"प्च... तुला ना काहीही सांगा, तू तुझंच खरं म्हणणाऱ्यातली आहे." अगस्त्य नाक मुरडत म्हणाला.
"हो, कारण मला माहिती असतं माझंच खरं आहे." गाथिकाने जीभ दाखवून परत त्याला चिडवले.
"तुझ्यात इतका कॉन्फिडन्स आहे म्हणून लॉयर होणार आहेस ना! म्हणजे कसं, इतक्याच कॉन्फिडन्सने न्यायलयात तुला खोटं बोलता येईल... राईट?" त्यानेही तिची दुखरी नस पकडून तिला अचूक टोला लगावला.
"उडव! जितकी टर उडवायची आहे तितकी उडव; पण एखाद्या वेळी फसलास ना, तर माझ्या मदतीशिवाय तुझी धडगत होणार नाही." गाथिकाने ओठ तिरपे केले.
"नाही रे भाई, असला श्राप नको देऊ. कोर्टाची पायरी नकोच." अगस्त्यने पटकन कानाला हात लावला.
"ह्म्म. तुझंही बरोबर आहे; पण अशी परिस्थिती निर्माण झालीच तर माझ्याकडे येशील नको आणि आलाच तर मग जोपर्यंत मला दंडवत घालून, माझे पाय धुवून, माझ्या पायाचं तीर्थ तू पिणार नाहीस ना; तोपर्यंत मी तुझी केस हातातही घेणार नाही." ती नाकाचा शेंडा उडवत म्हणाली.
"वाट बघ." त्याने तिच्या डोक्यात टपली मारली आणि तिने तोंड वाकडे केले.
बडबड करतच दोघेही कॅन्टीनमध्ये पोहोचले. त्यांना बघून त्यांचे मित्र डोळे बारीक करून उभे राहिले.
"किती वेळ?" तनिशा गाल फुगवून म्हणाली.
"सॉरी." त्याने खुर्चीवर बसतच कान पकडले. त्याच्याच बाजूला गाथिकाही बसली.
लागोपाठ सगळेच आपापल्या जागेवर बसले.
"काय सॉरी? आम्ही भाग घेणार नव्हतो या स्पर्धेत... तुझ्यावर उपकार करून आम्ही पार्टिसिपेट केलं आणि ऐनवेळी तूच गायब..." प्रनिश डोळे फिरवून म्हणाला.
"एक मिनिट, ही उपकाराची भाषा काय वापरतोस? तुमच्या लेक्चरला कमी स्टुडंट्स असले तर तुम्ही मला एक्स्ट्रा स्टुडंट म्हणून घेऊन जाता ना?" अगस्त्य बोट नाचवत म्हणाला.
"हो आणि तूही तेव्हा उपकाराचीच भाषा करतो." सौंदर्या म्हणाली. तसे त्याने ओठ दाबून घेतले.
"आणि फक्त त्यावर समाधान भागत नाही तुझं! तू ट्रीटही वसूल करतोस आमच्याकडून..." मयंक म्हणाला आणि सगळ्यांनी त्याला दुजोरा दिला.
"ते कॉम्प्लिमेंटरी असतं." अगस्त्य ओठांचा चंबू करून म्हणाला.
"हो का?" गाथिकाने त्याच्यावर नजर रोखली.
"हो." तो हट्टाने म्हणाला आणि सगळ्यांनी हसतच त्याच्याकडे बघून नकारार्थी मान हलवली.
त्यानंतर सगळे तिथेच नाश्ता करू लागले.
..........
..........
स्थळ: अधिराची खोली
राजवीर, विराज आणि अधिरा तिघेही पलंगावर बसले होते.
"कशाला गेला होतास अधिराला तिथे घेऊन?" राजवीरने विराजला जाब विचारला.
"ते मी..." विराज ततपप करू लागला.
"आता काय ततपप करतोस? आणि तू वेदर फोरकास्ट बघितलं नव्हतं का?" राजवीरची धारदार नजर अजूनही विराजवर स्थिर होती.
"बघितलं होतं आणि मी अधिराला नकारसुद्धा दिलेला पण..." विराजने मान खाली घातली.
"पण काय?" राजवीरने डोळे बारीक केले.
"काही नाही." विराज गप्प झाला, तशी अधिरा खुदकन हसली.
"तू काय त्याच्यावर हसतेस? तुला कळत नाही का? अशी कशी तू हट्टी... आज नाही गेली असतीस तर काही झालं असतं का?" तिला हसताना बघून राजवीर अधिरावरही भडकला.
त्याचे हातवारे बघून तिने तोंड बारीक केले.
"असा चेहरा नको करू? नेहमी असा भोळा चेहरा केला की मी शांत होतो; पण आज नाही." त्याने आधीच तिला बजावले.
आता तिने विराजकडे पाहिले आणि काही हातवारे केले.
"तू जर माझी मदत केली नाही, तर मी तुझं सिक्रेट दादाला सांगेन." तिने हातवारे करून विराजला धमकी दिली.
"कोणतं सिक्रेट? कशाबद्दल बोलत आहात तुम्ही दोघं?" राजवीरने डोळे बारीक करून दोघांकडे साशंक नजरेने पाहिले.
"काही नाही." अधिराने भुवया उडवल्याच होत्या की विराजने हातवारे करून अधिराला गप्प केले आणि विषयाची टाळाटाळ केली.
"राज..." राजवीरने सूर ओढला.
"अरे खरंच काही नाही आणि तू काय अधिराला ओरडण्यात वेळ वाया घालवतोय. आपल्या माईमचं काय करायचं?" विराज सपशेल विषय बदलत होता.
"तू विषय बदलू नको." राजवीरने त्याला दम दिला आणि अधिरा विराजच्या फजितीवर परत ओठ दाबून हसली.
"अधिरा, आजपासून तू परत असा हट्ट केलास तर बघ." राजवीरने तिचा कान खेचून तिला दटावले.
"दादा, तू आता गप्प राहिला नाही ना तर मी तुझं सिक्रेट रिव्हिल करेन." अधिराने आता राजवीरला धमकी दिली. तसा राजवीरचा चेहरा पांढरा पडला.
"कोणतं सिक्रेट?" विराजने अधिरा आणि राजवीरकडे बघून विचारले.
"काही नाही." राजवीरने लगेच विषय टाळला आणि अधिराकडे बारीक डोळे करून बघितले.
"अधिरा, खूप आगाऊ झाली आहेस तू..." राजवीरने हातवारे केले. तसे तिने हसतच जीभ दाखवून चिडवले आणि तिघेही खळखळून हसले.
"ह्म्म. तू बोल नाटकाचं काय?" राजवीरने विराजला विचारले.
"अरे मी अधिराला घेऊन आरे वारे बीचकडे त्या मंजुषाला भेटायलाच गेलो होतो. ती तिकडेच राहते ना..." विराज बोलू लागला, तशी अधिराची नजर त्याच्या ओठांवर स्थिरावली.
ओळखीच्या व्यक्तींच्या ओठांच्या हालचाली वाचून ते काय बोलत आहेत, हे ओळखण्याचे कौशल्य तिला अवगत होते. म्हणून ती आता शांतपणे लिप रिडींग करत होती.
"बरं मग, पुढे?" राजवीरने विचारले.
"तिला कावीळ झाली." विराज नाराज होत म्हणाला.
"काय?" राजवीरचे डोळे विस्फारले. अधिरालाही धक्का बसला.
"हो यार..." विराज म्हणाला.
"अरे यार पण आता आपल्या माईमचं काय होणार? ऐन वेळी रिप्लेसमेंट कशी मिळेल?" राजवीर वैतागून केसांत हात फिरवून म्हणाला.
"तेच तर..." विराजही हतबल होत म्हणाला.
अधिरानेही उसासा घेत निराशा व्यक्त केली आणि तेवढ्यात त्या दोघांनीही अधिराकडे पाहिले. त्यांची नजर ओळखून क्षणार्धात तिने जोरात नकारार्थी मान हलवली.
"प्लीज!" दोघांनीही हात जोडले. तिने तरीही नकार दिला.
त्या दोघांनी एकमेकांना इशारे केले आणि दोघेही तिला गुदगुल्या करू लागले. तशी ती खळखळून हसू लागली, तिला हसताना बघून ते दोघेही गुदगुल्या लावत हसत होते. त्यांच्या आवाजाने पूर्ण खोली भरून गेली होती तेवढ्यात त्या खोलीला जुळून असलेल्या दुसऱ्या खोलीचे दार जोरात उघडले गेले.
"तुम्ही जरा शांत नाही राहू शकत का? मला डिस्टर्ब होतंय." हुबेहूब अधिरासारखी दिसणारी तिची जुळी बहीण रुधिरा चिडून त्या तिघांवर कटाक्ष टाकत म्हणाली.
अधिरा दचकली आणि लगेच सावरून बसली.
"सॉरी." राजवीर दिलगीर स्वरात म्हणाला, तसे रुधिराने जोरातच तिच्या खोलीचे दार लावून घेतले.
"काका घरी नसले की ही रुधिरा इतकी का चिडचिड करते? ते असले की हिच्या घशातून आवाज निघत नाही आणि ते गेले की हिच्यात जणू मोंजोलिका घुसते." विराज तक्रारीच्या सुरात म्हणाला.
"तुला माहिती तर आहे सगळं... तिचाही काही दोष नाहीये यार..." राजवीर बंद दाराकडे बघत म्हणाला.
"ह्म्म. कोणाचाच काही दोष नाही आणि ज्याचा दोष आहे त्याला काही घेणं देणं नाही." विराज म्हणाला, तसा राजवीर आणि अधिराने दीर्घ श्वास घेतला.
"असो." राजवीर विषय टाळत म्हणाला.
"ह्म्म असो." विराजनेही विषय ताणला नाही.
तेवढ्यात राजवीरला काहीतरी आठवले. "अरे एक महत्त्वाचं विचारायचंच राहिलं..."
"काय?" विराजने गोंधळून पाहिले.
"बीचवर अधिराची ज्याच्याशी गाठ झाली तो क्रीप कोण होता? तू पाहिलं का त्याला?" राजवीरने गंभीरपणे विचारले.
"नाही ना यार... पाहिलं असतं तर तिथेच तुडवला असता त्याला... मुळात त्याला अधिराच्या जवळही येऊ दिलं नसतं." विराज दात ओठ खात म्हणाला.
"तू कुठे होतास तेव्हा?" राजवीरने आवाज वाढवला.
"अरे मी विचार केलेला की मी मंजुषाची भेट घेईन तोपर्यंत अधिरा बीचवर तिचं सॅंड आर्ट काढत राहील." विराज केविलवाण्या सुरात म्हणाला.
"मग तिची भेट घ्यायला इतका उशीर?" राजवीरचे डोळे विस्फारले.
"अरे नाही, तिचं घर शोधण्यातच खूप वेळ गेला. मग तिला भेटल्यावर तिच्या तब्येतीची नीट विचारपूस केली, त्यातही थोडाफार उशीर झाला." विराजने माहिती दिली.
"ह्म्म." राजवीरने विचार करत हुंकार भरला.
"पण यार बरं झालं निदान त्या मुलाचे आणि माझे कपडे सेम होते म्हणून मला काकांना थाप मारता आली." विराज सुटकेचा निःश्वास घेत म्हणाला.
"खरंच थोडक्यात वाचलो, नाहीतर बाबांनी आजच तुमचं लग्न करून द्यायला मागे पुढे बघितलं नसतं." राजवीर त्या दोघांकडे कटाक्ष टाकत म्हणाला.
"ह्म्म." विराजने कोरडा हुंकार भरला.
"काय रेड्यासारखा ह्म्म ह्म्म करतोय. तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तुला अधिराला कुठेही घेऊन जायची परवानगी दिलीय मी आणि आज तुझ्यामुळेच तिला मार पडता पडता राहिला. शिवाय त्या क्रीपचा इन्सिडंट वेगळाच..." राजवीरने विराजला हळूच कोपर मारले.
"मुद्दाम केलं का मी? आणि तू इतकं काय ओरडतोस? तुलाच तिची काळजी आहे का? तुझीच बहीण आहे का अधिरा? माझीही बहीणच आहे ती..." विराज गाल फुगवून म्हणाला.
"आणि तू बहिणीशीच लग्न करणार आहेस!" राजवीर खांदे उडवत म्हणाला, तशी तिथे एकाएकी शांतता पसरली.
क्रमशः
...........
© सेजल पुंजे
...........
© सेजल पुंजे
विराज अधिराला बहीण मानतो? म्हणजे त्यांचे लग्न त्यांच्या मनाविरुद्ध जुळवले आहे का?
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
