साडी पुराण - भाग १
आता नाव वाचूनच काही बायका खुश झाल्या असतील आणि पुरुषांच्या काळजात मात्र धस्स झालं असेल. तर हे साडी पुराण काही नवीन नाही. साडी म्हणजे सगळ्याच बायकांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. आता रीमा म्हणजेच अनुरागची बायको, साडी खरेदीला जायचं म्हणून नवऱ्याच्या मनाची तयार करत होती. तो कसा बसा बिचारा तयार झाला, पण तिला तो आधीच चांगलं बजावून सांगत होता.
"रीमा.. चल अग! किती उशीर करतेस. हो आणि मी आत्ताच सांगतोय, आपण एकाच दुकानात जाणार आहोत; त्यामुळे मला सारखं सारखं चला दुसरीकडे बघू इकडे आवडत नाहीये, असे तर अजिबात म्हणायचे नाही. मी काही तुला दुसऱ्या दुकानात नेणार नाहीये; त्यामुळे एकाच दुकानात साडी पसंत करायची. हो आणि एकदाच घे काय ते.. पुन्हा घरी गेल्यावर म्हणू नको, की नाही आवडली.. ह्या साडीपेक्षा ती दुसरीच छान होती. मी काय पुन्हा पुन्हा तुला साडी बदलण्यासाठी घेऊन जाणार नाहीये. आणि पटकन आवरायचं.. समजलं. जास्त वेळ लावायचा नाही, नाहीतर मी तिथून उठून बाहेर निघून जाईन."
झालं, घरातून निघतानाच अनुरागने रीमाला चांगल भल मोठ लेक्चर दिल होत. कारण त्याला माहिती होतं, साडी खरेदी म्हटले की बायका जाम खुश असतात. अंगात एकशे चार ताप असला तरी काय उत्साह संचारतो बायकांच्या अंगात काय माहिती. नुसत्या साडी खरेदीचे नाव काढले तरी आनंद गगनात मावत नाही इतक्या खुश असतात.
रीमा एक अतीसुंदर मुलगी, अगदी स्वप्नातील परीच होती अनुरागच्या. अनुराग पण तसा कमी नव्हता, तो ही खुप छान होता. दोघेही कॉलेज मधले मित्र होते आणि ह्या मैत्रीच रूपांतर प्रेमात कधी झालं हे त्या दोघांनाही समजले नाही आणि त्यामुळेच त्याला तिचा स्वभाव चांगलाच माहिती होता. दोघांनी घरच्यांच्या संमतीने लग्न केले आणि रीमा कायमस्वरूपी अनुरागची झाली.
आता साडी खरेदी म्हटले, की तुम्हांला माहितीच आहे.. बायकांना कित्ती आवडते. नुसते दुकानात जायचे म्हटले तरी आम्हा बायकांना खुप आनंद होतो. अगदी झोपेतून उठल्या बरोबर चला म्हटले तरी लगेच तयार होतो. साडी म्हणजे जीव की प्राण आहे आमचा, मग भलेही आम्ही त्या कपाटात नुसत्या मांडून ठेवू किंवा कधीतरीच नेसणार असू, पण प्रत्येक सणाला साडी तर हवीच असते.
आता तर पाडवा येणार होणार होता, मग काय मोठ्ठी खरेदी. रीमाने कसेबसे अनुरागला तयार केले होते साडी खरेदी करायला सोबत जायचे म्हणून, कारण पुरुषांना बायकोसोबत साडी खरेदीला जायचे म्हणजे मोठे संकट वाटते आणि यात फारसा काही रस नसतोच.
अनुराग आणि रीमाचे नवीनच लग्न झालेले आणि हा त्यांचा पहिलाच सण होता; त्यामुळे त्याला जावेच लागणार होते. रीमा आणि अनुराग दोघेही आज दुपारीच जाणार होते खरेदीला; त्यामुळे रीमाने दुपारच्या जेवणात सगळे अनुरागच्या आवडीचे पदार्थ बनवले होते. घ्या! म्हणजे त्याला मस्का लावायला इथूनच सुरुवात झाली होती.
बघुया आता पुढे काय होते.
क्रमशः
