Login

सख्या रे... भाग सहा

रिधानची खूप चिडचिड होते....

मागील भागात आपण पाहिलं कि,आस्था नव्या नवरीच्या रूपात तयार होऊन बाहेर येते. तिचं रूप पाहून रिधिमा आणि अवंतिका तिची दृष्ट काढतात, तर अच्युतराव तिला मुलीसारखं प्रेम आणि आधार देण्याचं आश्वासन देतात. या प्रेमळ वातावरणामुळे आस्थाच्या मनाला थोडा दिलासा मिळतो. तेवढ्यात रिधान बाहेर येतो.आता पाहूया पुढे..,


"अरे काय आहे हे...? सकाळी सकाळी काय बाजार भरलाय?"

त्याचा आवाज ऐकताच सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या.

"अरे... उठलास?"

अवंतिका हसत म्हणाली.

"ये, आम्ही नाश्ता करतोय. तूही ये आमच्यासोबत."

रिधिमा तर त्याची वाटच पाहत होती. ती लगेच खोडकरपणे म्हणाली,

"ये ना, दादा... बघ, वहिनी किती छान तयार झाली आहे. आज तर दोन घास जास्तच खाशील तू!"

रिधानने तिच्याकडे एक रागाचा कटाक्ष टाकला, तस त्याची नजर पाहून रिधिमा लगेच गप्प बसली.

इकडे आस्था मात्र संपूर्ण वेळ मान खाली घालून बसली होती.एकदाही तिने रिधानकडे पाहण्याचं धाडस केलं नाही.रात्री घडलेला प्रसंग अजूनही तिच्या मनातून गेला नव्हता. त्याच्याबद्दल तिच्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली होती.

रिधान काहीही न बोलता येऊन तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसला.तो शांत होता...पण त्याच्या मनात असणारी धुसफूस आस्थाला स्पष्ट जाणवत होती.

अवंतिकाने त्याच्या ताटात गरमागरम उपमा वाढला.

"रिधान," त्या प्रेमाने म्हणाल्या,

"संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा ठेवली आहे घरात . तोपर्यंत तुम्ही दोघांनी आराम करा."

तसा रिधानने चमचा ताटातच आपटला...

"आई... आता या पूजेची काय गरज आहे? लग्न झालं ना? मग पुन्हा हे सगळं कशाला?झाल्या कि रितीभाती आता अजून काय बाकी??"

त्याच्या आवाजातला वैताग कुणाच्याही लक्षात यावा इतका स्पष्ट होता.

तस अवंतिका परिस्थिती ओळखून शांतपणे म्हणाल्या,

"अरे बाळा, अस कस बोलतोस? लग्नानंतर पूजा करणं ही आपल्या घराण्याची परंपरा आहे, पूजा झाली कि त्यानंतर देवदर्शनाला जायचं असतं... माहित नाही का तुला.."

रिधानने काही उत्तर दिलं नाही.तो नुसता उपम्यात चमचा फिरवत राहिला. इतक्यात रिधिमाला पुन्हा एकदा खोडकरपणा सुचला.

"आणि त्यानंतर..."

ती मिश्कीलपणे हसत म्हणाली,

"तू आणि वहिनी हनिमूनला जाऊ शकता."

यावर न थांबता ती डोळा मारत पुढे म्हणाली,

"काय मग... कुठे जायचं ठरवलं आहे तुम्ही दोघांनी?"

ते शब्द कानावर पडताच रिधानचा चेहरा क्षणात कोरा झाला.त्याने हातातला चमचा इतक्या जोरात दाबला की तो चमचा तर वाकलाच पण त्याच्या हाताला देखील लागलं...तरीही त्याच्या मनात उसळणारा राग तो कसाबसा आवरत होता.

हे कुणाच्याही लक्षात आलं नाही...

पण...

त्याच्या अगदी शेजारी बसलेल्या आस्थाने मात्र त्याच्या प्रत्येक हालचालीतला राग स्पष्टपणे ओळखला होता.. ते सगळ पाहून तिचं हृदय पुन्हा एकदा धडधडू लागलं होत...
.

रिधानच्या चेहऱ्यावरचा वाढता वैताग पाहताच अवंतिकाने रिधिमाकडे रागाने पाहिलं.

"रिधू... बस आता. जरा शांत बसशील का?"

रिधिमाने लगेच दोन्ही हात ओठांवर ठेवले आणि नाटकीपणे म्हणाली,

"ओके... मी काहीच बोलत नाही."

तिची ती अॅक्टिंग पाहून क्षणभर वातावरण हलकं झालं.
पण रिधानच्या चेहऱ्यावरचा राग काही कमी झाला नव्हता.

तो ताटाकडे पाहतच म्हणाला,

"आई... खरंच गरज नसेल तर ही पूजा कॅन्सल कर."

यावेळी त्याच्या आवाजातला वैताग स्पष्ट जाणवत होता. ते ऐकून हॉलमध्ये काही क्षण शांतता पसरली. आणि अवंतिकाच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं..

अच्युतरावांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवलं आणि शांतपणे ठाम आवाजात म्हणाले,

"रिधान..."

त्याने नाखुशीनेच बाबांकडे पाहिलं.

"काय हे? आईने इतक्या मनापासून पूजा ठेवली आहे. त्यात नकार देण्यासारखं काय आहे?"

आता मात्र रिधानने त्रासिकपणे एक वैताकून सुस्कारा सोडला.

"बाबा... कालपासून खूप दमलोय, थकलोय काहीही करायची इच्छा नाही आहे म्हणून म्हणालो."

तस अच्युतराव त्याच्याकडे काही क्षण पाहत राहिले आणि पुन्हा त्याच टोनमध्ये शांत आवाजात म्हणाले..,

"रिधान, एका दिवसाने काही फरक पडत नाही. घरातल्या काही गोष्टी आपल्या मनासाठी नाही, तर घरच्या माणसांच्या आनंदासाठी करायच्या असतात... ती नवीन मुलगी किती स्वप्ने घेऊन आली असेल.. काय वाटेल तिला..."

हे बोलताना त्यांच्या आवाजात अजिबात राग नव्हता...पण त्यांच्या मुलाला समजावणे गरजेचे त्यांना त्या वेळेस वाटले...

त्यावर रिधानने काही उत्तर दिलं नाही.त्याने फक्त होकारात मान हलवली आणि उपमा तसाच चिवडत राहिला.

थोड्याच वेळात अच्युतरावही शांतपणे उठले आणि बाहेरच्या अंगणात फेरफटका मारण्यासाठी निघून गेले.

इकडे अवंतिकाने सगळ्यांची ताटे गोळा केली.

"मी किचन आवरते."

असं म्हणत त्या आत निघून गेल्या.

नाश्ता झाल्यामुळे रिधिमाही उठली.

"मी पण माझी रूम आवरते. नाहीतर आई पुन्हा माझ्यामागे लागेल."

ती हसत म्हणाली आणि वरच्या मजल्यावर निघून गेली.

आणि काहीच क्षणात संपूर्ण हॉल शांत झाला....आता
त्या मोठ्या हॉलमध्ये फक्त दोनच माणसं उरली होती.
आस्था आणि रिधान..

ते आस्थाचं हृदय पुन्हा वेगाने धडधडू लागलं.
रात्रीचा तो प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला होता.. तिला समजत नव्हतं इथून उठून जावं कि तिथेच बसाव..
ती तिची मान खाली घालून शांत बसली होती...तर रिधानच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.

आणि त्या शांततेचं ओझं...दोघांनाही असह्य होत होतं.

रिधानने आजूबाजूला एकदा नजर फिरवली. घरातले सगळे आपापल्या कामाला निघून गेले होते.

ते पाहून तो अचानक रागाने आस्थाकडे वळला.

"बघितलंस...?" तो दात-ओठ खात म्हणाला.

"तुझ्यामुळे मला किती गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात."

ते ऐकून आस्था दचकली. तिला कळतच नव्हतं ह्यात तिचा काय दोष आहे...त्याने तिच्याकडे तिरस्काराने पाहिलं.

"सगळे गेले ना आता...? तूही जा. मला शांतपणे नाश्ता करू दे... इथे माझ्या समोर बसून मला अजून राग आणून देऊ नकोस..."

त्याच्या आवाजातला राग तिच्या हृदयावर पुन्हा एकदा घाव घालून गेला.आस्थाच्या डोळ्यांत क्षणार्धात पाणी दाटून आलं.

एकही शब्द न बोलता ती तिथून उठली.तिने त्याच्याकडे पुन्हा पाहण्याचंही धाडस केलं नाही आणि जवळजवळ धावतच ती खोलीकडे निघून गेली.

इतक्यात किचनमधून बाहेर आलेल्या अवंतिकाच्या नजरेस हा सगळा प्रकार पडला.

आस्था अश्रू आवरत खोलीत जाताना पाहून त्या पटकन रिधानजवळ आल्या.

"रिधान..."

त्यांनी काळजीने विचारलं,

"आस्था अशी रडत रडत का गेली?"

रिधानने नजरेला नजर न देता ताटात चमचा फिरवला.

"माहित नाही."

तो कोरड्या आवाजात म्हणाला.

" असेल तिला काही काम.... आता काय तिला बांधून ठेवू का मी?"

त्याचा चिडका स्वर अवंतिकाच्या कानावर पडताच त्या नाराज झाल्या.

"रिधान, उगाच चिडचिड करू नकोस."

त्या शांतपणे ठाम आवाजात म्हणाल्या.

"आणि त्या बिचाऱ्या पोरीला विनाकारण त्रास देऊ नकोस. कालच या घरात आली आहे ती... तिला कसलाच त्रास नको व्हायला...."

ते ऐकून रिधानचा संयम सुटला.तो अचानक खुर्चीवरून उठला.

"वा...!"

असं म्हणून तो अवंतिकाकडे पाहून उपहासाने हसला.

"त्या परक्या पोरीचा त्रास तुम्हाला लगेच दिसतोय..."

क्षणभर थांबून तो आईकडे पाहत म्हणाला,

"पण स्वतःच्या मुलाच्या मनात काय चाललंय, ते मात्र कधीच दिसल नाही."

इतकं बोलून त्याने हातातला चमचा रागाने ताटात आपटला.

खण्ण...! त्या आवाजाने क्षणभर अवंतिका दचकली
पण तेवढ्यात रिधान तसाच वळला आणि भराभर बाहेर निघून गेला.

"रिधान... अरे ऐक तरी...!"

अवंतिकाने त्याला हाक मारली.

पण...त्याने मागे वळूनही पाहण्याचे सुद्धा कष्ट घेतले नाही. बाहेरचा दार बंद होण्याचा आवाज झाला आणि पुन्हा एकदा घरात शांतता पसरली.

अवंतिका काही क्षण जागच्या जागी उभ्याच राहिल्या. त्यांच्या डोळ्यांत काळजी स्पष्ट दिसत होती.

"काय होईल या मुलाचं, देवा...? आम्ही जे काही केलं... ते त्याच्या भल्यासाठीच केलं. पण हे त्याला कधी समजणार...?आणि त्यासाठी त्याने त्या बिचाऱ्या आस्थाला जबाबदार धरू नये म्हणजे झालं.... देवा आता तुझाच काय तो आधार..."

मनातल्या मनात देवाला साकडं घालत त्यांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला.डोळ्यांच्या कडा अलगद पुसल्या...आणि स्वतःला सावरत पुन्हा किचनकडे वळल्या.


रिधानच्या वागण्यामागच कारण काय असू शकत??


क्रमश :-

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →