी तिने कोणताही प्रश्न न विचारता, डोळे बंद करून लग्न केलं होतं.

तिच्यासाठी बाबांचा निर्णय म्हणजेच तिचं सुख होतं.

आणि आज...

त्याच अनोळखी व्यक्तीसोबत आयुष्यभराची नवी वाट चालायला ती मनापासून तयार होती. पण ज्याच्यासोबत तिला हे सगळ करायचं होत.. त्याचा मात्र अजूनही पत्ताच नव्हता.


काय वाटत आस्थाची स्वप्ने पूर्ण होतील कि....

क्रमश :

पाहिला भाग कसा वाटला नक्की कळवा..


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →