सून तें सखी - भाग -1

Sakhi

सून ते सखी - भाग -1


सुमित्रा लग्न होऊन सासरी आल्याच्या पहिल्या दिवशीचं कुसुमताई सुमित्राला स्पष्ट बोलल्या होत्या.

"सुमित्रा, या घरात दोनचं नियम आहेत, मोठ्यांचा मान राखायचा आणि घराला घरपण द्यायचं."

सुमित्रा मान खाली घालून म्हणाली होती, "हो आई, तुम्ही सांगाल तसं वागेन."

आणि तिने खरंच तसंच वागायला सुरुवात केली, पहाटे पाचला उठणं, देवपूजा, स्वयंपाक, सगळ्यांचे डबे, सासऱ्यांचं औषध, नवरा प्रशांतचे कपडे इस्त्री करून ठेवणं, सगळं ती अगदी प्रेमाने करायची.


कुसुमताई लोकांना अभिमानाने सांगायच्या, "आमची सून अगदी संस्कारी मिळाली बघा, कधीचं उलट उत्तर देतं नाही, सांगितलेलं सगळं मुकाट्याने ऐकते."


सुमित्राला हे ऐकून बरं वाटायचं, संस्कारी असणं म्हणजे चांगलं असणं, असं तिला वाटायचं.


सुमित्रा सासूबाई म्हणतील तसंच वागत राहिली, लग्नाला पाच वर्ष झाली, एक मुलगी झाली, सुमित्राला निर्णय घेण्याचे अधिकार नव्हते, सासूबाई म्हणतील तिचं पूर्वदिशा असचं घरात चालू असे.


दिवस जातं राहिले, कुसुमताई म्हणतील तसंचं सुमित्रा वागत राहिली, सुमित्राची मुलगी चार वर्षाची होतं आली होती, तिला शाळेत घालायचं होतं.


सुमित्रा नवऱ्याला म्हणाली, "प्रशांत, आपण आर्याला इंग्लिश मीडियममध्ये टाकूया का ? ती खूप हुशार आहे. तिला लवकर कळतं सगळं."


प्रशांत म्हणाला, "आईला विचारावं लागेल, तिला मराठी शाळाचं आवडते."


दुसऱ्या दिवशी सुमित्राने हिम्मत करून कुसुमताईना विचारलं.

"आई, आर्याच्या शाळेबद्दल बोलायचं होतं."

"बोल."

"मला वाटतं तिला इंग्लिश मीडियममध्ये टाकावं, फी जास्त आहे पण मी शिकवणी घेऊन मदत करेन."


कुसुमताईनी भाजी चिरता चिरता हातातली सुरी खाली ठेवली आणी चिडून बोलू लागल्या....."काय गरज आहे इंग्लिशची? आमची मुलं मराठी शाळेत शिकून मोठी झाली नाहीत का? एवढं इंग्लिशचं फॅड कशाला? आणि तू शिकवणी घेणार? घर सोडून चार घरी जाणार?"


सुमित्रा म्हणाली, "आई, फॅड नाही, काळ बदललाय अहो, मराठीचा अभिमान मलाही आहे, पण तिला दोन्ही आलं पाहिजे ना आणि मी घरातचं मुलांना शिकवेन, बाहेर कुठे जाणार नाही."


"तू मला शिकवू नकोस, या घरात निर्णय माझा असतो, तुला काय कळतंय संसारातलं?" कुसुमताई ओरडून बोलल्या.


सुमित्राचा पहिल्यांदा आवाज थोडा चढला, ती म्हणाली "आई, पण आर्या माझी पण मुलगी आहे ना,  तिच्याबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही का?"


कुसुमताई जोरात ओरडल्या, "प्रशांत! अरे बघ तुझ्या बायकोकडे, कशी उलट बोलते, संस्कारी म्हणता म्हणताही तर उद्धट निघाली, आज शाळेवरून बोलतेयं, उद्या घर विकायला काढेल."


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - संस्कारी असणारी सुमीत्रा जेव्हा आपल्या हक्कासाठी बोलते तेव्हा ती उद्धट होते, सुमि ह्या सगळ्यातून कशी बाहेर पडते तें.)
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →