Login

साज़िश: गॅम्बल ऑफ लव्ह (भाग-७)

"आमच्या चिरंजीवाच्या संगतीत तुम्ही बिघडू नका, विराजराव..." का असे म्हणाले असतील सर्जेराव? राजवीरबद्दल त्यांना जिव्हाळा नाही का? अधिराची खरंच त्यांना काळजी आहे की त्यांच्या मुखवट्यामागे दडली असतील रहस्ये? जाणून घेण्यासाठी वाचत राहा "साज़िश: गॅम्बल ऑफ लव्ह"
"आजपासून परत इथे यायची काही गरज नाही. तुझं तोंड आम्हाला परत दिसता कामा नये." सर्जेराव जळजळीत कटाक्षाने दिगंबरकडे बघत बोलले. पूर्ण खोलीत त्यांचा आवाज घुमत होता.

"सुर्या..." सर्जेरावांनी त्यांच्या खास माणसाला आवाज दिला.

"हो भाऊ!" सुर्या पुढे आला.

"याचा हिशोब कर नि मोकळा कर ह्याला... परत याची सावलीही आपल्या अवतीभवती दिसता कामा नये." सर्जेरावांचा इशारा सुर्याला लगेच कळला.

"हो भाऊ!" सुर्याने मान डोलावली आणि तो दिगंबरकडे जाऊ लागला.

"भाऊ, चूक झाली भाऊ..." दिगंबर आता गयावया करू लागला; पण त्याच्या विनवणीने सर्जेराव किंवा सुर्याला पाझर फुटणार नव्हताच.

"काका, असू द्या. दिगंबर दादांनाही अधिराची काळजी होती, म्हणूनच त्यांनी फोटो काढला असेल. नका त्यांना नोकरीवरून काढू, मी समजावतो त्यांना..." विराज सर्जेरावांना समजावत बोलला.

विराजचा शब्द सर्जेराव मोडणार नव्हते, म्हणून त्यांनी सुर्याला दिगंबरपासून दूर होण्याचा इशारा केला.

विराज आता स्वतः दिगंबरजवळ गेला. त्याच्या डोळ्यातला राग बघून दिगंबरला आणखीच घाम फुटला.

"दिगंबर दादा, पुढच्या वेळी अशी चूक होता कामा नये." विराजने दिगंबरच्या खांद्यावर दाब देऊन कडक आवाजात त्याला दम दिला.

"ह... हो साहेब... चूक झाली... परत असं होणार नाही." दिगंबर हात जोडून म्हणाला. त्याने अधिराकडे बघूनही हात जोडले.

"जा आता तुम्ही..." त्याच्या दंडाला थोपटत विराज शांतपणे म्हणाला, तसा दिगंबर हात जोडून आभार व्यक्त करत अदबीने बाहेर गेला.

"विराजराव, अधिराला आमच्या नकळत एकांतात भेटण्याचं काही खास कारण? नाही म्हणजे तुम्ही आम्हाला विचारलं असतं तर आम्हीही नकार दिला नसताच." सर्जेराव मंद हसत म्हणाले.

"माहिती आहे काका; पण मला अधिराला सरप्राईज द्यायचं होतं. तिला बीचवर जायला खूप आवडतं म्हणून तिला तिथे घेऊन गेलो. तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही चार बॉडीगार्ड आमच्यासोबत पाठवले असते, अर्थात आमच्या सुरक्षेसाठीच; पण आम्हाला हवा तसा एकांत मिळाला नसता म्हणून हा खटाटोप!" विराजने स्पष्टीकरण दिले.

"ह्म्म." सर्जेरावांनी हुंकार भरून अधिराकडे पाहिले.

"यात अधिराचा काही दोष नाही, काका. मीच तिला घेऊन गेलो आणि तुम्हाला आधीच सगळं कळवलंय असं खोटंही बोललो. ती तर तुम्हाला सांगितल्याशिवाय घराबाहेर पडणार नाही, हेच म्हणत होती." सर्जेरावांची अधिरावर स्थिर असलेली नजर बघून विराज म्हणाला.

सर्जेराव मात्र अजूनही शांत होते. त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे, याचा अंदाज येत नव्हता.

"काका, काही चुकलं असेल तर मला माफ करा." विराजने हात जोडले.

"नाही, विराजराव. असू द्या. तुम्ही तुमच्या बायकोच्या आनंदासाठी हे सगळं केलं, ते आलं आमच्या लक्षात... त्यामुळे तुम्ही माफी मागू नका. फक्त पुढच्या वेळी आम्हाला कल्पना दिली तर बरं होईल, कारण जीवाला घोर लागून राहतो. आमच्या लाडक्या लेकीच्या काळजीने आम्ही एक क्षण स्वस्थ बसू शकत नाही. तिला काही झाले तर नाही ना सतत हा विचार घोंघावत असतो मनात..." सर्जेराव खोटी काळजी व्यक्त करत म्हणाले.

'यांचा अभिनय बघून यांना ऑस्कर द्यायला हवा. राजकारणात असणाऱ्याला अभिनय यायलाच हवा, असा काही अलिखित नियम आहे का?' सर्जेरावांकडे बघत विराज मनातल्या मनात बोलला.

"काका, तुमची काळजी मी समजू शकतो; पण अधिरा माझ्यासोबत असताना मी तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाही." विराज सर्जेरावांचा हात हातात घेत म्हणाला.

"ती खात्री आम्हाला आहेच, म्हणून तर आमच्या काळजाचा तुकडा आम्ही तुम्हाला सोपवलाय." अधिराकडे बघत सर्जेराव विराजला म्हणाले.

"ह्म्म." विराज अवघडून हसला.

"अधिरा, बाळा इकडे ये." सर्जेरावांनी आता अधिराला हातांनी इशारा करून जवळ बोलावले.

अधिरा अजूनही घाबरली होती. त्यांच्याजवळ जायला तिची पावले धजावत नव्हती.

तिने चोरटा कटाक्ष विराजवर टाकला आणि एकदा तिरप्या कटाक्षाने राजवीरकडे पाहिले. दोघांनीही तिला नजरेने इशारा केला, तशी ती डोळे पुसून सर्जेरावांजवळ गेली.

"माफ कर बाळा, तुझी काळजी आहे म्हणून ओरडलो. आमचे शत्रू इतके आहेत की कोण, कधी, काय करेल कशाचाही नेम नाही. शिवाय सगळ्यांना ठाऊक आहे तू आमची लाडकी आहेस म्हणून कायम धाक असतो. तुझं काही बरं-वाईट झालं तर आम्ही जगू शकणार नाही, पोरी... आज नकळत आम्ही तुझ्यावर चिडलो; पण तू नाराज नको होऊ बाळा. माफ कर आम्हाला! आम्ही परत तुला असं ओरडणार नाही." सर्जेराव तिचे डोळे पुसत बोलले; पण तिला काहीच कळले नाही म्हणून ती राजवीरकडे गोंधळून बघू लागली.

"राजवीर, सांग तुझ्या बहिणीला मी काय म्हणालो..." सर्जेराव राजवीरकडे बघत म्हणाले.

"ह्म्म." राजवीरने हुंकार भरला.

"एक मिनिट, मी बोलतो अधिराशी..." विराज म्हणाला, तसे राजवीरने सर्जेरावांकडे बघितले. त्यांनी राजवीरला नजरेनेच इशारा केला, तसा राजवीर शांत उभा राहिला.

दरम्यान विराजने अधिराकडे पाहिले आणि नकारार्थी मान हलवून तिचे अश्रू पुसले. ती अजूनही हुंदके देत होती, त्याने काही हातवारे करून तिची समजूत काढली तशी ती आता गोड हसली.

"विराजराव, तुम्ही अगदी परफेक्ट आहात आमच्या अधिरासाठी..." अधिराला हसताना बघून सर्जेराव विराजला म्हणाले.

विराजने मंद हसून त्यांच्याकडे पाहिले, त्याच वेळी त्याचे राजवीरकडे लक्ष गेले तर तो खाऊ की गिळू नजरेने त्याच्याकडे पाहत होता म्हणून लगेच त्याचे हसू मावळले.

"ह्म्म." विराजने प्रत्युत्तर म्हणून फक्त हुंकार भरला.

"कधी उडवायचा मग बार?" सर्जेरावांनी हसतच विचारले.

त्यांच्या त्या प्रश्नाने विराजचा चेहरा गंभीर झाला.

"काका, मी सांगितलंय ना जोपर्यंत अधिराचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबूयात. शिवाय माझ्या नोकरीचाही प्रश्न आहे. स्वावलंबी होऊन चार पैसे कमावण्याची ऐपत असल्याशिवाय मी अधिराच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार नाही." विराज म्हणाला, तसा सर्जेरावांनी खोल सुस्कारा घेतला.

"अहो विराजराव, तुम्ही कशाला नोकरीच्या भानगडीत पडत आहात? साळुंखे साहेबांचे उत्तराधिकारी तुम्हीच आहात. त्यांच्या सत्तेचा भार तुम्हालाच तर पुढे खांद्यावर घ्यायचा आहे." सर्जेराव म्हणाले.

"काका, माझं स्वतःचं अस्तित्त्व आहे. माझीही काही स्वप्नं आहेत. मला माझी स्वतःची ओळख स्वतः निर्माण करायची आहे, तेही बाबांच्या हस्तक्षेपाशिवाय!" विराज ठामपणे म्हणाला.

"बरं, जशी तुमची इच्छा." सर्जेराव किंचित हसत म्हणाले.

"अधिरा, तू आवर तुझं आपण कॉलेजला जातोय." राजवीर अधिराशी हातवारे करून बोलला, तशी तिने मान हलवली आणि तिच्या खोलीत निघून गेली.

"राजवीर, काय म्हणालास तू अधिराला?" सर्जेराव साशंक नजरेने त्याच्याकडे बघत होते.

"कॉलेजला जायचंय तर लवकर तयारी कर बोललो तिला..." राजवीर म्हणाला.

"ह्म्म. कॉलेजमध्ये घेऊन जात आहात तर काळजी घ्या आमच्या लेकीची..." सर्जेराव आदेशयुक्त स्वरात म्हणाले.

'तुमच्यासारखी दिखाव्याची काळजी नाही मला... माझी बहीण आहे ती, मला काळजी असणारच ना तिची!' राजवीर मनातल्या मनात म्हणाला.

"कळलं?" सर्जेरावांनी आवाज वाढवला. तसा राजवीर त्याच्या विचारातून बाहेर आला.

"ह्म्म. घेईन मी काळजी अधिराची..." राजवीर म्हणाला.

"काका, तुम्ही उगाच काळजी करत आहात. वीर आणि मी असताना अधिरा अगदी सुरक्षित आहे. तुम्ही निश्चिंत राहा." विराजने मध्यस्थी केली.

"तुमच्यावर विश्वास आहेच; पण लाडकी लेक म्हटल्यावर काळजी तर असणारच ना!" सर्जेराव म्हणाले आणि त्यांच्याही नकळत राजवीरने डोळे फिरवले.

"ह्म्म." विराजने हुंकार भरला.

"बरं, विराजराव तुम्ही काही घ्याल? चहा, कॉफी?" सर्जेरावांनी विराजला विचारले.

"नको." विराजने लगेच नकार दिला.

"घ्या हो." सर्जेराव आग्रह करू लागले.

"नाही काका... खरंच नको." विराज म्हणाला. तसा सर्जेरावांनी हुंकार भरला.

"बरं काका, मी आणि वीर आतमध्ये जातो. आम्हाला आमच्या नाटकाबद्दल चर्चा करायची आहे." विराज राजवीरकडे बघत म्हणाला.

"विराजराव त्या नाटकात काय पडलंय? आमच्या चिरंजीवांच्या संगतीत तुम्हीही बिघडू नका." सर्जेराव राजवीरवर जळजळीत कटाक्ष टाकत विराजला म्हणाले.

"असं काही नाही काका! वीरपेक्षा मलाच छंद आहे नाटकात अभिनय करण्याचा... त्याला मीच बळजबरीने नाटकात सहभाग घ्यायला सांगत असतो." विराज म्हणाला.

"बरं. जा मग, बोला तुम्ही... आमचीही बैठक आहे, आम्ही निघतो." सर्जेराव म्हणाले.

"ह्म्म." विराजने हुंकार भरला.

काहीच वेळात सर्जेराव घराबाहेर पडले. त्यांच्यासोबत बॉडीगार्ड्सचा ताफाही त्यांच्यासोबत बाहेर गेला. इतर बॉडीगार्ड्स घराबाहेर तैनात होते. आता त्या मुख्य खोलीत फक्त विराज आणि राजवीरच होते.

राजवीरने एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि तिथून जाऊ लागला. तसा विराजने त्याचा हात पकडला. दुसऱ्याच क्षणी राजवीरच्या डोळ्यात राग उतरला.

क्रमशः
..........
© सेजल पुंजे.

सर्जेरावांना खरंच अधिराची काळजी आहे की ते दिखावा करतात? राजवीर आणि विराजचे नाते कसे आहे? जर विराज आणि अधिराचे लग्न आधीपासून ठरलेले आहे तर वर्तमानात अधिरा अगस्त्यची बायको कशी काय?


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →