Login

साज़िश: गॅम्बल ऑफ लव्ह (भाग-६)

भरती येण्याची शक्यता बघून अगस्त्यने समुद्रकिनाऱ्यावर कलाकृती काढणाऱ्या मुलीला केला समजावण्याचा प्रयत्न पण एकाएकी तिने त्याच्या कानशीलात लगावली आणि पळतच निघून गेली. का?
"अगं ए, डोक्यावर पडलीस काय? जराशी अक्कल नाहीये... आपण कुठे आहोत, याचंही भान नाही का तुला? वेदर रिपोर्ट बघितली नाही का? लाटांचा ओघ बघ जरा, त्यांचा वेग बघ... कोणत्याही क्षणी त्या लाटा तुझ्या पायाला स्पर्श करतील आणि एक तू आहे की कशाची काळजीच नाही." अगस्त्य रागीट कटाक्षाने त्या मुलीकडे बघत तिच्याशी चिडून बोलला; पण ती कपाळावर आठ्या आणून त्याच्याकडे गोंधळून बघत होती.

"ठीक आहे, आर्टिस्ट चांगली आहेस आणि तुझं तुझ्या कलेवर प्रेम असेलही... कलाकृती काढताना तुला जगाचा विसर पडतही असेल; पण इतकंही अलिप्त असू नये माणसाने! मान्य केलं की समुद्राच्या दिशेने तुझी पाठ आहे म्हणून तुला जाणवलं नसेल; पण विजांचा कडकडाट आणि लाटांचा खळखळाट तर ऐकू आला नसेल ना?" त्याने तिला प्रश्न केला व तिच्या प्रतिक्रियेची वाट बघू लागला; पण एक ती होती की एकटक त्याच्याकडे गोंधळून बघत होती.

"व्हॉट रबीश! मी इथे तुझ्याशी जीव तोडून बोलतोय आणि तू मख्खासारखी बघतेय... तुला कळतंय मी काय बोलतोय ते? मराठी कळते ना? अगं बोल ना काहीतरी... मी काही बोलतोय ते कळतंय का? निदान हो किंवा नाही तरी बोल.... मूकबधिर असल्यासारखी काय वागतेस? आय नो, तू आता घाबरली आहेस म्हणून..." तो बोलतच होता की तो बोलता बोलता थांबला. त्याचे तिच्या डोळ्यांकडे लक्ष गेले.

तिच्या डोळ्यात पाणी होते आणि ती तिच्या हाताकडे बघत होती. तिच्या गोऱ्या मनगटावर लाल व्रण पडले होते. त्याची क्षणात तिच्या हातावरची पकड सैल झाली. तिने लगेच त्याच्या हाताला झटका दिला आणि घाईतच तेथून जाऊ लागली, मात्र ती दोन पावले पुढे गेलीच होती की त्याने तिचा हात परत पकडला आणि जरासा ओढला, तशी बेसावध ती त्याच्या छातीवर आदळली.

तिने अंग चोरून घेत मान वर करून थरथरतच त्याच्याकडे बघितले.

"मी तुझी हेल्प केली आणि तू अशीच निघून जात होतीस? थॅंक यू वगैरे म्हणायची पद्धत नाही का?" असे बोलून अगस्त्यने त्याच्याही नकळत तिच्या डोळ्यावर आलेली एक बट तिच्या कानामागे सारली.

त्याने तिला स्पर्श करताच तिच्या डोळ्यात राग उतरला आणि किंचित पाणीही तरळले. तिने त्याच्याकडे पाहिले आणि धाडस करून उलट्या हाताने सणसणीत त्याच्या कानाखाली मारली. अगस्त्यला तिची चापट इतकी जोरात लागली की एक क्षणभर तो सुन्न झाला आणि त्याच्या हाताच्या मुठी रागाने वळल्या.

त्याने दात ओठ खाऊन रागातच तिच्याकडे पाहिले. तिनेही त्याच्याकडे पाहिले आणि जोरात त्याला मागे ढकलून रडतच तिथून पळून गेली.

"व्हॉट द..." तो बोलतच होता; पण त्याचे वाक्य पूर्ण होण्याआधीच ती निघून गेली होती.

'हिचा काय खरंच पेच ढिला आहे का? हिने का मारलं मला? एकतर मी तिची मदत केली आणि ती बावळट माझ्याच थोबाडीत मारून गेली... आंधळ्यास सोबती केला, त्याने डोळे उपसून हाती दिला ह्यालाच म्हणत असतील... हं! सगळा मूड घालवला माझा... देवाने तिला जेवढं सौंदर्य दिलंय त्याच्या तुलनेत फक्त एक पर्सेंट अक्कल दिली असती तर बरं झालं असतं.' ती मुलगी गेली त्या दिशेने बघत अगस्त्यची बडबड सुरू होती.

'पण एक मिनिट, ती जाताना रडत होती का? पण का? थोबाडीत मी खाल्ली आणि रडत ती गेली? हाऊ स्ट्रेंज!' त्याने विचार करतच खाली बघितले आणि दुसऱ्याच क्षणी डोक्यावर हात मारला.

'ओह गॉड! मी तिच्या सॅंड आर्टवर पाय ठेवला, म्हणून तिला राग आला आणि तिने मला चापट मारली? पण मी मुद्दाम नाही केलं ना... मला तिची काळजी होती म्हणून धावत-पळत आलो ना! माणुसकी म्हणून मदत केली आणि तिने माझा गालच रंगवला. जाऊ दे अगस्त्य, आपण सुंदर मुलींपासून चार हात लांबच राहायचं.' ओठ तिरपे करून अगस्त्यने स्वतःलाच बजावले.

एकदा परत तिच्या सॅंड आर्टला बघून त्याने खोल श्वास घेतला आणि पावसाने हजेरी लावण्याआधी तेथून जाऊ लागला.

'देवा, भारी हं! सकाळी सकाळी छान विश करतोय तू मला... आज माझी वाट लावायची, हे ठरवलंच आहे बहुतेक! आधी ती मुलगी आणि आता हा पाऊस...' वैतागून आभाळाकडे बघत त्याने मनातच तक्रार केली आणि पळतच त्याच्या घरी निघून गेला.
.........

इकडे एका घरी सकाळी सकाळी प्रचंड वातावरण तापले होते.

समुद्रकिनाऱ्यावर कलाकृती काढणारी मुलगी सध्या मान खाली घालून मुळमुळ रडत होती.

"काय आहे हे? कशाला गेली होतीस तिथे?" सर्जेराव इंदलकरांचा आवाज पूर्ण घरात घुमला, तशी ती मुलगी दचकली.

तिने स्वतःला सावरले आणि हातवारे करू लागली.

"सांग लवकर काय झालं होतं?" तिचे हातवारे बघून सर्जेराव इंदलकर आणखी मोठ्याने ओरडले.

त्यांच्या आवाजाने ती आणखीच घाबरली आणि रडायला लागली.

"बाबा, ओरडू नका. अधिरा तेच सांगायचा प्रयत्न करतेय." राजवीर लगेच तिच्या वतीने बोलला.

"हा जिव्हाळा आणि हे प्रेम नारळी पौर्णिमा आणि भाऊबीजेला दाखवायचं, आता नाही. कळलं? आमचं रक्त आणखी उसळण्याच्या आधी सांग पटकन काय बोलतेय ती... नाहीतर दोघांनाही चाबकाने फोडायला मागे-पुढे बघणार नाही आम्ही!" दातावर दात घासून सर्जेरावांनी राजवीरला धमकी दिली.

ती धमकी ऐकून रागाने राजवीरच्याही मुठी वळल्या; पण त्याने त्याच्या बहिणीकडे— अधिराकडे बघितले आणि स्वतःचा राग शांत केला.

त्यानंतर तिच्याकडे बघून त्याने हातवारे केले. तीसुद्धा हातवारे करून रडतच राजवीरसोबत बोलत होती. त्याने तिचे डोळे पुसले आणि तिला नजरेनेच धीर दिला.

"अधिरा तिथे सॅंड आर्ट काढायला गेली होती बाबा..." राजवीर सर्जेरावांकडे बघत म्हणाला.

"कोणी जायला सांगितलं होतं तुला तिथे? मी तुला परवानगी दिली होती का? आणि ज्याच्या मिठीत होती तो कोण आहे? कोण आहे या फोटोतला मुलगा?" सर्जेरावांनी आवाज वाढवला.

तिला ऐकू येत नसले तरी त्यांचा रागीट चेहरा बघून ती पुरती घाबरली होती. शरीर गार पडले होते. डोळ्यातले अश्रू सतत वाहत होते.

"मला न विचारता गेलीच कशी तिथे तू?" सर्जेरावांनी अधिरावर हात उचललाच होता की राजवीर तिच्या बचावासाठी पुढे आला.

"मी भेटायला बोलावलं होतं अधिराला काका... माझ्यामुळे आणि माझ्यासाठी ती बीचवर गेली होती." दारातून एका तरुणाचा आवाज आला.

सर्जेराव, राजवीर आणि अधिरा त्याच्याकडे बघू लागले.

"विराजराव तुम्ही?" सर्जेरावांच्या चेहऱ्यावरचे हावभाव क्षणात बदलले.

"तुम्ही मला विराजच म्हणा काका..." विराज उसने हसून आत येत म्हणाला.

"असं कसं? जावई आहात तुम्ही आमचे... मान तर द्यायलाच हवा." सर्जेराव मंद हसून म्हणाले.

"ह्म्म." विराजने कोरडा हुंकार भरला आणि अधिराकडे बघू लागला.

तिच्या डोळ्यात अश्रू बघून त्याचा राग उफाळून आला; पण त्याने रागावर संयम ठेवला.

"ते विराजराव, तुम्ही काय म्हणालात... तुम्ही भेटायला बोलावलं होतं अधिराला तिथे?" सर्जेरावांच्या ओठांवर हसू असले तरी कपाळावर आठ्या होत्या.

"हो काका! इन फॅक्ट मीच तिला इथून पिक केलं." विराज ठामपणे बोलला.

"पण बीचवर का? तेही भल्या पहाटेच?" सर्जेरावांनी नजर रोखली.

"सहज... खरंतर, अधिराला सॅंड आर्ट काढायचा छंद आहे ना काका, म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. राहिला प्रश्न या फोटोचा तर फोटोतला हा मुलगा मीच आहे. अधिरा माझ्यासोबतच होती इतका वेळ, काका." विराज म्हणाला. त्याचे उत्तर ऐकून सर्जेराव गोंधळले.

"काय? पण अधिराचा बॉडीगार्ड, हा दिगंबर बोलला की..." सर्जेराव बोलतच होते की विराज बोलायला लागला.

"तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का काका? मान्य की हा फोटो अधिराच्या बॉडीगार्डने दुरून काढलाय, म्हणून माझा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये; पण कपडे तर ओळखू येत असतील ना? बघा, माझे कपडे आणि फोटोतले कपडे सारखेच आहेत, कारण हा मीच आहे." विराजने स्वतःच्या शर्टकडे इशारा करून फोटोतल्या मुलाच्या कपड्यातले साधर्म्य दाखवले.

"हो विराजराव बरोबर बोललात तुम्ही... हे आमच्या लक्षातच आलं नाही." सर्जेराव फोटो निरखून बघत म्हणाले.

त्यांची खात्री होताच राजवीर आणि विराजने सुटकेचा श्वास घेतला. अधिरा मात्र अजूनही घाबरलेली होती.

तेवढ्यात सर्जेरावांनी अधिराच्या बॉडीगार्डला— दिगंबरला सणसणीत चापट मारली. त्यांनी इतक्या जोरात चापट मारली की दिगंबरच्या ओठांतून रक्त बाहेर पडले आणि क्षणात तिथले वातावरण गंभीर झाले.

क्रमशः
.........
© सेजल पुंजे

कोण आहेत सर्जेराव इंदलकर आणि अधिराला बॉडीगार्डची काय गरज? विराज कोण आहे? अधिराचे विराजशी लग्न झाले आहे का? तो का तिची बाजू घेत होता? यात त्याचा व्यक्तिगत स्वार्थ असावा का?



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →